वेल्श भाषा – साहित्य : ब्रिटनमधील वेल्स प्रदेशाची ही मूळची भाषा इंडो-यूरोपियन भाषासमूहाच्या केल्टिक गटात मोडते. तिचे स्थानिक नाव किम्रीग (Cymraeg) असे आहे. ब्रिटनमध्ये रोमन अंमल असताना (इ. स. पहिले ते पाचवे शतक) राज्यकर्त्यांची भाषा जरी लॅटिन असली, तरी वेल्स व इंग्लंड मध्ये लोकभाषा ब्रिटिश होती. नंतर इंग्लिशच्या रूपाने जर्मानिक भाषासमूहातील लोक येऊन त्यांचे प्राबल्या प्रस्थापित झाले, तरी ब्रिटिश भाषा परिवर्तित रूपात वेल्श भाषा म्हणून जिवंत राहिली. आजही ग्रामीण डोंगराळ भागातून वेल्समधले सु. 36 टक्के लोक वेल्श बोलतात. दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रीय भावना वाढीस लागल्यामुळे शालेय शिक्षणात अंतर्भाव, परंपरागत कविसंमेलने इ. प्रकारे तिचे महत्त्व थोडे वाढले आहे. आज ती रोमन लिपीत लिहिली जाते.
अतिपुराण (पाचवे-आठवे शतक), पुराण (नववे-अकरावे शतक), मध्यकालीन (बारावे-चौदावे शतक), अर्वाचीन (पंधरावे शतक -) असे कालखंड आणि उत्तर, दक्षिण असे प्रादेशिक भेद या भाषेत मानले जातात. ब्रिटिश भाषा जरी लॅटिन किंवा संस्कृतप्रमाणे प्रत्ययरूपी पदविकारप्रचुर होती, तरी अखेरच्या काळात स्पर्श व्यंजनांतील काही बदल (उदा., स्वरमध्य प, ट, क चे ब, ड, ग) आणि बलहीन स्वर (विशेषतः संपूर्ण अंत्य अक्षर) लोप पावणे यामुळे ती व्यवस्था मोडकळीला आली आणि फेरमांडणी व्हावी लागली ( उदा., branos/branc कावळा/ कावळे >bran/brein, brain). मध्यकाळात ती नियमित लिहिली जाऊ लागली, तरी पुराण वेल्श काळातील मौखिक काव्य आणि ऑगम (Ogham) लिपीतील तुरळक शिलालेख अजून उपलब्ध आहेत.
केळकर, अशोक रा.
साहित्य : इ. स. सहाव्या शतकापासून आजतागायत वेल्श साहित्याची अखंड परंपरा आहे. आरंभीची वेल्श कविता मुख्यतः चार हस्तलिखितांत संकलित केलेली आढळते : (१) ब्लॅक बुक ऑफ कारमारदेन, (२) बुक ऑफ अनायरिन, (३) बुक ऑफ टालयेसन आणि (४) रेड बुक ऑफ हेरगेस्ट (इ. स. बारावे ते पंधरावे शतक). त्यांतील बहुतेक कविता अनायरिन, टालयेसन, लवॉर्च हेन आणि मिरडीन ह्यांच्या नावावर मोडतात. Y Gododdin हे दीर्घ काव्य अनायरिनच्या (इ. स. सहावे शतक) नावावर मोडते. आक्रमक सॅक्सनांच्या कबजातून कॅट्रॉएथ (बहुधा उत्तर यॉर्कशरमधील कॅटरिक) मुक्त करण्यासाठी आखलेल्या, परंतु फसलेल्या दुर्दैवी मोहिमेवर लिहिलेले हे विलापिकात्मक काव्य आहे. टालयेसन याने उद्देशिकांच्या स्वरूपात आपल्या आश्रयदात्याची स्तुतिगीते गायिली आहेत. हे दोनही कवी वीरगीते रचणाऱ्या कवींचे नमुनेदार प्रतिनिधी होत. लवॉर्च हेन ह्याच्याशी संबंधित अशा कविता सहाव्या शतकातल्या परंतु ह्या कविता म्हणजे किमान दोन वीरकाव्यांचे अवशेष असून ही वीरकाव्ये नवव्या शतकाच्या मध्याला पोअस (प्राचीन वेल्समधील चार मोठ्या राज्यांपैकी एक) येथील एका अज्ञात कवीने रचली, असे दिसते. ह्या काव्यातील गद्यभाग नष्ट झालेला दिसतो. गतवैभवाचे स्मरण आणि आज ते हरपल्याचे दुःख ह्या दोन्ही काव्यांतून व्यक्त झाले आहे. मिरडीनच्या नावावर मोडणाऱ्या कविताही उत्तरकालीन आणि अन्य कोणाच्या असाव्यात.
