व्यक्तिमात्रतावाद : (नॉमिनॅलिझम). फक्त विशिष्ट वस्तूंना अस्तित्व असते, इतर कोणत्याही प्रकारच्या पदार्थाला अस्तित्व नसते, असे प्रतिपादन करणारे सत्ताशास्त्रातील मत. व्यक्तिमात्रतावादासाठी ‘वस्तुमात्रतावाद’, ‘नाममात्रतावाद’ असेही पऱ्यायी शब्द आहेत. इतर प्रकारचे पदार्थ म्हणजे उदा. सामान्ये (युनिव्हर्सल्स), गुणधर्म, संबंध, वस्तुस्थिती (फॅक्ट), विधाने इत्यादी. ⇨ प्लेटो ह्या तत्त्ववेत्त्याने असा सिद्धांत मांडला आहे की, ज्याप्रमाणे विशिष्ट घोड्यांना अस्तित्व असते, त्याप्रमाणे घोडेपणा किंवा अश्वत्व असे सामान्यही अस्तित्वात असते आणि ज्या विशिष्ट वस्तूंच्या ठिकाणी हे सामान्य मूर्त झालेले असते वा अवतरलेले असते, त्या वस्तू आणि त्याच वस्तू (विशिष्ट) घोडे असतात. सामान्यांना असे स्वतंत्र अस्तित्व असते, ह्या मताला ‘वास्तववाद’ असे म्हणतात. ‘वास्तववाद’ ह्या शब्दाला तत्त्वज्ञानाच्या परंपरेत दुसराही एक अर्थ आहे. तो असा की, प्रत्यक्ष ज्ञानाचे विषय असलेल्या वस्तूंना त्या ज्ञानाहून स्वतंत्र असे अस्तित्व असते. [→ वास्तववाद, तत्त्वज्ञानातील]. ह्यात असे सूचित केले आहे की, ज्या सामान्यांचे अस्तित्व प्लेटो मानतो, त्यांच्याविषयीचे आपले बोलणे हे केवळ कित्येक शब्दांविषयीचे बोलणे असते.

व्यक्तिमात्रतावादाचा प्रारंभ विल्यम ऑफ ऑकम ह्या चौदाव्या शतकातील मध्ययुगीन ‘स्कोलॅस्टिक’ तत्त्ववेत्त्याच्या विचारापासून झालेला आढळतो. ऑकमचे मत थोडक्यात असे होते की, अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट ही विशिष्ट वस्तू असते पण आपल्या भाषेत दोन प्रकारची पदे असतात. एका प्रकारची पदे अशी असतात की, ती एकाच वस्तूला उद्देशून लावता येतात. उदा. ‘हरिश्चंद्र’ किंवा ‘राणा प्रताप’ पण काही पदे अशी असतात, उदा. ‘घोडा’ किंवा ‘माणूस’ की, ती अनेक समान वस्तूंना उद्देशून लावता येतात. ही दुसऱ्या प्रकारची पदे म्हणजे ‘सामान्य पदे’ होत. ‘हरिश्चंद्र’ हे पद ज्या व्यक्तीचा निर्देश करते, ती विशिष्ट व्यक्ती म्हणजे त्या पदाचा अर्थ असे म्हणता येईल. पण ‘घोडा’ हे सामान्य पद ‘अश्वत्थ’ ह्या सामान्याचा निर्देश करते आणि हे सामान्य त्या पदाचा अर्थ असतो असे नसते, तर ज्या विशिष्ट वस्तूंना उद्देशून ‘घोडा’ हे पद लावता येते, त्या विशिष्ट वस्तूंचा समुदाय हा ‘घोडा’ ह्या पदाचा अर्थ असतो. पण ह्या भूमिकेच्या संदर्भात एक प्रश्न उपस्थित होतो तो हा की, ‘घोडा’ हे पद एका विशिष्ट वस्तूला उद्देशून लावणे योग्य, बरोबर ठरेल की नाही हे आपण कशाच्या आधारे ठरवितो? ‘घोडा’ ह्या पदाने निर्दिष्ट होणाऱ्या विशिष्ट वस्तूंच्या समुदायात एखाद्या विशिष्ट वस्तूचा अंतर्भाव करणे योग्य आहे की नाही हे ठरविण्याचे निकष काय? ह्यावर ऑकम याचे उत्तर असे आहे की, ‘घोडा’ यासारख्या सामान्यवाची शब्दामागे एक मानसिक संज्ञा किंवा संकल्पना असते आणि हिचे स्वरूपच असे असते की, काही नेमक्या, विशिष्ट वस्तूंना उद्देशून ती लावता येते. ह्या संज्ञेने एक सामान्य अस्तित्व निर्दिष्ट होते म्हणून ती सामान्य संकल्पना नसते, तर अनेक विशिष्ट वस्तूंना उद्देशून ती लावली जाते. ह्या तिच्या स्वरूपामुळे ती सामान्य असते.

