वूहान : चीनच्या हूबे (हूपे) प्रांताची राजधानी व एक नगरसमूह (म्युनिसिपालिटी). लोकसंख्या ३८,६०,००० (१९९३). वूचांग, हान्को व हानयांग या तीन शहरांचा मिळून बनलेला हा नगरसमूह मध्य चीनमध्ये यांगत्सी-हान या दोन नद्यांच्या संगमावर वसला आहे. यांगत्सीच्या डाव्या (उत्तर) तीरावर, हानच्या मुखाशी हान्को हे शहर, तर याच तीरावर हानच्या दक्षिणेस हानयांग शहर व यांगत्सीच्या उजव्या काठावर वूचांग हे प्राचीन नगर आहे. १९५० मध्ये चीन सरकारने या तीन शहरांचा मिळून वूहान हा एकच नगरसमूह केला. मध्य चीनमधील ही सर्वांत मोठी नगरपरिषद असून लोकसंख्येच्या दृष्टीने तिचा देशात पाचवा क्रमांक लागतो. बीजिंग, शांघाय, कँटन शहरांपासून साधारण सारख्याच अंतरावर वूहानचे स्थान आहे. वूहानचा पूर्वेतिहास म्हणजे वूचांग, हानयांग व हान्को शहरांचा इतिहास होय. चीनच्या विसाव्या शतकातील घटनांमध्ये वूहानने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडलेली आढळते. चिनी जनतेला वेगवेगळ्या सामाजिक सुविधा पुरविण्यात वूहान महानगर आघाडीवर असलेले दिसते.
भौगोलिकदृष्ट्या वूहान हे देशाच्या मध्यवर्ती व मोक्याच्या ठिकाणी असल्याने मध्य चीनमधील औद्योगिक, व्यापारी, प्रशासकीय व वाहतुकीचे हे केंद्र बनले आहे. वूहान नगरसमूहातील हान्को हे सर्वांत मोठे शहर असून ते कारखानदारी व व्यापारासाठी विशेष प्रसिध्द आहे. वूचांग हे प्रमुख शैक्षणिक व प्रशासकीय केंद्र आहे, तर हानयांग हे जड उद्योगासाठी महत्त्वाचे आहे. नदीमार्ग, लोहमार्ग व रस्ते असे सर्व वाहतूक मार्ग वूहानजवळ येऊन मिळतात. वूचांग–हान्को पुलावरुन बीजिंग-कँटन हा मुख्य दक्षिणोत्तर लोहमार्ग यांगत्सी नदी पार करतो. हान नदीवरील रेल्वे पुलामुळे हान्को व हानयांग शहरे एकमेकांना जोडली गेली आहेत. वूहान हे यांगत्सीवरील सर्वाधिक रहदारीचे अंतर्गत बंदर आहे. ते समुद्रकिनाऱ्या पासून ९७० किमी. आत असूनही मोठमोठी जहाजे येथपर्यंत येऊ शकतात.
चौधरी, वसंत