काशीनाथ सीताराम वैद्यवैद्य, काशीनाथ सीताराम : ( ९ मार्च १८९०–१३ मार्च १९५९). ब्रिटिशांकित हिंदुस्थानच्या हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्यलढ्यातील एक नेते व सनदशीर राजकारणी. औरंगाबाद शहराजवळील सातारा खेड्यात जन्म. मद्रास विद्यापीठाची एम्‌.ए. व मुंबर्इ विद्यापीठाची एल्‌एल्‌. बी. या पदव्या मिळवल्यानंतर हैदराबाद शहरात वकिलीस व सार्वजनिक कार्यास प्रारंभ केला. संस्थानातील शिक्षणात उर्दू भाषेची सक्ती असू नये आणि खाजगी शाळा व ग्रंथालये काढण्यावरील निर्बंध रद्द करावेत, अशा मागण्यांसाठी काम करणाऱ्या हैदराबाद जनता शिक्षण परिषदेचे ते एक संस्थापक होते. संस्थानातील लोकजागृतीच्या वामन नाईक व केशवराव कोरटकरांच्या प्रारंभिक उपक्रमांना १९३०–४० या दशकात वैद्यांनी आधार दिला. सोशल सर्व्हिस लीग, हैदराबाद सामाजिक परिषद, विवेकवर्धिनी शिक्षणसंस्था, मराठी ग्रंथसंग्रहालय, अनाथ विद्यार्थिगृह, त्यावेळी आपल्या कार्यक्षेत्रात मराठवाड्याचा समावेश असलेला विदर्भ साहित्यसंघ अशा अनेक सार्वजनिक संस्थांशी त्यांचा सक्रिय संबंध होता.

संस्थानात अस्तित्वात असलेल्या अधिकारशून्य व नामधारी राजनियुक्त विधिमंडळाला थोडेतरी प्रातिनिधिक रूप लाभावे, यासाठी वैद्य यांनी प्रयत्न केले. त्यासाठी हैदराबाद पोलिटिकल रिफॉर्म्स असोसिएशन ही संस्था स्थापन केली. १९३७ साली सर आरमुदू अय्यंगार यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय सुधारणा सुचविण्यासाठी निजाम सरकारने नेमलेल्या समितीचे ते एक सभासद होते. समितीच्या अहवालाला त्यांनी भिन्न मतपत्रिका जोडली होती.

सत्याग्रह व संघर्षाचे राजकारण करण्याचा काशीनाथरावांचा पिंड नव्हता परंतु हैदराबाद स्टेट कॉंग्रेसवर जन्मापूर्वीच बंदी आल्याने १९३८ साली झालेल्या स्टेट कॉंग्रेसच्या पहिल्या सत्याग्रहातील शेवटच्या तुकडीत त्यांनी सत्याग्रह केला. त्यांना दोन वर्षे तुरुंगवास व दंडाची शिक्षा झाली. मात्र सत्याग्रह परत घेतला गेला असल्याने त्यांची थोड्याच दिवसांनंतर सुटका झाली. स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवण्याचा एक प्रयत्न म्हणून १९४०-४१ मध्ये सरकारशी वैद्यांनी दीर्घकाळ पत्रव्यवहार केला परंतु हा प्रयत्नही निष्फळ झाला.

वैद्य हैदराबादच्या राजकारणातील मवाळ गटाचे एक नेते होते. पोलीस कारवाईनंतर हंगामी लोकसभेवर हैदराबादचे जे सोळा सदस्य नियुक्त झाले, त्यात वैद्यांचा समावेश होता. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते हैदराबाद विधानसभेवर निवडून आले व त्यांची सभापती म्हणून निवड झाली. राज्यपुनर्रचनेनंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले. नंतर हरिजन सेवक संघ, भारत सेवक समाज अशा विधायक कार्य करणाऱ्या संस्थांतच त्यांनी लक्ष घातले. वैद्यांची भाषणे व लेख अभ्यासपूर्ण, मुद्देसूद तरीही संयमित असत. संस्थानातील पहिल्या सार्वजनिक कार्यकर्त्यांपैकी एक न्या. केशवराव कोरटकर यांचे चरित्रही वैद्यांनी लिहिले आहे. हैदराबाद येथे त्यांचे निधन झाले.

चपळगावकर, नरेंद्र