वेस्ट व्हर्जिनिया : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पूर्व-मध्य भागातील एक घटक राज्य. याच्या उत्तरेस पेनसिल्व्हेनिया, ईशान्येस मेरिलंड, पूर्वेस व दक्षिणेस व्हर्जिनिया, नैर्ऋत्येस केंटकी व वायव्येस ओहायओ राज्य आहे. ⇨चार्ल्सटन (लोकसंख्या ५७,२८७– १९९०) ही राज्याची राजधानी आहे. राज्याचे एकूण क्षेत्रफळ ६२,७६१ चौ.किमी. असून लोकसंख्या १८,०७,००० (१९९९ अंदाज) होती. ओहायओ व पेनसिल्व्हेनिया यांदरम्यानची राज्याची अगदी उत्तरेकडील अरुंद पट्टी नॉर्दर्न पॅनहॅंडल या नावाने तर पूर्वेकडील मेरिलंड व व्हर्जिनिया यांदरम्यानची पट्टी ईस्टर्न पॅनहॅंडल नावाने ओळखली जाते. यामुळे या राज्याला पॅनहॅंडल स्टेट असेही म्हटले जाते. उंचसखल भूप्रदेशामुळे हे मौंटन स्टेट किंवा दि स्वित्झर्लंड ऑफ अमेरिका या नावानेही ओळखले जाते.

भूवर्णन : वेस्ट व्हर्जिनिया राज्याचा संपूर्ण प्रदेश ॲपालॅचिअन पर्वतप्रणालीचाच भाग आहे. राज्याचे ॲपालॅचिअन पठार आणि अपालॅचिअन कटक व दरी प्रदेश असे दोन प्राकृतिक विभाग पडतात. ॲलेगेनी फ्रंटच्या पश्चिमेकडील ओबडधोबड ॲपालॅचिअन पठाराने राज्याचे दोन तृतीयांशापेक्षा अधिक क्षेत्र व्यापले आहे. मोठ्या प्रमाणावर झीज झाल्यामुळे या प्रदेशात अरुंद दऱ्यात, द्रुतवाह, धबधबे, सपाट माथ्याचे उंचवटे व गोलाकार टेकड्या ही भूवैशिष्ट्ये आढळतात. त्यामुळे सखल प्रदेश फारच कमी आहे. ॲपालॅचिअन कटक व दरी प्रदेश ॲलेगेनी फ्रंटच्या पूर्वेस राज्याच्या पूर्व भागात आहे. याने राज्याचा एक तृतीयांश भाग व्यापला आहे. येथील पर्वतश्रेण्या ईशान्य-नैऋत्य दिशेत एकमेकींना समांतर अशा पसरलेल्या आहेत. त्यामुळे तेथील अरुंद दऱ्या एकमेकींपासून अलग झाल्या आहेत. दोन्ही प्राकृतिक विभागांच्या दरम्यानचा प्रदेश अतिशय ओबडधोबड असून खडकाळ कटक व दऱ्या तेथेही आढळतात. वेस्ट व्हर्जिनियाच्या भूप्रदेशाची सरासरी उंची सस. पासून सु. ४६० मी. आहे. शेनॅंडोआ व पोटोमॅक नद्यांच्या संगमाजवळील हार्पर्स फेरी हे सर्वांत कमी उंचीचे ठिकाण (७३ मी.) असून पूर्वेकडील ॲलेगेनी पर्वतीय प्रदेशातील स्प्रूस नॉब (१,४८३ मी.) हे राज्यातील सर्वोच्च शिखर आहे. राज्याच्या काही भागात हिमनदीने वाहून आणलेल्या गाळाचे संचयन झालेले आढळते. बिट्युमिनस कोळसा ही राज्यातील सर्वांत मोठी खनिज संपत्ती आहे. ती प्रामुख्याने मध्य व पश्चिम भागांत आढळते. याशिवाय खनिज तेल, नैसर्गिक वायू, मिठवणी (सॉल्ट ब्राइन), सैंधव, चुनखडक, वालुकाश्म, रेती, वाळू, बॅराइट, ब्रोमिन व फ्लूअरस्पार ही उत्पादनेही महत्त्वाची आहेत. व्हाइट-सल्फर व बर्कली स्प्रिंग येथे खनिजयुक्त पाण्याचे झरे आहेत.