आधुनिक काळात ब्रिटिश अनुभववादी तत्त्ववेत्त्यांनी सामान्यांविषयीच्या समस्येचा ऊहापोह केला आहे. सर्व ज्ञानाचा उगम प्रत्यक्ष ज्ञानात असतो असा ह्या तत्त्ववेत्त्यांचा मूलभूत सिद्धांत आहे. आता विशिष्ट त्रिकोणांचे प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला होते, पण ‘हा त्रिकोण आहे’ ह्या विधानात ‘त्रिकोण’ हे सामान्यपद आहे आणि त्याचा अर्थ काय असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे ⇨ जॉन लॉक (१६३२–१७०४) ह्याने दिलेले उत्तर असे की, अनेक विशिष्ट त्रिकोणांचे निरीक्षण केल्यानंतर त्यांच्यात जे भिन्न धर्म असतात ते वगळून आणि जे समान धर्म असतात तेवढेच सर्व निवडून हेच केवळ धर्म जिच्या अंगी आहेत अशा आकृतीची कल्पना बनवितो. अनेक विशिष्ट वस्तूंना समान असलेले तेवढे धर्म स्वीकारून बनविलेल्या कल्पनांना लॉक ‘अपकृष्ट कल्पना’ (ॲब्स्ट्रॅक्ट आयडियाज) म्हणतो. सामान्य पदांनी अशा अपकृष्ट कल्पना व्यक्त होतात, असे त्याचे प्रतिपादन आहे पण त्याच्या नंतरचा अनुभववादी तत्त्ववेत्ता बिशप ⇨ जॉर्ज बर्क्ली (१६८५–१७५३) लॉकचे हे मत अमान्य करतो. त्याचे म्हणणे असे आहे की, जी जी कल्पना आपण करतो ती विशिष्ट वस्तूची कल्पना असते. एक त्रिकोण आहे, त्याच्या रेषांना लांबी आहे, पण विशिष्ट लांबी नाही त्याला कोन आहेत, पण ते विशिष्ट आकारमानाचे नाहीत अशा त्रिकोणाची कल्पनाच असू शकत नाही. तेव्हा अपकृष्ट कल्पना असे काही नसते पण एखाद्या विशिष्ट त्रिकोणाची कल्पना आपण करून ह्या कल्पनेकडे त्रिकोणाच्या सबंध वर्गाची प्रतिनिधी म्हणून आपण पाहू शकतो. जिला आपण सामान्याची कल्पना म्हणतो ती एक विशिष्ट कल्पनाच असते, पण एकमेकांसारख्या असलेल्या कित्येक वस्तूंच्या वर्गाची प्रतिनिधी म्हणून आपण तिचे उपयोजन करीत असतो. नंतरचा अनुभववादी तत्त्ववेत्ता ⇨ डेव्हिड ह्यूम (१७११–७६) याने बर्क्लीच्या ह्या मताला पुष्टी दिली आहे. [→ अनुभववाद].

अलीकडच्या काळात सामान्ये असतात की नाहीत ह्या समस्येविषयी बराच विचार झाला आहे. ‘हे पिवळे आहे’ ह्या विधानाने पिवळेपणा हा सामान्य धर्म ह्या वस्तूच्या ठिकाणी आहे असे सांगितले आहे, हे कसे नाकारता येईल हा प्रश्न आहे. ह्यातून सुटका करून घेण्याचा एक मार्ग असा : ‘पिवळे असणे’ ह्या शब्दप्रयोगाची विशिष्ट प्रकारे व्याख्या आपण करतो. जिला पिवळी म्हणून आपण ओळखू अशी एक विशिष्ट वस्तू आपण घेतो. तिचे ‘अ’ असे नाव ठेवू. मग ‘क्ष पिवळे आहे’ ह्याची व्याख्या आपण अशी करतो : ‘क्ष पिवळे आहे’ म्हणजे क्ष=अ किंवा ‘क्ष’ ‘अ’सारखे आहे. ह्या व्याख्येत ‘पिवळा’ हे सामान्य पद उपस्थित नाही आणि म्हणून पिवळेपणा असा सामान्य धर्म मानण्याचे कारण उरत नाही. पण अडचणींचे पूर्ण निरसन होत नाही. कारण ‘पिवळे असणे’ म्हणजे ‘अ-सारखे असणे’ एवढेच नसते, तर रंगाने अ-सारखे असणे असते आणि ह्या व्याख्येत ‘रंग’ हे सामान्य पद येते. शिवाय ‘सारखे’ हे सामान्य पद येतेच येते. त्यांचा अर्थ काय?

