वॉल्ट व्हिटमनव्हिटमन , वॉल्ट : (२१ मे १८१९ – २६ मार्च १८९२). विख्यात अमेरिकन कवी. मूळ नाव वॉल्टर व्हिटमन. लेखन वॉल्ट व्हिटमन ह्या नावाने.  अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातील वेस्ट हिल्स, लाँग आयलँड येथे जन्म. बालपण व शिक्षण ब्रुकलिनमध्ये. छापखान्यातील जुळारी, शिक्षक, पत्रकार म्हणून त्याने काम केले. आरंभीच्या त्याच्या कविता सामान्य, अनुकरणात्मक होत्या. त्यानंतर बायबल, होमरची महाकाव्ये, गीता व हिंदू तत्त्वज्ञानावरील अन्य साहित्य, तसेच ⇨राल्फ वॉल्डो एमर्सनचे निबंध अशा विपुल वाचनातून त्याची काव्यदृष्टी बदलली, विकसित झाली. खलाशी, कामगार अशा सर्वसामान्य स्तरांतील लोकांत मिसळल्याने त्याची जीवनदृष्टीही व्यापक झाली. लीव्ह्ज ऑफ ग्रास (१८५५) हा त्याचा काव्यसंग्रह. एक खराखुरा अमेरिकन कवी उदयाला आल्याची साक्ष ह्या संग्रहाने पटविली. त्यातील कविता अमेरिकन नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या आहेत. विशाल ह्रदयी व्यक्ती बनण्याचा संदेश ह्या कवितांतून दिलेला आहे. एक प्रकारचे एकाकीपण अनुभवत असतानाच भोवतालच्या सर्वसामान्यांच्या जीवनात हा कवी सहभागी होत असल्याचा प्रत्यय त्याच्या ह्या कविता वाचताना येतो. ह्या काव्यसंग्रहात त्याने वेळोवेळी नव्या कवितांची भर घातली आणि त्यांचे परिष्करण केले, हे त्या काव्यसंग्रहाच्या पुढील आवृत्त्यांवरून दिसते. ड्रम टॅप्स (१८६५) आणि सीक्वेल टू ड्रम टॅप्स (१८६५) हे त्याचे अन्य उल्लेखनीय काव्यसंग्रह. अमेरिकेतील यादवी युद्धाच्या काळात व्हिटमनने जखमी शिपायांच्या शुश्रूषेचे कार्य तळमळीने केले होते. युद्धाच्या दुःखमयतेची अस्वस्थ करणारी जाणीव ड्रम टॅप्समधून येते. सीक्वेल टू ड्रम टॅप्समध्ये अब्राहम लिंकनवर त्याने लिहिलेली विख्यात विलापिका अंतर्भूत आहे.

‘पॅसेज टू इंडिया’ ही व्हिटमनची एक महत्त्वाची कविता. तीत त्याने विज्ञानामुळे घडून आलेल्या तीन महान घटनांचा गौरव केला : (१) युनियन पॅसिफिक रेल्वेमार्गाचा पूर्ण झालेला प्रकल्प. (२) युरोप आणि आशिया ह्यांना जोडणारा सुएझ कालवा आणि (३) अमेरिका व युरोप ह्यांना जोडणारी अटलांटिक केबल. व्हिटमनला ह्या तीन घटना म्हणजे संपूर्ण मानवजातीच्या ऎक्याचे प्रतीक वाटत होत्या. अनेक शतकांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेरीस माणसाने निसर्गाशी सुसंवाद आणि एकात्मता साधली आता ईश्वराशी–त्या अतिशाली तत्त्वाशी–आध्यात्मिक एकात्मता साधायची आहे, अशी भावना त्याने ह्या कवितेत व्यक्त केली आहे.

लोकशाही व सामान्य माणूस ह्यांवर नितान्त श्रद्धा, स्वत्वाची दक्षतेने जपणूक, पददलितांविषयी तळमळ, स्त्रियांच्या समान हक्कांवरील निष्ठा, शिष्टसंमत धर्माविरुद्ध बंडखोरी, हिंदू तत्त्वज्ञानाच्या संस्कारांतून आलेला एक प्रकारचा गूढवाद हे त्याच्या काव्यांतील प्रमुख विचारप्रवाह. त्याची काव्यशैलीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. बोली भाषेतील, स्पॅनिश व फ्रेंच भाषांतील, तसेच स्वनिर्मित शब्दांचा सर्रास उपयोग, जंत्रीवजा वर्णने, गद्याच्या सीमेवर घुटमळणारी मुक्तछंदात्मक पद्यरचना ह्यांतून ह्या शैलीचे वेगळेपण जाणवते. ब्रिटिश परंपरेचा ठसा पूर्णपणे पूसून टाकणारा अमेरिकन मनाचा व निष्ठांचा स्वतंत्रपणे आविष्कार घडविणारा पहिला अमेरिकन कवी म्हणून तो मान्यता पावला. व्हिटमनने अमेरिकन कवितेला स्वतःची खास ओळख प्राप्त करून दिली.

डेमॉक्रॅटिक व्हिस्टाज (१८७१) हा त्याचा महत्त्वाचा गद्यग्रंथ. अमेरिकन समाज जडवादी होत चाललेला असून त्याचे आध्यात्मिकरण करण्याची गरज त्याने ह्या ग्रंथात प्रतिपादली. कला आणि साहित्य ह्या दोन शक्ती खऱ्या अर्थाने लोकशाही समाज निर्माण करू शकतील, अशी त्याची धारणा होती. १९०२मध्ये त्याचे समग्र लेखन दहा खंडांत प्रसिद्ध झाले (पुनर्मुद्रण-१९६८).

कॅमडेन (न्यू जर्सी) येथे तो निधन पावला. 

संदर्भ : 1. Allen, G. W. The New Walt Whitman Handbook, 1975 Reprint, New York, 1986.             2. Boswell, Jeanette, Walt Whitman and the Critics : A Checklist of Criticism 1900-1978, 1980.           3. Chase, Richard, Walt Whitman Reconsidered, New York, 1955           4. Dello Buono, Carmen J. Rare Early Essays on Walt Whitman, 1980.

नाईक, म. कृ.