ॲलेगेनी फ्रंटमुळे राज्यात दोन स्वतंत्र नदीप्रणाल्या निर्माण झाल्या आहेत. फ्रंटच्या पश्चिमेकडील नद्या व प्रवाह सामान्यपणे वायव्येकडे ओहायओ नदीला जाऊन मिळतात, तर पूर्वेकहील प्रवाह चेसापीक उपसागराला मिळतात. ओहायओ नदी राज्याच्या पश्चिम सरहद्दीवरून ४४३ किमी. अंतर वाहते. पुढे ती मिसिसिपीला मिळते. ओहायओमधून जलवाहतूक चालते. मनॉंगहीला, लिट्‌ल कनॉवा, गायन्‌डॉट व बिग सॅंडी या ओहायओच्या प्रमुख उपनद्या आहेत. पोटोमॅक ही पूर्वेकडील प्रदेशातील प्रमुख नदीप्रणाली आहे. ती उत्तरेकडे वाहत जाते. नॉर्थ ब्रॅंच व साउथ ब्रॅंच ह्या पोटोमॅकच्या प्रमुख उपनद्या आहेत. ग्रीनब्रायर ही या प्रदेशातील दुसरी महत्त्वाची नदी दक्षिणेस वाहत जाते. वेस्ट व्हर्जिनियात धरणांमुळे काही जलाशय तयार झाले असून ते मासेमारीच्या व पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत.

हवामान : राज्याच्या हवामानात विविधता आढळते. सारख्या कालावधीचे स्पष्टपणे दोन ऋतू अनुभवास येतात. राज्याचे सरासरी तापमान दक्षिण भागात १३° से., उत्तर भागात ११° सें., तर पर्वतीय प्रदेशात ९° से. आहिव्ळ्याती सरासरी तापमान पर्वतीय प्रदेशात –३° से. तर सखल भागात १° से. असते. उन्हाळ्यातील सरासरी तापमान पर्वतीय प्रदेशात १९° से. व सखल भागात २३° से. असते. पर्वतीय प्रदेशात काही वेळा-३४° से. पर्यंत तापमान कमी होते. पूर्व पॅनहॅंडल प्रदेशाच्या हवामानावर अटलांटिक महासागराचा परिणाम झालेला आहे. वार्षिक पर्जन्यमान काही पर्वतीय भागांत १२७ सेंमी. तर पॅनहॅंडल प्रदेशात ८९ ते १०२ सेंमी. आढळते. पर्जन्याचे वितरण सामान्यपणे समान असते. जास्त उंचीच्या प्रदेशात हिमवृष्टी होते.

वनस्पती व प्राणी : गोरे वसाहतकार येण्यापूर्वी सांप्रतच्या वेस्ट व्हर्जिनिया प्रदेशाचा बहुतांश भाग ॲपालॅचिअन हार्डवुड फॉरेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिश्र कठिण लाकडाच्या अरण्यांनी व्यापलेला होता. आज राज्याचा सु. तीन चतुर्थांश भाग वनाच्छादित आहे. भरपूर वनसंपत्तीमुळे हे राज्य वनस्पतिशास्त्रज्ञांचे नंदनवनच बनले आहे.

अमेरिकन इंडियनांनी केलेल्या शिकारीमुळे येथील एल्क व रेड्यांची संख्या खूप घटली. पांढऱ्या शेपटीचा व्हर्जिनिया मृग, ससा, खार, कोल्हा, अस्वल, ऑपॉस्सम, मार्टेन, मिंक, ऊद मांजर, स्कंक, रॅकून, प्यूमा, बीव्हर, रानमांजर, ग्राउंडहॉग हे प्राणी सर्वसामान्यपणे सर्वत्र आढळतात. आधुनिक पशुसंवर्धन तंत्रानुसार यातील फर-उत्पादक प्राण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. नद्यांच्या प्रवाहात वेगवेगळ्या प्रकारचे मासे आढळतात.

