व्हँडॉल : प्राचीन काळातील रानटी टोळ्यांपैकी विशेष विध्वंसक वृत्तीची जर्मानिक टोळी. सर्व प्रकारच्या सार्वजनिक व खाजगी मूल्यवान वस्तूंची लूट व नासधूस करणे तसेच विशिष्ट राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन विध्वंसक कृत्ये करणार्यांtना ‘व्हँडॉल’ असे नाव रूढ झाले. मूळ बर्बर आदिवासी लोकांमधील ही टोळी असून ती ख्रिस्ती शकाच्या चौथ्या शतकात उत्तर जटलंमधून पनोनिया व डेश म्हणजे स्थूलमानाने हल्लीच्या हंगेरी, रूमानिया या देशांत स्थायिक झाली. तेथून पश्चिमेकडे सरकत सरकत व्हँडॉलांनी प्राचीन ⇨ गॉल या प्रदेशात (हल्लीच्या फ्रान्समध्ये) वसाहत करण्याचा प्रयत्न केला पण तेथे रोमन सम्राटांच्या वतीने फ्रँक लोकांनी त्यांना कसून विरोध केल्यामुळे ते स्पेनमध्ये शिरले व सम्राट होनोरिअसची सत्ता (कार. ३९५-४२३) मान्य करून तेथे राहू लागले. पण लवकरच हे सख्य संपुष्टात येऊन व्हँडॉलांचे रोमन सत्तेशी व व्हिसिगॉथ टोळ्यांशी संघर्ष होत राहिले [→ गॉथ]. पाचव्या शतकाच्या पूर्वार्धात राजा गायझरिकच्या (कार. ४२८-४७७) नेतृत्वाखाली व्हँडॉल टोळ्या उत्तर आफ्रिकेत पोहोचल्या व तेथे त्यांनी स्वतःचे बलवत्तर आरमार तयार केले. लवकरच त्यांनी रोमन सेनापती बॉनिफेसचा पराभव करून आफ्रिका खंडातील रोमन साम्राज्याच्या बऱ्याच भागांवर अंमल बसविला. इ. स. ४३९ मध्ये त्यांनी कर्थेजही काबीज केले. आफ्रिकेतील वसाहतीतून व्हँडॉल आरमाराने भूमध्य समुद्राच्या परिसरातील मुलखात लुटालूट करून सिसिली, दक्षिण इटली इ. देशांना त्रस्त केले. सम्राट तिसरा व्हॅलन्टिनीअनने (कार. ४२५-४५५) गायझरिकच्या स्वतंत्र राज्यास मान्यताही दिली. तरीही व्हँडॉल आरमाराच्या विध्वंसक कृत्यांना आळा बसला नाही किंवा पूर्व व पश्चिम रोमन साम्राज्यांवरील व्हँडॉलांच्या आक्रमक धोरणात बदल झाली नाही. इ. स. ४५५ मध्ये त्यांनी खुद्द रोममध्ये जाळपोळ करून सम्राज्ञी युडोशीआला तिच्या दोन मुलींसह ओलीस म्हणून आफ्रिकेला नेले. व्हँडॉल जमात एरिअन पंथी असल्याने त्यांचा प्रस्थापित ख्रिस्ती धर्मसंस्थेशीही संघर्ष झाला. पोप मजोरिअर (कार. ४५७-४६१) व पहिला लीओ यांनी व्हँडॉल सत्ता नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला सम्राट झीनोला तर गायझरिकशी तह करणे भाग पडले. मात्र गायझरिकच्या मृत्यूनंतर (इ. स. ४७७) व्हँडॉल सत्तेस उतरती कळा लागली. पुढे सम्राट जस्टिनिअनचा (कार. ५२७-५६५) सेनापती बेलिसेअरिअस याने कार्थेज काबीज करून व्हँडॉल सत्ता नष्ट केली (५३३). इतिहासात नोंद राहिली ती व्हँडॉलांच्या विध्वंसक आक्रमणाची व त्यांच्या लुटारू व क्रूर प्रवृत्तीची. सांस्कृतिक दृष्ट्या यूरोपीय जीवनावर त्यांचा फारसा प्रभाव पडला नाही.

संदर्भ : 1. Bury, J. B. The Invasion of Europe by the Barbarians, New York, 1967.

             2. Gibben, Edward, The Decline and Fall of the Roman Empire, 2 Vols. London, 1952.

             3. Hodgkin, Thomas, Italy and Her Invanders, 3 Vols. London, 1992-96.

ओक, द. ह.