व्हाग्नर, रिखार्ट : (२२ मे १८१३-१३ फेब्रुवारी १८८३). प्रख्यात संगीतरचनाकार, संगीत-निर्देशक व संगीतावर सैद्धांतिक लिखाण करणारा लेखक. जन्म लाइपसिक येथे. त्याच्या घरात लहानपणापासून संगीतमय वातावरण होते. त्याचे शिक्षण शिष्टमान्य शाळॆत झाले. वयाच्या अठराव्या वर्षी त्याने पहिली वाद्यवृंदरचना केली. ती सादरही झाली पण भरपूर टीका व्हावी इतकी ती साधारण होती. पुढे संगीतरचनाशास्त्राचा त्याने मनोभावे अभ्यास केला. वुर्ट्सबर्ग रंगगृहात वृंदगानप्रमुख (कोरसमास्टर) म्हणून त्याने १८३३ मध्ये काम केले तर मॅग्डेबर्ग रंगगृहात १८३४ पासून व कोनिग्सबर्ग रंगगृहात १८३६ पासून संगीत-निर्देशक म्हणून काम केले.
आपल्या रिएंझी या संगीतकृतीचा प्रयोग व्हावा, म्हणून तो पॅरिसला गेला. १८३९-४२ या कालावधीत तिथे रहिलाही. पॅरिसमधील वास्तव्यात त्याने ‘द फ्लाइंग डचमन’ (इं.शी.) ही संगीतरचना (१८४१) केली. जर्मन मिथकांच्या आधाराने संगीतिकांची मालिका रचण्यास त्याने ह्या रचनेपासूनच प्रारंभ केला. शिवाय व्हाग्नर स्वतःच आपल्या नाटकांच्या संहिता व पदेही लिहीत असे. तानहॅयझर (१८४५) व लोहेनग्रिन (१८४८) या रचना ड्रेझ्डेन येथे त्याने लिहिल्या. जर्मनीतील १८४८ च्या बंडाळीत त्याचा हात असल्याकारणाने त्याला ड्रेझ्डेनमधून पळ काढावा लागला. त्यानंतर तटस्थ स्वित्झर्लंडमध्ये त्याने आठ वर्षे आश्रय घेतला. इथे द रिंग ऑफ द नीबलुंग या प्रचंड व वैशिष्ट्यपूर्ण संगीतकृतीच्या रचनेस त्याने १८५२ मध्ये आरंभ केला. यांत -हाईनगोल्ड, द व्हॉल्किरी, सीगफ्रीड व द डस्क ऑफ द गॉड्स या चार रचनांचा समावेश होतो. हे रचनाचक्र पूर्ण करण्यास त्याला पंचवीस वर्षे लागली. १८६३ मध्ये त्याची नीत्शेशी भेट झाली. देश-विदेशांत भ्रमंती चालू असताना त्याचे संगीतावरील काम चालूच होते. संगीतरचनांचे निराळेपण व तात्विक विवेचनातील बंडखोरी, राजकीय मतांतील जहालपण, कर्जबाजारी आर्थिक व्यवहार व सहसा शिष्टमान्य न होण्यासारखे वैयक्तिक प्रेमजीवन यांचा संकलित परिणाम संगीतप्रेमिकांना जाणवू लागला होता. पण तरीही जर्मनीत त्याच्यावर असलेले निर्बंध व बंदी उठायला त्याच्या वयाचे अठ्ठेचाळिसावे वर्ष उजाडावे लागले. याच सुमारास ट्रिस्टान अँड इसोल्ड ही रचना रचून झाली (१८५९) व द माइस्टरसिंगर्स ही रचना पूर्ण होऊ घातली होती (१८६७ मध्ये ती पूर्ण झाली). आपल्या सावकारांपासून व राजकीय विरोधकांपासून वारंवार पळ काढणाऱ्या व्हाग्नरला अखेर बव्हेरियाच्या दुसऱ्या लुडविग राजाने आश्रय दिला. आणखी बऱ्याच उलथापालथींनंतर तो १८७२ मध्ये बाइरॉइट येथे स्थायिक झाला. एक महत्त्वाची घटना अशी, की आपल्या संगीत नाटकांची सादरीकरणे स्वतःच्या कल्पनांनुसार व्हावीत म्हणून स्वतःच्याच देखरेखीखाली त्याने १८७६ मध्ये बाइरॉइट येथील रंगगृह पूर्ण करून घेतले. व्हाग्नरच्या संगीतकृतींचे सादरीकरण नियमितपणे करणारा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा महोत्सव तेथे होऊ लागला.