आपण जेव्हा एखाद्या वस्तूचा निर्देश करून ती अशी अशी आहे असे सांगतो, तेव्हा निर्दिष्ट वस्तूला अस्तित्व आहे हे मान्य करावे लागते, पण तिचे जे वर्णन आपण केलेले असते, जे विशेषण तिला लावलेले असते त्याच्या आशयाला स्वतंत्रपणे अस्तित्व असते असे मानण्याचे कारण नाही, अशी एक भूमिका आहे. ‘हे पिवळे आहे’ ह्या वाक्यातील ‘हे’ ह्या सर्वनामाने निर्दिष्ट होणाऱ्या वस्तूला अस्तित्व असते, पण ‘पिवळे’ ह्या विशेषणाने व्यक्त होणाऱ्या पिवळेपणा ह्या गुणाला अस्तित्व असते, असे मानायचे कारण नाही. आता ‘वक्तशीरपणा चांगला असतो’ ह्या वाक्यात वक्तशीरपणाचा निर्देश झाला आहे आणि त्याच्याविषयी काहीतरी सांगितले गेले आहे. तेव्हा वक्तशीरपणा असा एक सामान्य धर्म आहे असे मानावे लागते. पण ह्यावर मार्ग असा की, ‘वक्तशीरपणा चांगला असतो’ ह्या वाक्याचे भाषांतर आपण असे करतो : ‘जो माणूस वक्तशीर असतो, तो चांगला असतो.’ ह्या भाषांतर करणाऱ्या वाक्यात ‘वक्तशीर’ हे विशेषण काय ते येते वक्तशीरपणाचा निर्देश होत नाही. म्हणून वक्तशीरपणा असे सामान्य आहे असे मानण्याचे कारण उरत नाही पण ह्या मार्गालाही एक मऱ्यादा आहे. ‘देवदत्त हा माणसांच्या वर्गाचा घटक आहे’ ह्या वाक्यात माणसांच्या वर्गाचा निर्देश आहे पण माणसांचा वर्ग अशी विशिष्ट वस्तू नसते हे उघड आहे. पण ह्या वाक्याचे ‘देवदत्त हा माणूस आहे’ असे भाषांतर करता येते आणि ‘माणूस’ हे पद केवळ विशेषण म्हणून येते पण ह्या मार्गाचा नेहमी अवलंब करता येतो असे नाही. उदा. संच-उपपत्तीमध्ये (सेट-थिअरी) पुढील विधान सत्य म्हणून स्वीकारता येते : A हा विशिष्ट संच Aच घातसंचाचा सदस्य असतो. ह्यात A ह्या विशिष्ट वर्गाचा किंवा संचाचा निर्देश आहे. त्याचे अस्तित्व मान्य करावे लागते.

सामान्यांविषयीच्या समस्येवर एक तोडगा सुचविण्यात आला. तो असा की, सामान्यांविषयीचे आपले बोलणे हे वस्तूविषयीचे बोलणे आहे असे न मानता ते काही भाषिक प्रयोगांविषयीचे बोलणे आहे असे मानावे. उदा. ‘तांबडेपणा हा एक धर्म आहे’ असे न म्हणता ‘चांगुलपणा’ (हा शब्द) एक विशेषण आहे असे मानावे. म्हणजे धर्म ह्या सामान्याचे अस्तित्व मानायचे कारण उरत नाही. ह्या प्रकारे सामान्यांविषयीच्या समस्येची सोडवणूक करण्यातील अडचण अशी : आपण कुठच्याही पुरेशा प्रगत भाषेत ‘तांबडेपणा हा धर्म आहे’ हे विधान करू शकतो. उदा. इंग्रजीत ‘Redness is an attribute’ ह्या वाक्याद्वारे हे विधार करता येते. पण ‘तांबडेपणा हा एक धर्म आहे’ ह्याचे भाषांतर ‘तांबडे हे विशेषण आहे’ असे केले, तर हे मराठी भाषेपुरते सत्य ठरते. कारण येथे आपण ‘तांबडे’ ह्या मराठी शब्दाविषयी बोलत आहोत. ‘तांबडे’ हे विशेषण आहे, ह्या वाक्याचे इंग्रजी भाषांतर ‘तांबडे’ is an adjective असे होईल ‘Red is an adjective’ असे होणार नाही. तेव्हा धर्मांविषयीच्या वाक्यांचे भाषानिरपेक्ष रीतीने विशेषणांविषयीच्या वाक्यांत भाषांतर करता येत नाही. ह्या अडचणीतून मार्ग काढण्याचे प्रयत्न होत आहेत.

पहा : सामान्य.

संदर्भ : 1. Lewis, D. On the Plurality of Worlds, Oxford, 1986.

            2. Lous, M. J. Ockham’s Theory of Terms, Notre Dame, 1974.

            3. Quine, W. V. From a Logical Point of View, Cambridge, 1953.

            4. Stout, G. F. The Nature of Universal and Propositions, London, 1921.

रेगे, मे. पुं.