व्यूह मानसशास्त्र : (गेश्टाल्ट सायकॉलॉजी). एक मानसशास्त्रीय संप्रदाय. समष्टिमानसशास्त्र असेही त्यास संबोधण्यात येते. समष्टिवादी मानसशास्त्र उदयाला येण्यापूर्वीच्या रचनालक्षी आणि प्रक्रियावादी मानसशास्त्र प्रणालींचा भर विश्लेषणावर होता. जे काही दिसते, त्यातील मूलभूत तत्त्व शोधून काढणे, हे त्यांचे उद्दिष्ट होते. त्यामुळे अंतर्निरीक्षण, वर्तननिरीक्षण, शाब्दिक कथन इ. ⇨ मानसशास्त्रीय पद्धतींचा त्यांनी अवलंब केला. समष्टिवाद म्हणजे वर उल्लेखिलेल्या प्रणालींच्या विरुद्ध केलेले बंड होते. या प्रणालीनुसार आपल्याला विश्लेषणाच्या माध्यमातून वर्तनाचा अभ्यास करता येत नाही कारण संवेदन-प्रक्रियेतून आपल्याला जी अनुभूती होते, ती त्यातील तपशिलाने होत नाही. अनेक संवेदने एकत्र आल्यामुळे आपल्याला जो काही बोध होतो, तो त्यातील पृथक् संवेदनांपेक्षा अगदी वेगळा असतो, असे समष्टिवादी मानतात. [→ प्रक्रियावादी मानसशास्त्र रचनालक्षी मानसशास्त्र].
वर्तनवादी मानसशास्त्र हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ⇨ जॉन ब्रॉड्स वॉटसन यांच्या पुढाकाराने १९१३ मध्ये अमेरिकेत उदयास आले. त्याच सुमारास म्हणजे १९१२ मध्ये जर्मनीमध्ये, समष्टिवादी मानसशास्त्राचा प्रारंभ झाला. जर्मन मानसशास्त्रज्ञ ⇨ माक्स व्हेर्थायमर (१८८० –१९४३) यांना समष्टिवादाचे जनक समजण्यात येते. त्यांच्या समष्टिवादी विचारप्रणालीत ⇨ व्होल्फगांग कलर (१८८७ –१९६७) आणि ⇨ कुर्ट कॉफ्का (१८८६ –१९४१) हे दोघे मानसशास्त्रज्ञ लवकरच सामील झाले. या त्रयीने समष्टिवादी मानसशास्त्राची भक्कम उभारणी केली. या चळवळीतच ⇨ कुर्ट ल्यूइन (१८९० – १९४७) यांनी समष्टितत्त्वांच्या आधारे स्वत:ची क्षेत्रीय उपपत्ती (फील्ड थिअरी) निर्माण केली. [→ क्षेत्रीय मानसशास्त्र].
फेलिक्स क्रूगर (१८७४ – १९४८) यांनी सर्वप्रथम Ganzheit या जर्मन शब्दाचा उपयोग मानसशास्त्रात केला. Gestalten हासुद्धा जर्मन शब्द असून त्याचाही अर्थ पूर्णता, संपूर्णता, संघटना असा आहे. या शब्दाचे बहुवचन Gestalt होय. कोणत्याही वर्तनातील वा क्रियेतील संपूर्ण अर्थ हा त्या क्रियेतील घटकांपेक्षा वेगळा व अधिक असतो. काही घटक सहजपणे एकत्र येत नाहीत, तर त्यांच्या एकत्रितपणामुळे काही वेगळे निर्माण व्हावयाचे असते व त्यामुळे ते एकत्रित येतात. साखर, चक्का, केशर, जायफळ हे पदार्थ विशिष्ट प्रमाणात एकत्र आले, की त्यातून जे काही निर्माण होते, त्याला ‘श्रीखंड’ म्हणतात. आपण जगात जे अनुभवतो, ते पूर्णत्वाच्या स्वरूपात अनुभवतो. आपण व्यक्ती, टेबल, झाड, पुस्तक, इमारत, फळ इ. वस्तू पूर्णत्वाच्या स्वरूपात पाहतो. त्यांचा रंग, आकार इ. घटक आपण वेगवेगळेपणाने पाहत नाही. आपले संवेदन हे पूर्णत्वाच्या स्वरूपात असते आणि तोच समष्टिवादाचा अभ्यासविषय होय.
समष्टिमानसशास्त्रानुसार वर्तनाचे दोन भाग पडतात : स्थूल किंवा सांघतिक (मोलर) आणि सूक्ष्म किंवा रेणवीय (मॉल्यूक्यूलर). ज्या वेळी आपण वर्तनाचा उल्लेख ढोबळपणे करतो, त्या वेळी वर्तनाच्या तपशिलाचा त्यात उल्लेख नसतो. उदा., ‘आजचा दिवस फार चांगला गेला’ हे स्थूल वर्तन होय. परंतु दिवस चांगला जाण्यास काय-काय घडले याचा तपशील जेव्हा आपण सांगतो, तेव्हा आपण सूक्ष्म वर्तनाचा उल्लेख करत असतो. स्थूल वर्तन हे नेहमी सहेतुक असते आणि त्याला काही उद्दिष्ट असते. ⇨ एडवर्ड टोलमन (१८८६ –१९५९) या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी स्थूल वर्तनाचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या मतानुसार स्थूल वर्तन म्हणजे एक प्रकारची पूर्णता होय. समष्टिवादी मानसशास्त्रज्ञांनी ⇨ व्हिल्हेल्म व्हुंट (१८३२ – १९२०) ह्यांच्या ‘विटा आणि चुना’ या प्रकारच्या मानसशास्त्राला प्रखर विरोध केला. विटा म्हणजे मूलभूत तत्त्व (एलिमेंट) आणि चुना म्हणजे विटांना जोडणारे साधन म्हणजेच साहचर्य. दोन मूलभूत तत्त्वे साहचर्यामुळे एकत्रित येतात आणि आपल्या स्मरणात राहतात. या प्रकारचे मानसशास्त्र समष्टिवाद्यांना मान्य नव्हते. त्यांनी संपूर्णत्वाचाच नेहमी पुरस्कार केला.
