विस्कॉन्सिन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील उत्तर – मध्य  भागातील एक संपन्न राज्य. अमेरिकेचा ‘दुधदुभत्याचा प्रदेश’ म्हणून  हे राज्य प्रसिद्ध आहे. राज्याचा अक्षवृत्तीय विस्तार ४२ ते  ३०’ उ. ते ४७ ०३’ उ. व रेखावृत्तीय विस्तार  ८६ ४९’ प.ते. ९२ ५४’ प. असा आहे. विस्कॉन्सिनचा पूर्व – पश्चिम विस्तार ४८० किमी. व दक्षिणोत्तर विस्तार ४५० किमी. आहे. राज्याचे क्षेत्रफळ १,४५,४३६ चौ. किमी. असून त्यापैकी ४,४७२ चौ. किमी. क्षेत्र अंतर्गत जलाशयांनी  व्यापलेले आहे. विस्कॉन्सिनच्या उत्तरेस मिशिगन राज्य व सुपीरिअर सरोवर, पूर्वेस मिशिगन सरोवर, दक्षिणेस इलिनॉय राज्य, पश्चिमेस आयोवा आणि मिनेसोटा राज्ये आहेत. या प्रदेशातून वाहणाऱ्या विस्कॉन्सिन या मुख्य नदीच्या अमेरिकन इंडियन नावावरून राज्याला हे नाव पडलेले आहे. मिस् कॉस, मिस् कॉनसिंग, मेस् कॉन्सिग, व शेवटी  फ्रेंच विस्कॉन्सिन असा या नावाचा अपभ्रंश होत गेलेला दिसतो. विस्कॉन्सिन म्हणजे ‘पाण्याचा संचय’ (गॅदरिंग ऑफ द वॉटर) असा सर्वसाधारणपणे याचा अर्थ घेतला जातो.राज्याची लोकसंख्या ४८,९१,७६९ (१९९०) आहे. मॅडिसन (१, ९१, २६२ – १९९०) ही राज्याची राजधानी व मिलवॉकी (६,२८,०८८ – १९९०) हे राज्यातील सर्वात मोठे शहर आहे.

भूवर्णन: उत्तरेकडील सुपीरिअर अपलँड व दक्षिणेकडील सेंट्रल लोलँड्स असे राज्याचे दोन प्रमुख नैसर्गिक प्रदेश पडतात. त्यांपैकी सेंट्रल लोलँड्सचे पश्चिमेकडील विस्कॉन्सिन ड्रिफ्टलेस एरिया व पूर्वेकडील ग्रेट लेक्स प्लेन असे दोन उपविभाग पडतात. सुपीरिअर अपलँड व सेंट्रल लोलँड्स या प्रदेशांमध्ये महत्त्वाचा फरक उंचीबाबतचा आहे. हिमयुगात झालेल्या घडामोडींच्या स्वरूपावरून ग्रेट लेक्स प्लेन व विस्कॉन्सिन ड्रिफ्टलेस एरिया या दोन प्रदेशांमध्ये भिन्नता आढळते. विस्कॉन्सिन ड्रिफ्टलेस एरियाचा नैर्ऋत्येकडील प्रदेश वगळता इतर सर्व क्षेत्रात हिमयुगात हिमनद्यांनी  फार मोठ्या प्रमाणात संचयन केलेले आढळते.सुपीरिअर अपलँड हा राज्यातील सर्वाधिक उंचीचा भाग आहे. प्राइस काऊंटीतील टिग्झ हिल हे राज्यातील सर्वोच्च शिखर (५९५ मी.) या प्रदेशातच आहे. भूवैज्ञानिक दृष्ट्या या प्रदेशात प्राचीन खडक ( प्रामुख्याने ग्रँनाईट व नीस) आढळत असून तो कॅनडियन ढाल क्षेत्राचाच एक भाग आहे. या भागात घनदाट जंगल आहे. काही प्रदेश दलदलयुक्त आहे. वायव्येस गोगीबिक किंवा पेनोकी  पर्वतरांग असून सुपीरिअर सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ पाणथळ सपाट प्रदेश आहे. सुपीरिअर अपलँडमध्ये राज्यातील प्रमुख नद्या उगम पावतात आणि त्या दक्षिणेस सेंट्रल लोलँड्सकडे वाहत जातात. यांतील सेंट क्रोई, चिपेवा, ब्लॅक, विस्कॉन्सिन आणि वुल्फ या प्रमुख नद्या आहेत. उत्तरेस सुपीरिअर सरोवराकडे वाहणाऱ्या सर्व नद्या लहान आहेत. राज्याच्या आग्नेयीस ग्रेट लेक्स प्लेन मधील पृष्टखडक हिमानी प्लवराशींनी आच्छादलेले आहेत. तीत चंद्रकोरीच्या आकाराचे हिमोढ द्दष्टोत्पत्तीस येतात.या हिमोढांदरम्यान अनेक छोटी सरोवरे आणि दलदलीचे पट्टे आहेत. राज्यात अनेक नैसर्गिक प्रपात असून बिग मॅनिट्यू हा पॅटिसन पार्कमधील धबधबा सु. ५० मी. उंचीचा आहे. या भागात दाट वस्ती असून मोठी शहरे वसली आहेत. विस्कॉन्सिनला सुपीरिअर सरोवराच्या काठचा सु. २४० किमी.चा किनारा असून मिशिगन सरोवराचा ६१० किमी. चा किनारा लाभला आहे.

