वृषपर्वीय डेल्टा : (डेल्टा सेफी). वृषपर्वा तारकासमूहाची आकृती नसराळ्यासारखी असून नसराळ्याचे निमुळते टोक ध्रुवाकडे येते. नसराळ्याच्या रुंद तोंडाच्या एका अंगास या समूहाचा आल्फा तारा असून विरुद्ध अंगास आकाशगंगेच्या पट्ट्याच्या मध्याकडे नुसत्या डोळ्यांनी दिसू शकणारा डेल्टा तारा आहे. हा तारकासमूह ऑक्टोबर महिन्यात रात्री ध्रुवाच्या वरच्या अंगास विषुवांश २२ व क्रांती + ७०0 [→ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] या भागात दिसतो.
वृषपर्वातील डेल्टा तारा वैशिष्ट्यपूर्ण चल तारा असल्याचा शोध जॉन गुडरिक (१८ वर्षे वयाचा एक बहिरा व मुका मुलगा) व पिगट या दोघांनी मिळून १७८४-८५ च्या सुमारास लावला. वृषपर्वीय डेल्टा हे एक तारकायुग्म असून त्यांपैकी मुख्य तारा पीतवर्णी चल किंवा आवर्ती तेजस्वितेचा तारा आहे. तो इतका दूर आहे की, त्याचा ⇨पराशय अनिश्चित आहे. तो २०० पार्सेक (१ पार्सेक = ३.२५८ प्रकाशवर्षे) अंतरावर असून त्याची निरपेक्ष ⇨प्रत – १.५ पेक्षाही कमी आहे. याचा अंधुक निळा सहचर तारा ७.५ प्रतीचा व त्याच्यापासून ४१” अंतरावर आहे.
वृषपर्वीय डेल्टाच्या तेजस्वितेच्या आवर्ती बदलाचा आवर्तन काल ५ दि. ९ ता. इतका असून या काळात त्याची तेजस्वितेची प्रत ३.६ पासून ४.३ पर्यंत बदलते. तेजस्वितेतील वाढ झटकन होते व त्यास आवर्तन कालाचा १/३ वेळ म्हणजे सु. १.५ दिवस पुरतात, पण घट मात्र सावकाश होऊन किमान तेजस्विता पूर्ण होण्यास सु. ४ दिवस लागतात. तेजस्वितेत होणारे बदल त्याच्या सहचरामुळे होत नसून ते ताऱ्याच्या स्वतःच्या आकुंचन-प्रसरणामुळे निर्माण होणाऱ्या तापमानातील चढ-उतारांमुळे होतात. आकुंचनाने कमाल मर्यादा गाठली तरी उष्णतावहनास थोडा अवधी लागत असल्यामुळे कमाल तापमानाची व तेजस्वितेची मर्यादा येण्यापूर्वीच प्रसरणास सुरुवात झालेली असते. वृषपर्वीय डेल्टा ताऱ्याप्रमाणे तेजस्वितेच्या आवर्तितेचे भिन्नभिन्न आवर्तन काल असलेले अनेक तारे आकाशगंगेत व सर्पिल दीर्घिकांत [तारामंडलांत→दीर्घिका] सापडतात. अशा ताऱ्यांचा एक वर्ग करुन त्यांना या डेल्टा सेफी ताऱ्यावरुन ‘सेफिड तारे’ असे संबोधण्यात येते. विशेष तेजस्वितेतील बदल आवर्तन कालाशी निगडित आहेत व दीर्घ आवर्तन काल असलेले तारे मोठे असून त्यांच्या तेजस्वितेतील बदलही मोठे असतात.
अशा ताऱ्यांच्या तेजस्वितेतील बदलाच्या आवर्तन कालानुसार आवर्तन काल एक दिवसाहून कमी असलेले आणि एक दिवस ते कित्येक दिवस असलेले असे दोन उपवर्ग केलेले आहेत. १ ते ५० दिवसांपर्यंत आवर्तन काल असलेल्या ताऱ्यांपैकी ३५ टक्के सेफीड ताऱ्यांच्या तेजस्वितेच्या आवर्तितेचा आवर्तन काल ३ ते ६ दिवसांपर्यंत असतो. तेजस्वितेबरोबर त्यांच्या वर्णपटांचे स्वरुपही F1 पासून G3 पर्यंत बदलते. [→तारा].
ठाकूर, अ. ना.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..