समष्टिवादी मानसशास्त्रज्ञांचे पहिले महत्त्वाचे संशोधनक्षेत्र म्हणजे ‘संवेदन’. समष्टिवादाची सुरुवात ही माक्स व्हेर्थायमर ह्यांच्या संवेदनावरील पहिल्या प्रयोगातून झाली. हा प्रयोग भासमान गतीशी (अपॅरेंट मूव्हमेंट) संबंधित होता. व्हेर्थायमर एकदा आगगाडीत बसून र्हारईनलँडला जाताना त्यांच्या लक्षात आले, की दोन दिव्यांची उघडझाप विशिष्ट ठरावीक गतीने केल्यास, पाहणाऱ्या ला ते दिवे पुढे-मागे सरकत आहेत, असा भास होतो. यालाच त्यांनी ‘भासमान गती’ म्हणून संबोधले. हा विचार मनात आल्याबरोबर ते आगगाडीतून उतरले आणि त्यांनी स्ट्रॉबोस्कोप खरेदी केला आणि त्याच्या साहाय्याने पुन:पुन्हा भासमान गतीचा प्रयोग केला. या प्रयोगांचे मानसशास्त्रावर फार दूरमागी परिणाम झाले. भासमान गतीचा अनुभव हा त्यातील दोन दिव्यांच्या स्वतंत्रपणे होणाऱ्या उघडझापीवर अवलंबून नव्हता तर तो त्या दोन्ही दिव्यांच्या उघडझापीचा संयुक्त परिणाम होता. कोणत्याही दोन किंवा त्याहून अधिक वस्तूंचे होणारे पृथक-पृथक वेदन (सेन्सेशन) आणि त्या वस्तूंचे होणारे संयुक्त वेदन हे भिन्न असते. संयुक्त वेदनामुळे येणारा मानसशास्त्रीय अनुभव हा अगदी वेगळा असतो. या संयुक्त अनुभवात प्रयुक्ताचा सहभाग असतो. प्रयुक्त त्या सर्व वेदनांचे संघटन करत असतो आणि त्यालाच समष्टितत्त्व म्हणून संबोधण्यात येते. आपण संपूर्ण जगाचा अनुभव हा समष्टितत्त्वाच्या माध्यमातून घेत असतो. सुंदर स्त्रीचे नाक, भालप्रदेश, गाल, जिवणी, भुवया म्हणजे सुंदर मुख नव्हे, तर या सर्व भागांचे एकत्रीकरण (समष्टितत्त्व) म्हणजे सुंदर चेहरा.
मेंदूच्या कार्याचा विचार केला, तर वर्तनवादी आणि समष्टिवादी मानसशास्त्रज्ञांमध्ये मूलभूत फरक आढळून येतो. ⇨ वर्तनवादानुसार पर्यावरणातील उद्दीपकांद्वारे येणारे वेदन हे प्रथमत: वेदनेन्द्रियांवर कार्यान्वित होते आणि नंतर ते मेंदूपर्यंत पोहोचते. त्यामुळे मेंदूला विशिष्ट अनुभव प्राप्त होतो व परिणामी व्यक्ती प्रतिक्रिया देण्यास सिद्ध होते. या संपूर्ण प्रक्रियेत मेंदूचा स्वत:चा कार्यभाग नसतो. मेंदू जणू निष्क्रिय असतो. ही मेंदूची निष्क्रियता (पॅसिव्हिटी) समष्टिवाद्यांना मुळीच मान्य नाही. त्यांच्या मतानुसार पर्यावरणातून येणाऱ्या वेदनांशी मेंदूतील पेशींची आंतरक्रिया होते व त्यामुळे आपल्याला विशिष्ट अर्थबोध होतो या ठिकाणी मेंदू हा सक्रिय असतो, असे गृहीत धरण्यात आलेले आहे. या मेंदूच्या सक्रियतेमुळे येणाऱ्या वेदनांचे अधिक चांगले संघटन होते आणि आपल्याला बाहेरील उद्दीपकाविषयी अधिक चांगली माहिती मिळते.