विस्कॉन्सिन ड्रिफ्टलेस एरिया हा ओबोडधोबड प्रदेश असून त्याची  सस. पासूनची उंची १८५ ते ५२० मी. एवढी आहे.या प्रदेशाच्या मध्यभागी खडकांचे सुळके असून त्यातील काही लांबून ब्यूट व मेसा या भूविशेषांसारखे दिसतात. मिसिसिपी आणि विस्कॉन्सिन नद्यांच्या प्रवाहांनी निर्माण केलेल्या या भागात खोल घळ्या, किकपू खोरे,डेव्हिल्स लेक व मिलिटरी रिज ही या भूप्रदेशातील काही खास भूवैशिष्ट्ये होत. राज्यात लहानमोठी १५,००० सरोवरे आहेत. त्यापैकी विन्नबेगो सरोवर हे सर्वात मोठे (५५७ चौ. किमी.), तर ग्रीन्ले हे सर्वांत खोल सरोवर आहे.राज्याच्या इतर प्रदेशाच्या तुलनेत ड्रिफ्टलेस एरिया प्रदेशात थोडी सरोवरे आहेत. काळी प्रेअरी मृदा आणि करड्या रंगाची अरण्यातील मृदा असलेल्या सखोल प्रदेश तसेच पूर्वेकडील उंचावट्यावर असलेली जमीन शेतीस अत्यंत उपयुक्त आहे. विस्कॉन्सिन राज्यात अनेक ठिकाणी हिमगाळाची सुपीक जमीन आहे. नद्यांच्या खोऱ्यांत व सरोवरांकाठी गाळ माती आहे.

हवामान : थंड हिवाळे आणि उष्ण उन्हाळे असे विषम हवामान येथे आढळते. पश्चिम – पूर्व दिशेत येणाऱ्या चक्री वादळांमुळे यात बदल होतो.वार्षिक सरासरी तापमान नैर्ऋत्य भागात ९ से. तर उत्तर सरहद्दीवर ४° आढळते. मिशिगन व सुपीरिअर या सरोवरांच्या किनारपट्टीवर मात्र सौम्य उबदार हिवाळे आणि अल्हाददायक थंड उन्हाळे असे चित्र आढळते. मिलबॉकी शहराचे सरासरी तापमान जानेवारीमध्ये ६° आणि जुलैमध्ये २१° असते. येथील आतापर्यंत नोंदविलेल्या तापमानात सर्वांत कमी तापमानाची  नोंद – ४८° ची झाली असून कमाल तापमानाची नोंद ४६° से झाली आहे राज्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६८ ते ८६ सेंमी. च्या दरम्यान असून ५०% पाऊस उन्हाळ्यात पडतो. सुपीरिअर सरोवराच्या परिसरात पर्जन्यमान ७४ सेंमी. आणि दक्षिणेकडे ते ८१ सेंमी . आढळते. हिमवृष्टीचे वार्षिक सरासरी प्रमाण ११४ सेंमी. असते.

 खनिजे : राज्यात विविध प्रकारची खनिजे असून लोहधातूक, शिसे, जस्त,गंधक ही प्रमुख खनिजे आहेत. उत्तर अमेरिका खंडातील शिशाचा मोठा साठा या राज्यात असून गार्नेंट, सैंधव, एमरी या खनिजांचेही उत्पादन होते. डोलोमाइट आणि ग्रॅनाइट हे दगडांचे प्रकार व विशेषतः , वालुकाश्म, जिप्सम, रेती , वाळू आणि चिकणमाती  इ. खनिजेसुद्धा  मिळतात.

