ॲल्फ्रेड नॉर्थ व्हाइटहेडव्हाइटहेड, ॲल्फ्रेड नॉर्थ : (१५ फेब्रुवारी १८६१ – ३० डिसेंबर १९४७) इंग्रज गणितज्ञ व तत्त्वज्ञ. त्यांनी गणित, भौतिकी व विज्ञानाचे तत्त्व ज्ञान या विषयांत मौलिक कार्य केले. व्हाइटहेड व ⇨ बर्ट्रंड रसेल यांनी दहा वर्षे एकत्र काम करून प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका (३ खंड, १९१०-१३) हा विख्यात ग्रंथ प्रसिद्ध केला. व्हाइटहेड यांनी हार्वर्ड विद्यापीठात १९२४-३७ या काळात अध्यापन केले आणि एक व्यापक तत्त्वमीमांसा विकसित केली.

व्हाइटेड यांचा जन्म रॅम्सगेट (आइल ऑफ थॅनेट, केंट) येथे झाला. वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत वडिलांनी त्यांना घरीच शिक्षण दिले. नंतर त्यांना डॉर्सेट येथील शेर्बोर्न शाळेत दाखल करण्यात आले. तेथे त्यांनी ग्रीक, लॅटिन, गणित व विज्ञान या विषयांचा अभ्यास केला. १८८० मध्ये शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्यांनी केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १८८३-८४ मध्ये गणिताच्या ट्रायपॉस या ऑनर्स परीक्षेत उत्तम यश संपादन केल्यामुळे ते ट्रिनिटी कॉलेजचे फेलो झाले. या महाविद्यालयात ते वरिष्ठ व्याख्याते म्हणून होते (१९०३-१०).

व्हाइटहेड यांनी १९१० मध्ये लंडनला स्थलांतर केले. १९११ मध्ये त्यांची लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये नेमणूक झाली. १९१४ मध्ये ते इंपिरिअल कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे गणिताचे प्राध्यापक झाले. ते लंडन विद्यापीठात अधिसभेचे सदस्य, विद्यापरिषदेचे अध्यक्ष आणि विज्ञान विद्याशाखेचे डीन होते. नंतर ते हार्वर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते (१९२४-२७). निवृत्त झाल्यानंतरही ते हार्वर्ड येथे वरिष्ठ फेलो म्हणून राहिले.

गणिताच्या तीन क्षेत्रांत व्हाइटहेड यांनी कार्य केले. पहिला भाग भूमिती व बीजगणित यांचा. ए ट्रीटिज ऑन युनव्हर्सल ॲल्जिब्रा (१८९८) या त्यांच्या ग्रंथाचा उद्देश बीजगणिताला परिमाणापासून मोकळे करणे आणि बीजगणित हा संरचनांचा अभ्यास आहे हे प्रस्थापित करणे, असा होता. म्हणजे गणितातील सर्व पायाभूत विधाने ही तर्कशास्त्रातील काही गृहीततत्त्वे व काही अव्याख्यात तर्ककल्पना यांच्यापासून निष्पन्न करून दाखविणे आणि गणितशास्त्र म्हणजे तर्कशास्त्राचेच विकसित रूप असल्याचे दाखविणे, हा या ग्रंथाचा मूळ उद्देश होता. आव्यूह, निर्धारक, सदिश, प्रदिश इ. संरचना एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत निर्माण झाल्या होत्या. या संरचना एकाच संरचनेची विविध रूपे आहेत, असे दाखविण्याचा व्हाइटहेड यांचा प्रयत्न होता.