समष्टिवादी हे संपूर्ण जगाकडे केवळ ‘भौतिक’ म्हणून न पाहता मनोभौतिक (सायकोफिजिकल) दृष्टिकेानातून पाहतात. आपल्याला विशिष्ट वस्तूचा येणारा अनुभव, हा त्या वस्तूपेक्षा भिन्न असतो. समजा, आपण एखाद्या व्यक्तीला चालताना, तिच्या पाठमोऱ्या अवस्थेत पाहिले. आपण त्या व्यक्तीच्या पाठीकडील भाग बघत असूनदेखील त्या व्यक्तीच्या चालण्याच्या लकबीवरून ती व्यक्ती कोण आहे हे लक्षात घेतो आणि अचूकपणे त्या व्यक्तीला हाक मारतो. आपण या ठिकाणी त्या व्यक्तीचा जो काही भाग पाहतो, त्यावरून मानसिक पातळीवर त्या व्यक्तीचे संपूर्ण संघटन तयार करतो आणि ती व्यक्ती कोण हे निश्चित करतो. ‘चक्राकार परिणाम’ (स्पायरल इफेक्ट) याच्या साहाय्यानेदेखील जग हे मनोभौतिक कसे आहे, हे अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट करता येते. या प्रयोगात वर्तुळाकार चकती ३६० अंशाने फिरत असते. आपण त्या चकतीच्या मध्यभागी बघत असतो. सुमारे एक मिनिटानंतर त्या चकतीचे फिरणे थांबविल्यास ती चकती जणू आपल्याकडे येत आहे असा भास आपल्याला होतो. या ठिकाणी चकती स्थिर असणे हा भौतिकतेचा भाग, तर ती आपल्याकडे येत आहे हा मानसिकतेचा भाग होय. दोन्ही गोष्टी एकदम घडत असल्यामुळे आपणास येणाऱ्या अनुभवाला आपण मानसिक-भौतिक वा मनो-भौतिक अनुभव असे संबोधतो.
समष्टिवादी मानसशास्त्रज्ञांनी संवेदनाच्या बाबतीत केलेल्या संशोधनातून काही नियम जगापुढे मांडले. त्यांचा आता थोडक्यात विचार करू :
(१) आकृती व आधारभूमी : (फिगर अँड ग्राउंड). पर्यावरणातील वस्तूंचे संवेदन हे त्या वस्तूंच्या आधारभूमीवर होत असते. या ठिकाणी वस्तू ही आकृती असते. आपल्याला आकृती व आधारभूमीचे संवेदन होणे ही संवेदन-प्रक्रियेतील मूलभूत प्रवृत्ती होय, असे समष्टिवादी मानसशास्त्रज्ञ मानतात. या प्रकारचे संवेदन हे सर्व वेदनेंद्रियांच्या बाबतीत आढळून येते. उदा., आपण जेवताना अनेक चवींचा आस्वाद घेतो. परंतु एखादी चव इतर चवींच्या पार्श्वभूमीवर अधिक योग्य वाटते. या ठिकाणी ती विशिष्ट चव म्हणजे आकृती आणि जेवणातील इतर चवी म्हणजे आधारभूमी होय.
रूबिन (१९२१) या मानसशास्त्रज्ञांनी आकृति-आधारभूमीचे तत्त्व सर्वप्रथम सांगितले. त्यांच्या मतानुसार बाह्य जगातील आपण पाहत असलेली कोणतीही वस्तू कोणत्या ना कोणत्या आधारभूमीवर पाहत असतो. चंद्र आकाशाच्या आधारभूमीवर पाहतो तर झाडावरील फळ हे त्या झाडावरील पानांच्या आधारभूमीवर पाहतो. ध्वनिसंवेदनात आपण गाणे ऐकताना गायकाचा आवाज हा तबला, पेटी इ. वाद्यवृंदातील सुरांच्या आधारभूमीवर ऐकू येतो. या ठिकाणी गाणे ही आकृती, तर वाद्यवृंद ही आधारभूमी ठरते.
आकृती व आधारभूमी यांच्यात पुढीलप्रमाणे फरक नमूद करता येतील : (१) आकृती ही समोरच्या भागात असते, तर आधारभूमी ही पार्श्वभागात असते. (२) आकृती ही नेहमी आपल्याला जवळ वाटते, तर आधारभूमी ही आपल्यापासून दूर असते. (३) आकृतीला विशिष्ट आकार असतो व त्यामुळे ती उठावदार दिसते. याउलट, आधारभूमी मागे पसरलेली आहे, असे वाटते. (४) आकृतीला विशिष्ट रूप (शेप) असल्यामुळे ती सहज लक्षात राहते.
आकृती आणि आधारभूमी यांचा अनुभव घ्यावयाचा असल्यास ह्या आकृतीकडे पाहा. संपूर्ण आकृतीवर नजर स्थिर केल्यास आपल्याला दोन काळे चेहरे समोरासमोर दिसतात. या दोन काळ्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास त्या दोन चेहऱ्यांत लपलेली फुलदाणी दिसते. या ठिकाणी फुलदाणी ज्या वेळी आकृतीच्या रूपाने प्रकट होते, त्या वेळी समोरासमोरील काळे चेहरे आधारभूमीचे काम करतात.
आकृती आपण बघतो परंतु आकृती कशी तयार होते, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही हातात पेन्सिल धरा आणि कोऱ्या कागदावर एका विशिष्ट बिंदूपासून रेषा काढायला सुरुवात करा. रेषा वेडीवाकडी काढली, तरी चालेल परंतु ती रेषा शेवटी सुरुवातीच्या बिंदूला जुळेल याची खातरी करा. असे केल्यांनतर तुम्हाला असे आढळून येईल, की कोऱ्या कागदावर एक आकृती तयार झाली आहे. ही केवळ रेषा नसून आकाररेषा (कॉंटुर) आहे. परंतु आकृती निर्माण करणारी आकाररेषा म्हणजे आकृती नव्हे. एवढेच की, तिच्यामुळे आपण आकृती ही आधारभूमीपासून वेगळी पाहू शकतो. जेव्हा आधारभूमीचा रंग किंवा तेजस्विता ही आकृतीचा रंग किंवा तेजस्विता ह्यांपेक्षा वेगळी असते, तेव्हाच आकाररेषा तयार होते. एकंदरीत, आकाररेषेमुळे वस्तूला आकार प्राप्त होतो. त्याचप्रमाणे एका वस्तूपासून दुसरी वस्तू वेगळी अशी ओळखण्यास आपणास मदत होते. तसेच आकाररेषेमुळे वस्तूला आकार प्राप्त होत असला, तरी आकाररेषा स्वत: आकारहीन असते.