वनस्पती व प्राणी : राज्याचा पन्नास टक्के भूभाग जंगलांनी व्यापला असून त्यातील ॲश, ॲस्पेन, बासवुड, एल्म, मॅपल, ओक इ. कठीण लाकडाच्या वृक्षांचे प्रमाण ८०% आहे.अन्य वृक्षप्रकारांत देवदार, हेमलॉक, पांढरा पाइन, सीडार, स्प्रूस इत्यांदींचा अंतर्भाव होतो. हे सर्व वृक्षप्रकार मऊ लाकडाचे आहेत. प्लायवुड, पृष्ठावरणे, कागदाचा लगदा  आणि कागद तयार करण्याचे उद्योग राज्यात मोठ्या प्रमाणात चालातात. ब्लू हकल इ. बेरी वनस्पतीचे विविध प्रकार येथील जंगलात असून द्राक्षे, चेरी,सफरचंद, सप्ताळू, अलुबुखार  इ. फलवृक्षही आढळतात. विस्कॉन्सिनच्या दाट जंगलात अस्वले, हरिणे, लांडगे, कोल्हे, कॉयॉट इ.प्राणी असून विजू (बॅजर) हा विस्कॉन्सिनचा राज्यप्राणी आहे. पांढऱ्या शेपटीचे हरिण, कोल्हे, कॉटनटेल, ससे, स्कंक, बुडचक, खारी, रॅकून, चिपमंक, सायाळ इ. प्राणी सर्वत्र आढळतात. बदक, हंस, कवडे, तीतर, रानकोंबड्या इत्यादींची शिकार केली जाते. दलदलीच्या प्रदेशात बिटर्न, ब्लॅकटर्न आणि पाणपक्षी आढळतात. रॉबिन हा राज्यापक्षी आहे. मोठ्या सरोवरांतून मासेमारी व्यवसाय चालतो, तसेच मासेमारी हा एक अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. पॅनफिश, ट्राउट, बास, पाइक, स्टर्जन, इ. मासे विपुल आहेत.

इतिहास : विस्कॉन्सिन राज्याचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. नीन आणि बॅरबू येथे आढळलेल्या प्राचीन थडग्यांवरून या प्रदेशात सु.१,५०० वर्षापूर्वी वस्ती असावी आणि ते मृत व्यक्तीला पुरत असत, असा पुरावा मिळाला. येथे प्रामुख्याने आदिम लोकांची जंगलातून विखुरलेली मानवी वस्ती होती. सोळाव्या शतकात यूरोपीय समन्वेषक या भूप्रदेशात आले, तेव्हा अमेरिकन इंडियन जमातींपैकी बिन्नवेगो, डकोटा व मनॉमनी इंडियन हे विस्कॉन्सिन प्रदेशात राहत होते. ते उत्तम कारागीर होते. लाकडाची घरे बांधून ते राहत असत. मासेमारी व शिकार हे त्यांचे प्रमुख व्यवसाय होते, क्वचित ते शेती करीत. मिआमी व इलिनॉय इंडियनांनी फॉक्स नदीकाठी वस्ती केली. फ्रेंच समन्वेषक झां नीक़ॉले हा या भूप्रदेशात पाऊल ठेवणारा (१६३४) पहिला गोरा इसम. त्यानंतर प्येर एस्प्री रॅदीसों, मेदॅर श्वार दे ग्रोझेये इ. समन्वेषकांनी फरच्या (लोकर) शोधार्थ या प्रदेशात पायपीट केली. रने मेनार हा पहिला मिशनरी इ.स. १६६० मध्ये येथे आला आणि त्याने अँशलँडजवळ रोमन कॅथलिक मिशनची स्थापना केली आणि पुढे फादर क्लोद झां ॲलवे याने ल्वी आंद्रे या ख्रिस्ती  धर्मोपदेशकाच्या मदतीने विद्यमान द पेरे या जागी मिशनरी केंद्र स्थापन केले. यामुळे फ्रेंचांची या प्रदेशात ये-जा सुरू झाली. सुरूवातीस स्थानिक इंडियन जमातीने फ्रेंचांना सहकार्य केले, पण इ.स. १७१२ मध्ये फॉक्स इंडियन आणि वसाहतवाले यांच्यातील संघर्षाला प्रारंभ झाला.दोघांनाही  फॉक्स आणि विस्कॉन्सिन नद्यांच्या जलमार्गावर नियंत्रण हवे होते. अनेक चकमकीनंतर फ्रेंचांनी फॉक्स इंडियनांचा अखेर १७४० मध्ये पाडाव केला, मात्र यामुळे फ्रान्सची या भागातील संरक्षण फळी कमकुवत झाली. इतर इंडियन जमातींबरोबरचे फ्रेंचांचे संबंध दुरावले. परिणामत: १७५४ च्या ग्रेट ब्रिटन-फ्रान्स यांमधील अमेरिकेतील वर्चस्वासाठीच्या युद्धात फ्रेंचांचा पराभव झाला. पॅरिस तहाने (१७६३) फ्रान्सला कॅनडा, मिसिसिपीच्या पूर्वेकडील सर्व प्रदेश व विस्कॉन्सिनवरील नियंत्रण यांना मुकावे लागले. इंग्रज व्यापाऱ्यांनी तात्काळ याचा फायदा उठविला. ब्रिटिशांनी १७७४ चा  क्वीबेक कायदा संमत करून विस्कॉन्सिन भूप्रदेश क्कीबेक प्रांताचा एक भाग बनविला या कायद्यामुळेच अमेरिकेतील मूळ तेरा वसाहतींनी बंडाचे निशाण फडकविले(१७७५). अमेरिकन क्रांतीनंतर (१७८३) विस्कॉन्सिन हा प्रदेश अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा एक भाग बनला. सुरूवातीला विस्कॉन्सिन हा नॉर्थवेस्ट टेरिटरीचा एक भाग बनला (१७८७). त्यानंतर विस्कॉन्सिनचे क्षेत्र क्रमश : इंडियाना (१८०० ते १८०९), इलिनॉय (१८०९ – १८) आणि मिशिगन (१८१८ – ३६) या प्रदेशांचा भाग बनले. या प्रदेशातील शिसे धातुकाच्या मुबलक साठ्याकरिता रस्सीखेच सुरू झाली . तेंव्हा खाणमालकांची झुंबड उडाली. काही खाणमालक पर्वतश्रेणींच्या  उतारांवर गुहा खणून बिजू प्राण्याप्रमाणे राहू लागले. त्यामुळे त्याला ‘बॅजर प्रदेश’ हे नामाभिधान मिळाले आणि पुढे राज्याला ‘बॅजर स्टेट’ म्हणण्यात येऊ लागाले. स्थानिक इंडियनांनी प्रतिकाराचा शेवटचा अयशस्वी प्रयत्न ‘ब्लॅक हॉक वॉर’ द्वारे १८३२ मध्ये केला. अमेरिकन कॉग्रेसने २० एप्रिल १८३६ रोजी  विस्कॉन्सिन हे स्वतंत्र क्षेत्र बनविले आणि मॅडिसन येथे क्षेत्रीय विधिसभेची बैठक झाली  (१८३८). या क्षेत्रात त्यावेळी सांप्रतचे मिनेसोटा, आयोवा (उत्तर भाग) व दक्षिण डकोटा हे भूप्रदेश होते. हेन्री डॉज याची क्षेत्रीय राज्यपाल म्हणून पहिली नियुक्ती झाली.


