वेस्ली बंधू : वेस्ली, जॉन (१७ जून १७०३–२ मार्च १७९१), वेस्ली, चार्ल्स (१८डिसेंबर १७०७–२९ मार्च १७८८) : हे दोघे बंधू प्रॉटेस्टंट चर्चमधील मेथडिस्ट पंथाच्या संदर्भात महत्त्वाच्या व्यक्ती म्हणून गणल्या जातात. जॉन वेस्ली हा थोर धर्मनेता आणि मेथडिस्ट पंथाचा संस्थापक, तर चार्ल्स वेस्ली हा स्तोत्रकार आणि धर्मोपदेशक. दोघेही लिंकनशरमधील एपवर्थ येथे जन्मले. त्यांचे वडील सॅम्युएल हे अँग्लिकन धर्मोपदेशक होते. ख्राइस्ट चर्च कॉलेज, ऑक्सफर्ड येथे दोघांचेही शिक्षण झाले.
जॉन वेस्ली हा पदवीधर झाल्यावर (१७२४) ‘चर्च ऑफ इंग्लंड’ चा डीकन झाला (१७२५) आणि त्यानंतर काही वर्षांनी ह्याच चर्चचा तो अधिकृत धर्मोपदेशक झाला. १७२६ मध्ये लिंकन कॉलेज, ऑक्सफर्डचा ‘फेलो’ म्हणून त्याची नेमणूक झाली होती. ‘द होली क्लब’ ह्या नावाने ओळखल्या जाणार्याक विद्यार्थ्यांच्या एका गटाला तो मार्गदर्शन करीत असे. चार्ल्स हा त्याचा भाऊही ह्या गटात होता. ह्या विद्यार्थ्यांनी जॉनच्या नेतृत्वाखाली एक पंध स्थापन केला (१७२९). ह्या पंथीयांच्या शिस्तबद्ध, अचूक कार्यपद्धतीला अनुलक्षून ‘मेथडिस्ट’ हेच नाव त्यांच्या पंथाला मिळाले. जॉन उत्तर अमेरिकेतील जॉर्जियामध्ये मिशनरी म्हणून काम करीत असताना (१७३५–३७) मोरेव्हियन मिशनर्यांलनी त्याला प्रभावित केले. ख्रिस्तच आपल्याला तारील असा स्पष्ट संदेश आणि विश्वास देणारा एक आध्यात्मिक अनुभव तो लंडनमध्ये एका धार्मिक बैठकीसाठी गेलेला असता त्याला आला. अँग्लिकन चर्चच्या चौकटीत राहूनच हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो भ्रमंती करू लागला पण अँग्लिकन चर्चकडून प्रतिसाद मिळाला नाही. अनेकदा त्याच्या प्रवचनांसाठी चर्च उपलब्ध करून दिले जात नसल्याने तो खुल्या भूमीवरच प्रवचने देऊ लागला. चाळीस हजारांहून अधिक प्रवचने त्याने इंग्लंडमध्ये दिली त्यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला उपेक्षित सर्वसामान्यांपर्यंत मेथडिस्ट पंथ पोहोचला. केवळ ⇨ येथू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळेच मुक्ती मिळू शकते, असे हा पंथ मानतो [→ ख्रिस्ती धर्मपंथ]. जॉन वेस्लीच्या मेथडिस्ट चळवळीतून स्त्रीपुरुषांच्या अनेक ‘सोसायट्या’ उभ्या राहिल्या. त्यांच्यासाठी त्याने धर्मशास्त्रविषयक विपुल लेखन केले काही स्तोत्रे रचली ख्रिस्ती साहित्याचे ३५ खंड संपादित केले. १७८४ मध्ये ‘मेथडिस्ट चर्च’ ची स्थापना करण्याता आली. लंडनमध्ये तो निधन पावला.
“