गोविंददेव मंदिर (रेड टेंपल), वृंदावन.वृंदावन : उत्तर प्रदेश राज्याच्या मथुरा जिल्ह्यातील व तालुक्यातील एक पुण्यक्षेत्र. यमुना नदीच्या उजव्या तीरावर, द्वीपकल्पासारख्या भूभागावर वसलेले हे ठिकाण मथुरेपासून उत्तरेस १० किमी.वर आहे. श्रीकृष्णकालीन वृंदावन आणि आधुनिक वृंदावन ही दोन्ही स्थाने एकच असावीत, याबाबत मात्र तज्ञांत साशंकता आहे. पौराणिक कथा आणि आख्यायिकांनुसार श्रीकृष्णाच्या बाललीला व पराक्रम तसेच श्रीकृष्ण व राधा यांच्या प्रणयकथांची वर्णने वृंदावनशी निगडित आहेत.

वृंदावनाचे प्राचीन नाव कालियावर्त असावे. एकेकाळी येथे तुळशीचे वन होते व त्यामुळे वृंदा (तुळस) या शब्दावरुन हे नाव पडले असावे, असे मानले जाते. राधेच्या सोळा नावांत वृंदा हे नाव आहे. श्रीकृष्णाच्या रासस्थळामुळे व्रजमंडलातील सर्व वनांत वृंदावन श्रेष्ठ मानले गेले आहे. वृंदावनात शेकडो मंदिरे, अनेक साधूंच्या समाध्या व इतरही पवित्र स्थळे आहेत. येथील कालियाडोह, वंशीवट, रासचबुतरा, केसीघाट, राधाबावडी, दावानलकुंड, ब्रह्मकुंड व धीरसमीरघाट ही स्थळे विशेष प्रसिध्द आहेत. ब्रह्मकुंड व गोविंदकुंड हे नैसर्गिक तलाव असून १८५७ मध्ये ते बांधून काढण्यात आले. वृंदावनच्या परिसरात मोर व माकडे आढळतात. केवरबन हा तिसरा तलाव मदनमोहन मंदिराजवळ आहे. त्याच्या जवळच दावानल बेहरी हे छोटेसे मंदिर आहे. सोळाव्या शतकात अनेक भाविक लोक येथे येऊन स्थायिक झाले. त्यांनी गोविंददेव, मदनमोहन, गोपीनाथ व जुगलकिशोर ही चार मंदिरे बांधली.