विस्कॉन्सिनला संघराज्यातील तिसाव्या राज्याचा दर्जा २९ में १८४८ मध्ये प्राप्त झाला आणि सध्या असलेला सर्व भूप्रदेश त्यात ठेवण्यात आला. नेल्सन द्यूई पहिला राज्यापाल झाला. १८५४ मध्ये कॅनझस – नेब्रॅस्का विधेयकाला विस्कॉन्सिन नागरिकांनी विरोध दर्शविला. त्यांचा गुलामगिरीला विरोध होता. यातून रिपब्लिकन पक्षाचा विकास  झाला आणि त्या पक्षाचा कोल्स बॅशफोर्ड राज्यपाल झाला (१८५६). त्यानंतर सुमारे १०० वर्ष रिपब्लिकन पक्षाचे आधिपत्य या राज्यावर राहिले. यादवी युद्धात (१८६२ – ६४) विस्कॉन्सिन राज्याने संघीय लष्करास ९१,००० सैनिक पुरविले आणि अब्राहम लिंकनच्या धोरणाचा हिरिरीने पुरस्कार केला. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात राज्यात अनेक राजकीय, सामाजिक, आर्थिक सुधारणा झाल्या.

पहिल्या महायुद्धानंतरच्या मंदीच्या लाटेचा थोडा परिणाम या राज्यावर झाला, तथापि औद्योगिक विकासात – विस्तारात त्याने आघाडी मारली. यंत्रसामग्री आणि वाहतुकीची साधने यांचे कारखाने मोठ्या प्रमाणावर वाढले. दूधदुभत्यांच्या पदार्थांचे उत्पादन वाढून त्या धंद्याला तेजी आली. मात्र दारूबंदीमुळे मद्यार्काच्या उत्पादनावर परिणाम झाला. मंदीमुळे कृषी व्यवसायावर परिणाम झाला आणि बेकारी वाढली. त्यामुळे राज्याला बेकारांसाठी विमा कायदा संमत करणे भाग पडले. हा देशातील या प्रकारचा पाहिला कायदा होता. दुसऱ्या महायुद्धानंतर राज्याची अर्थिक स्थिती धीमेपणाने सुधारू लागली.

