वेडा राघू : हा चिमणीएवढा एक गोजिरवाणा पक्षी आहे, पण चिमणीच्या शेपटीपेक्षा याची शेपटी लांब असते. शरीर सडपातळ व सु. २३ सेंमी. लांब असते. याचे शास्त्रीय नाव मेरॉप्स ओरिएंटॅलिस आहे. याच्या शरीराचा रंग हिरवा असतो, डोके व मान यांवर सोनेरी तपकिरी आणि हनुवटी व गळा यांवर निळी छटा असते गळ्यावर आडवा काळा पट्टा असतो. चोच लांब, बारीक, काळी आणि थोडी बाकदार असते. तिच्या बुडापासून काळा पट्टा निघून डोळ्यांच्या मागे जातो. डोळे लाल-भडक आणि पाय शिशासारख्या काळसर रंगाचे असतात. शेपटी लांब असून तिच्या मध्यावरची दोन पिसे जास्त लांब, शेपटीच्या बाहेर आलेली आणि सळईसारखी असतात. नर आणि मादी दिसण्यात सारखीच असतात. यांची जोडपी किंवा लहान थवे असतात.
वेडया राघूंचा विणीचा हंगाम फेब्रुवारीपासून मेपर्यंत असतो. नर व मादी मिळून एखाद्या दरडीत किंवा टेकाडात सु. ०.७५ ते १ मी. लांब बोगदा आणि त्याच्या शेवटाला एक कोटर तयार करुन ⇨घरटे बनवितात. या कोटरात मादी ३ ते ५ तकतकीत पांढरी अंडी घालते. अंडी उबविणे व पिलांना खाऊ घालणे ही कामे नर व मादी आळीपाळीने करतात.
कर्वे, ज. नी.
“