इतिहास : सुमारे १५,००० वर्षांपूर्वी या भागात मानवाचे वास्तव्य असावे. ‘अदेना’ किंवा ‘माउंड बिल्डर्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकन इंडियनांने वास्तव्य इ. स. पू. १००० ते इ. स. १००० या कालखंडात येथे होते. त्यांनी उभारलेली गोलाकार टेकाडे, स्मारके, भिंती इ. अजूनही अवशिष्ट आहेत. माउंड्‌सव्हील येथील ‘ग्रेव्ह क्रीक माउंड’ हा देशातील सर्वांत मोठा माउंड आहे. माउंड बिल्डर्स लोकांची जागा पुढे ‘फोर्ट एन्शन्ट’ लोकांनी घेतली. त्यानंतर सतराव्या शतकात इरोक्वाइस व चेरोकी लोकांनी येथे वस्ती केली. १६६९ मध्ये जॉन लेडरर हा पहिला यूरोपीय मनुष्य या प्रदेशात आला. १७२६ पासून या प्रदेशात गोऱ्या लोकांच्या वसाहतींस प्रारंभ झाला. १७२६–२७ मध्ये वेल्श, जर्मन व स्कॉटिश-आयरिश यांनी येथे वसाहतींची स्थापना केली. त्यांनी येथे किल्ले बांधले. १७४२ मध्ये कोल नदीकाठावरील रेसाइनजवळ जॉन पी. सॅली याने कोळशाच्या साठ्यांचा शोध लावला. १७५० व १७६० च्या दशकांत इंग्रजांनी फ्रेंचांच्या ताब्यातील या प्रदेशावर ताबा मिळवला.


अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धानंतर या प्रदेशात लोकांची बरीच गर्दी वाढली. १८६३ पर्यंत वेस्ट व्हर्जिनिया हा व्हर्जिनियाचा एक भाग होता. पूर्वेकडील उंच पर्वतरांगांमुळे या भागात आलेले वसाहतकरी प्रामुख्याने उत्तरेकडून आले. त्यामुळे पश्चिमेकडील व्हर्जिनिया सामाजिक, राजकीय व आर्थिक दृष्ट्या वेगळा राहिला. त्यातूनच यादवी युद्धकाळात गुलामगिरी व इतर अनेक गोष्टींबद्दलच्या वादातून हा भाग व्हर्जिनियापासून अलग झाला (१८६१). २० जून १८६३ रोजी पस्तीसावे घटक राज्य म्हणून वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकन संघराज्यात समाविष्ट झाले. १८८० च्या दशकात कोळसा व नैसर्गिक वायुउत्पादन आणि लाकूड-उद्योगाचा राज्यात विकास झाला. १८७१ ते १८९७ या काळात राज्यात डेमोक्रॅट पक्षाची, १८९७ ते १९३३ (१९१७– २१ वगळता) रिपब्लिकन पक्षाची, तर १९३३ ते १९५७ मध्ये डेमोक्रॅट पक्षाची सत्ता होती. त्यानंतर मात्र सतत सत्तांतर होत गेले.

