व्हीबॉर्ग : व्हीपरी. रशियाच्या सेंट पीटर्झबर्ग (लेनिनग्राड) प्रांतातील (ओब्लास्ट) एक शहर व सागरी बंदर. लोकसंख्या ८१,००० (१९८७ अंदाज). फिनलंडच्या आखातातील व्हीबॉर्ग उपसागराच्या शिरोभागी हे वसले आहे. कारीलीअन संयोगभूमीवर फिनलंडच्या आखाताला जेथे साइमा कालवा मिळतो, तेथे व्हीबॉर्गचे स्थान आहे. हे शहर सेंट पीटर्झबर्गपासून वायव्येस ११३ किमी. वर असून येथून जवळच फिनलंडची सरहद्द लागते.
बाराव्या शतकात याची स्थापना झाली. १२९३ मध्ये स्वीडिश अमलाखाली येथे एक किल्ला बांधण्यात आला. १४७७मध्ये या नगराला तटबंदी करण्यात आली. १४९३ मध्ये याला नागरी हक्क प्राप्त झाले. १७१० मध्ये पहिला पीटर द ग्रेट याने येथील किल्ला ताब्यात घेतला. तेव्हापासून व्हीबॉर्ग हे रशियाच्या आधिपत्याखाली आले. फिनलंडच्या सत्तेखाली (१९१८ – ४०) असताना व्हीपरी या नावाने ते ओळखले जाई. १९३९-४०मधील सोव्हिएट– फिनिश युद्धानंतर १२ मार्च १९४० रोजी व्हीबॉर्ग सोव्हिएट युनियनला जोडण्यात आले. दुसऱ्या महायुद्धकाळात फिनलंडने पुन्हा व्हीबॉर्गवर ताबा मिळविला. या काळात शहराची खूप हानी झाली. १९४४पासून मात्र हे सोव्हिएट युनियनच्या ताब्यात राहिले.
व्हीबॉर्गमध्ये जहाजदुरुस्ती, लाकूड चिरकाम, लाकडी सामान, कागद, कृषियंत्रे, खाद्यपदार्थ उत्पादने, सुगंधी द्रव्यनिर्मिती, तंबाखू प्रक्रिया, पीठ-उत्पादन, विद्युत्-उपकरणे निर्मिती इ. उद्योग चालतात. हे प्रमुख मासेमारी बंदर असून तेथून लाकडाची निऱ्यात होते. डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत पाणी गोठल्यामुळे बंदर वाहतुकीस बंद होते. या बंदराची खोलीही कमी आहे. त्यामुळे आजूबाजूच्या बंदरांचा विकास केला जात आहे. हेल्सिंकी (फिनलंड) व सेंट पीटर्झबर्ग यांना जोडणाऱ्या लोहमार्गावरील हे प्रमुख स्थानक आहे. अनेक ऐतिहासिक वास्तू या शहरात आढळतात. त्यांपैकी तेराव्या शतकातील गॉथिक किल्ला उल्लेखनीय आहे. व्हीबॉर्ग येथील उन्हाळे शीतल, तर हिवाळे सौम्य असतात. समुद्रकिनाऱ्यावर सुंदर पुळणी आहेत. क्षयरोग्यांचे आरोग्यधाम म्हणून व्हीबॉर्ग विशेष प्रसिद्ध आहे.
चौधरी, वसंत
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..