व्हिक्टोरिया-३ : हिंदी महासागरातील मादागास्कर बेटाच्या उत्तरेस असलेल्या सेशल्स प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या २८,००० (१९९९ अंदाज). द्वीपसमूहातील माहे या सर्वांत मोठ्या बेटाच्या ईशान्य किनाऱ्यावर व्हिक्टोरिया हे शहर वसलेले आहे. बेटावरील एकूण लोकसंख्येपैकी तीन चतुर्थांश लोक व्हिक्टोरियामध्ये राहतात. हे एक खोल सागरी बंदर असून एकाच वेळी चार मोठी जहाजे यात नांगरता येतात. २१० मी. लांबीच्या सागरी जहाजांच्या सोयीसाठी १९७५ मध्ये या बंदराची पुनर्रचना करण्यात आली. व्हिक्टोरियाजवळच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. देशातील हे एक प्रमुख व्यापारी व सांस्कृतिक केन्द्र असून येथे एक रुग्णालय व एक शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय आहे. माहे बेटावरील प्रमुख स्थळांशी हे नगर फरसबंदी रस्त्यांनी जोडलेले आहे.
चौधरी, वसंत