हासियम : मानवनिर्मित किरणोत्सर्गी मूलद्रव्य. रासायनिक चिन्ह Hs अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) १०८ आवर्त सारणी (इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांची कोष्टकरूप मांडणी) गट ८ आणि आवर्त ७ मधील ॲक्टिनियमोत्तर मूलद्रव्य विद्युत् विन्यास (इलेक्ट्रॉनांची अणूमधील मांडणी) [रेडॉन] 5f146d67s2 किंवा २,८,१८,३२,३२,१४,२.

 

पश्चिम जर्मनीतील डार्मस्टाट येथील जड आयन संशोधन (G.S.I.) संस्थेच्या प्रयोगशाळेत पीटर आर्मब्रुस्टर आणि जी. मुइन्झेनबर्ग यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांनी युनिव्हर्सल लिनिअर ॲक्सिलेटर (UNILAC) या आयन वेगवर्धकाचा १९८४ मध्ये वापर केला. त्यांनी आयन आघाताद्वारे हासियम हे मूलद्रव्य बनविले आणि त्याचे अस्तित्व ओळखण्यात आले. हासियम (२६५) हा किरणोत्सर्गी समस्थानिक (अणुक्रमांक तोच परंतु द्रव्यमानांक भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याचा प्रकार) लोह (५८) या वेगवान कणांचा शिसे (२०८) याच्यावर मारा करून संघटन विक्रियेद्वारे निर्माण करण्यात आला. वरील शास्त्रज्ञांच्या गटानेच बोरियम (अ. क्र. १०७) आणि माइटनरियम (अ. क्र. १०९) या मूलद्रव्यांचे अस्तित्व ओळखले. विषम प्रोटॉन आणि न्यूट्रॉन संख्या असलेल्या समस्थानिकांचे अभिज्ञान करीत असताना, बोरियम आणि माइटनरियम या मूलद्रव्यांचे शोध लावण्यात आले. विषम-विषम अणुकेंद्रे भंजन विक्रियेच्या विरोधात उच्च स्थिरता दर्शवितात. सम अणुक्रमांक (सम प्रोटॉन संख्या) असलेली मूलद्रव्ये स्वयंस्फूर्त भंजनाच्या विरोधात वस्तुतः कमी स्थिर असतात. हासियम मूलद्रव्याच्या समस्थानिकांचा क्षय स्वयंस्फूर्त भंजनाने होत असल्याचे अपेक्षित होते. यावरून माइटनरियम हे हासियम याच्या अगोदर का निर्माण करण्यात आले याचे स्पष्टीकरण मिळते.

 

शीत संघटन विक्रियेद्वारे हासियम (२६६) हा समस्थानिक तयार करण्यात आला. हासियम (२६५) या समस्थानिकाचे अर्धायुष्य सु. २ मिलिसेकंद असून १०.३६ चशत ऊर्जा असलेल्या आल्फा कणांचेउत्सर्जन होऊन या समस्थानिकाचा क्षय होतो. डूब्नॉ (रशिया) येथीलजॉईंट रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर न्यूक्लिअर रिसर्च या संस्थेत संशोधन केलेल्या शास्त्रज्ञांनी द्रव्यमानांक २६३ व २६४ असलेले हासियमाचे समस्थानिक अस्तित्वात असल्याचे सांगितले.

 

बोरियम, हासियम आणि माइटनरियम ही मूलद्रव्ये स्वयंस्फूर्त भंजनविरोधी कवच परिणामाचा वापर करून स्थिर करता येतात. या मूलद्रव्यांची अणुकेंद्रे सॉसेज प्रकारचे आकार पसंत करीत असल्यामुळे ही विशिष्ट स्थिरता प्राप्त होते, असे भाकीत करण्यात आले.

 

खोब्रागडे, स्नेहा दिलीप