आर्थिक स्थिती : वेस्ट व्हर्जिनिया राज्य पूर्वीपासूनच कोळसा, खनिज-तेल, नैसर्गिक वायू इ. कच्च्या मालाच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे. बिट्युमिनस कोळसा हे राज्यातील सर्वांत महत्त्वाचे खनिज आहे. संयुक्त संस्थानांतील हे दुस क्रमांकाचे कोळसा-उत्पादक राज्य आहे. एकेकाळी राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोळसा-उत्पादन, वनोत्पादन व खनिज तेल-उत्पादनावर आधारित होती परंतु पहिल्या महायुद्धानंतर कारखानदारीचा विकास होत जाऊन अर्थव्यवस्था विविधतेकडे जाऊ लागली. ओहायओ व कनॉवा खोऱ्यांत आणि व्हीलिंग प्रदेशात मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांचा विकास होत गेला. या खोऱ्यात महत्त्वाची रसायने, काच व धातू उद्योगांची केंद्रे निर्माण झाली आहेत. स्वस्त व मुबलक कोळसा, नैसर्गिक वायू, मुबलक पाणीपुरवठा, चुनखडक व सैंधव यांचे विपुल साठे अशी पुरेशी नैसर्गिक साधनसंपत्ती, वाहतूक सुविधा व मोठ्या बाजारक्षेत्रांजवळचे स्थान यांचा येथील औद्योगिकीकरणास फायदा मिळाला आहे. लोह व पोलाद-निर्मिति-उद्योगांचे स्थानिकीकरण नॉर्दर्न पॅनहॅंडल प्रदेशात झालेले आहे. याशिवाय मातीच्या व काचेच्या वस्तू, खाद्यपदार्थ, खनिज तेल व कोळसा उत्पादने, धातूच्या वस्तू, यंत्रे, प्लॅस्टिक, विद्युत साहित्य, वैद्यकीय उपरणे, लाकूड-उत्पादने, कागद व कागदाचा लगदा, कापड, वाहतूक साधनांची निर्मिती हे इतर महत्त्वाचे उद्योगधंदे राज्यात चालतता.

कोळसा खाणकाम हा अजूनही प्रमुख आर्थिक व्यवसायांपैकी एक आहे. कारखानदारी, व्यापार व खाणकाम व्यवसायांतून राज्याला सर्वाधिक उत्पन्न मिळते. राज्यातील सु. तीन चतुर्थांश कामगार सेवा-व्यवसायांत गुंतले आहेत. राज्यातील लोकांचे दरडोई उत्पन्न १७,२०८ डॉलर होते (१९९४ अंदाज). नैसर्गिक पर्यावरण-संतुलनाची व साधनसंपत्तीच्या संवर्धनाची राज्यात विशेष काळजी घेतली जाते.

डोंगराळ प्रदेशामुळे राज्यातील बराचसा भाग लागवडीस अयोग्य आहे परंतु रुंद दऱ्या व पर्वतपठारे सुपीक आहेत. टेकड्यांच्या भागात कुरणे राखली आहेत. पोटोमॅक खोऱ्यात कृषी पट्टे आढळतात. नदी खोlत गाळाची सुपीक मृदा आहे. उत्पन्नातील फारच थोडा भाग शेतीपासून मिळतो. १९९३ मध्ये राज्यात २०,००० शेते होती. प्रत्येक शेताचा सरासरी आकार सु. ७५ हेक्टर होता. वाळलेले गवत, बार्ली, ओट, गहू, बटाटे, पीच, सफरचंद, चेरी, द्राक्षे, पीअर ही प्रमुख कृषिउत्पादने आहेत. शेनॅंडोआ व्हॅली हा प्रदेश सफरचंद-उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पशुपालन व्यवसाय महत्त्वाचा असून गायीगुरे, मेंढ्या, डुकरे, कोंबड्या हे प्राणी पाळले जातात.

राज्यात सु. ५९,५९४ किमी. लांबीचे रस्ते व १३,२१,९०२ नोंदणीकृत मोटारगाड्या होत्या (१९९३). लोहमार्गांची लांबी २,९२५ किमी. होती (१९९४). ओबडधोबड भूपृष्ठामुळे राज्यात जलमार्ग वाहतूक महत्त्वाची ठरली आहे. ४८० किमी. लांबीचे नदीमार्ग जलवाहतुकीस उपयुक्त आहेत. त्यादृष्टीने ओहायओ, मनॉंगहीला, कनॉवा व बिग सॅंडी या नद्या महत्त्वाच्या आहेत. विमानतळ ३६ आहेत. हंटिंग्टन येथे राज्यातील पहिले आकाशवाणी केंद्र (१९२३) व पहिले दूरचित्रवाणी केंद्र (१९४९) कार्यान्वित झाले. राज्यात १५५ व्यापारी नभोवाणी केंद्रे, १२ व्यापारी व ३ सार्वजनिक दूरचित्रवाणी केंद्रे आहेत. २५ दैनिक वृत्तपत्रे आणि ८४ साप्ताहिके येथून प्रसिद्ध होत होती (१९९४)