(२) छद्मावरण : (कॅमूफ्लाझ). आकृती आणि आधारभूमी यांतील आकाररेषा अस्पष्ट असली, किंवा नाहीशी झाली तर आणि आकृती व आधारभूमी यांचा रंग एकच असेल, तर आकृती शोधणे कठीण जाते. हिरव्या रंगाचा पोपट झाडाच्या हिरव्या पानांमध्ये लवकर दिसत नाही. [→ मायावरण]. या तत्त्वाचा उपयोग युद्धभूमीवर लढणारे सैनिक स्वत:च्या बचावाकरिता करतात. [→ मायावरण, सैनिकी]. समष्टिवाद्यांनी काही विशेष असे सांवेदनिक समूहनाचे नियम (लॉज ऑफ पर्सेप्च्युअल ग्रुपिंग) शोधून काढले आहेत. आपल्या संवेदनक्षेत्रात अनेक वस्तू किंवा उद्दीपके असतात. त्या वस्तू समूहरूपात पाहण्याची आपली मूलभूत प्रवृत्ती असते. त्यांचादेखील आपल्याला विचार करावयास हवा.
(३) सान्निध्य किंवा समीपता : (प्रॉक्सिमिटी ऑर निअरनेस). समजा, एखाद्या मोठ्या खोलीत अनेक व्यक्ती बसल्या आहेत, एका सोफ्यावर तीन व्यक्ती जवळजवळ बसल्या आहेत. दुसऱ्याच सोफ्यावर दोन व्यक्ती जवळजवळ बसल्या आहेत. त्याचप्रमाणे खोलीतील चार खुर्च्यांवर प्रत्येकी एकेक व्यक्ती बसली आहे. आपण खोलीत या
व्यक्तींकडे पाहत असताना तीन व्यक्तींचा एक समूह आणि दोन व्यक्तींचा दुसरा समूह असे आपल्या लक्षात येते. याचे कारण म्हणजे त्या व्यक्ती जवळजवळ बसल्या आहेत. यालाच ‘समीपतेचा नियम’ म्हणतात. उरलेल्या चार खुर्च्यांवरील व्यक्ती वेगवेगळ्या असल्याचे आपल्याला वाटते. त्यांचा समूह आहे, असे आपणास वाटत नाही. एकंदरीत जे उद्दीपक स्थानिक किंवा कालिकदृष्ट्या एकमेकांच्या सान्निध्यात किंवा जवळ असतील, त्यांचे संवदेन समूहरूपाने होते. हे खालील उदाहरणावरून अधिक स्पष्ट होईल. अ आणि ब आकृतींत १० रेषा आहेत. परंतु ‘अ’ आकृतीत दहा रेषा आहेत असे आपण समजतो. तर ‘ब’ आकृतीत दोन रेषांचा एक याप्रमाणे पाच समूह आहेत असे आपल्या लक्षात येते.
(४) समानता : (सिमिलॅरिटी). उद्दीपकांमध्ये जर सारखेपणा किंवा समानता असेल, तर त्या उद्दीपकांचे संवेदन समूहरूपाने होते. दहा मुलांच्या समूहामध्ये दोन मुली असल्यास त्या दोन मुलींचा एक समूह आणि उरलेल्या आठ मुलांचा एक समूह आपल्याला प्रतीत होतो. आकृती क्रमांक तीनमध्ये भरीव ठिपके आणि पोकळ ठिपके आहेत. भरीव ठिपक्यांकडे पाहिल्यास त्यांचे एकत्र समूहरूपाने ‘त्रिकोण’ म्हणून आपणास संवेदन होते. परंतु पोकळ ठिपक्यांकडे पाहिल्यास त्यांचे वेगळे त्रिकोणरूपाने संवेदन होते. रस्त्यात गणवेश घातलेले पोलीस समूहरूपाने लगेच आपल्या लक्षात येतात.
(५) समावेशन : (क्लोझर). या नियमानुसार अपूर्ण आकृतीचे संवेदन अपूर्णत्वाने न होता पूर्णत्वाने होते. आकृती पूर्ण नसली, तरी पूर्ण आहे असे आपण समजतो. आकृती क्र.४ मध्ये अ, ब, क या तीन आकृत्या आहेत. त्या सर्व अपूर्ण आहेत. परंतु त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ‘अ’ आकृती ही वर्तुळासारखी, ‘ब’ आकृती त्रिकोणासारखी आणि ‘क’ आकृती चौकोनासारखी दिसते. या आकृत्या म्हणजे वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोन आहेत असे आपण समजतो.
(६) चांगली आकृती : (गुड फिगर). चांगली आकृती, चांगले चित्र, चांगली दिसणारी व्यक्ती आपल्या नजरेत एकदम भरते. याउलट, ओबडधोबड आकृती किंवा वेडेवाकडे चित्र आपल्या लगेच लक्षात राहात नाही. आकृती क्र.५ मध्ये ‘अ’ आणि ‘ब’ या दोन आकृत्या आहेत. समानतेच्या नियमानुसार ‘अ’ आकृतीमधील सर्व ठिपके भरीव आहेत. ते चांदणीच्या रूपाने प्रतीत होतात. ‘ब’ आकृतीत दोन प्रकारचे ठिपके आहेत. असे असूनदेखील त्यांच्या विशिष्ट रचनेमुळे आपल्याला ते चांदणीसारखे दिसतात. परंतु ‘अ’ आणि ‘ब’ या दोन आकृतींपैकी ‘अ’ ही आकृती अधिक वेधक व आकर्षक वाटते.
