व्हानूआटू : (रिपब्लिक ऑफ व्हानूआटू). पूर्वीची ⇨न्यू हेब्रिडीझ बेटे. पॅसिफिक महासागराच्या नैर्ऋत्य भागातील द्वीपसमूहांचा देश. त्यात एकूण ८० बेटे असून, त्यांचे एकूण भूक्षेत्र सु. १२,१९० चौ.किमी. आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेस १,८०० किमी.वर फिजी बेटांपासून पश्चिमेस १,००० किमी.वर तर न्यू कॅलेडोनियापासून ईशान्येस ४०० किमी.वर ही बेटे आहेत. या द्वीपसमूहाचा उत्तर-दक्षिण विस्तार सु. ९०० किमी. असून अक्षवृत्तीय विस्तार १३० ते २१० द. आणि रेखावृत्तीय विस्तार १६६० ते १७१० पू. यांदरम्यान आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने या द्वीपसमूहातील एस्पीरीतून सांतो (३,६८० चौ.किमी.), मालेkuकुला, एफाटी, एरोमांगा, ताना ही मोठी बेटे आहेत. व्हानूआ लावा, एपीग्वा (सँता मारिया), मोता, मोता लावा, मालो, आओबा, माइवो, पामा, पेंटकॉस्ट, अँब्रिम, एपी, ॲनाटॉम ही इतर प्रमुख बेटे आहेत. मॅथ्यू व हंटर बेटांवरही व्हानूआटूने हक्क सांगितला आहे. व्हानूआटूमधील ६७ बेटांवर वस्ती होती (१९९०). व्हानूआटूची एकूण लोकसंख्या १,९७,००० होती (२००० अंदाज). यामधील काही प्रमुख बेटांची १९९८ ची लोकसंख्या पुढीलप्रमाणे होती : एफाटी (४५,०४७), एस्पीरीतू सांतो (३२,४१६), मालेकुला (२३,७५२), ताना (२४,८५५). एफाटी बेटावरील व्हीला (लोकसंख्या २६,००० १९९९ अंदाज) हे देशाच्या राजधानीचे शहर आहे. नागरी लोकसंख्या याच बेटावर अधिक आहे.
भूवर्णन : ओबडधोबड पर्वतीय प्रदेश, कमी-अधिक उंचीचा पठारी प्रदेश, लाटांसारख्या टेकड्या, पायऱ्या पायऱ्यांच्या किनारपट्ट्या व समुद्रातील प्रवाळशैलभित्ती अशी प्राकृतिक रचना या बेटांवर आढळते. दक्षिणोत्तर व्हानूआटू द्वीपमालिका इंग्रजीतील ‘वाय’ अक्षरासारखी आहे. बरीच बेटे पर्वतीय व वनाच्छादित आहेत. बहुतांश बेटांवर अरुंद किनारपट्टीची मैदाने व पर्वतीय अंतर्भाग आढळतात. बरीच बेटे ज्वालामुखीजन्य आहेत. एस्पीरीतून सांतो बेटावरील मौंट ताब्वेमासान (उंची १,८८८ मी.) हे येथील सर्वोच्च शिखर आहे. वारंवार होणाऱ्या भूकंपांमुळे अस्थिर भूस्तररचना आढळते. प्रामुख्याने बँक्स गटातील बेटे, तसेच ताना, लोपेव्ही व अँब्रिम या बेटांवर ज्वालामुखी आहेत. गाळाचे खडक, प्रवाळी चुनखडक व ज्वालामुखी खडकांचे प्रमाण येथे अधिक आहे.
व्हानूआटूचे हवामान उष्णकटिबंधीय महासागरी प्रकारचे आहे. मे ते ऑक्टोबर या काळात आग्नेय व्यापारी वाऱ्यांचा प्रभाव येथील हवामानावर असतो. उत्तरेकडील बेटांवर वार्षिक सरासरी तापमान २७ से. व पर्जन्यमान ३९ सेंमी. असून, दक्षिणेकडील बेटांवर तापमान १९ से ते ३१ से. यांदरम्यान, तर वार्षिक सरासरी पर्जन्यमान २३ सेंमी. आढळते. द्वीपसमूहांच्या साधारण मध्यावर असलेल्या व्हीला येथील सरासरी तापमानातील चढउतार २२ से ते २७ से.च्यादरम्यान आढळतो. कधीकधी या भागात हरिकेन वादळे निर्माण होतात. १९८७ मध्ये व्हानूआटूला हरिकेन वादळांचा सर्वांत मोठा तडाखा बसला होता.
