व्हेरोना : इटलीच्या उत्तर भागातील व्हेनटो विभागातील व्हेरोना प्रांताची राजधानी. लोकसंख्या २,५५,४९२ (१९९२). मिलानपासून पूर्वेस १४५ किमी. तसेच व्हेनिसच्या पश्चिमेस आदीजे नदीच्या अर्धवर्तुळाकार वळणाच्या भागात, नदीच्या दोन्ही काठांवर हे शहर वसले आहे. शहराच्या उत्तर बाजूस लेसिनी पर्वताच्या टेकड्या, तर दुसऱ्या बाजूस पो नदीखोऱ्याचा मैदानी प्रदेश आहे.

युगानेई किंवा रेती या प्राचीन जमातीने व्हेरोना वसविले असावे. इ. स. पू. ८९ मध्ये रोमनांनी ही वसाहत काबीज केली. इटली व उत्तर युरोप यांदरम्यानच्या प्रमुख रस्त्यांवरील हे प्रमुख स्थानक असल्यामुळे याचे महत्त्व वेगाने वाढत गेले. रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर ऑस्ट्रोगॉत टोळीचा राजा थीओडोरिक याने इ. स. ४८९ मध्ये हे ताब्यात घेतले. त्याने बांधलेल्या किल्ल्याच्या जागेवरच आजचा कास्तेल सान प्येत्रो हा आदीजे नदीकाठावरील किल्ला आहे. पुढे शार्लमेन राजाने ७७४ मध्ये यावर ताबा मिळविला. दहाव्या शतकात पहिला ऑटो या सम्राटाने व्हेरोना बव्हेरियाच्या ड्यूकला दिले. बाराव्या शतकाच्या प्रारंभी जहागिरदार, जमीनमालक व नवोदित व्यापारी यांच्या सहकाऱ्यामुळे हे एक स्वतंत्र कम्यून बनले.

व्हेनटो, व्हेरोना व इतर नगरांनी मिळून व्हेरोनीज लीगची स्थापना केली (११६४). तिचेच पुढे जर्मनविरोधी लाँबर्डी लीगमध्ये रूपांतर झाले (११६७). ग्वेल्फ (पोपचे समर्थक) व गिबलिन (राजसत्ता पक्ष) यांच्यातील प्रारंभीच्या संघर्षाची झळ या नगराला बसली. शेक्सपिअरच्या रोमिओ अँण्ड ज्युलिएट नाटकात या सत्तासंघर्षाची पार्श्वभूमी आहे. व्हेरोना ग्वेल्फ पक्षाचे होते. स्कॅलजर (देलास्काला) घराण्याच्या अमलाखालील काळ हा शहराच्या राजकीय व कलाक्षेत्रीय इतिहासातील विशेष संपन्न काळ म्हणावा लागेल. बार्तोलोमीओ देलास्काला याच्या कारकिर्दीत रोमिओ माँतग्यू व ज्युलिएट कॅप्युलेट यांची शोकात्म प्रेमकहाणी येथे घडल्याच्या दंतकथा सांगितल्या जातात. तसेच येथील तथाकथित ज्युलिएटचे थडगे, रोमिओचे घर व ज्युलिएटचे घर म्हणून विशिष्ट वास्तू दाखविल्या जातात. १४०५ मध्ये व्हेरोनाने व्हेनिसची सत्ता मान्य केली. व्हेनिसच्या दीर्घ राजवटीत (१४०५ ते १७९६) व्हेरोनाला शांतता व समृद्धी लाभली. १७९७ मध्ये हे ऑस्ट्रियाच्या ताब्यात आले. १८०१ ते १८१४ हा काळ वगळता १८६६ पर्यंत ऑस्ट्रियाचीच सत्ता त्यावर राहिली. रशिया, प्रशिया, ऑस्ट्रिया व ब्रिटन यांच्या चतुष्ट संघाची (क्वाड्रुपल अलायन्स) अखेरची सभा व्हेरोना येथेच १८२२ मध्ये भरली होती. १८६६ मध्ये हे शहर इटलीच्या राज्याला जोडण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या हवाई हल्ल्यांचा रोख व्हेरोनाकडेही होता. परतीच्या जर्मन सैन्याने आदीजे नदीवरील नऊ पूल उडवून दिले, त्या वेळी व्हेरोनाची प्रचंड हानी होऊन अनेक ऐतिहासिक स्मारकांना झळ पोहोचली. महायुद्धोत्तर काळात शहराची पुनर्बांधणी करण्यात आली.

