विश्वातील जीवसृष्टि : पृथ्वीवर विविध प्रकारचे जीव म्हणजे प्राणी व वनस्पती आहेत. पृथ्वी व तिचे वातावरण यांच्याशिवाय इतरत्र असे जीव असल्यास त्यांच्यासाठी पृथ्वीबाह्य जीवसृष्टी ही संज्ञा वापरतात. त्यांचा शोध घेण्याला व अभ्यास करण्याला पृथ्वीबाह्य जीवविज्ञान किंवा जीवखगोलशास्त्र म्हणतात.

पृथ्वीबाह्य जीवसृष्टीची शक्यता पडताळून पाहण्यासाठी ज्योतिषशास्त्र, जीवविज्ञान, भौतिकी, रसायनशास्त्र, भूविज्ञान व अभियांत्रिकी या विज्ञानांची मदत होते. जीवाची रासायनिक उत्क्रांती, जैव भूरसायनशास्त्र, जीवांचे अनुयोजन (परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्रिया), जीव-अभिज्ञान (ओळख पटविणे) इत्यादींमधील संशोधन पृथ्वीबाह्य जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी उपयुक्त असते. पृथ्वीवरील जीवसृष्टीचे एकमेवाद्वितीयत्व, विश्वातील जीवनिर्मितीची संभाव्य प्रक्रिया आणि एकूण विश्वरचनेत असलेले जीवांचे स्थान यांच्याशी निगडित असलेल्या अवकाश मोहिमा, ज्योतिषशास्त्रीय वेध आणि जमिनीवर होणारे संशोधन यांच्यावर या विज्ञानशाखेत भर देण्यात येतो. उलट अवकाश मोहिमा आणि निरीक्षणे (वेध) यांतून जीवनिर्मितीची प्रक्रिया समजून घेण्याचे प्रयत्‍न केले जातात.

भारत (उदा., गंधर्व, किन्नर), चीन, ईजिप्त, ग्रीस इ. देशांतील पुराणकथांत पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे उल्लेख आढळतात. विश्वाच्या इतर भागांत जीवसृष्टी, विशेषकरून बुद्धीमान जीवसृष्टी, असू शकेल, ही कल्पनाही जुनीच आहे. उदा., किऑसचा मेट्रोडोरस ( इ .स. पू. पाचवे शतक) व टायटस ल्युक्रेशियस कारस (इ.स. पू. पहिले शतक) या ग्रीक तत्त्वज्ञांच्या लेखनात ही कल्पना आढळते. झ्यूल व्हेर्न, एच्. जी. वेल्स इत्यादींच्या साहित्यकृतींमध्ये, तसेच ‘स्टार वॉर्स’ सारख्या चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत पृथ्वीबाह्य जीवसृष्टीच्या कल्पना रंगविल्या आहेत. सूर्य, पृथ्वी व मानववंश यांचे खास असे काही आगळेवेगळेपण नाही, तर या गोष्टी विश्वात सर्वसाधारणपणे आढळतात (हा सर्वसाधारण पक्ष), असे सध्या मानले जाते.

वैज्ञानिक आधार : या संदर्भात विज्ञानाचा दृष्टीकोन असा आहे : पृथ्वीबाह्य जीवसृष्टीचा ‘प्रत्यक्ष पुरावा’ उपलब्ध झालेला नाही, तसेच जीवोत्पत्तीचे कोडे सुटलेले नाही. पृथ्वीबाहेर जीवसृष्टीच्या संदर्भात मिळालेली माहिती अगदी प्राथमिक स्वरूपाची आहे. या परिस्थितीजन्य पुराव्यांवरून केवळ तर्क करण्यात आले आहेत. या तर्काच्या आधारे वैज्ञानिक भाकिते करता येतात. या भाकितांची निरीक्षणाला मदत होते आणि निरीक्षणांवरून भाकिते खरी ठरतात अथवा खरी ठरत नाहीत. म्हणजे आपल्यासमोरील प्रश्नाचे उत्तर मिळते अथवा मिळत नाही.

विश्वात सर्वत्र तीच मूलद्रव्ये आढळतात आणि भौतिकी व रसायनशास्त्र यांतील नियमही विश्वात सर्वत्र तेच आहेत. शिवाय विश्वात गुरूत्व, विद्युत् चुंबकीय आणि दुर्बल व प्रबल अणुकेंद्रीय प्रेरणा याच प्रेरणा सर्वत्र आढळतात. विश्वरचनाशास्त्र, भूविज्ञान, शिळाभूत जीवावशेषांचा (म्हणजे जीवाश्मांचा) अभ्यास यांवरून विश्वात इतरत्र जीवसृष्टी असेल असा तर्क करता येतो. मोठ्या ⇨ रेडिओ दूरदर्शकांमुळे प्रचंड अवकाशाचे व्यापक प्रमाणात निरीक्षण करणे शक्य झाल्याने या तर्काची खातरजमा करून घेण्याची काही प्रमाणात सोय झाली आहे.

