व्रणबंध : (आयुर्वेद). व्रणावर बांधावयाचा बंध-पट्टा. अळशीचे धागे, कापूस, लोकर, रेशीम यांनी विणलेले पट्टे, तसेच दुकूल (तलम वा रेशमी वस्त्र), चीनपट्ट (चीनयुगपट चीनमध्ये होणारा लोकरीचा प्रकार), चामडे, झाडाची अंतर्साल, दुध्या-भोपळ्याच्या सालीचे तुकडे, वेलीचे तुकडे, दोरी, सावरीची बोंडे, दुधाची साय, सोने, रुपे इ. धातूंचे पत्रे वगैरे द्रव्ये यासाठी वापरतात. रोग, दोष, काल पाहून यांचा उपयोग करावा. कोश, दाम, स्वस्तिक, वितान, गोफण, यमक, पंचांगी इ. पंधरा व्रणबंध प्रकार आहेत. अवयवाची ठेवण व त्यावर सोईने बांधता येऊन बांधलेली द्रव्ये व्यवस्थित राहतील या दृष्टीने बंधाच्या आकाराचे प्रकार केले आहेत. गाढ, सम, शिथिल हे बंध बांधण्याचे प्रकार आहेत. व्रणाचा अवयव, त्याची हालचाल, दोष इत्यादींना अनुसरून तो घट्ट, ढिला की मध्यम बांधावा हे ठरवायचे असते. व्रणबंधाचे पुढील उपयोग आहेत : व्रणबंधामुळे माश्या, धूळ, वारा, ऊन, धक्का लागणे इत्यादींपासून व्रणाचे रक्षण होते बंधामुळे निखळलेले, फुटलेले हाड, लचक इ. चांगली बरी होतात शिवाय सुखाने हालचाल करता येते, निजता येते व व्रण लवकर भरून येतो.
जोशी, वेणीमाधवशास्त्री.