साधारणपणे ११५० ते १३५० हा काळ दरबारी काव्याचा. दरबारी कवींची एक श्रेणिव्यवस्था होती. त्या व्यवस्थेच्या अगदी वरच्या टोकाला मुख्य कवी असे. परमेश्वर, आश्रयदाता राजा आणि त्याचे कुटुंबीय ह्यांची स्तुतिगीते तो रचित असे. निसर्ग आणि प्रेम हे विषय त्याला त्याज्य असत. त्यानंतरचे स्थान शाही लष्कराचे गुणगान करणाऱ्या भाटांचे. ह्यानंतरही काही श्रेणी होत्या. कवींच्या परिषदा भरवून त्यांत कवींना त्यांच्या काव्यरचनाकौशल्याची प्रमाणपत्रे दिली जात. परिणामतः ही कविता पारंपरिक रचनातंत्राच्या चौकटीत बंदिस्त झाली. काही कवींमध्ये काव्यरचनेची कुलपरंपरा असे. उदा., आरंभीच्या कवींपैकी मायलिर, त्याचा पुत्र ग्वाल्कमाय आणि त्याचा नातू मायलिर आप ग्वाल्कमाय (सु. ११४०–८०) हे ग्विनएद ह्या राज्यात दरबारी कवी होते. काही राजे स्वतःही कवी होते. उदा., ओवाइन सायफायलिऑग (पोअस) आणि हवेल ॲब ओवाइन (ग्विनएद) हे वेल्समधील दोन राजे. ओवाइन सायफायलिऑगच्या `ओवाइन्स लॉंग ब्लू ड्रिंकिंग हॉर्न (इं. शी.) ह्या काव्यात एका विजयी मोहिमेचे वर्णन आहे तथापि हवेल ॲब ओवाइनच्या (मृ. ११७०) कवितेत प्रथमच देशप्रेमाची भावना वेल्सच्या सृष्टिसौंदर्याचे वर्णन आढळते. १२८२ मध्ये अखेरचा वेल्श राजा लवेलिन ॲप ग्रिफिद हा इंग्रज सैनिकांकडून मारला गेला. ग्रिफिद ॲब अर अनाद कोच ह्याने या प्रसंगावर लिहिलेली विलापिका प्रसिद्ध आहे. ह्या विलापिकेबरोबर वेल्समधील दरबारी कवितेचा कालखंडही संपला असे म्हणता येईल.
दरबारी कवितेत विलापिका, प्रशंसागीते ह्यांबरोबर साध्या शैलीतील धार्मिक स्वरूपाची काही कविताही आढळते. धार्मिक कवितांचा एक प्रकार म्हणजे मृत्युशय्येवरील गीतांचा. या गीतांमधून आपला मृत्यू जवळ येतो आहे, ह्याची जाणीव झाल्यानंतर कवी आपल्या अपराधाची कबुली ईश्वराकडे देतो आणि क्षमेची याचना करतो. ईश्वरस्तुती, ख्रिस्तजन्म, संतांचा गौरव अशा अन्य विषयांवरही कविता आहेत.
वेल्श राजे आणि त्यांचे वैभव गेल्यानंतर दक्षिण वेल्समध्ये दीर्घकाळ नॉर्मनांची सत्ता होती. तेथील नव्या कवींमध्ये सर्वांत महत्त्वाचे नाव दाव्हिद ॲप ग्विलइम (सु.१३४०–७०) ह्याचे. विख्यात इंग्रज कवी ⇨ चॉसर (१३४०–१४००) ह्याचा तो समकालीन. त्याने Cywydd ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या छंदोरचनांत कविता लिहिली. अत्यंत साधी शब्दकळा हे त्याचे वैशिष्ट्य. त्यामुळे वेल्श कवितेची जुनी शब्दकळा मागे पडली. त्याच्या कवितेचा आशयही नवा होता. फ्रान्समधील चारणांच्या कवितेचे विषय त्याने आपल्या कवितेत आणले. उत्कृष्ट निसर्गवर्णने हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य. दाव्हिद नॅनमॉर ह्या पंधराव्या शतकातील कवीने उपर्युक्त छंदसमूहावर फार मोठे प्रभुत्व प्राप्त केले होते.