पार्सिफाल हे महत्त्वाचे सांगीतिक धर्मनाट्य तो अडुसष्ट वर्षांचा असताना पुरे झाले (१८८१). जर्मन स्वच्छंदतावादी चळवळीला सांगीतिक पूर्णरूप देऊन पाश्चिमात्य संगीतपरंपरेत मोलाची भर घालणारा व्हाग्नर हा युगधर्मी संगीतरचनाकार तर होताच शिवाय एक प्रभावी पण वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्या काळात गाजला. ⇨ थोव्हन चा मानसपुत्र असेही त्याचे वर्णन करण्यात आले आहे. त्याने जर्मन मिथकांचा व आख्यायिकांचा आधार घेऊन संगीताचा भावनिक आशय अधिक तीव्र करण्याचा चंग बांधला. ऑपेरा, ऑव्हरचर, कोरल, सिंफनी व वाद्यवृंदरचना या संगीतप्रकारांत त्याच्या रचना मोडतात. मुख्यतः त्याने पारंपरिक संगीतिकेच्या जागी नव्या संगीत नाट्याची स्थापना केली आणि नेहमीच्या संगीतरचनापद्धतीसच एक निराळे वळण दिले. वर्णनात्मक संगीतरचनांचा पाश्चात्त्य संगीतपरंपरेत प्रघात असल्याने आणि संगीतिकेत काय काय व कसे असावे याविषयीचे संकेतही पक्के झाले असल्याकारणाने याविषयीची व्हाग्नरची मते धक्का देणारी ठरली. जीवनव्यवहार वा भाषा यांच्यापलीकडे जाणारे सत्य संगीताला सांगावयाचे असते, हा त्याचा परम आग्रह असे. याबाबतीत त्याला ⇨ शोपेनहौअरच्या तात्त्विक भूमिकेचा आधार मिळाला. व्हाग्नरच्या मते, रूढ प्रेमकल्पना/कथा वा इतिहास यांनी केवळ बुद्धीला आवाहन मिळत असल्याकारणाने मिथकांचा वापर केला, तरच भावना व बुद्धी या दोहोंना वाव देणारे संगीत शक्य असते. मिथकांवर भर देण्यत त्याला आणखीही एक बाब सुचवायची होती. संगीत हे सर्व समाजाचे असते. समाज त्यापर्यंत पोहचू शकतो कारण सर्व समाजाने मिळूनच जणू संगीत रचलेले असते, हे त्याचे एक आवडते मत होते. रूढ ऑपेरा हा शिष्ट समाजापुरता मर्यादित असल्याने त्याच्या या विवेचनास एक निराळी धार आली असे दिसते. त्याचे आणखी एक मत असे, की काव्यातूनच संगीताने स्फूर्ती घ्यायची असते. तत्कालीन प्रचलित रूढींनुसार ऑपेरांत याउलट घडत असे. सर्व काही संगीतानुसार ठरत असे. व्हाग्नरचे म्हणणे असे, की जे काही शब्दांत सांगता येत नाही, ते सांगण्याचे काम वाद्यवृंदाचे असते. यासाठी सांगीतिक कल्पनाबंध (लेमोतिफ) सारख्या तंत्रांचा वापर आवश्यक असल्याचे त्याने प्रतिपादिले. खास प्रकारचा ध्वनी निर्माण करणारी वाद्येही वापरायला पाहिजेत, असा त्याचा आग्रह होता. त्याच्याच ‘लेमोतिफ’ या बहुचर्चित संगीतबंधानुसार एका बाजूस पात्रे, भावना, शब्द यांच्या बांधण्या, तर दुसऱ्या बाजूस सांगीतिक कल्पनाबंध अशी नवी समीकरणे वापरल्याने व्हाग्नरच्या संगीतरचनांचा पट वेगळ्याच पोताचा झाला.
संगीतरचनांशिवाय, अकरा खंड भरावेत इतके त्याचे गद्य लिखाण आहे. राजकीय चळवळीविषयक असलेले लिखाण बाजूला ठेवले, तरीही संगीतिकेच्या स्वरूपाविषयीचे त्याचे विचार मूलगामी आहेत. आर्ट अँड रेव्होल्यूशन (१८४९), द आर्ट वर्क ऑफ द फ्यूचर (१८५०), ऑपेरा अँड ड्रामा (१८५१), ए कम्युनिकेशन टू माय फ्रॆंड (१८५१) ही त्याची इंग्रजीतील भाषांतरित पुस्तके महत्त्वाची होत. व्हेनिस येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ : 1. Gutman, Robert, Richard Wagner: The Man, His Mind and His Music, Harcourt, 1968.
2. Newman, Ernest, The life of Wagner, 4 vols., Cambridge, 1976.
3. Newman, Ernest, The Wagner Operas, 2 Vols., 1983.
4. Panofsky, Walter Trans. Rickett, Richard, Wargner : A Pictorial Biography, London, 1963.
रानडे, अशोक दा.