 राजकीय स्थिती : विस्कॉन्सिन राज्याने मार्च १९४८ मध्ये सार्वमताने घटना संमत करून घेतली आणि ती आजपर्यंत कार्यवाहीत आहे. तीत १९८४ पर्यंत ११८ वेळा घटना दुरूस्त्या करण्यात आल्या. या घटनेनुसार कार्यकारी सत्ता ही चार वर्ष निवडलेल्या राज्यपालाच्या हाती असून तो राज्याच्या हाती असून तो राज्याच्या सैन्याचा प्रमुख असतो. त्याला महाभियोग आणि राजद्रोह या गुन्ह्यांव्यतिरिक्त अन्य प्रमदाबद्दल माफी देण्याचा अधिकार आहे, यांशिवाय कायद्याचे पालन योग्य प्रकारे होते किंवा नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम त्याचे आहे. राज्यपालाव्यत्तिरिक्त लेफ्टनंट गर्व्हनर, राज्याचा प्रमुख सचिव, खजिनदार, महान्यायवादी, महाधिक्षक इ. प्रमुख पदे असून त्यांचीही  निवड चार वर्षांकरिता होते. गर्व्हनर व लेफ्टनंट गर्व्हनर यांची निवडणूक संयुक्तरीत्या होते. सीनेटमध्ये चार वर्षाकरिता निवडून आलेले ३३ सभासद असून विधानसभेत दोन वर्षांकरिता ९९ सभासद निवडले जातात. राज्यात प्रामुख्याने रिपब्लिकन व डेमॉक्रॅटिक, द पॉप्युलिस्ट, द सोशॅलिस्ट लेबर, द प्रोग्रेसिव्ह हे अन्य पक्षही कार्यरत आहेत. प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याचे ७२ काउंटीमध्ये विभाजन केले आहे. शहरातून नगरपालिका सद्दश स्थानिक प्रशासन असून तीन वा पाच लोकांचे निरीक्षक मंडळ प्रशासकीय व्यवस्था पाहते.

राज्यातून संधीय काँग्रेसवर, विशषात सीनेटवर, दोन सीनेटर  निवडून दिले जातात. आणि प्रतिनिधिगृहावर नऊ सदस्य निवडले जातात. राज्याला एकूण ११ मतधिकाऱ्याचा हक्क आहे.

अर्थिक स्थिती : अनेक वर्षापासून उद्योगधंदे प्रशासन, शिक्षण, विज्ञान, तसेच शेतीमध्ये हे राज्य आघाडीवर आहे. भरपूर पाणी, अनुकूल हवामान व सुपीक जमीन या नैसर्गिक घटकांमुळे विस्कॉन्सिन राज्यातील कृषिव्यवसाय आघाडीवर असून किफायतशीर ठरला आहे. कृषिव्यवसायाला दुग्धव्यवसायाची जोड असून राज्यातील एकूण सु. आठ दशलक्ष हेक्टर जमिनीपैकी दोन तृतीयांश क्षेत्र पिकाऊ जमिनीचे आहे. शेती हा व्यवसाय पूर्णतः यंत्राच्या साह्याने केला जातो. त्यामुळे कृषिकामगारांचे प्रमाण कमी झाले आहे. यादवी युद्धापूर्वी गहू हे राज्याचे प्रमुख पीक होते. नंतर हळूहळू शेतकऱ्यांनी पशुपालन आणि खाद्य यांवर भर दिला.परिणामतः जनावरांना आवश्यक असणारी ओट, राय, मका इ.पिके आणि विविध प्रकारचे गवत मोठ्या प्रमाणात घेतले जाऊ लागले. नगदी पिकामध्ये बटाटे, सोयाबीन, वाटाणा, फळभाज्या, सफरचंद, स्ट्रॉबेरी, ऋँनबेरी, चेरी इ. असून पन्हेरी व पादपगृहांमधील पिकेही यात मोडतात.१९९० मध्ये राज्यात धान्य उत्पादन करणारे सु.८१,००० मळे होते. यातील प्रत्येक मळ्याचे सरासरी क्षेत्र ८७.८ हेक्टर होते. यातून राज्यास ४.३३ महापद्म डॉलर वार्षिक उत्पन्न मिळाले. त्याच वर्षी दुग्धजन्य पदार्थांपासून २.५० महापद्म डॉलर उत्पन्न मिळाले.राज्यात १८७० पासून पशुपालन व्यवसायास गती मिळाली आणि पशूंसाठी शेती हे समीकरण झाले. मांस डबाबंद करण्याचे प्रमुख कारखाने कडही मॅडिसन, मिलवॉकी व ग्रीन बे येथे असून त्यांपासून राज्यास ८२४ दशलक्ष डॉलर वार्षिक उत्पादन मिळाले (१९८४). गाईच्या संख्येबाबत तसेच  दूध व मलईचे पदार्थ बनविणारे हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य होते. औद्योगिक दृष्ट्या हे देशातील एक महत्त्वाचे राज्य असून उद्योगधंद्यांत त्याचा देशात अकरावा क्रमांक लागतो. विस्कॉन्सिनची खनिज संपत्ती लक्षणीय नसली तरीसुद्धा त्याचे पंचमहासरोवरांकाठचे भौगोलिक स्थान औद्योगिक विकासास उपयुक्त ठरले आहे. ग्रेट लेक्स येथील खाणीतील कोळसा आणि लोहधातूक यांच्या ने-आणीकरिता पंचमहासरोवरांची स्वस्त व उत्कृष्ट वाहतूक सुविधा उपलब्ध झाली आहे. परिणामतः, यंत्रसामग्रीचे कारखाने, अन्नप्रक्रिया, कागद, विद्युत् उपकरणे, रसायने, रबर, वाहतुकीची साधन-सामग्री, प्लॅस्टिक, फर्निचर इ. उद्योगांना त्यामुळे चालना मिळाली आहे. मुद्रण आणि प्रकाशन व्यवसाय या उद्योगांनाही राज्यात विशेष महत्त्व आहे. औद्योगिक उत्पादनाची व्याप्ती विविधता व मूल्य या दृष्टींनी विस्कॉन्सिन राज्य आघाडीवर आहे. राज्याच्या निर्मितिउद्योगांमध्ये प्रक्रिया उद्योगाला विशेष महत्त्व आहे. मोटारी, बसगाड्या, ट्रक, बोटी, इ. वाहनांच्या निर्मितीमध्ये राज्याचा फार मोठा वाटा आहे.