बहुतेक सर्वच बेटांवर जंगलांचे प्रमाण जास्त आहे. एकूण वनाच्छादित क्षेत्र ९,१४,००० हेक्टर असून त्यात उष्णकटिबंधीय वर्षारण्यांचे प्रमाण अधिक आहे. अरण्यांत उंच वृक्ष, दाट नेचे व वेली आढळतात. उंच प्रदेशात ऑर्किड वृक्ष आढळतात. एरोमांगा व ताना या दक्षिणेकडील बेटांवर खुल्या गवताळ प्रदेशाचे पट्टे आहेत. मालेकुला व एफाटी बेटांच्या किनाऱ्यावरील काही भागांत कच्छ वनश्री आढळते. युरोपीय लोक येण्याआधी या भागत वटवाघळे, घुशी व रानडुकरे अधिक होती. कबुतरे, पोपट, कोकीळ, हनीईटर व स्विफ्टलेट्स इ. पक्षी येथे आढळतात.
इतिहास : सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी यांतील उत्तरेकडील बेटांवर मेलानीशियन लोकांची वस्ती होती. स्पॅनिश मोहिमेचा कप्तान पेद्रो फर्नेंदिश दे कैरॉस याने १६०६ मध्ये ही बेटे प्रथम पाहिली. फ्रेंच समन्वेषक लुईस दे बोगनव्हील याने १७६८ मध्ये बेटांचे समन्वेषण केले. ब्रिटिश समन्वेषक जेम्स कुक याने १७७४ मध्ये या बेटांना भेट दिली व त्यांना न्यू हेब्रिडीझ हे नाव दिले. १८६८ च्या सुमारास कापसाची लागवड करणारे ब्रिटिश व फ्रेंच शेतकरी येथे आले. १९०६ मध्ये न्यू हेब्रिडीझवर इंग्लंड व फ्रान्स यांचे संयुक्त सार्वभौम शासन आले. या शासनाचे व्हीला येथे मुख्यालय होते. या व्यवस्थेत (१) ब्रिटिश नॅशनल सर्व्हिस, (२) फ्रेंच नॅशनल सर्व्हिस व (३) कंडोमिनिअम (जॉईंट) डिपार्टमेंट अशा तीन शाखा होत्या. स्थानिक न्यू हेब्रिडियन लोकांनी आपली नागरिकता या दोन सत्तांपासून वेगळी ठेवली. परिणामतः येथे दोन अधिकृत भाषा, दोन पोलीस दले, तीन लोकसेवा विभाग, तीन न्यायालये, तीन चलने, तीन राष्ट्रीय अर्थसंकल्प, राजधानी पोर्ट व्हीला येथे दोन निवासी आयुक्त, चार जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन जिल्हा आयुक्त अशी परिस्थिती निर्माण झाली.
दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या फौजांचा न्यू हेब्रिडीझ बेटांवर महत्त्वाचा तळ होता. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात स्थानिक राजकीय नेतृत्व निर्माण होऊ लागले. १९६० च्य दशकात स्वातंत्र्यप्राप्तीच्या दिशेने या बेटांवर चळवळ सुरू झाली. न्यू हेब्रिडीझची ३६ टक्क्यांपेक्षा अधिक भूमी परकीयांनी खरेदी केलेली होती. ना-ग्रीआमेल हा येथील पहिला राजकीय गट होय. १९७२ मध्ये ‘न्यू हेब्रिडीझ नॅशनल पार्टी’ची स्थापना झाली. १९४७ मध्ये झालेल्या राजकीय वाटाघाटींनुसार या प्रदेशातील पूर्वीच्या ‘ॲडव्हायझरी कौन्सिल’ची जागा ४२ सदस्यीय लोकप्रातिनिधिक विधानसभेने घेतली. १९७६ मध्ये नॅशनल पार्टीचे नाव ‘व्हानूआकू पार्टी’ (व्हिपी) असे बदलण्यात आले. १९७७ मध्ये पॅरिस येथे ब्रिटिश, फ्रेंच व न्यू हेब्रिडीझचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली. तीत या बेटांना १९८० मध्ये स्वातंत्र्य देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र व्हानूआकू पार्टी या पक्षाची त्वरित स्वातंत्र्याची मागणी होती. त्यामुळे या पक्षाने या संयुक्त बैठकीवर बहिष्कार टाकला. सप्टेंबर १९७९ मध्ये संविधान स्वीकारण्याबाबत एक बैठक झाली. त्या वेळी जुलै १९८० मध्ये या बेटांना स्वातंत्र्य देण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला. नोव्हेंबर १९७९ मध्ये झालेल्या निवडणुकीत व्हानूआकू पार्टीने असेंब्लीच्या ३९ जागांपैकी २६ जागा जिंकल्या व अखेर १९०६ ते १९८० या काळातील ग्रेट ब्रिटन व फ्रान्स यांचे या बेटांवरील संयुक्त प्रशासन संपुष्टात येऊन ३० जुलै १९८० रोजी ‘रिपब्लिक ऑफ व्हानूआटू’ हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जॉर्ज कलकोआ हे पहिले राष्ट्राध्यक्ष तर लिनी हे पंतप्रधान बनले. जॉर्ज कलकोआ यांनी ‘हजारोंचे नेते’ याअर्थी आपले आडनाव सोकोमानू असे स्वीकारले. देशात बरेच राजकीय पक्ष आहेत.