दहाव्या शतकाच्या मध्यानंतर वेल्श कायद्याचे संहितीकरण करण्यात आले होते, असे परंपरा मानते. तथापि वेल्श कायद्याची सर्व प्राचीन हस्तलिखिते मुख्यतः तेराव्या शतकाच्या प्रथमार्धातील आहेत, असे दिसते. मिथ्यकथा, लोकविद्या, वीरांचे पराक्रम इत्यादींचा उपयोग करून कथाकथन करणाऱ्याच्या काही कथा लेखनबद्ध झालेल्या आहेत. अशा अकरा कथांचा एक संग्रह Mabinogion ह्या नावाने प्रसिद्ध आहे. लॅटिन आणि फ्रेंच लेखनाची भाषांतरेही तेराव्या शतकापासून होत होती. त्यांतील गद्याचे स्वरूप प्रायोगिक आहे.
सोळाव्या शतकात वेल्समध्ये मुद्रणाची सोय उपलब्ध झाली. ⇨धर्मसुधारणा आंदोलन आणि ⇨प्रबोधनकाल ह्यांचा प्रभाव वेल्श साहित्यावरही झाला. ⇨विल्यम सॉल्झबरी (सु. १५२०–८४) ह्या वेल्श विद्वानाने बायबलच्या नव्या कराराचा वेल्श अनुवाद केला (१५६७). ह्याच वर्षी वेल्श प्रेअर बुक प्रसिद्ध झाले. विल्यम मॉर्गन (सेंट एसफचा बिशप) ह्याने बायबलचा केलेला वेल्श अनुवाद १५८८ मध्ये प्रसिद्ध झाला. १६२० मध्ये प्रसिद्ध झालेली त्याची सुधारित आवृत्ती आजही प्रचारात आहे. त्याच काळात काही रोमन कॅथलिक लेखकांनी प्रचारार्थ काही ग्रंथलेखन केले. प्रबोधनकालात वेल्श साहित्यही आपल्या काव्यरचनेच्या चारणपरंपरेकडे वळले. चारणांच्या कवितेचे नियम, वेल्श भाषा अशा विषयांवर लेखन झाले वेल्श शब्दकोश आणि व्याकरणही तयार झाले.
सोळाव्या शतकात मुख्यतः भाषांतरांच्या अंगाने वाढणारे वेल्श गद्य सतराव्या शतकात मौलिक ग्रंथांच्या रूपानेही विकसित होऊ लागले. उदा., प्यूरिटन धर्मोपदेशक मॉर्गन ल्यूइड (१६१९-५९) ह्याचे `द बुक ऑफ द थ्री बर्ड्स’ (१६५३, इ. शी.) हे सरकार आणि धर्मस्वातंत्र्य ह्या विषयाचा परामर्श घेणारे पुस्तक व थीओफिलस एव्हान्झ ह्याचे `ए व्ह्यू ऑफ द प्रिमिटिव्ह एजीस’ (१७१६, इं. शी.).
लोकगीते आणि समकालीन इंग्रजीतील कविता ह्यांच्या प्रभावातून एक नवा काव्यसंप्रदाय ह्या शतकात उदयाला आला. रीस प्रिचर्ड (१५७९–१६४४) ह्या धर्मोपदेशकाने लोकगीतांच्या छंदांत आपल्या प्रवचनांची रचना केली (द वेल्शमन्स कॅंडल, १६४६–७२, इं. शी.). ह्यू मॉरिस (१६२२–१७०९) हा ह्या शतकातील सर्वश्रेष्ठ कवी गणला जातो. प्रेमकवितेसाठी तो विशेष प्रसिद्ध आहे.
अठराव्या शतकात वेल्श साहित्यातील अभिजाततावादी संप्रदाय गोरोन्वी ओएन (१७२३–६९) ह्या कवीने सुरू केला. वेल्श काव्यपरंपरेतील जुन्या छंदसमूहाचे त्याने पुनरुज्जीवन केले. एडवर्ड रिचर्ड, इव्हान एव्हान्झ हे ह्या संप्रदायातील काही उल्लेखनीय कवी होत.
वेल्समधील गद्यलेखन धार्मिक विषयांभोवती केंद्रित झालेले होते परंतु फ्रेंच राज्यक्रांती घडून आल्यानंतर राजकीय लेखनालाही चालना मिळाली. जॉन जोन्स (१७६६–१८२१) ह्याने लिहिलेली राजकीय पुस्तपत्रे ह्या संदर्भात निर्देशिता येतील.
