वेल्सबाख, कार्ल औअर फ्राइहेर फोन : (१ सप्टेंबर १८५८-४ ऑगस्ट १९२९). ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ व अभियंते. त्यांनी ⇨ वायुजाळीचा  शोध लावला व त्यामुळे वायुदीपाची कार्यक्षमता वाढून अधिक प्रकाश मिळू लागला.

वेल्सबाख यांचा जन्म व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे झाला. त्यांचे शिक्षण हायडल्‌बर्ग विद्यापीठात झशले. तेथे त्यांनी ⇨विरल मृत्तिकांवर संशोधन केले. त्यांनी आपले अध्ययन व्हिएन्ना विद्यापीठात पुढे सुरू ठेवले. पूर्वी विरल मृत्तिका मूलद्रव्य म्हणून समजल्या जाणाऱ्या डिडीमियमाचे भंजन करून निओडिमियम व प्रासिओडिमियम हे त्याचे घटक त्यांनी वेगळे केले.

विरल मृत्तिकांबद्दलची त्यांची जिज्ञासा कायम होती. थोरियम नायट्रेट व सिरियम नायट्रेट यांच्या मिश्रणामध्ये भिजविलेल्या कापडाची जाळी तयार करून ती वायुज्योतीवर तापविली असता अधिकच दीप्तिमान होते आणि अधिक प्रकाश मिळतो, हे त्यांच्या लक्षात आले. १८८५ मध्ये त्यांनी अशा वायुजाळीचे एकस्व (पेटंट) घेतले. वेल्सबाख जाळीमुळे वायुदीपांपासून झगझगीत प्रकाश मिळविण्यात खूपच सुधारणा झाली. प्रदीप्त विद्युत्‌दिव्यांमुळे वायुजाळी मागे पडली असली, तरी तिचा अजून गॅसबत्ती (पेट्रोमॅक्स) व केरोसीनवर चालणाऱ्या इतर दिव्यांत बराच वापर केला जातो.

इ. स. १८९८ मध्ये वेल्सबाख यांनी प्रदीप्त दिव्यासाठी प्रथम धातूची तंतूसारखी बारीक तार वापरण्यास सुरुवात केली. त्यांनी वापरलेली ऑस्मियमाची तार सामान्य वापराच्या दृष्टीने दुर्मिळ होती. तरीही तिच्या वापरामुळे टंगस्टनाच्या तारेच्या वापराचा मार्ग खुला झाला व आधुनिक विद्युत्‌दिव्यांत सुधारणा झाली.

वेल्सबाख यांनी मिश मिश्रधातू विकसित केली. ती सिरियम व अन्य विरल मृत्तिकांचे मिश्रण आहे. ती त्यांनी लोहाबरोबर मिसळून `औअर धातू’ मिळविली. प्राचीन काळापासून ठिणगी पाडण्यासाठी चकमकीत फ्लिंट व पोलाद वापरीत त्यामध्ये ही पहिली सुधारणा होय. आता या मिश्रधातूचा उपयोग सिगारेट लाइटर व गॅस लाइटर यांच्यात सर्रास होतो.

ट्रेबाक (ऑस्ट्रिया) येथे वेल्सबाख मरण पावले.

जमदाडे, ज. वि.