शतवार्षिक युद्ध, यूरोपीय : इंग्लंड व फ्रान्स या दोन देशांत इ.स. १३३७ ते १४५३ यांदरम्यान चाललेला प्रदीर्घ संघर्ष. हा संघर्ष एक अखंड युद्ध नसून युद्धपर्व होते. फ्रान्सच्या गादीवर कोणाचा हक्क असावा, या प्रश्नावरून या युद्धास सुरूवात झाली पण पुढे हा संघर्ष राजघराण्यांतला न राहता तो राष्ट्राराष्ट्रांतील राजकीय व आर्थिक संघर्ष ठरला.

फ्रान्सचा चौथा चार्लस निपुत्रिक मरण पावल्यामुळे (१३३८) वारसासंबंधी वाद उद्भवला. इंग्लंडचा तिसरा एडवर्डने आईकडून गादीसाठी हक्क सांगितला पण सॅलिक कायद्याप्रमाणे मुलीकडून वारसा मान्य नसल्याने एडवर्डला नकार मिळाला. कायद्याचे ते निमित्त होते. चार्लसचा चुलतभाऊ आणि व्हाल्वा घराण्यातील सहावा फिलिप (कार. १३२८ – ५०) यास फ्रान्सच्या उमरावांनी गादीवर बसविले परंतु एडवर्डची फ्रेंच-गादीची अभिलाषा गेली नसल्याने फ्लँडर्समधील व्यापाऱ्याच्या चिथावणीवरून त्याने युद्ध आरंभले (१३३७).

इ.स. १३६० पर्यतची परिस्थिती इंग्रजांना फार अनुकूल होती. तेथील उमराव राजनिष्ठ असल्यामुळे इंग्लंडच्या डावपेचांत एकसूत्रीपणा होता. उलट फ्रेंच उमराव राजनिष्ठ नसल्यामुळे त्यांची बाजू कमकुवत राहिली. इंग्लंडचे सुघटित व सुसज्ज धनुर्धारी पायदळ अश्वारुढ फ्रेंच उमरावांविरूद्ध प्रभावी ठरले. स्ल्युस, क्रेसी, प्वात्ये येथे महत्त्वाचे विजय इंग्रजांना मिळाले. कॅले त्यांच्या हाती पडल्याने फ्रान्सचा हमरस्ता त्यांना खुला झाला. प्वात्ये येथे खुद्द जॉन राजा इंग्रजांच्या हाती सापडला (१३५६). शेवटी ब्रेतिन्यीच्या तहाने फार मोठा मुलूख इंग्रजांना मिळाला परंतु ह्या अपमानाची प्रतिक्रिया होऊन फ्रेंचाची अस्मिता जागृत झाली.

जॉननंतरचा फ्रेंच राजा पाचवा चार्ल्‌स (कार. १३६४ –८०) याने सैन्यात सुधारणा केली व युद्धतंत्र बदलले. इ.स. १३६९ – ७५ या काळात बेयोन, बॉर्दो, कॅले व आसपासचा मुलूख एवढाच प्रदेश इंग्रंजांच्या हाती राहिला. पाचव्या चार्लसच्या मृत्यूनंतर फ्रान्समध्ये पुन्हा यादवी माजली. युवराज चार्लस अज्ञान होता. त्याचे चुलते आपापसांत भांडू लागले. पुढे राजपद मिळाल्यावर सहाव्या चार्लसला वेड लागले (१३९२). इंग्लंडच्या पाचव्या हेंरीने या संधीचा फायदा घेऊन फ्रान्सच्या गादीवर हक्क सांगितला व अँजनकोर्त येथे फ्रेंचांचा पराभव केला (१४१५). शेवटी त्र्वा येथे तह होऊन सहाव्या चार्लसनंतर फ्रान्सचे राजपद डॉफिन (युवराज चार्लस) याजकडे न जाता हेंरीस मिळावे, असे ठरले. इंग्लंडच्या कोणत्याही राजास फ्रांसमध्ये इतके यश मिळाले नव्हते परंतु इ.स. १४२२ मध्ये सहावा चार्लस व पाचवा हेंरी हे दोघेही मरण पावल्यामुळे पुन्हा पेचप्रसंग ओढावला.

या वेळी जोन ऑफ आर्क या महिलेने डॉफिन व त्याच्या सेनापतीचा आत्मविश्वास जागविला. इंग्रजांचा अनेक ठिकाणी त्यांनी पराभव केला व डॉफिनला सातवा चार्लस (कार. १४२२–६१) म्हणून राज्याभिषेक करविला. (१४२९). पुढे कांप्येन्यच्या लढाईत ती इंग्रजांच्या हाती सापडली. चेटूक करणारी स्त्री म्हणून तिच्यावर आरोप ठेवण्यात येऊन तिला जिवंत जाळले. (१४३१). जोनच्या हौतात्म्याचा फ्रेंच जनमानसावर विलक्षण परिणाम होऊन त्यांच्यामध्ये नैतिक एकात्मता प्रकटली. ड्यूक ऑफ बर्गडीने इंग्रजी सत्तेशी जुळते घेतले. इ.स. १४५० मध्ये नॉर्मंडी व इ.स. १४५३ मध्ये ग्येन हे प्रांत पुन्हा फ्रान्सच्या ताब्यात आले. फक्त कॅले इंग्रजांच्या ताब्यात राहिले. या दीर्घकालीन संघर्षामुळे इंग्लंड व फ्रान्स यांचे संबंध दुरावले. फ्रान्समध्ये राष्ट्रीय भावना फैलावली. तेथील उमराव सत्ता खिळखिळी झाली व राजसत्ता प्रबळ झाली. युद्धकालीन भाववाढीमुळे पश्चिम युरोपातील देशांची आर्थिक स्थिती बिघडली. कित्येक ठिकाणी शेतकऱ्यांची बंडे झाली. पोपलाही भाववाढीची झळ लागल्यामुळे आपली चैन चालू ठेवण्यासाठी भाविकांवरील करभार वाढवावा लागला. त्यामुळे पोपच्या सत्तेचा नैतिक पाया डळमळीत झाला.

पाहा : ग्रेट ब्रिटन (इतिहास) जोन ऑफ आर्क फ्रान्स (इतिहास).

संदर्भ : Allmand, C. The Hundred Years of War, Cambridge, 1988.

पोतनीस, चं. रा.