व्याघाती द्वंद्व : (अँटिनॉमी). ‘अँटिनॉमी’ या संज्ञेशी समानार्थक अशी पॅरॅडॉक्स ही संज्ञा अलीकडे वापरात आहे. जेव्हा सामान्यपणे सर्वमान्य अशा आधारवाक्यांपासून परस्परविरुद्ध किंवा परस्परव्याघाती निष्कर्ष निघतात, तेव्हा त्या प्रसंगास ‘व्याघाती द्वंद्व’ किंवा ‘विप्रतिषेध’ असे म्हणतात. असत्य बोलणार्याचे द्वंद्व (लायर पॅरॅडॉक्स) हे व्याघाती द्वंद्वाचे सर्वांत जुने आणि प्रसिद्ध उदाहरण. उदा., ‘मी खोटे बोलतो आहे’ असे कोणीतरी केलेले विधान. जर ते खरे असेल, तर ते खोटे होईल आणि खोटे असेल, तर खरे होईल. [→ विरोधापत्ति, तार्किक].

तत्त्वज्ञानाच्या इतिहासात अशी अनेक द्वंद्वे प्रसिद्धी पावली आहेत. उदा., ⇨ ईलीआची झीनो (इ. स. पू. पाचवे शतक) ह्याने रचलेली द्वंद्वे किंवा ⇨ इमॅन्युएल कांट (१७२४–१८०४) ह्याची अवकाश आणि काल ह्यांच्याविषयीची द्वंद्वे. अलीकडचे एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे ⇨ बर्ट्रँड रसेल (१८७२–१९७०) ह्यांनी दाखवून दिलेले द्वंद्व.

ही द्वंद्वे म्हणजे चमत्कृतिजनक खेळ आहेत, असे प्रथमदर्शनी वाटेल पण त्यांच्यामुळे गंभीर समस्या उद्‌भवतात. जर ह्या द्वंद्वांची समाधानकारक उकल झाली नाही, तर मानवी विचार आणि तर्क मुळातच दूषित आहेत, असे सिद्ध होईल.

पहा : द्वंद्ववाद.

देशपांडे, दि. य.