याच विषयाचा अधिक अभ्यास वरील ग्रंथाच्या दुसऱ्या भागात करण्याचा व्हाइटहेड यांचा विचार होता. तथापि याच सुमारास व्हाइटहेड यांची बर्ट्रांड रसेल यांच्याशी गाठ पडली. रसेल यांनी प्रिन्सिपल्स ऑफ मॅथेमॅटिक्स (१९०३) नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला होता व त्याच्या दुसऱ्या भागाची तयारी ते करीत होते. दोघांच्या चर्चेतून असे निष्पन्न झाले की, दोघे एकाच दिशेने विचार करीत आहेत. म्हणून त्यांनी एकत्र काम करायचे असे ठरवून प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका (१९१०-१३) हा ग्रंथ तीन खंडांत प्रसिद्ध केला. या ग्रंथाद्वारे या दोघांनी गणिताचा पाया खऱ्या तर्ककठोर तत्वांवर मांडण्याचे मोलाचे कार्य केले. चिन्हांकित तर्कशास्त्र ही गणिताची एक प्रमुख शाखा होण्यास त्यांच्या या कार्याचा हातभार लागला.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस गणितीय क्षेत्रात अनेक उपपत्तींची एकच गर्दी झाली होती. व्हाइटहेड यांना या उपपत्ती एका सूत्रात गोवून त्यांची व्यवस्था लावणे आवश्यक वाटत होते. ए ट्रीटिज ऑन युनिव्हर्सल ॲल्जिब्रा या ग्रंथात व्हाइटहेड यांनी केलेला असा प्रयत्न आता प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका या ग्रंथात त्यांनी पूर्णत्वाला नेला. तर्कशास्त्र व संचविज्ञान यांच्या पायावर संपूर्ण गणिताची उभारणी करण्याचे अवघड काम या ग्रंथाने पार पाडले. संचविज्ञानात बऱ्याच विरोधापत्ती (विरोधाभास) तयार झाल्या होत्या. त्यांचा निरास करण्यासाठी काही नवीन उपपत्ती मांडाव्या लागल्या.

व्हाइटहेड यांचे गणित क्षेत्रातील तिसरे कार्य म्हणजे गणिताच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास. गणिती उपपत्ती या मूलतः तर्कशास्त्र व संचविज्ञान यांच्या समन्वयातून बनतात पण भौतिकीतील प्रश्न सोडविण्यास त्यांचा उपयोग होतो. हे कोडे सोडविण्याच्या उद्देशाने ऑन मॅथेमॅटिकल कन्सेप्ट्स ऑफ द मॅथेमॅटिकल वर्ल्ड हा ग्रंथ त्यांनी १९०६ साली प्रसिद्ध केला. गणितातील तयार उपपत्तींचे उपयोजन होते असे न मानता अनुभवाचे समर्पकपणे ग्रहण करतील, अशा गणिती उपपत्ती कशा तयार करता येतील, याचा विचार या ग्रंथात केला आहे. ठोसर सृष्टी (मटेरियल वर्ल्ड) हे संचविज्ञातील संबंधाच्या माध्यमातून समजावून घ्यायचे आणि या संबंधातील क्षेत्रे म्हणजे सृष्टीतील पदार्थ होत, अशी ही मांडणी आहे. त्यानंतरच्या ॲन इन्ट्रोडक्शन टू मॅथेमॅटिक्स या लहान पुस्तकात त्यांनी गणितातील प्राथमिक पण मूलभूत संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत.

भौतिकी या विषयात व्हाइटहेड यांनी ॲन इन्क्वायरी कन्सर्निंग द प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल नॉलेज (१९१९), द कन्सेप्ट ऑफ नेचर (१९२०) आणि द प्रिन्सिपल्स ऑफ रिलेटिव्हिटी (१९२२) असे तीन ग्रंथ लिहिले.


पहिल्या ग्रंथात त्यांनी ‘प्रिन्सिपल ऑफ कायनेमॅटिक सिमेट्री’ म्हणजे ‘शुद्धगतिकीच्या समाकारतेचे तत्त्व’ मांडले व त्यावरून ⇨ हेंड्रिक लोरेन्ट्स यांनी चतुरायामी अवकाशाचे आयाम बदलण्याची जी समीकरणे मांडली होती, ती सिद्ध केली. या समीकरणांत येणारा स्थिर C ॲल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या सापेक्षता सिद्धांतात ‘प्रकाशाचा वेग’ या अर्थाने आला आहे पण व्हाइटहेड यांच्या उपपत्तीत C हा कोणताही वेग आहे. व्हाइटहेड यांनी शुद्धगतिकीचे अपास्ताकार, दीर्घवर्तुळाकार व अन्वस्तीय असे तीन प्रकार मानले आहेत. C2 हा धन, ऋण किंवा अनंत असेल, त्यानुसार हे प्रकार ठरतात.

