वेग : (आयुर्वेद). शरीराच्या स्वाभाविक प्रवृत्तींना गती निर्माण होणे म्हणजे वेग होय. बहिर्मुख वेग म्हणजे वात, विष्ठा, मूत्र, अश्रू ही द्रव्ये बाहेर घालविण्याची शरीराची प्रवृत्ती आहे. ती जेव्हा जोरात, वेगाने येते, तेव्हा वेगाची जाणीव होते. पहिले तीन वेग नित्य व चौथा प्रासंगिक आहे. रेतोवेग हा तारुण्यात संभोगकर्माचे वेळी शुक्र बाहेर घालविण्याकरिता उत्पन्न होतो. नाकात कफ क्षोभक झाला की, त्याला काढण्याला क्षव म्हणजे शिंक आणि शरीरात, विशेषतः उरात, वात मल अधिक झाले की, ते बाहेर काढण्याकरिता जांभई हे वेग निर्माण होतात. श्रमाने, व्यायामाने श्वासवेग वाढतो, शरीरातील घर्षणजन्य वायुरुप मल बाहेर घालविण्याकरिता व प्राणवायू आत रक्ताबरोबर पाठविण्याकरिता तो परिणामी उत्पन्न होतो.

खोकला व ओकारी रोगोत्पन्न बहिर्मुख वेग असून खोकला हा गळा, फुप्फुस यांत आणि ओकारी आमाशयात वाढलेले दोष बाहेर घालविण्याकरिता उत्पन्न होतात. शरीराला अन्नाची गरज आहे हे व्यक्त करण्याकरिता क्षुधा व पाण्याची गरज दाखविण्याला तहान हे अंतर्मुख वेग उत्पन्न होतात.   

श्रम अधिक झाल्यावर म्हणजेच शरीरावयवांची कर्मप्रवृत्ती अधिक झाल्यावर ते कर्म करणाऱ्या इंद्रिये व मन यांना विश्रांतीची गरज निर्माण होते. ती भागविण्याकरिता झोप वेगाने, जोराने येते. हा निद्रावेग होय. हे वेग शरीराच्या शुध्दी व धारण- पोषणाकरिता निर्माण होतात. या वेगांना अनुकूल राहून ते घडविणे शरीराच्या आरोग्याकरिता आवश्यक आहे. हे वेग घडविले नाहीत व अडविले, तर शरीर शुध्द न होता मल दोष-संचय होऊन वा धारण-पोषणात व्यत्यय येऊन शरीराचा तो तो वेगसंबध्द अवयव विकृत होऊन रोग होतात.

वेग उत्पन्न झाले नसता ते मुद्दाम आणणे म्हणजे वेगोदीरण होय. विष्ठेच्या शरीरातल्या अस्तित्वाने शरीराला उपयुक्त असे तिचे कार्य संपताच तिला बाहेर घालविण्याची संज्ञा शरीर निर्माण करते म्हणजे शौचास लागते व हा वेग निर्माण होतो, पण शौचास लागली नसताना उगीचच कुंथत बसून शौचास केले, विष्ठा बाहेर काढली, तर शरीराच्या त्या अवयवावर बळजबरी झाल्याने तो थकतो व विष्ठेचे शरीरोपयुक्त घडत असलेले कार्य थांबविल्यानेही शरीराचे नुकसान होते व रोग होतात. मुद्दाम शिंका काढणे इत्यादींचे असेच अनिष्ट परिणाम होतात.

वेगांचे धारण व उदीरण (मुद्दाम आणणे) ही दोन्ही रोग उत्पन्न होण्याची कारणे आहेत. निरोगी राहण्याकरिता ही कारणे घडू देऊ नयेत.

                                       

जोशी, वेणीमाधवशास्त्री