गोविंददेव हे येथील सर्वांत जूने (१५९०) व वैभवशाली मंदिर असून अकबराच्या कारकीर्दीत अंबरचा (जयपूरजवळ) राजा मानसिंग याने हे बांधून घेतले. याच्यावरील कोरीव काम व खोदकाम अतिशय सुंदर आहे. तांबड्या वालुकाश्मात बांधलेल्या या पिरॅमिडसदृश मंदिरातील गोविंदजीची जुनी मूर्ती जयपूरला हलविण्यात आली. आहे. वृंदावनमधील हे मंदिर मथुरेच्या व्यापारीवर्गाने दक्षिणेतील श्रीरंगम्‌ येथील मंदिराच्या धर्तीवर उभारले आहे. मंदिरातील मदनमोहन मूर्ती करौली येथे ठेवण्यात आली आहे. औरंगजेबाच्या अचानक हल्ल्याच्या भितीने या मूर्ती हलविण्यात आल्या होत्या. मंदिराच्या जवळच गौडीय भक्तांचे (चैतन्य संप्रदाय ) एक समाधिस्थळ आहे. शेखावत रजपूत रायसिंग यांनी गोपीनाथ मंदिर बांधलेले असावे. केसीघाटाजवळ जुगलकिशोर मंदिर असून जहांगीरच्या कारकीर्दीत १६२७ मध्ये ते बांधले गेले. सुंदर दास नावाच्या व्यक्तीने १६२६ मध्ये राधा-वल्ल्भ मंदिर बांधले, तर कृष्ण चंद्र सेन नावाच्या व्यक्तीने १८१० मध्ये कृष्ण चंद्र मंदिर (लाला बाबू मंदिर) बांधले, लक्ष्मी चंद बंधूंनी रंगजी मंदिर बांधले (१८५१). यामंदिराच्या बाहेरील भिंतीची लांबी २३२ मी. व रूंदी १३२ मी. आहे. त्यात एक मोठा तलाव, बगीचा आहे. बिकानेरच्या राम नारायण सिंग यांनी १८३८ मध्ये राधा मनोहर मंदिर बांधले. याशिवाय ग्वाल्हेरच्या महाराजांनी राधा गोपाल मंदिर (१८६०), राणी इंद्रजीत कन्वर या बिहारच्या हेत राम या जमीनदाराच्या विधवा पत्नीने राधा इंद्र किशोर मंदिर (१८७१), लखनौच्या शाह कुंदन लाल या रहिवाशाने राधा रामन मंदिर (शाहजी-का-मंदिर, १८७६), स्वामी हरिदास यांनी बांकेबिहारी मंदिर बांधले आहे. काही मोठी मंदिरे एकोणिसाव्या शतकात बांधण्यात आलेली आहेत. त्यांपैकी एक दक्षिण भारतीय मंदिरांच्या द्राविड वास्तुशैलीत बांधलेले आहे. दुसरे मोठे मंदिर जयपूरच्या महाराजाने बांधलेले आहे. लॉस अँजेल्स येथे १९६५ मध्ये भक्तिवेदान्त प्रभुपाद (१८९६–१९७७) यांनी स्थापन केलेल्या इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शसनेस) या संस्थेचे वृंदावन हे भारतातील प्रमुख केंद्र आहे. संस्थेने बांधलेले संगमवरी श्रीकृष्ण मंदिर, बिर्लांनी बांधलेले गीता मंदिर, प्रभुपाद यांच्या स्मरणार्थ बांधलेले क़ृष्ण-बलराम मंदिर इ. येथील प्रसिध्द मंदिरे आहेत. वृंदावनातील काही मंदिरांचा ताबा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याकडे आहे. वृंदावनचा परिसर पवित्र वनराईचा मानलेला आहे. वन-विभागाने येथे बरेच वृक्षारोपण केलेले आहे. यमुना नदीतीरावर २.४ किमी, लांबीच्या भागात दगडी बांधकामातील सुंदर घाट आहेत. त्यांपैकी बन्सीघाट, कालियामर्दन घाट, कालियादाह घाट व केसीघाट महत्त्वाचे आहेत. वैष्णवांच्या या आवडत्या धार्मिक स्थळामुळे व यात्रेकरूंच्या वर्दळीमुळे येथील लोकांना व्यवसाय मिळाले आहेत. १८६६ पासून वृंदावन येथे नगरपालिका आहे. छापील सुती कापड व हातमागावरील फ्लॅनेल कापड तयार करण्याचे उद्योग नगरात असून या कापडाला मारवाड व बिकानेरमध्ये मोठी मागणी असते. लोहमार्ग व पक्क्या रस्त्याने हे मथुरेशी जोडलेले आहे. येथे उच्च शिक्षणाच्या संस्था, रुग्णालये, पोस्ट व तार कार्यालये, चित्रपटगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धर्मशाळा, धर्मशास्त्र विद्यापीठ, संस्कृत पाठशाळा इ. संस्था आहेत.

निधिवन (सांप्रतचे सेवाकुंज) व निकुंजवन ही येथील निसर्गरम्य स्थाने आहेत. संत स्वामी हरिदास या ठिकाणी संगीत व काव्य यांच्या साधनेत रमत असत. अकबराच्या दरबारातील तानसेन हा त्यांचा शिष्य. स्वामी हरिदास, विठ्ठलविपुल, भगवत रसिक, हरिराम व्यास इ. भक्तांच्या समाध्या येथेच आहेत. महाप्रभू वल्लभाचार्य, विठ्ठलनाथ, गोकुलनाथ व दामोदरदास यांच्या बैठका, अद्वैतस्वामींची तपोभूमी, अद्वैतवट, संप्रदायांच्या छावण्या, उडियाबाबाचा आश्रम, पुलीना हे रासमंडळ स्थळ, वस्त्रहरण घाट, रूपसनातनाची भजनकुटी, चंद्रसखीचा कुंज, ग्वालजीकी हवेली, राधाचरणस्वामींचे पुस्तकालय ही येथील उल्लेखनीय स्थळे आहेत. हिंदी भक्तकवींनी या क्षेत्रावर सर्वाधिक काव्यरचना केल्या आहेत. भागवत, पद्मपुराण, स्कंदपुराण, नारद पांचरात्रातले श्रुतिविद्या संवाद इ. संस्कृत ग्रंथांतही वृंदावनचे माहात्म्य वर्णिलेले आहे.      

                          

चौधरी, वसंत