लोक व समाजजीवन : अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात येथील खाणींत काम करण्यासाठी हंगेरी, आयर्लंड, इटली, जर्मनी व पोलंडमधून फार मोठ्या संख्येने लोकांनी येथे स्थलांतर केले. त्यामुळे राज्याची लोकसंख्या एकदम वाढली. एकूण लोकसंख्येत १,४३,००० युनायटेड मेथडिस्ट १,०८,८२४ बॅप्टिस्ट व १,०५,६४५ रोमन कॅथलिक पंथाचे लोक होते (१९९२). त्याशिवाय एपिस्कोपलियन व प्रेस्बिटेरियन लोकही येथे आहेत. ओहायओ, कनॉवा व मनॉंगहीला नद्यांच्या काठावर प्रमुख नागरी व औद्योगिक केंद्रे आहेत. राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी सु. दोन तृतीयांश लोक ग्रामीण भागात राहतात (१९९०). दर हजारी जन्मप्रमाण ११·५ मृत्युप्रमाण ११ होते (१९९३). पर्वतीय प्रदेशामुळे येथील लोकांच्या चालीरीतींवर बाह्य प्रदेशाचा बराच काळ विशेष परिणाम झाला नाही. हस्तकलावस्तू, संगीत-वाद्ये, स्थानिक गीते व इतर काही सांस्कृतिक परंपरा अजूनही राज्याच्या ग्रामीण भागांत आढळून येतात.

वेस्ट व्हर्जिनियाला राज्याचा दर्जा प्राप्त होण्यापूर्वी तेथील शिक्षण खाजगी किंवा चर्चच्या अखत्यारीत होते. १८६३ नंतर मात्र शैक्षणिक सुविधा पुरविण्याची जबाबदारी राज्याकडे आली. ५ ते २१ वयोगटातील सर्वांना सार्वजनिक शिक्षण मोफत असून, ७ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण सक्तीचे आहे. हंटिंग्टन येथील मार्शल विद्यापीठ (स्था. १८३७), बेथनी येथील बेथनी महाविद्यालय (१८४०), मॉर्गनटाउन येथील वेस्ट व्हर्जिनिया विद्यापीठ (१८६७) या येथील जुन्या शैक्षणिक संस्था आहेत. वेस्ट व्हर्जिनिया विद्यापीठाचे राज्यातील सर्वांत मोठे ग्रंथालय आहे. अनेक वस्तुसंग्रहालयेही राज्यात आहेत. राज्यात ६५ रुग्णालये, ६५ खाजगी दवाखाने, १०५ सुश्रुषागृहे व तीन मनोरुग्णालये होती (१९९३).

पर्यटन : हंटिंग्टन (लोकसंख्या ५८,८४४ – १९९०), चार्ल्‌स्टन (५७,२८७), व्हीलिंग (३८,८८२), पार्कर्सबर्ग (३३,८८२), मॉर्गन टाउन (२५,८७९), विरस्टन (२२,१२४), फेअरमॉंट (२०,२१०), क्लार्क्सबर्ग (१८,०५९) ही राज्यातील महत्त्वाची शहरे आहेत. पर्यटन व मनोरंजन व्यवसायाचा वेगाने विकास होत आहे. हार्पर्स नगरातील व इतर ठिकाणाची वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण संस्कृती आणि पर्वतीय प्रदेशांतील निसर्गसुंदर स्थळे ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. ॲलेगेनी पर्वतप्रदेशातील मनॉंगहीला येथील राष्ट्रीय वन व तेथील ब्लॅक वॉटर कॅन्यनमधील धबधबा, ‘स्प्रूस नॉब सेनेका रॉक्स नॅशनल रिक्रिएशन एरिया’ व कनॉवा खोऱ्यातील पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले सेंट ऑल्बन्झ ही प्रमुख पर्यटनस्थळे आहेत.

चौधरी, वसंत