व्हानूआटू हा एक प्रजासत्ताक देश आहे. एकसदनी संसदेचे ४६ सभासद असून सार्वत्रिक प्रौढ मतदानपद्धतीने त्यांना चार वर्षांसाठी निवडून दिलेले असते. संसद सदस्यांमधून पंतप्रधानांची निवड केली जाते. संसद सदस्य आणि प्रादेशिक परिषदांचे अध्यक्ष यांच्यामार्फत पाच वर्षांकरिता राष्ट्राध्यक्षांची निवड केली जाते. ग्रामपरिषद, प्रादेशिक परिषद, द्वीपपरिषद यांच्यामार्फत स्थानिक पातळीवरील शासकीय कारभार पाहिला जातो.
आर्थिक स्थिती : शेती, पशुपालन व मासेमारी यांवर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. उदरनिर्वाह शेती, काही लघुउद्योग व विकसनशील पर्यटनव्यवसाय असे देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र आहे. एकूण कृषिक्षेत्रापैकी एक तृतीयांश क्षेत्र मळ्यांचे आहे. मळ्यांचे मालक प्रामुख्याने युरोपीय लोक आहेत. शेती प्रामुख्याने अरुंद किनारपट्टीची मैदाने व सखल पठारांपुरतीच मर्यादित आहे. नारळ, केळी, याम, कसाव्हा, तारो, रताळी, ब्रेडफ्रूट, भाजीपाला, कोको, कॉफी ही येथील प्रमुख पिके आहेत. खोबरे हे प्रमुख उत्पादन असून त्यापासून देशाला सर्वाधिक परकीय चलन मिळते. कोको निऱ्याही महत्त्वाची आहे. १९९८ मध्ये देशात खोबऱ्याचे उत्पादन ४०,००० टन, तर कोकोचे उत्पादन २,००० टन झाले. गोमांसाची निऱ्या होते. याच वर्षी देशात १,५१,००० गुरे, १२,००० शेळ्या व ६०,००० डुकरे होती.
मासेमारी हा महत्त्वाचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी सुरुवातीला जपानचे मार्गदर्शन लाभले. ट्यूना व बोनिटो मासे अधिक पकडले जातात. ते गोठवून त्यांची निऱ्या प्रामुख्याने संयुक्त संस्थानांत केली जाते. एस्पीरीतू सांतो बेटावर मासे गोठविण्याचा प्रकल्प आहे. मांस डबाबंदीकरण, मासे गोठविणे तसेच सौम्य पेये, खोबऱ्यावरील प्रक्रिया, लाकूड चिरकाम, छपाई, बांधकामाचे साहित्य, लाकडी सामान, ॲल्युमिनियम, सिमेंट व बोटी निर्मितीचे उद्योग देशात चालतात. एफाटी व एरोमांगा बेटांवर मँगॅनीजचे साठे आहेत. मँगॅनीजची निऱ्या केली जाते.
मुक्त व्यापारी अर्थव्यवस्था असलेले हे एक विकसनशील राष्ट्र आहे. व्हानूआटूवर प्रत्यक्ष करपद्धती नसल्यामुळे एक वित्तपुरवठा केंद्र म्हणून त्याचे महत्त्व वाढत आहे. नेदर्लंड्स, जर्मनी, फ्रान्स, जपान व इटली हे निऱ्या व्यापारातील प्रमुख सहभागी देश आहेत. निर्मिती वस्तू, खाद्यपदार्थ व खनिज तेल यांची आयात प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड, इटली, फ्रान्स या देशांकडून केली जाते. १९९० मध्ये ९३० लक्ष अमेरिकी डॉलर किमतीची आयात व १४० लक्ष डॉलर किमतीची निऱ्या या देशाने केली.
व्हाटू हे व्हानूआटूचे चलन आहे. १ स्टर्लिंग पौंड = १७२ व्हाटू आणि १ अमेरिकी डॉलर = ११३ व्हाटू असा विनिमय दर होता (मार्च १९९६). देशात मेट्रिक परिणामपद्धती अवलंबिली जाते.
