व्हिएन्ना विद्यापीठ : ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथील हे जगातील सर्वांत जुने जर्मन भाषिक विद्यापीठ होय. स्थापना इ.स. १३६५. १९९८ मध्ये या विद्यापीठात १२८ देशांतील सु. ९२,००० विद्यार्थी शिक्षण घेत होते. या विद्यापीठात दोन प्रमुख विभाग असून १३० विविध पाठ्यक्रम शिकविले जातात. या विद्यापीठात कार्यक्षेत्रात २६३ संघटना आणि २५ शैक्षणिक संस्था आहेत. ऑस्ट्रियातील शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या विद्यापीठात प्रवेश मिळतो.

हे विद्यापीठ शासकीय असले, तरी प्रशासन, शिक्षण तथा संशोधन यांबाबतीत त्यास स्वायत्तता आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रमुखांना रेक्टर (कुलमंत्री) हे नामाभिमान आहे. दोन वर्षांसाठी त्यांची निवड होते. आठ शैक्षणिक विभागातील प्रतिनिधींच्या साहाय्याने ते विद्यापीठाचा कारभार पाहातात. विद्यापीठाच्या प्रशासकीय कारभारासाठी प्रशासकीय संचालक नेमलेला असतो. विद्यापीठाचा आर्थिक व्यवहार शासनमान्य अर्थसंकल्पीय तरतुदींनुसार चालतो.

ऑस्ट्रियातील सर्वांत मोठे ग्रंथालय या विद्यापीठात आहे. विद्यापीठातील संगणक कक्षही अत्याधुनिक असून उत्कृष्ट आहे. येथील शैक्षणिक विभागांमध्ये भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, शिक्षणशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र, वैद्यक आणि आरोग्यशास्त्र, सामाजिक शास्त्रे, विविध भाषा, गणित, संख्याशास्त्र इत्यादींचा समावेश आहे.

या विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांसाठी असलेला शैक्षणिक विभाग प्रसिद्ध आहे.  या विभागातील अभ्यासक्रम १९२२ व पुढे दुसऱ्या महायुद्धाचा काळ वगळता १९५२ पासून सुरू आहे. दर वर्षी सु. २,५०० विद्यार्थी या विभागात प्रवेश घेतात. उन्हाळ्याच्या सुटीत जगातून येथे विद्यार्थी येतात. जर्मन भाषा शिकण्यासाठी संपूर्ण जगातून येथे विद्यार्थी येतात. त्यांना जर्मन भाषेबरोबरच वाडमय, संगीत, इतिहास, राज्यशास्त्र या विषयांवरील व्याख्याने ऎकण्याची सोय असते. त्याचप्रमाणे संगीत आणि निसर्गसुंदर व्हिएन्ना या ऐतिहासिक शहराची ओळख करून देण्यात येते.

गोगटे, श्री. ब.