व्हान मानवेल, दॉन : (५ मे १२८२-१३४८). मध्ययुगीन स्पॅनिश साहित्यातील एक श्रेष्ठ लेखक. तो उमराव घराण्यातील असून कास्तिलचा राजा तिसरा फेर्दिनांद ह्याचा तो नातू होता. एक उमराव, राजकारणी आणि लढवय्या म्हणूनत्याचे व्यक्तिमत्त्व वादळी होते. लेखक म्हणून त्याची कीर्ती Libro de los enxiemplos del conde Lucanor et de Patronio (१३२८-३५, इं. भा. काउंट लुकानोर : ऑर, द फिफ्टी प्लेझंट स्टोअरीज ऑफपात्रोनिओ, १८६८) ह्या बोधकथासंग्रहावर अधिष्ठित आहे. हा ग्रंथ म्हणजे ⇨बोकाचीओ ह्याच्या देकामेरॉन ह्या बृहतकथांचा पूर्वसुरी होय. तथापि देकामेरॉनप्रमाणे प्रेम हा विषय व्हान याने क्वचितच हाताळलेला दिसून येतो. एक तरुणसरदार आपल्या सेवकाला काही प्रश्न विचारतो आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तो सेवक एक कथा सांगून देतो, अशी ह्या कथाग्रंथाची मांडणी आहे. विनोद आणि उपरोध ही व्हानच्या बोधकथांची विलोभनीय अंगे आहेत. मर्मदृष्टीच्यावाचकाला या कथा विशेषच अर्थपूर्ण वाटतात. या कथांमागील सर्जनशील व्यक्तिमत्त्व जाणवते व वेधकही वाटते. स्पॅनिश गद्याच्या विकासात या कथाग्रंथाला महत्त्वाचे स्थान आहे. ‘द बुक ऑफ स्टेट्स’ आणि ‘द बुक ऑफ द नाइटअँड द स्क्वायर’ (दोन्हीही इं.शी.) हे व्हानचे इतर ग्रंथ. कॉर्दोव्हा येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.