व्हीनस : एक प्राचीन पौराणिक रोमन देवता. इ. स. पू. तिसऱ्या शतकापासून ⇨ ॲफ्रोडाइटी ह्या ग्रीक देवतेचेच व्हीनस हे रोमन रूप मानले जाऊ लागले. पहिल्या प्यूनिक युद्धाच्या वेळी (इ.स.पूर्व २६४ – २४१) रोमनांना ॲफ्रोडाइटी ह्या देवतेचा परिचय सिसिलीमध्ये झाला. तिथे माउंट एरिक्सवर तिचे मंदिर होते. व्हीनसचा निर्देश असलेले आरंभीचे जे कोरीव लेख मिळतात, त्यांत तिच्या नामनिर्देशात इतर काही देवतांच्या नावांची जोड दिलेली दिसते. उदा. व्हीनस लोव्हिआ, व्हीनस केर्रिआ. लोव्हिआ ह्या शब्दाने रोमन देवता-समूहातील सर्वश्रेष्ठ देवाचा निर्देश होतो, तर केर्रिआ ह्या शब्दाने कीरीस ह्या देवतेचा निर्देश होतो. या जोडनावांच्या देवदेवतांचे विशिष्ट स्वभावधर्म व्हीनसमध्ये सामावले असल्याचे मानले जाई. ह्याचाच अर्थ, व्हीनस ही आरंभी स्वतंत्र देवता नसावी. त्यामुळेच पुढे सर्वसाधारणपणे प्रेमाची देवता म्हणून तिला मान्यता मिळाली आणि तिच्या ह्याच भूमिकेवर लॅटिन कवींनीही विशेष भर दिला. तथापि प्रेमाची देवता म्हणूनही तिची भूमिका मुळात मऱ्यादित होती. समाजाने घालून दिलेल्या चौकटीत जे प्रेम योग्य प्रकारे बसेल, अशा प्रेमाला संरक्षण देणे, ही त्या भूमिकेची सीमा होती. तथापि रोममध्ये तिचा जो संप्रदाय निर्माण झाला, त्याने व्हीनसला बहुविध भूमिका बहाल केल्या. रोममधील तिचे सर्वांत प्राचीन मंदिर इ. स. पू. २९५ मध्ये बांधण्यात आले आणि त्या बांधकामाचा खर्च व्यभिचाराचा आरोप सिद्ध झालेल्या स्त्रियांवर बसवलेल्या दंडाच्या रकमांतून भागविण्यात आला. इ. स. पू. दुसऱ्या शतकात रोममधील गणिका आपणास सौंदर्य, चातुर्य मिळावे, म्हणून व्हीनसची पूजा करु लागल्या. पुढे इतर संदर्भातील तिचे महत्त्वही वाढीला लागले. व्हीनसचे उपर्युक्त मंदिर ईडाइल (रोममधील एक अधिकारी) क्विंटस फेबिअस गुर्गेस ह्याने बांधले, कारण अधिकारपदानुसार कर्तव्यपालन करण्याच्या बाबतीत व्हीनसने त्याच्यावर अनुग्रह दाखवून साहाय्य केले, अशी त्याची श्रद्धा होती. दुसऱ्या प्यूनिक युद्धाच्या काळात (२१८-२०१ इ. स. पू.) रोमनांची संरक्षक देवता म्हणून ती ओळखली जाऊ लागली, असे दिसते.
कुलकर्णी, अ. र.