(७) निरंतरता : (कंटिन्यूइटी). काही वस्तू किंवा उद्दीपके एका रेषेत असली, तर त्यात सलगता किंवा निरंतरता निर्माण होते. कवायतीमध्ये व्यक्ती एकामागोमाग उभ्या राहतात. त्यामुळे जणू एखादी रांग वा ओळ निर्माण झाली आहे, असे संवेदन आपल्याला होते. आकृती क्रमांक ६ च्या साहाय्याने निरंतरता अधिक स्पष्ट करता येईल. या आकृतीत ‘अ’ आणि ‘ब’ हे दोन ठिपके आहेत. ‘अ’ पासून सुरू होणाऱ्या ठिपक्याच्या साहाय्याने नंतर-नंतरच्या ठिपक्यांवर नजर फिरवीत ‘ब’ ठिपक्यापर्यंत पोहोचलो, तर आपल्याला एका सलग रेषेचे संवेदन होते. वस्तुत: ही रेषा सलग नाही. दोन ठिपक्यांमधील अंतरामुळे ती तुटलेली आहे. परंतु आपल्याला मात्र एका निरंतर रेषेचे संवेदन होते.
पर्यावरणातील वस्तू वा उद्दीपके यांचे संवेदन त्यांच्या विशिष्ट रचनेमुळे (सारखेपणा, समीपता, सलगता इत्यादी) होते. परंतु संवेदन-प्रक्रियेत केवळ बाह्य वस्तू या उद्दीपके यांचाच समावेश नसतो. या संवेदन-प्रक्रियेवर व्यक्तीच्या आंतरिक घटकांचादेखील परिणाम होतो. समजा, उद्दीपके पर्यावरणात आहेत आणि व्यक्तीला त्यांच्याकडे पाहण्याची इच्छा नसेल, तर वरील सर्व नियम व्यर्थ ठरतात. संवेदन हे पर्यावरणातील उद्दीपके आणि आंतरिक घटक यांमधील आंतरक्रियेचे फलित होय. या आंतरिक घटकांचे स्वरूप पुढीलप्रमाणे :
(१) न्यास : (सेट). विशिष्ट उद्दीपक ग्रहण करण्याच्या तयारीला (ए स्टेट ऑफ रेडिनेस) ‘न्यास’ असे म्हणतात. मानसिक आणि कारक (मोटर) असे न्यासाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. वक्त्याच्या भाषणाकडे मन लावून लक्ष देणे, ते अवधानपूर्वक ऐकणे हा ‘मानसिक न्यास’ होय. परंतु भाषण ऐकत असताना आपण आपली शरीरस्थिती विशिष्ट रीतीने ठेवतो. हा ‘कारक न्यास’ होय. उद्दीपकातील किंवा वस्तूतील तपशील जाणून घेण्याकरिता या दोन्ही प्रकारच्या न्यासांची आवश्यकता असते. आपल्या विचारांचादेखील आपल्या न्यासावर परिणाम होतो.
(२) गरजा, प्रेरणा व भावनिक स्थिती : (नीड्स, मोटिव्ह्ज अँड इमोशनल स्टेट). विशिष्ट वेळेला असणारी आपली भावना व आपल्या गरजा-प्रेरणा यांवर आपले संवेदन अवलंबून असते. आपण आनंदी असताना दुसऱ्या व्यक्तीने केलेली चूक मनावर न घेता त्या व्यक्तीला सावरून घेण्याचा प्रयत्न करतो. याउलट आपण क्रुद्ध असताना दुसऱ्या व्यक्तीची किरकोळ चूकदेखील आपल्याला फार मोठी वाटते एका प्रयोगात भुकेल्या प्रयुक्तांना आकारहीन चित्रे दाखविली, तर त्यांना त्या आकारहीन चित्रांत फळे व इतर खाद्यपदार्थ दिसू लागले. एकंदरीत आपल्या गरजेनुसार-प्रेरणेनुसार आपले संवेदन बदलत असते.
(३) पूर्वानुभव : डेव्हिड क्रेच (१९०६ –७७) आणि रिचर्ड क्रंचफील्ड (१९१२ – ७७) यांच्या मतानुसार आपण एखाद्या व्यक्तीकडे किंवा वस्तूकडे आपल्या पूर्वानुभवाच्या माध्यमातून पाहतो. गरम दुधाने तोंड भाजल्याचा पूर्वानुभव असलेली व्यक्ती दूधच काय, पण ताकदेखील फुंकून पिते ही म्हण या संदर्भात अर्थपूर्ण ठरते.
(४) सांवेदनिक अध्ययन : (पर्सेप्च्युअल लर्निंग). अनुभव किंवा प्रशिक्षण यांच्या आधारे उद्दीपकांद्वारे जास्तीत जास्त माहिती मिळविणे, याला ‘सांवेदनिक अध्ययन’ म्हणतात. यातून आपण सांवेदनिक कौशल्ये शिकत असतो. केवळ स्पर्शाच्या साहाय्याने धातूतज्ज्ञांना मौल्यवान खड्यांमधील फरक कळतो कारण हे खडे अनेक वर्षे हाताळल्यामुळे त्यांना हे सांवेदनिक ज्ञान प्राप्त होते. अनुभवाद्वारे प्राप्त होणाऱ्याक सांवेदनिक कौशल्याचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात बऱ्याचदा उपयोग करतो.