जगातील पहिला जलविद्युत् प्रकल्प या राज्यातील ॲपलटन येथे फॉक्स नदीवर इ. स.१८८२ मध्ये सुरू करण्यात आला. परंतु हळूहळू जलविद्युतीकरणाचे प्रमाण कमी झाले आणि १९८३ मध्ये तर फक्त ४ % वीज पाण्यापासून घेण्यात आली. उर्वरित विद्युत्‌निर्मिती दगडी कोळशाचा इंधन म्हणून उपयोग करून औष्णिक संयंत्राद्वारे  करण्यात येते. राज्याची अणुकेंद्रीय शक्ति-संयंत्र केंद्रे ला क्रॉस व कार्ल् टन या ठिकाणी असून त्यांपासून १९८३ मध्ये १ कोटी ७ लाख किवॉ. उर्जा उपलब्ध झाली.

वाहतूक व संदेशवहन : सुरवातीच्या वसाहतवाल्यांना सपाट तळ असलेल्या होड्यांतून मिसीसिपी नदी – प्रवाहातून जावे लागत असे. त्यांना बॅटो (बॅटोझ) म्हणत. पुढे वाफेच्या बोटी आल्या आणि आगबोटीतून प्रवास सुरू झाला. रेल्वेच्या आगमनानंतर बोटींचा प्रवास मागे पडला. पहिली रेल्वे १८५१ मध्ये मिलबॉकी व वॉकिशॉ दरम्यान ३३ किमी.ची झाली. सांप्रत रेल्वे मार्गांचे जाळे ८,७०० किमी. (१९९६) पसरले असून त्यापैकी सहा मार्ग केवळ मालाची वाहतूक करण्यासाठी आहेत व राज्यातील दहा शहरे एकमेकांशी रेल्वेने जोडलेली आहेत. राज्यात एकूण १०० सार्वजनिक तर २८५ खाजगी विमानतळ आहेत. ग्रीन वे, मॅडिसन, मिलवॉकी आणि सर्व मोठी शहरे हवाई मार्गाने जोडलेली आहेत. राज्यात एकूण सु.१.७९,४४० किमी. लांबीचे महामार्ग होते. (१९९७). राज्यातील बहुतेक सर्व रस्ते पक्के असून महामार्गांना क्रमांक पद्धत वापरणारे विस्कॉन्सिन हे देशातील पहिले राज्य आहे. मिलवॉकी हे ग्रेट लेक्समधील निर्यात करणारे प्रमुख बंदर असून तेथून दुधाचे पदार्थ, पीठ, धान्य, लोह, यंत्रसामग्री इ. निर्यात होते. दगडी कोळसा, मिलवॉकी  आणि सुपीरिअर येथे उतरविण्यात येतो व त्याचे वाटप होते.

