वैशाख : हिंदू कालगणनेप्रमाणे वर्षातील हा दुसरा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र विशाखा नक्षत्राच्या आसपास असतो म्हणून या महिन्याला वैशाख हे नाव पडले आहे. प्राचीन काळी या महिन्याचे नाव माधव हे होते. चैत्र पौर्णिमेपासून वैशाख पौर्णिमेपर्यंत महिनाभर सूर्योदयापूर्वी पुण्यप्रद वैशाख स्नान करतात.
वैशाख महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस पुढील होत : शिखांचे दहावे व अखेरचे गुरू ⇨गोविंदसिंग यांनी वैशाख शुद्ध प्रतिपदेला खालसा (अत्यंत शुद्ध) पंथाची स्थापना केली. या महिन्यात पूर्ण नवीन पिके हाती येत असल्याने उत्तर भारतात बैसाखी हा उत्सव या महिन्यात (सामान्यपणे १३ एप्रिलला) साजरा करतात. तृतीयेत परशुराम जयंती, चतुर्थीला रामानुजाचार्य जयंती, पंचमीला आद्य शंकराचार्य जयंती (नवीन मतानुसार दशमी), सप्तमीला गंगापूजन, सीतानवमी (जनक राजाला सीता या दिवशी सापडली), चतुर्दशीला सायंकाळी नृसिंह जयंती आणि पौर्णिमेला बुद्ध जयंती व आद्य शंकराचार्याची पुण्यतिथी असते. यांपैकी शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात व साडेतीन मुहूर्तांपैकी (चैत्री पाडवा, अक्षय्य तृतीया व विजया दशमी पूर्ण आणि दिवाळी पाडवा अर्धा) हा एक पूर्ण मुहूर्त आहे. शुद्ध अष्टमीला दुर्गेची अपराजिता नावाने पूजा करतात व शुद्ध नवनीला भूदान करतात. कृष्ण पक्षात कालाष्टमी आणि अमावस्येला शनैश्चर जयंती असते. भारतीय राष्ट्रीय पंचांगात वैशाख हा दुसरा महिना असून तो ३१ दिवसांचा आहे आणि त्याची सुरुवात २१ एप्रिल रोजी होते.
ठाकूर, अ. ना.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..