(५) सांवेदनिक स्थिरता : (पर्सेप्च्युअल कॉन्स्टंसीज). सांवेदनिक स्थिरता म्हणजे आपण विशिष्ट वस्तू निरनिराळ्या परिस्थितीत सारखीच पाहतो. काळा कोळसा अंधारात असला काय आणि लख्ख प्रकाशात असला काय तो काळाच दिसतो. आणखी एका उदाहरणाने हे अधिक स्पष्ट करता येईल. समजा ‘क्ष’ व्यक्ती आपल्यासमोर उभी आहे, इमारतीच्या पहिल्या मजल्यावर, नंतर दुसऱ्या मजल्यावर आणि शेवटी आपण त्या व्यक्तीला सहाव्या मजल्यावर उभी असलेली पाहतो. या ठिकाणी मजल्यानुसार त्या व्यक्तीचे आपल्यापासूनचे अंतर जास्त होत असल्यामुळे आपल्या दृक्पटलावर पडणारी प्रतिमा लहान-लहान होते. असे असूनही आपल्याला ती व्यक्ती सर्वसाधारण माणसासारखी वाटते. म्हणजेच परिस्थितीत बदल होत असला, तरी आपले संवेदन मात्र स्थिर राहते. आकार स्थिरता (साइझ कॉन्स्टन्सी), दीप्ती (द्युती)-स्थिरता (ब्राइटनेस कॉन्स्टन्सी), डौल वा रूप स्थिरता (शेप कॉन्स्टन्सी) इ. संवेदन-स्थिरता आपल्या आयुष्यात नसतील, तर पर्यावरणातील वस्तू पाहताना आपला गोंधळ होईल.
समष्टिवादी मानसशास्त्रातील अध्ययनाची तत्त्वे : व्होल्फगांग कलर या समष्टिवादी मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या अध्ययनक्षेत्रातील संशोधनाचे निष्कर्ष ‘द मेंटॅलिटी ऑफ एप्स’ (१९२५) या पुस्तकात आढळून येतात. त्यांच्या मतानुसार आपल्यासमोर एखादी समस्या असल्यास आपल्यात बोधनिक असंतुलन निर्माण होते आणि समस्येचे निराकरण होईपर्यंत ते असंतुलन कायम राहते. त्यांच्या मतानुसार अध्ययन हे बोधनिक (कॉग्निटिव्ह) स्वरूपाचे असते. अध्ययनकर्ता बोधनिक स्तरावर काय काय करता येईल याचा विचार करतो. बऱ्याचदा त्याला एकदम मार्ग सुचतो आणि समस्येचे निराकरण होते. याला ‘मर्मदृष्टी-अध्ययन’ असे म्हणतात. समष्टिवाद्यांनुसार या प्रकारे अध्ययन होते किंवा होत नाही हे दोनच पर्याय असतात. त्यामुळे अध्ययन म्हणजे सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया असे ते मानत नाहीत. याचा पडताळा घेण्याकरिता त्यांनी सुलतान नावाच्या चिंपॉंझीच्या साहाय्याने पुढील प्रयोग केले :
एका खोलीत वर एक केळ टांगलेले होते. जमिनीवर तीन-चार खोकी होती. थोडा वेळ येरझारा घालून वानराने ती खोकी एकावर एक ठेवली आणि वरच्या खोक्यावर उभे राहून केळ हस्तगत केले. दुसऱ्या प्रयोगात भुकेल्या वानराला बंदिस्त पिंजऱ्यात ठेवण्यात आले. पिंजऱ्यात एक लहान काठी होती. पिंजऱ्याच्या बाहेर एक मोठी काठी होती आणि त्या काठीच्या पलीकडे काही अंतरावर एक केळे ठेवलेले होते. वानराने लहान काठीने मोठी काठी ओढून घेतली आणि मोठ्या काठीच्या साहाय्याने केळे पिंजऱ्याकडे ओढले, हातात घेतले आणि खाल्ले.
या प्रयोगात आपणास असे आढळून येते, की समस्येची सोडवणूक हळुहळू न होता एकदम होते. खोके आणि केळे यांतील संबंध तसेच मोठी काठी आणि केळे यांतील संबंध वानराच्या लक्षात एकदम आला आणि त्याप्रमाणे त्याने पुढील कारवाई केली. एकंदरीत प्राप्त परिस्थितीतील महत्त्वपूर्ण संबंधांची जाणीव म्हणजे मर्मदृष्टी.
मर्मदृष्टी-अध्ययनाची तीन वैशिष्ट्ये सांगता येतील : (१) विविध प्रकारे प्रयत्न केल्यानंतर समस्येची उकल एकदम लक्षात येते. याचाच अर्थ हा, की मर्मदृष्टी काही प्रमाणात प्रयत्न-प्रमाद-प्राप्त असू शकते. (२) मर्मदृष्टीत ‘सांवेदनिक पुनर्संघटने’चा अंतर्भाव असतो. सांवेदनिक पुनर्संघटन म्हणजे परिस्थितीत उपस्थित असणाऱ्या घटकांमधील (वस्तू, संकल्पना इ.) नवीन संबंधांची जाणीव होणे. (३) एकदा समस्येची उकल झाली, की त्यातून निर्माण होणाऱ्या मर्मदृष्टीचा उपयोग या प्रकारच्या समस्यांची उकल करण्याकरिता भविष्यात होतो. [→ मर्मदृष्टि].