विस्कॉन्सिन राज्यातून ३२५ वृत्तपत्रे प्रसिद्ध होतात. यापैकी ३५ दैनिके असून बाकीची नियतकालिके आहेत. राज्यात प्रेस असोसिएशनची स्थापना १८५३ मध्ये झाली. राज्यात १९०९ मध्ये प्रथम आकाशवाणी केंद्र सुरू करण्यात आले आणि मिलवॉकी येथे पहिले दूरचित्रवाणी केंद्र १९४७ मध्ये स्थापन झाले. राज्यात एकूण २२१ आकाशवाणी केंद्रे व २४ दूरचित्रवाणी केंद्रे होती (१९८५).


लोक व समाजजीवन : गोऱ्यांच्या वसाहतीपूर्वी  विस्कॉन्सिन या भूप्रदेशात अमेरिकन इंडियन जमातींचे १२,००० लोक राहत असत (१९३४). त्यानंतर या भागात यूरोपीयनांनी प्रवेश केला. त्यांत जर्मन लोकांचे प्राबल्य होते. त्यानंतर पोलिश, स्काँडिनेव्हियन (मुख्यत्वे नॉर्वेजियन) आणि ब्रिटिश आले. साहजिकच सांप्रतच्या लोकसंख्येत जर्मन पूर्वजांपासून निपजलेली वंशावळ जास्त आहे. या सर्वांनी जमिनी खरेदी करून आपली वस्ती ५ वाढविली. १९८० च्या जनगणनेनुसार गोऱ्यांची संख्या जास्त असून ५·६% गोरेतर आहेत. त्यांत १,८२,५९३ काळे, २९,४९७ अमेरिकन इंडियन व १८,१६५ आशियायी अमेरिकन होते. चार पंचमांश कृष्णवर्णीय मिलवॉकी  शहरात राहतात आणि बहुसंख्य अमेरिकन इंडियन त्यांच्या आठ संरक्षित क्षेत्रात वास्तव्य करून आहेत.युरोपीय गोऱ्यांमध्ये जर्मन व पोलिश यांचे प्रमाण २·६ टक्के होते. बहुतेक लोक शहरांतून व महानगरांतून राहतात. त्यामुळे ग्रामीन भागातून अल्प प्रमाणात वस्ती  आढळते.

ख्रिस्ती धर्माचे राज्यात प्राबल्य असून प्रॉटेस्टंट व रोमन कॅथलिक चर्चचे समसमान सदस्य आहेत. प्रॉटेस्टंटामध्ये अधिकतर ल्यूथरन, मेथाडिस्ट, युनायटेड चर्च ऑफ क्राइस्ट, प्रेस् बिटेरियन, बॅप्टिस्ट, एपिस्कोपल आणि इव्हॅजेलिकल युनाटेड ब्रेदरे या उपपंथांचे अनुयायी आहेत.

शिक्षण : मायकेल फ्रँक या सुधारणावादी संपादकाच्या प्रयत्नांनी विस्कॉन्सिनमधील कनोश गावी पहिले मोफत प्राथमिक विद्यालय (१८४५) आणि मोफत माध्यमिक विद्यालय (१८४९) सुरू झाले. १८४८ च्या संविधनाने वय वर्ष ४ ते २० दरम्यानच्या सर्व मुलांना मोफत अध्ययनाची सुविधा पुरविली. देशातील पहिले बालोद्यान मॅगरीथ मेयर शुर्त्स (कार्ल शुर्त्स) या महिलेने वॉटरटाऊन येथे १८५६ मध्ये सुरू केले. १९९१ च्या कायद्याने पाच हजार वस्तीच्या गावात व्यावसायिक शिक्षण देणारे विद्यालय असलेच पाहिजे, असा दंडक घालण्यात आला आणि व्यावसायिक मंडळाची स्थापना झाली. १८७९ मध्ये सर्वांना सक्तीचे शिक्षण करण्यात आले. मॅडिसन येथे १८४८ मध्ये द युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिनची स्थापना करण्यात आली. मिलवॉकी व मॅडिसन या गावांतून विस्कॉन्सिन विद्यापीठाची प्रमुख विद्यापीठ क्षेत्रे असून अन्य शहरांतून त्यांच्या शाखा आहेत. त्याशिवाय मार्केत विद्यापीठ (मिलवॉकी), बेलॉईट महाविद्यालय, लॉरेन्स विद्यापीठ (ॲपलटन), रिपन महाविद्यालय (रिपन), ह्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. मिलवॉकी सार्वजनिक ग्रंथालय हे राज्यातील सर्वात मोठे (तेवीस लाख ग्रंथ) ग्रंथालय आहे. विस्कॉन्सिन विद्यापीठ आणि स्टेट हिस्टॉरिकल सोसायटी यांच्या ग्रंथालयांत अनुक्रमे ४१ लाख व १६ लाख पुस्तके आहेत. राज्यात एकूण ३६० ग्रंथालये आहेत. स्टेट हिस्टॉरिकल सोसायटीचे संग्रहालय मॅडिसन येथे १८४६ मध्ये सुरू झाले. त्यात पुराभिलेख व ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह आहे. मिलवॉकी सार्वजनिक संग्रहालय हे राज्यातील सर्वात मोठे निसर्गेतिहासाचे संग्रहालय आहे. याशिवाय विषयवार संग्रहालये ॲपलटन, बॅरबू , कॅसव्हिल इ. ठिकाणी आहेत.