व्हाइटहेड यांचा सापेक्षतेच्या उपपत्तीचा अभ्यास वरील ग्रंथातून सुरू झाला होता. आइन्स्टाइन यांच्या सापेक्षता उपपत्तीला पर्यायी उपपत्ती देण्याचा प्रयत्न व्हाइटहेड यांनी द प्रिन्सिपल ऑफ रिलेटिव्हिटी या ग्रंथात केला. काल व अवकाश यांची सर्व जागी व सर्व काळी एकसमान संरचना असते, असे व्हाइटहेड यांचे गृहीतक होते उलट आइन्स्टाइन या दोन्ही गोष्टींना स्थानपरत्वे वक्रता येते असे म्हणतात. हा दोन्हींत फरक आहे, परंतु व्हाइटहेड यांची उपपत्ती मान्यता पावली नाही.

पश्चिमी प्रबोधन युगात विज्ञानाच्या अभ्यासाला सुरुवात झाली, तेव्हा असे सर्वसाधारण मानले गेले की, अनुभवाला येणारी सृष्टी व कल्पनांच्या जाळ्यात पकडून गणिती सूत्रांच्या वापरातून व्यक्त होणारी सृष्टी यांत फरक आहे. असे असले तरी दुसऱ्या सृष्टीच्या साहाय्याने अनुभवाला येणारी सृष्टी एकात्मपणे जाणता येते. आनुभविक सृष्टी व कल्पनाजात सृष्टी यांच्यातील हे द्वित्व व्हाइटहेड यांना मान्य नव्हते. आपल्या अनुभवाला येणारी सृष्टी हीच एकमेव सृष्टी आहे, असा व्हाइटहेड यांचा आग्रह होता.

काल व अवकाश या आयामांच्या साहाय्याने आपण अनुभव घेतो, अशी समजूत आहे पण हे आयाम अनुभवातून प्रकृष्ट केलेले आहेत, हे दाखविण्याचा प्रयत्न व्हाइटहेड यांनी केला. यासाठी त्यांनी ‘एक्स्टेन्सिव्ह ॲब्स्ट्रॅक्शन’ या शीर्षकाची विचारपद्धती अवलंबिली. या पद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य असे की, तिच्यात वस्तू किंवा पदार्थ यांच्यापेक्षा ते घटनांना महत्त्व देतात. घटनांमध्ये ‘परस्परांत गुंफलेले असणे’ या प्रकारचा संबंध असतो. ‘अंश’, ‘पूर्ण’, ‘सातत्य’ या संकल्पनांचा उपयोग करून त्यांनी ‘क्रमिक काल’ व ‘क्रमिक अवकाश’ या संकल्पनांची मांडणी केली. हा सर्व विचार त्यांच्या प्रोसेस अँड रिॲलिटी या ग्रंथात आला आहे.

सायन्स अँड द मॉडर्न वर्ल्ड (१९२५), प्रोसेस अँड रिॲलिटी : ॲन एसे इन कॉस्मॉलॉजी (१९२९) आणि ॲडव्हेंचर्स ऑफ आयडियाज (१९३३) या तीन ग्रंथांच्या संचामुळे व्हाइटहेड यांना विख्यात तत्त्वमीमांसक म्हणून प्रसिद्धी मिळाली. त्यांनी लेखांमध्ये व व्याख्यानांमध्ये मांडलेले विचार द एम्स ऑफ एज्युकेशन अँड अदर एसेज (१९२९) आणि एसेज इन सायन्स अँड फिलॉसॉफी (१९४७) या ग्रंथांमध्ये एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आले. शिक्षण आणि तत्त्वज्ञान या विषयांवरील त्यांच्या पुस्तकांचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.

व्हाइटहेड १९०३ सालापासून रॉयल सोसायटीचे फेलो होते. त्यांची १९३१ मध्ये ब्रिटिश ॲकॅडेमीवर निवड झाली. १९४५ मध्ये त्यांना ऑर्डर ऑफ मेरिट हा पुरस्कार मिळाला.

ते केंब्रिज (मॅसॅचुसेट्स) येथे मृत्यू पावले.

संदर्भ : Schilpp, Paul Arthur, The Philosophy of Alfred North Whitehead, New York, 1951.

भावे, श्री. मा.