व्हिचेंत्सा : लॅटिन व्हायसेंशिया. इटलीच्या व्हेनटो विभागातील व्हिचेंत्सा प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,०९,१४५ (१९९८). इटलीच्या उत्तर भागात व्हेनिसपासून पश्चिमेस ६४ किमी. अंतरावर बॅचिग्लिऑन व रेट्रॉन या नद्यांच्या संगमावर हे शहर वसले आहे. मिलान-व्हेनिस हा लोहमार्ग येथूनच जातो. प्राचीन काळापासून या शहराचा उल्लेख आढळतो. येथील मूळ वसाहत लिग्यूरियन किंवा व्हेनेटी यांची असावी. इ. स. पू. ४९ मध्ये हे रोमनांच्या ताब्यात होते. त्या वेळी ते ‘व्हायसेंशिया’ या नावाने ओळखले जाई. पुढे लाँबर्डीच्या सरदार-घराण्याचे हे प्रमुख ठिकाण बनले. ख्रिस्ती धर्मगुरूंच्या सत्तेखाली यास स्वतंत्र दर्जा मिळाल्यानंतर ते लाँबर्ड लीगमध्ये सामील झाले (बारावे शतक). नंतर हा व्हेरोनीज लीगचा घटक बनला. तेराव्या शतकातही येथील धर्मसत्तेने राजेशाही व स्थानिक जुलमी उमरावांविरुद्ध लढा चालूच ठेवला. याच शतकात शहराभोवती तटबंदी उभारण्यात आली. चौदाव्या शतकात व्हेरोनाच्या ला स्काला घराण्याची यावर सत्ता होती. पॅड्युआ, व्हेरोना आणि मिलान येथील लॉर्डस सत्तेविरुद्धच्या संघर्षात या शहराचा समावेश होता. त्यानंतर हे व्हेनिसच्या सार्वभौम प्रजासत्ताकाखाली आले (१४०४). सोळाव्या शतकात हे शहर विकासाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचले होते. नेपोलियन कालखंडानंतर १८६६पर्यंत हे शहर हॅप्सबर्गच्या आधिपत्याखाली होते. पुढे ते इटलीच्या संयुक्त राजेशाहीखाली गेले. मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बॉंबवर्षावामुळे या शहराचे प्रचंड नुकसान झाले.    

औद्योगिक, व्यापारी, कृषी, दळणवळण व प्रशासकीय केंद्र म्हणून हे शहर महत्त्वाचे आहे. अभियांत्रिकी उद्योग, कृषी व वस्त्रोद्योगविषयक यंत्रसामग्री, लोखंड व पोलाद ओतशाळा, वस्त्रनिर्माण, फर्निचर, काच, रसायने, अन्नप्रक्रिया, लाकूडकाम इ. उद्योग येथे विकसित झाले आहेत. व्हिचेंत्साचा आसमंत सुपीक आहे. माँटी लेस्सीनी आणि बेरीसी यांदरम्यानच्या नैसर्गिक खिंडीच्या पूर्वेकडील तोंडाशी हे शहर आहे. या खिंडीमुळे प्राचीन काळापासून व्हेनटो ते लाँबार्डी यांदरम्यानचा मार्ग उपलब्ध झाला आहे. मिलान–व्हेनिस यांदरम्यानच्या रस्ते व लोहमार्गावरील हे प्रमुख स्थानक आहे. बॅचिग्लिऑन नदीमधून व्हिचेंत्सापर्यंत जलवाहतूक चालते.    

सांस्कृतिक केंद्र म्हणून व्हिचेंत्सा विशेष प्रसिद्ध आहे. सुरेख व समृद्ध अशी व्हेनीशियन गॉथिक शैली (चौदा-पंधरावे शतक), आलंकारिक लोंबार्ड शैली (पंधरावे-सोळावे शतक) आणि आन्द्रेआ पाललाद्यो याची वैशिष्ट्यपूर्ण अशी प्रबोधनकालीन शैली (१५०८ –८०) अशा वास्तुशिल्पाच्या तीन शैली येथील वास्तुरचनांतून आढळून येतात. इटालियन वास्तुविशारद आन्द्रेआ पाललाद्यो याचे शिक्षण येथेच झाले. पाललाद्योच्या वैभवशाली काळात या शहराने बार्थॉलोम्यू माँटॅग्ना, फ्रॅन्सिस्को माफेई यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रकारांची मालिकाच निर्माण केली. पाललाद्यो शैलीतील अनेक वैशिष्ट्यपूर्ण व सुंदर वास्तू या शहरात आढळतात. त्यामुळेच या शहराला ‘पालालाद्योचे शहर’ असे संबोधले जाते. येथील चर्च, वस्तुसंग्रहालय, कॅथीड्रल, राजवाडा व इतर अनेक प्रकारच्या वास्तू पालालाद्यो शैलीत उभारलेल्या असून त्यांवर इंग्लंडमधील जॉर्जियन व अमेरिकेतील वसाहतकालीन शैली यांचा प्रभाव आढळतो. पाललाद्यो शैलीतील अत्यंत महत्त्वाच्या वास्तू म्हणजे तेथील भव्य राजवाडा–बॅसिलिका (१५४९ –१६१४), लॉगिओ देल कॅपिटॉनिओ (१९७१), तेआर्तो ऑलंपिको (१५८० – ८४), रोतोंदो (१५५३ – ८९) या होत. पाललाद्योच्या अपूर्ण वास्तू स्कॅमोझी याने पूर्णत्वास नेल्या. याच शैलीतील पालाझ्झो चिएरीकाती (१५५१ – ५७) या वास्तूत शहरातील प्रसिद्ध कलासंग्रहालय असून त्यात पंधराव्या-सोळाव्या शतकांतील बार्थॉलोम्यू माँटॅग्ना आणि इतर उत्तर इटालियन चित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. येथील तेराव्या शतकातील गॉथिक कॅथेड्रलची १९४४ मध्ये पुनर्बांधणी करण्यात आली. याशिवाय येथील सँता कोरोना (१२६०), सेंट लोरेन्झा (तेरावे शतक) प्लाझा दीईसिगनोरी, सॅनहॅनसिझो चर्च, प्लाझो देल मॉर्ट दि पिएटा इ. वास्तू उल्लेखनीय आहेत. माँते बेसिको बॅसिलिका (पुनर्बांधणी १६८७ – १७०२) व व्हिला व्हालमारोना (१६६९) ह्या वास्तू शहराच्या बाहेर असून त्याही प्रेक्षणीय आहेत.                         

चौधरी, वसंत