प्रेक्षणीय स्थळे : राज्यातील मिलवॉकी आणि मॅडिसन ही मोठी शहरे असून यांशिवाय रेसीन (८४,२९८-१९९०), वॉटरटॉउन, वॉकिशों  ( ५६,९५८), ग्रीन बे (९६,४६६), कनोश (८०,३५२), व्हाइटवॉटर, जेन्झव्हिल (५२,१३३), बिव्हर डॅम, द पेरी, कॉकॉन, ॲपलटन (६५,६९५), मनॅश इ. शहरे आहेत. मिलवॉकी हे  राज्यातील सर्वात मोठे शहर, एक मोठे औद्योगिक केंद्र आणि जर्मन – अमेरिकन संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र आहे.

मॅडिसन ही राज्याची राजधानी. तीत देशातील एक उत्कृष्ट कॅपिटॉलची इमारत असून तिचा ग्रॅनाइट दगडातील ८७ मीटर उंचीचा मनोरा आकर्षक आहे. शहराला निसर्ग सुंदर परिसर लाभलेला आहे. रेसीन, कनोश ग्रीन बे ही औद्येगिक शहरे असून तीत बोटी बांधणे आणि यंत्र निर्मितीचे कारखाने आहेत. सुपीरिअर लेक (२९,५७१) येथे लोहधातुक व्यापाराची जगातील एक मोठी गोदी आहे.

अपॉसल ही किनाऱ्यापासून थोड्या दूरवर असलेली बेटे मासेमारीकरिता (विशेषतः ट्राउट आणि सॉलमन या माशांसाठी) प्रसिद्ध आहेत. मासेमारी खेळासाठी देशातून अनेक लोक येथे येतात. मौंट होरेब आणि ब्लू मौट्स यांमध्ये केव्ह ऑफ द मौट्स असून त्यांतील चौदा दालने चित्रविचित्र रंगीत चुनखडी रचनाबंधांसाठी प्रसिद्ध आहेत. मौट होरेबजवळ १९२६ मध्ये बांधलेली लिट्स नॉर्वे नावाची स्कँडिनेव्हियन संस्कृती दर्शविणारी प्रशस्त (६५ हेक्टर) शेतातील एक इमारत आहे. त्याभोवती छोटी घरे असून त्यात नॉर्वेची संस्कृती दर्शविणारे फर्निचर आहे. बॅरबूमध्ये ‘सर्कस वर्ल्ड म्यूझियम’ असून तीत १८८४ पासून विविध सर्कशींमधून वापरलेल्या अनेक जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये रिंगलिंग बंधू वापरीत असलेल्या काही नमुनेदार वस्तू आहेत. डोअर कांउटी हे लोकप्रिय पर्यटन स्थळ डोअर द्विपकल्पावर असून तेथे पुळण, फळबाग आणि कलावस्तूंची दुकाने आहेत. डॉजव्हिलच्या उत्तरेस सु. १८ किमी. वर एका खडकावर (उंची १३७ मी.) मध्यभागी बांधलेले बावीस खोल्यांचे प्रशस्त घर आहे. त्याला ‘हाउस ऑन द रॉक’ म्हणतात. तिथे पाण्याचे सात तलाव, सहा भितींत बसविलेल्या शेकोट्या, अनेक प्राचीन वस्तू आणि संगीत पेट्या आहेत. राज्यात दोन राष्ट्रीय जंगले असून त्यांतून शिकार, मासे पकडणे आणि स्कीइंग हे खेळ चालतात. याशिवाय राज्यात एकूण ५१ उद्याने असून त्यांची देखभाल पर्यटन खाते पाहते. पयर्टन व्यवसायास उत्तेजन देण्यासाठी शासनाने १९९६-९७ च्या अर्थसंकल्पात १,१०,८३,८०० डॉलरची तरतूद केली होती.

देशपांडे, सु. र.