व्हिएन्ना परिषद (काँग्रेस) : युरोपच्या पुनर्रचनेसाठी सप्टेंबर १८१४ ते जून १८१५ दरम्यान व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे भरलेली आंतरराष्ट्रीय महत्त्वाची परिषद. ⇨ फ्रेंच राज्यक्रांतीपासून (१७८९) युरोपमध्ये उद्भवलेली राजकीय अस्थिरता आणि पहिल्या नेपोलियनचे युरोपीय राजकारणातील वर्चस्व, यांना या परिषदेने पायबंद घातला. ऑस्ट्रियाचा राजा पहिला फ्रान्सिस याच्या निमंत्रणावरून ही परिषद ऑस्ट्रियाचा पंतप्रधान मेटरनिख याच्या पुढाकाराने व्हिएन्ना येथे भरली. तीत रशियाचा पहिला झार अलेक्झांडर, प्रशियाचा तिसरा विल्यम फ्रीड्रिख हे राजे आणि इंग्लंडचा परराष्ट्रमंत्री कॅसलरे उपस्थित होते. पुढे स्वीडन, स्पेन व पोर्तुगाल हे देशही तीत सामील झाले. व्हिएन्ना परिषदेने इंग्लंड, प्रशिया, ऑस्ट्रिया व रशिया यांचा युरोपीय चतु:संघ (कन्सर्ट ऑफ युरोप) स्थापन केला आणि युद्धाऎवजी सामोपचाराने संघर्ष मिटविण्याची कल्पना पुरस्कृत केली. या चार प्रमुख देशांनी ९ मार्च १८१४ रोजी परस्पर सहकार्याचा शोमोन (फ्रान्स) येथे तह केला. त्यानंतर स्वीडन-पोर्तुगालसह या देशांनी फ्रान्सबरोबर ३० मे १८१४ रोजी तह केला. स्पेनने २० जुलै १८१४ रोजी या तहावर सही केली. नेपोलियनचा ⇨ वॉटर्लूच्या लढाईत (१८१५) पूर्ण पराभव करण्यात दोस्त राष्ट्रांचे सैन्य कारणीभूत होते. यानंतर या चार देशांच्या मुत्सद्यांनी युरोपची सुरक्षितता व सत्तासमतोल यांकडे लक्ष दिले. काही युरोपीय सत्ताधीशांना त्यांनी पुन्हा सत्तेवर बसविले. या धोरणानुसार प्रथम फ्रान्स मध्ये बूरबाँ घराण्याची राजेशाही प्रस्थापित करण्यात आली. युरोपच्या पुनर्घटनेसाठी परिषदेने फ्रेंच राज्यक्रांतीपूर्व (१७९०) सरहद्दी मान्य केल्या, तसेच युद्धाचा खर्च वसूल होईपर्यंत दोस्त राष्ट्रांचे सैन्य फ्रान्समध्ये फ्रान्सच्या खर्चाने तैनात करण्याचे ठरले. नेपोलियनने जमा केलेल्या वस्तू ज्या त्या देशांना परत करण्यात आल्या. फ्रान्स पुन्हा बलवत्तर होऊ नये, म्हणून त्याभोवती प्रबळ राज्यांची लष्करी ठाणी वसविण्यात आली.
प्रादेशिक फेरवाटपात ऑस्ट्रिया व प्रशिया यांनी अधिक भूभाग मिळविला. ऑस्ट्रियाने उत्तर इटलीतील लाँबर्डी आणि व्हिनीशिया हे प्रदेश मिळविले तर नेपोलियनची पत्नि मारी ल्वीझला पार्मा प्रदेश देण्यात येऊन तिचे सम्राज्ञी हे बिरूद मान्य करण्यात आले. सॅक्सनीचा दोनपंचमांश भाग, तसेच र्हाउईनच्या डाव्या तीरावरील काही भाग प्रशियाला मिळाला. मोदिना व तस्कनी ऑस्ट्रियाशी संबंधित असलेल्या संस्थानिकांना आणि नेपल्स बूरबाँ वंशातील स्पॅनिश शाखेला, अशी वाटणी झाली. पोपला त्याचा इटलीतील मूळ प्रदेश मिळाला परंतु त्याचा ॲव्हीन्यों गावावरील हक्क नाकारण्यात आला. स्वित्झर्लंडचे राज्य तीन जिल्ह्यांची भर घालून वाढविण्यात आले. ग्रेट ब्रिटनचा अनेक वसाहतींवरील हक्क मान्य करण्यात आला. डेन्मार्कने जर्मन डचीच्या बदल्यात नॉर्वे स्वीडनला दिला. व्हिएन्ना काँग्रेसमुळे रशियन झार पोलंडच्या संवैधानिक राज्याचा स्वामी बनला. गमावलेला फिनलंड व बेसारेबिया हे भूभाग मिळविण्यात त्याला यश मिळाले. उरलेल्या पोलंडच्या भूभागावर ऑस्ट्रिया व प्रशिया यांनी नियंत्रण मिळविले. या प्रादेशिक व्यवस्थेव्यतिरिक्त परिषदेने गुलामांचा व्यापार निषिद्ध ठरविला आणि चाचेगिरीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. सर्वानुमते नद्यांवरील आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयी काही तत्त्वे निश्चित करण्यात आली आणि एकूण राजनीतिविषयक एक व्यवहार्य संहिताही बनविण्यात आली आणि एकूण राजनीतिविषयक एक व्यवहार्य संहिताही बनविण्यात आली. त्यामुळे युरोप खंडात सत्तासंतुलन राहून अनेक वर्षे शांतता नांदली मात्र व्हिएन्ना परिषदेने लोकशाही व राष्ट्रवादी भावनांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे १८३० व १८४८ मध्ये युरोपात विविध ठिकाणी राष्ट्रवादी उठाव झाले. इटली व जर्मनी या देशांत राष्ट्रीय चळवळींचा जोर वाढला. या परिषदेने एकोणिसाव्या शतकात युरोप खंडातील सत्तासमतोल राखण्यास हातभार लावला.
ओक, द. ह.