अभियांत्रिकी, रसायने, कागद, साखर, औद्योगिक व कृषी यंत्रे, फर्निचर, अन्नप्रक्रिया, छपाई, चामडी उत्पादने, औषधे, प्लॅस्टिक इ. उद्योगधंदे या शहरात चालतात. कलाकुसरीचे फर्निचर, सोने, रूपे वगैरे मौल्यवान धातू व संगमरवरी दगडांवरील कोरीवकाम हे उद्योगही येथे विकसित झालेले आहेत. व्हेरोनामधून मध्य युरोपकडे फळे व भाजीपाला पाठविला जातो. धान्यबाजार तसेच १८९८पासून दर वर्षी भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृषि-जत्रा व घोड्यांच्या बाजारासाठी व्हेरोना प्रसिद्ध आहे.

प्राचीन रोमन अवशेषांसाठी व्हेरोना प्रसिद्ध आहे. प्राचीन रंगमंडल किंवा प्रेक्षागार, इ. स. पू. पहिल्या शतकातील आर्को देई गवी ही कमान-वास्तू, पोर्ता देई बोरसरी हे प्राचीन रोमन वेशीचे प्रवेशद्वार आणि आदीजे नदीच्या डाव्या तीरावरील रंगमंदिर हे येथील उल्लेखनीय रोमन अवशेष. आधुनिक संगीतनाटकगृह म्हणून प्राचीन रंगमंडल पुन:स्थापित करण्यात आलेले असून त्यातील ४४ रांगांमध्ये २२,००० प्रेक्षक बसू शकतात. दर वर्षी येथे संगीतिका-समारंभ भरतो. प्याझा देले एर्ब हा शहरातील अतिशय सुंदर आणि गजबजलेला चौक असून तेथे इतिहासकालीन वेधक कारंजे आहे. प्याझा देइ सिगनोरी चौकाचा थाट मात्र शाही आहे. अतिभव्य कास्तेलव्हेचिओ गढी (१३५४ – ७५) येथे आहे. येथील तांबड्या विटांमधील रोमन व गॉथिक वास्तू नमुनेदार आहेत. पाचव्या शतकातील मूळ रोमनेस्क सॅन झीनो मॅगीओर चर्च प्रसिद्ध आहे. रोमनेस्क गॉथिक कॅथीड्रल चर्च ऑफ सॅन गिऑर्गिओखेरीज व्हेरोनात अनेक प्रसिद्ध अशा ऐतिहासिक चर्च-वास्तू आहेत. येथील ग्रंथालय यूरोपातील सर्वांत जुन्या ग्रंथालयांपैकी एक आहे.

मध्ययुगीन काळात चित्रकलेबाबत व्हेरोनाचा लौकिक मोठा होता. चौदाव्या व पंधराव्या शतकांत येथील भित्तिचित्रकलेने उत्कर्षाचे शिखरच गाठले होते. फ्रा जोकोंदो व मीकेले साममीकेली हे वास्तुविशारद, पीसानेल्लो, पाओलो व्हेरोनेझे (पाओलो काल्यारी किंवा कॅलीआरी) व अँड्रीआ  मोन्तेन्या हे चित्रकार व्हेरोनातील प्रसिद्ध कलावंत होत. 

चौधरी, वसंत