ब्लूमा झायगर्निक (१९०० – ८८) ह्या समष्टिवादी मानसशास्त्रज्ञांच्या मतानुसार उकल न झालेल्या समस्यांचे स्मरण आपल्याला उकल झालेल्या समस्यांच्या तुलनेत अधिक होते. उकल न झालेल्या समस्यांमुळे आपल्यात बोधनिक असंतुलन निर्माण होते आणि हे असंतुलन आपल्याला त्या समस्येची वारंवार आठवण करून देत असते. एकदा समस्येची उकल झाली, की मग मात्र त्या समस्येचे स्मरण हळुहळू कमी-कमी होऊन कालांतराने नाहीसे होते.
विचारप्रक्रिया : समष्टिवाद्यांनी विचारप्रक्रियेतील उत्पादक विचार (प्रॉडक्टिव्ह थिंकिंग) याविषयी बरेच संशोधन केले. माक्स व्हेर्थायमर ह्यांचे ‘प्रॉडक्टिव्ह थिंकिंग’ या नावाचे पुस्तक १९४५ साली प्रसिद्ध झाले. त्यांनी पारंपरिक पद्धतीने विचार करण्याच्या प्रक्रियेला जबरदस्त धक्का दिला. त्यांच्या मतानुसार तार्किकता आणि साहचर्य यांचा उत्पादक विचारांना फार थोडा फायदा होतो. समस्येची उकल करण्याकरिता तार्किकतेचा फार थोडा उपयोग होतो, असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले. त्याचप्रमाणे साहचर्याचा कल घोकंपट्टीकडे असल्यामुळे ही पद्धती सर्जनप्रक्रियेला घातक ठरते. व्यक्तिगत अनुभव, प्रायोगिकता, भावभावना, अभिवृत्ती, संवेदन या सर्व घटकांचा उपयोग विचारप्रक्रियेकरिता आणि समस्येची उलक करण्याकरिता होतो, असे त्यांचे मत होते. या घटकांमुळे उत्पादक विचारांना चालना मिळते. उत्पादक विचार किंवा सर्जनतेविषयी समष्टिवाद्यांची तत्त्वे पुढीलप्रमाणे सांगता येतील : (१) आपल्या पारंपरिक पद्धती किंवा आपल्या सवयी यांच्या साहाय्याने आपण जेव्हा समस्येची उकल करू शकत नाही, त्या वेळी उत्पादक किंवा सर्जनशील विचारांचा प्रादुर्भाव होतो. खोके किंवा काठ्या यांचा उपयोग करून आपण नेहमी अन्न मिळवत नाही परंतु अन्न मिळविण्याची समस्या निर्माण झाली, तर त्या साधनांचादेखील कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो, हे कलर ह्यांच्या प्रयोगातील वानराने आपल्याला दाखविले. (२) काही वेळा समस्येची उकल ही टप्प्याटप्याने होते. अशा वेळी आपल्याला निरनिराळ्या चढत्या श्रेणीच्या विचारप्रक्रियांचा विचार करावा लागतो. (३) विचारप्रक्रियेतील सांवेदनिक पुनर्संघटनेमुळे तुटलेले दुवे सांधून आपण संपूर्णतेचा (गेश्टाल्ट) विचार करू शकतो आणि त्यामुळे समस्या पूर्णत: कशी सुटेल, हे आपल्या सहज लक्षात येते. केळे आणि खोलीतील खालची जमीन यांमधील पोकळी कशी भरून काढावी, हे खोक्यांकडे किंवा मोठ्या काठीकडे पाहिल्यानंतर वानराच्या लक्षात आले. (४) सांवेदनिक क्षेत्राकडे पाहण्याची एकाग्रता, पूर्वानुभव आणि आंतरिक प्रेरणा यांवर समस्येची उकल बऱ्याचदा अवलंबून असते. (५) समस्येची उकल ही एकदम लक्षात येणाऱ्या पुनर्रचित सांवेदनिक संघटनेवर अवलंबून असते. हा एकदम लक्षात येणारा अनुभव म्हणजे कार्य करण्याची शीघ्रता नव्हे, हे मात्र आपण लक्षात ठेवावयास हवे. (६) बोधनिक समस्या काही प्रमाणात एकसारख्या असल्या, तर धनात्मक संक्रमण होत असते आणि परिणामी समस्येची उकल करण्यास याची मदत होते.
