व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक्स : (कॅटमाई नॅशनल मॉन्युमेंट). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी अलास्का राज्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण ज्वालामुखी प्रदेश व पर्यटन स्थळ. १९१२ मधील नॉव्हारूप्ता व मौंट कॅटमाई ज्वालामुखी स्फोटांमुळे या दरीची निर्मिती झाली. या दरीत धूर, बाष्प व वायुरूप द्रव्ये बाहेर टाकणाऱ्या अनेक (सु. दहा हजार) भेगा, छिद्रे असल्याने तिला ‘व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक्स’ हे नाव प्राप्त झाले. या दरीचा विस्तार सु. १८६ चौ.किमी. असून सध्या कॅटमाई नॅशनल पार्कचा तो एक भाग आहे. नैर्ऋत्येकडील अलास्का द्वीपकल्पावर १६,५५,००० हे. क्षेत्रात कॅटमाई नॅशनल मॉन्युमेंट (पार्क) चा विस्तार असून, संयुक्त संस्थानातील नॅशनल पार्क (राष्ट्रीय उद्यान) संहतीमधील हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे क्षेत्र आहे. नॅशनल मॉन्युमेंट म्हणून १९१६ मध्ये, तर नॅशनल पार्क म्हणून १९८० मध्ये याची स्थापना झाली. मरणोन्मुख ज्वालामुखी प्रदेशाचा यात समावेश होतो. या राष्ट्रीय उद्यानाच्या सीमांमध्ये १९३१, १९४२, १९६९, १९७८, व १९८० मध्ये बदल करण्यात आले. पूर्वी येथे फार मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी उद्रेक झालेले आहेत.

येथे २ ते ७ जून १९१२ या काळात भूकंपाचे प्रचंड धक्के बसले होते तर ६ व ७ जून १९१२ रोजी येथे एकूण तीन अतिशय स्फोटक असे ज्वालामुखी उद्रेक झाले. या स्फोटांचे आवाज शेकडो किमी. दूरवर ऐकू आले होते. या उद्रेकांमुळे आकाशत उष्ण राखेचे ढग निर्माण झाले. उद्रेकातून बाहेर पडलेल्या बाष्पामुळे ३०० किमी. अंतरापर्यंतच्या प्रदेशात अम्लयुक्त पाऊस पडला, हवा धूसर बनली. त्यामुळे उत्तर अमेरिका, युरोप, आशिया व उत्तर आफ्रिकेतील तापमान कमी झाले. केवळ ६० तासांत या स्फोटांतून सु. २९ घन किमी. ज्वालामुखी पदार्थ बाहेर पडले. या पदार्थांचे संचयन सु. ७,८०० चौ.किमी. क्षेत्रात झाले. आग्नेयेस १६० किमी.वर असलेल्या कोडिॲक बेटावर ३० सेंमी. जाडीचा राखेचा थर साचला होता. नॉव्हारूप्ता येथून वाहत गेलेल्या लाव्ह्यामुळे कॅटमाई ज्वालामुखी शंकूचा माथा पूर्णपणे कोसळला. या उद्रेकामुळे १२·८ किमी. परिघाचे आणि १,१२८ मी. खोलीचे ज्वालामुख निर्माण झाले. त्या ठिकाणी नंतर सरोवराची निर्मिती झाली. मात्र या स्फोटात मनुष्यहानीची नोंद झालेली नाही.

या ज्वालामुखी स्फोटाद्वारे बाहेर पडलेल्या लाव्हाजन्य पदार्थांचे प्रचंड प्रवाह येथील दरीतून २४ किमी.पर्यंत वाहत गेले. भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट एफ. ग्रिज व त्यांचा सहकारी लुसिअस जी. फॉल्सम यांनी १९१६ मध्ये या दरीचा शोध लावून तिला ‘व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक्स’ हे नाव दिले. सर्व साधनसामग्रीसह आयोजित सफरीशिवाय येथे जाणे अशक्य असते. अलीकडे मात्र पायी, बसने किंवा हवाई मार्गाने जाण्याच्या सोयी झाल्या आहेत.

कॅटमाई नॅशनल मॉन्युमेंटमध्ये हिमाच्छादित शिखरे व ज्वालामुखी सरोवरे आढळतात. उद्यानातील सरोवरे, नद्या, जंगले, पर्वत व दलदलयुक्त प्रदेश वन्य प्राणिजीवांनी समृद्ध बनत आहेत. सरोवरे व प्रवाहांमध्ये विविध जातींचे मासे पहावयास मिळतात. तपकिरी व करड्या रंगाची अस्वले, लांडगा, तांबडा कोल्हा, कॅनडियन लिंक्स, ऊद मांजर, मिंक, मार्टिन, बीव्हर इ. प्राणी या प्रदेशात आढळतात. अलीकडे पर्वतपायथ्यालगत जंगलांची वाढ झालेली असून, त्यांत प्रामुख्याने स्प्रूस वृक्ष आढळतात. या प्रदेशाच्या निसर्गसुंदर किनाऱ्यावर फ्योर्ड, उंच कडे, उपसागर व जलप्रपात आढळतात.

चौधरी, वसंत