व्हरॉ ट् स्ला फ : पोलंडमधील चौथ्या क्रमांकचे मोठे शहर व व्हरॉट्स्लाफ परगण्याची राजधानी. लोकसंख्या ६,३९,४०० (१९९७). पोलंडच्या नैर्ऋत्य भागात, वॉर्सापासून नैर्ऋत्येस ३२० किमी. अंतरावर, ओडर नदीकिनारी असलेल्या सुपीक प्रदेशात हे वसले आहे. ओडरच्या दोन्ही तीरांवर शहराचा विस्तार असून येथेच ओलाव्हा, स्लेझा, बिस्चित्सा व विदावा या नद्या ओडरला येऊन मिळतात.
व्हरॉट्स्लाफ येथे सापडलेल्या पुरावशेषांवरून येथील वस्ती अश्मयुगापासून असावी. नवव्या शतकात हे पोलंडचा एक भाग बनले. मध्ययुगाच्या सुरुवातीच्या काळत सुरक्षित नदी-बेटावरील व्यापारी केंद्र म्हणून त्याचा विकास झाला. त्या वेळी रोमन साम्राज्य ते बाल्टिक समुद्र तसेच काळा समुद्र व पश्चिम युरोप यांदरम्यान व्यापारी मार्गावरील हे प्रमुख ठिकाण होते. ११३८ मध्ये व्हरॉट्स्लाफ ही संपूर्ण सायलीशियाची पहिली राजधानी बनली. १२६१ मध्ये शहराला स्वयंशासनाचा अधिकार मिळाल्याने त्याची भरभराट होऊन विस्तारही झाला. शहराच्या मध्यभागी मोठी बाजारपेठ असून तेथेच चौदाव्या-पंधराव्या शतकांत गॉथिक नगरभवन बांधण्यात आले. पुढे काही सत्तांतरे होऊन १८७१ मध्ये हे शहर जर्मनीचा भाग बनले. जर्मन लोक त्याला ब्रेस्लौ असे म्हणत. पुढे नेपोलियनच्या नेतृत्त्वाखाली काही काळ ते फ्रान्सच्या ताब्यात होते. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस रशियन सैन्याने ८४ दिवस शहरास वेढा घातला होता. दुसऱ्या महायुद्धकाळात शहराची प्रचंड हानी झाली. नंतर हे शहर पुन्हा पोलिश प्रशासन व्यवस्थेखाली आले. (१९४५).
येथील गॉथिक कॅथीड्रल (१२४४ –७२), सेंट क्रॉस, सेंट मेरी मॅग्डेलन आणि सेंट एलिझाबेथ ही चर्चे, गॉथिक नगरभवन (चौदा-पंधरावे शतक) आणि व्हरॉट्स्लाफ विद्यापीठाच्या बरोक वास्तुशैलीतील इमारत (१७२८ – ३६) उल्लेखनीय आहेत. व्हरॉट्स्लाफ हे एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्रही आहे. अभिनय-प्रशिक्षण व नाट्यनिर्मितीचे केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले ‘पोलिश लॅबोरेटरी थिएटर’ येथेच आहे.
यांत्रिक अभियांत्रिकी, अवजड यंत्रनिर्मिती, विद्युत अभियांत्रिकी, रेल्वे एंजिने व डबे, स्वयंचलित यंत्रे, ओतशाळा, संगणक निर्मिती, धातुप्रक्रिया, ताम्रउद्योग, रसायने, वस्त्रोद्योग, खाद्यपदार्थनिर्मिती इ. उद्योगधंदे येथे चालतात. एक विज्ञानकेंद्र म्हणूनही येथील वनस्पतिविज्ञान संस्था व प्राणिसंग्रहालय महत्त्वाचे आहे.
चौधरी, वसंत