स्मृतिशेष : (मेमरी ट्रेस). समष्टिवादी हे जन्मजात क्षमतांवर अधिक भर देतात आणि त्या दृष्टिकोनातून संवेदन आणि अध्ययन यांचे स्पष्टीकरण देतात. असे असले, तरी त्यांनी अनुभवजन्य ज्ञानाचा त्याग केला नाही. आपल्या आयुष्यातील भूत आणि भविष्य कसे सांधले जातात, याचे स्पष्टीकरण देताना कुर्ट कॉफ्का ह्यांनी स्मृतिशेष ही संकल्पना मांडली. त्यांच्या मतानुसार ‘स्मृतिशेष’ हा भूत आणि भविष्य यांतील दुवा होय. वर्तमानकाळातील कोणत्याही अनुभवामुळे सर्वप्रथम स्मृतिप्रक्रियेला चालना मिळते. ही प्रक्रिया म्हणजे मेंदूच्या पेशींमध्ये होणारे बदल. हे बदल आपल्याला येणारा अनुभव अगदी साधा आहे, की गुंतागुंतीचा यावर कमी-अधिक प्रमाणात निर्माण होत असतात. पेशींमध्ये बदल होण्याची प्रक्रिया संपली, की मागे काही ‘शेष’ असे उरते. त्यालाच समष्टिवादी ‘स्मृतिशेष’ म्हणून संबोधतात. हे स्मृतिशेष नंतरच्या अनुभवाच्या वेळी उपयोगात येतात. एवढेच नव्हे, तर नंतरच्या अनुभवामुळे अगोदरच्या स्मृतिशेषांमध्ये आणखी बदल होतो. थोडक्यात, आपण ज्याला अध्ययन म्हणतो, ते या स्मृतिशेषांच्या बदलांवर, त्याच्या स्थित्यंतरावर अवलंबून असते. काही वेळा विशिष्ट अनुभवांचा स्मृतिशेष अधिक बळकट असतो. अशा स्मृतिशेषाचा परिणाम फार शीघ्रतेने होतो.
आपण विविध वस्तू, व्यक्ती, घटना यांना अनुलक्षून निरनिराळे अनुभव घेतो. त्यामुळे निरनिराळ्या अनुभवांचे वेगवेगळे स्मृतिशेष निर्माण होतात. परंतु हे विविध स्मृतिशेष पृथकपणे कार्यरत नसतात. कॉफ्काच्या मतानुसार अनेक स्मृतिशेषांच्या एकत्रीकरणामुळे मेंदूत एक प्रकारची शेषसंस्था (ट्रेस सिस्टिम) निर्माण होत असते. काही अनुभव आपण पुन्हा: पुन्हा घेतो. त्यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या स्मृतिशेषांमुळे शेषसंस्था अधिक दृढ होत असते. विविध अनुभवांकरिता मेंदूत वेगवेगळ्या शेषसंस्था निर्माण होतात आणि त्या सर्व परस्परांशी सहकार्याने काम करतात.
काही वेळा काही स्मृतिशेष अपूर्ण असतात. परंतु मेंदूच्या पेशींच्या साहाय्याने हे अपूर्ण स्मृतिशेष हळुहळू चांगले आणि पूर्ण होतात. समष्टिवाद्यांना साहचर्य-सिद्धांत मुळीच मान्य नाही. स्मृतिशेषाचे संकल्पनेने ते अध्ययन, संवेदन, स्मृती इत्यादींचे स्पष्टीकरण देतात.
समष्टि-उपचारपद्धती : (गेश्टाल्ट थेरपी). समष्टि-उपचारपद्धतींचा मुख्य गाभा हा संपूर्णत्वावर आधारित आहे. ज्या वेळी व्यक्तीला स्वत:च्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची जाणीव असते, त्या वेळी ती प्रकृत असते. परंतु ज्या वेळी ही जाणीव अस्पष्ट किंवा अर्धवट असेल, त्या वेळी व्यक्तिमत्त्वात काही बिघाड झाला आहे असे समजावे. अस्पष्ट किंवा अर्धवट जाणिवेमुळे विकृतीदेखील संभवते. व्यक्तीला पुन्हा व्यक्तिमत्त्वाची संपूर्ण जाणीव करून देणे म्हणजेच समष्टि-उपचारपद्धती होय. ही पद्धती मानवीय व समग्र (होलिस्टिक) दृष्टिकोनाचा पुरस्कार करते.
फ्रीड्रिख (फ्रिट्स) सालोमन पलर्स (१८९३ – १९७०) हा समष्टि-उपचारपद्धतीचा उद्गाता मानला जातो. त्याच्या मतानुसार व्यक्तिमत्त्वात संतुलन ठेवण्याकरिता व्यक्तीला सतत धडपड करावी लागते. पर्यावरणातील घटक आणि गरजा यांची पूर्ती या संदर्भांतील कारणांमुळे व्यक्तीचे संतुलन सतत बिघडत असते. त्यामुळे मानसिक ताण वाढतो. बिघडलेले संतुलन पूर्वपदावर आणण्याकरिता व्यक्ती सतत धडपडते आणि ही धडपड म्हणजे सर्व प्रेरणांचे मूळ होय. धडपडीमध्ये बऱ्याचदा काही व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग पूर्ण व्यक्तिमत्त्वापासून अलग होतो आणि परिणामी व्यक्तीत विकृती निर्माण होते. परंतु व्यक्तीला याची जाणीव नसते. उपचारपद्धतीत व्यक्तीला याची जाणीव करून देणे आणि अलग झालेला व्यक्तिमत्त्वाचा भाग उरलेल्या व्यक्तिमत्त्वाशी जोडून संपूर्ण व्यक्तिमत्त्व निर्माण करणे यावर भर असतो.
एकंदरीत व्यूह अथवा समष्टिवादी मानसशास्त्र पूर्णत्वावर आणि त्या पूर्णत्वाच्या अनुभवावर आधारलेले आहे.
पहा : मानसशास्त्र संवेदन ज्ञानसंपादन.
संदर्भ : 1. Chaplin, J. P. Krawiec, T. S. Systems and Theories of Psychology, New York, 1968.
2. Hergenhahn, B. R. An Introduction to Theories of Learning, Englewood Cliffs. (N. J.), 1988.
3. Woodworth, R. S. Schlosberg, H. Experimental Psychology, New York, 1958.
देशपांडे, चंद्रशेखर