पर्यटन या परकीय चलन मिळवून देणाऱ्या व्यवसायाची दिवसेंदिवस वाढ होत आहे. १९९९ मध्ये ५१,००० पर्यटकांनी व्हानूआटूला भेट दिली. त्या वर्षी या व्यवसायातून ५०,८५० लक्ष व्हाटू इतके उत्पन्न मिळाले. देशाला भेट देणाऱ्या परकीय नागरिकांपैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक पर्यटक ऑस्ट्रेलियन होते (१९९१).
देशात १,०७० किमी. लांबीचे रस्ते असून त्यांपैकी २५० किमी. लांबीचे पक्के रस्ते होते (१९९६). त्यांपैकी बहुतांश रस्ते एफाटी व एस्पीरीतू सांतो बेटावर आहेत. याच वर्षी देशात ४,००० नोंदणीकृत मोटारगाड्या होत्या. येथे लोहमार्ग नाहीत. व्हीला व लूगनव्हिल येथे खोल बंदरे आहेत. परदेश प्रवासासाठी व्हानूआटूची जहाजवाहतूक सेवा उपलब्ध आहे. बेटाबेटांदरम्यान लहान बोटी व विमानांद्वारे वाहतूक सुविधा पुरविली जाते. एफाटी आणि एस्पीरीतू सांतो बेटांवर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. देशात ६२,००० रेडिओसंच व २,००० दूरचित्रवाणीसंच होते (१९९७).
लोक व समाजजीवन : व्हानूआटूमधील नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक लोक मेलानीशियन आहेत. उर्वरित लोकसंख्येत चिनी, व्हिएटनामी, युरोपीय, पॉलिनीशियन व मायक्रोनीशियन यांचा अंतर्भाव होतो. सुमारे ८५% लोक ख्रिश्चन धर्मीय व प्रामुख्याने प्रॉटेस्टंट पंथीय आहेत. अँग्लिकन व रोमन कॅथलिक तसेच काही बहाई धर्माचे लोकही आहेत. सुमारे तीन चतुर्थांश लोक ग्रामीण भागात राहातात. खेड्यातील बहुतांश घरे लाकूड, बांबू व ताडाच्या झाडांची पाने यांची असतातात. राजधानी व्हीला तसेच एस्पीरीतू सांतो बेटावरील लूगनव्हिल (देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नगर) हीच काय ती प्रमुख नागरी केंद्रे आहेत. लोकसंख्येची घनता दर चौ.किमी. ला १५ होती (१९९७). एफाटी, एस्पीरीतू सांतो, ताना व मालेकुला ही जास्त लोकसंख्या असलेली बेटे आहेत. येथे जन्मदर व मृत्युदर दोन्हीनी जास्त आहेत. एकूण लोकसंख्येतील ४५% लोकसंख्या पंधरा वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहे.
देशात शंभरावर बोलीभाषा वापरात आहेत. त्यांतील बऱ्याचशा फिजी व न्यू कॅलेडोनियन भाषांशी निगडित आहेत. बिस्लामा ही राष्ट्रभाषा तसेच संपर्कभाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने इंग्रजी शब्द व मेलानीशियन व्याकरण यांच्या मिश्रणातून तयार झालेली आहे. देशातील सु. ८२% लोक ही भाषा बोलतात. बिस्लामा, इंग्रजी व फ्रेंच या अधिकृत भाषा आहेत.
हिवताप ही येथील फार मोठी आरोग्यविषयक समस्या आहे. व्हीला व लूगनव्हिल येथे प्रमुख रुग्णालये आहेत. देशात एकूण ९० रुग्णालये, २३ डॉक्टर व २५९ परिचारिका होत्या (१९९५).
व्हानूआटूमधील शिक्षण प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच माध्यमातून दिले जाते. बहुतेक सर्व मुलांना मोफत प्राथमिक शिक्षण उपलब्ध आहे. १९९४ मध्ये देशात २५२ पूर्व प्राथमिक विद्यालये होती. याच वर्षी २७२ प्राथमिक विद्यालयांत ८५२ शिक्षक आणि २६,२६७ विद्यार्थी होते. २१ माध्यमिक विद्यालयांत २२० शिक्षक व ४,२६९ विद्यार्थी होते (१९९२). त्याशिवाय येथे एक तांत्रिक प्रशिक्षण संस्था व एक शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय आहे. व्हानूआटूमधून तीन साप्ताहिके, एक मासिक व एक त्रैमासिक प्रकाशित होत असते.
चौधरी, वसंत