पॉल व्हीदाल द ला ब्लांशव्हीदाल द ला ब्लांश, पॉल : (२२ जानेवारी १८५४– ५ एप्रिल १९१८). प्रसिद्ध फ्रेंच भूगोलज्ञ. पूर्ण नाव पॉल व्हीदाल द ला ब्लांश. दक्षिण फ्रान्समधील पेत्सेनास येथे जन्म. पॅरिसमध्ये इतिहास व भूगोलाचे अध्ययन. अध्ययनाच्या हेतूने त्याने अथेन्स, भूमध्य सागरी प्रदेश, ⇨ रोम, बाल्कन द्वीपकल्प,⇨ सिरिया, पॅलेस्टाइन इत्यादी ठिकाणी कमी-अधिक काळ वास्तव्य केले. सुएझ कालव्याच्या उद्घाटनाला तो हजर होता.

फ्रान्सला परतल्यानंतर आंझे येथे, नंतर नॅन्सी व पॅरिस येथे त्याने भूगोलाचे अध्यापन केले. १८९८ ते १९१८ या काळात तो सॉर्बाँ येथे भूगोलाचा प्राध्यापक होता. भारताची १८७१ मध्ये झालेली पहिली जनगणना या विषयावर व्हीदालने एक लेख प्रसिद्ध केला होता (१८७७). हेच त्याचे पहिले भौगोलिक लेखन होय. या लेखात त्याने लोकसंख्येच्या वितरणावरील सामाजिक परंपरा, चालीरीती आणि प्राकृतिक पर्यावरणाच्या परिणामांचा ऊहापोह केला आहे. इटेप्स इट नेशन्स दे आम युरोप (१८८९) या पुस्तकात त्याने भूमध्य सागरी हवामानाचा फ्रान्सच्या ग्रामीण लोकजीवनावरील परिणाम आणि विविध ऎतिहासिक कालखंडांत झालेले लोकसंख्येचे स्थलांतर, त्यांतील प्रादेशिक घटकांचा प्रभाव इ. विषय हाताळले आहेत.

ऎतिहासिक व भौगिलिक असे दोन स्वतंत्र विभाग असलेला ॲटलास जनरल व्हीदाल ला ब्लांश हा त्याचा प्रसिद्ध नकाशासंग्रह (१८९४). तत्पूर्वी १८९२मध्येच त्याने ॲनल्स ऑफ जिऑग्रफी (इं. शी.) हे नियतकालिक सुरू केले होते. फ्रान्सच्या भूगोलाचे संक्षिप्त वर्णन त्याच्या जिऑग्रफी ऑफ फ्रान्स (इं. शी.) या पुस्तकात आहे. (१९०३). हिस्टरी ऑफ फ्रान्स (इं. शी) या ग्रंथाच्या पहिल्या खंडात त्याने फ्रान्सच्या प्रादेशिक भिन्नतेचा अतिशय मार्मिकपणे वेध घेतला. याच संदर्भातील ईस्टर्न फ्रान्स (इं. शी) हे त्याचे एक महत्त्वाचे पुस्तक. प्रिन्सिपल्स ऑफ ह्यूमन जिऑग्रफी (इं. शी. १९२६) या पुस्तकात व्हीदालचे अनेक शोधनिबंध संकलित केलेले आहेत. व्हीदालने सुरू केलेला जिऑग्रफी युनिव्हर्सल (इं. शी.) हा विश्व भूगोलकोश ल्यूसीएन गॅलॉइस याने पुढे पूर्ण केला (१९२७ – ४८).

नैसर्गिक पर्यावरण व मनुष्यव्यवहार यांच्या परस्पर-संबंधाच्या सखोल अभ्यासासाठी व्हीदालने आपले आयुष्य वेचले. माणसाला नैसर्गिक पर्यावरणामध्ये इष्ट ते बदल घडवून आणता येतील व पुढे जाता येईल, असा शक्यतावाद त्याने मांडला. त्याच्या मते निसर्गाचे रहस्य जाणून त्यानुसार व्यवसाय राखण्याची कुवत मानवात असते. आपली बुद्धिमत्ता, कलाकौशल्य व सामर्थ्य यांच्या जोरावर तो निसर्गावर विजय मिळवू शकतो. व्हीदालने भूगोलाच्या अभ्यासात मानवाला केंद्रस्थान दिले. त्यामुळेच त्याला मानवी भूगोलाचा प्रवर्तक मानले जाते. आधुनिक भूगोलाच्या विकासावर त्याचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे. फ्रान्समध्ये त्याला मोठी शिष्यपरंपरा लाभली.   

चौधरी, वसंत