विहार सरोवर : महाराष्ट्र राज्याच्या मुंबई उपनगर या जिल्ह्यातील एक कृत्रिम सरोवर, मध्य रेल्वेवरील भांडुप स्थानकाच्या पश्चिमेस ४·८ किमी तर पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव स्थानकाच्या पूर्वेस ९·६ किमी. वर हे सरोवर आहे. बृहन्मुंबई जिल्ह्यातून १९९० मध्ये मुंबई उपनगर हा जिल्हा होण्यापूर्वी हे सरोवर बृहन्मुंबई जिल्ह्यात येत असे. तानसा पाणीपुरवठा योजना होण्यापूर्वी मुंबई शहर व बेटाला पाणीपुरवठा करणारे हे प्रमुख सरोवर होते. सरोवराचा परिसर सुंदर असून त्यात हिरव्यागार वनश्रीने आच्छादलेली लहानलहान बेटे आहेत. याच्या सभोवती टेकड्या व दाट झाडी आढळते. सरोवराजवळ विहार, साई व गुंडगाव ही गावे आहेत. हा परिसर मिळून बनलेली ‘विहार इस्टेट’ २२ सप्टेंबर १८२९ रोजी मोरारजी रस्तमजी यांना खंडाने देण्यात आली होती.
सरोवराचा विस्तार ५६६·५ हेक्टर क्षेत्रात असून तलाव पूर्णपणे भरलेला असतो, तेव्हा पाण्याची पातळी सस. पासून ५५·४७ मी. तर कोरड्या ऋतूत ही पातळी ३·४५ मी. असते.
विहार प्रवाहाचे पाणी अडवून त्याचा साठा करून ते पाणी मुंबई शहराला पुरविण्याची पहिली कल्पना १८४५ मध्ये कँप्टन क्रॉफर्ड यांनी मांडली. या योजनेला १८५४ मध्ये शासनाची मंजुरी मिळून १८५६ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. विहार येथील हे धरण त्या काळातील जगातील सर्वात उंच मातीचे धरण होते. धरण बांधून पूर्ण झाले तेव्हां त्याची पाणी साठविण्याची क्षमता ९,१२० द. ल. गॅलन एवढी होती. मार्च १८६० पासून धरणात प्रत्यक्ष पाणी साठविण्यास सुरवात झाली. त्यावेळी या जलाशयातून शहरातील एकूण सात लाख लोकसंख्येला प्रतिदिनी सात द.ल. गॅलन म्हणजेच दरडोई दहा गॅलन पाणी पुरविले जात असे. विहारमधील पाण्याच्या अस्वच्छतेबद्दल वारंवार टीका झालेली आहे. १८६३ मध्ये विहार पाणीपुरवठा विभाग मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाराखाली आला. १९४३ मध्ये ५०,००० रू.खर्चून संपूर्ण विहार सरोवराची स्वच्छता करण्यात आली.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीस विहार सरोवराजवळ या जागेचे बक्षिसपत्र कोरलेला १·५ मी. x ०·४५ मी. X १·५ मी. आकाराचा, तेराव्या शतकातील एक शिलालेख सापडला असून त्यावर ५० ते ६० ओळी कोरलेल्या आहेत. या शिलालेखावर ही जागा देणाऱ्या-घेणाऱ्यांची नावे आहेत. त्याच्या वरच्या बाजूस सूर्य व चंद्राचे आकार व त्याखाली मजकूर आहे. मूर यांनी नंतर हा शिलालेख इंग्लंडला नेला. १८८१ मध्ये असेच बक्षिसपत्र असलेला १·२ मी. X ०·०२५ मी. X १·५ मी आकाराचा दगड विहारजवळ सापडला असून तो ठाणे येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या उद्यानात ठेवला आहे. या शिलालेखाचा वरचा भाग गोलाकार असून त्याच्या दोन्ही कोपऱ्यात सूर्य व चंद्राचे आकार आणि त्याखाली अस्पष्ठ अशा चार ओळी कोरलेल्या आहेत. शिलाहार राजा महामंदलेश्वर अनंतदेव यांच्या कारकीर्दीत (इ.स. १०८१) हे बक्षिसपत्र झालेले आहे. १८५५ मध्ये जलाशयाच्या वरच्या बाजूस सभोवती रस्ता तयार करत असताना तेथे तांब्याची एक हजार नाणी व त्याच आकाराचे काही तांब्याचे तुकडे सापडले.
विहार धरणाजवळच एक विश्रामगृह तसेच सुंदर उद्यान आहे. सहलीचे ठिकाण म्हणून हा परिसर प्रसिद्ध आहे. सुट्टीच्या दिवशी त्याचप्रमाणे उन्हाळ्यात हे पर्यटन स्थळ गजबजलेले असते.
चौधरी, वसंत