एकोणिसाव्या शतकात अभिजाततावादी कविता विपुल लिहिली गेली पण तिचा दर्जा सामान्यच होता. एबन व्हार्द (१८०२–६३) हा एक अपवाद. अठराव्या शतकात जी धार्मिक कविता लिहिली गेली, तीतून वेल्श भाषेतील भावकवितेचा विकास होत गेला. बहुतेक कवितांचे मूळ धर्मभावना हे असल्याचेही दिसून येते. समकालीन इंग्रजी कवितेचा मूळ धर्मभावना हे असल्याचेही दिसून येते. समकालीन इंग्रजी कवितेचा (विशेषतः जॉन ब्लॅकवेलच्या) प्रभावही प्रत्ययास येतो. जॉन ह्यूज ऊर्फ केरयॉग हा ह्या शतकातील सर्वश्रेष्ठ कवी मानला जातो. लोकगीतांच्या चालीवर त्याने नव्या भावकविता लिहिल्या. विल्यम टॉमस ऊर्फ इजलूइन (१८३२–७८) ह्या कवीने जीवन आणि कला ह्या विषयावर लिहिलेली Y Storm ही चिंतनशील, दीर्घ कविता उल्लेखनीय आहे.
एकोणिसाव्या शतकात धार्मिक पुस्तके, चरित्रे, राजकीय विषयांवरील लेखन खूप लिहिले गेले. सॅम्युएल रॉबर्ट्स आणि विल्यम रीस हे ह्या शतकातील श्रेष्ठ राजकीय लेखक होत. ल्यूइस एडवर्ड्स ह्याने `द एसेइस्ट’ (इं. शी.) ह्या आपल्या नियतकालिकातून साहित्यसमीक्षात्मक लेखनाला वाव दिला. यूरोपीय साहित्यसमीक्षेच्या मानदंडांचा परिचय त्याने वेल्श साहित्यविश्वाला घडविला. ललित लेखनाचे काही प्रयत्न झाले. डॅन्यल ओएन ह्याच्या कादंबऱ्यांतून, धार्मिक विचारांचा समाजावरील प्रभाव किती मोठा असतो हे प्रत्ययास येते.
वेल्स विद्यापीठाच्या स्थापनेनंतर वेल्श भाषेविषयीची आणि वाङ्मयीन अस्मितेविषयीची जाणीव अधिक उत्कट झाली. साहित्याविषयीच्या पारंपरिक विचारांची चिकित्साही सुरू झाली. जुन्या छंदांतून आधुनिक आशय व्यक्त केला जाऊ लागला. नेहमीच्या दैनंदिन जीवनातील भाषाही काव्याभिव्यक्तीसाठी वापरली जाऊ लागली. कवींची राजकीय जाणीवही तीव्र झाली. ग्विन जोन्स, आर्. विल्यम्स पॅरी, सर टॉमस पॅरी-विल्यम्स, विल्यम मॉरिस, विल्यम एव्हान्झ हे काही उल्लेखनीय कवी होत.
विसाव्या शतकात द लितरात्यूर हे वाङ्मयीन नियतकालिक उदयाला आले (१९२२). कवी आणि निबंधकार विल्यम जॉन ग्रिफिद (१८८१–१९५४) हे त्याचे संपादक होते. सॉंडर्स ल्यूइस (कवी, नाटककार, राजकारणी), सर टॉमस पॅरी-विल्यम्स (कवी आणि निबंधकार), आर्. टी जेनकिन्स (निबंधकार आणि इतिहासकार), त्याचप्रमाणे टेग्ला डेव्हिस, टी. रोलंड ह्यूझ, केट रॉबर्ट्स, डी. जे. विल्यम्स ह्यांच्यासारखे कथा-कादंबरीकार ह्यांचे वरील नियतकालिकास लेखनसाहाय्य होते. साहित्याचे काही मानदंड ह्या नियतकालिकाने निर्माण केले. विसाव्या शतकात वेल्श नाट्यलेखनासही आरंभ झाला. आरंभी वास्तववादी नाटके लिहिली गेल. हळुहळू त्यांची जागा काव्यात्मक, प्रतीकात्मक नाटकांनी घेतली. ह्या नाटकांचे विषय इतिहासातून आणि मिथ्यकथांतून घेतलेले असले, तरी तत्कालीन नैतिक-सामाजिक समस्याच त्यांतून मांडल्या गेल्या. सॉंडर्स ल्यूइस, जॉन ग्विलइम जोन्स, ग्विनलिन पॅरी हे काही उल्लेखनीय नाटककार होत.
कुलकर्णी, अ. र.
संदर्भ : 1. Jarman, A. O. H. Hughes, G. R. Eds. A Guide to Welsh Literature, 2. Vols., 1976-79.
2. Jones, Glyn Rowlands, John, Profiles : A Visitors Guide to Writing in Twentieth Century Wales, 1980.
3. Parry, Thomas, A History of Welsh Literature, Welsh, 1970.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..