⇨ आकाशगंगा ही एक दीर्घिका [प्रचंड मोठा तारकासमूह ⟶ दीर्घिका] असून तिच्यात २ X १०११ (१०११ म्हणजे एकावर ११ शून्ये) तारे आहेत. निरीक्षण करता येऊ शकणाऱ्या विश्वात १०११ दीर्घिका आहेत. सूर्य हा आकाशगंगेतील तेजस्विता, द्रव्यमान व रासायनिक संघटन यांच्या दृष्टीने प्रातिनिधिक स्वरूपाचा एक सर्वसाधारण तारा आहे. तो मध्यम वयाचा म्हणजे सु. ४.६५ अब्ज वर्षे वयाचा तारा आहे. महोत्स्फोटाने (बिग बँगने) सु २० अब्ज वर्षांपूर्वी विश्वाची सुरुवात झाली असून त्यातील ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन व लोखंड यांसारख्या जड मूलद्रव्यांचे प्रमाण सावकाशपणे वाढत आहे, असे मानतात.

ज्या जटिल (गुंतागुंतीच्या) संयुगांपासून पृथ्वीवर जीवनिर्मिती झाली, त्या संयुगांच्या नैसर्गिक रीतीने होणाऱ्या निर्मितीला जीवाची रासायनिक उत्क्रांती म्हणतात आणि रासायनिक उत्क्रांती ही विश्वातील सामान्य घटना आहे. जीवसृष्टीच्या निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक असलेली अशी संयुगे ठराविक लघुग्रह [गुरू व मंडळ यांच्या दरम्यानच्या पट्‌ट्यात आढळणारे लहान खस्थ पदार्थ ⟶ लघुग्रह], धूमकेतू, उपग्रह (उदा., शनीचा सर्वात मोठा टायटन हा उपग्रह), आंतरतारकीय मेघ, कार्बनयुक्त विशिष्ट अशनी [बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येऊन पडलेले लघुग्रहांचे तुकडे वा अन्य खडक ⟶ उल्का व अशनि] यांच्यावर आढळली आहेत. त्यांमध्ये अनेक ⇨ ॲमिनो अम्‍ले, तसेच डीएनए (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्‍ल) व आरएनए (रिबोन्यूक्लिइक अम्‍ल) यांचे महत्त्वपूर्ण घटक असलेले पाच क्षारक आहेत. सॅजिटॅरियस बी-२ या मेघात बृहद्‌रेणूंच्या आणि ग्‍लायसीन या ॲमिनो अम्‍लाच्या वैशिष्ट्यदर्शक वर्णपटरेषा १९९४ सालच्या जून महिन्यात आढळल्या होत्या. पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळातील ऑक्सिजनविरहित वातावरणात व महासागरात असलेली रसायने प्रयोगशाळेत तयार करता येतात, असे आढळले आहे. जीवसृष्टीच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली अशी विपुल ॲमिनो अम्‍ले व इतर कार्बनी संयुगे पृथ्वीवरील प्रयोगशाळेत निर्माण करता येतात. पृथ्वीवरील जीवनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये तिचे मोठे क्षेत्र व्यापणारा महासागर हा महत्त्वाचा घटक ठरला असल्याचे मानतात. कारण महासागरामुळे आदिम जीवांचे सूर्यापासून येणाऱ्या जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) प्रारणापासून (तरंगरूपी उर्जेपासून) रक्षण झाले असावे.

रासायनिक उत्क्रांतीमधून स्वतःसारखा जीव निर्माण करण्याची क्षमता असलेल्या पहिल्या जीवाची निर्मिती कशी झाली हे समजलेले नाही. मात्र जीवांचा नंतर झालेला ⇨ क्रमविकास म्हणजे उत्क्रांतीची प्रक्रिया बरीच चांगली माहीत झाली आहे. पृथ्वीवर महासागराच्या निर्मितीनंतर थोड्याच कालावधीत म्हणजे सु. ३.५ अब्ज वर्षांपूर्वी जीव अवतरला आणि ही सरळ सरळ नैसर्गिक प्रक्रिया आहे, असे दिसते. उत्परिवर्तन (आनुवंशिक वैशिष्ट्यांत होणारे बदल) आणि डार्विन यांचे क्रमविकासातील ‘नैसर्गिक निवडीचे तत्त्व’ यांच्याद्वारे एककोशिकीय (एकपेशीय) सूक्ष्मजीवांपासून ते मानव प्राण्यापर्यंतचे गुंतागुंतीची रचना असलेले बुद्धीमान प्राणी उत्क्रांत होत आले आहेत. यामुळे वातावरणात मुक्त ऑक्सिजन आला व त्याचे प्रमाण वाढत गेले. बुद्धीमता ही चांगली टिकून राहणारी गोष्ट असल्याने क्रमविकासात तिला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. यातून तंत्रविद्येची जाण असलेला समाज उत्क्रांत झाला. या समाजाचे ऊर्जेवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण असून तंत्रविद्येच्या साहाय्याने या समाजाला अवकाशात प्रवास करणे शक्य झाले. तथापि हा समाज स्वत:चा विनाश ओढवून घेऊ शकेल असा असल्याचेही मत आहे.

पृथ्वीवर ३.२ अब्ज वर्षापूर्वाचे जीवाश्म आढळले आहेत. याचा अर्थ पृथ्वीवर सु. ३.५ ते ४ अब्ज वर्षांपूर्वी जीवनिर्मिती झाली असावी. पृथ्वीवरील ⇨ जीवोत्पती ही ⇨ सूर्यकुलाच्या उत्पत्तीशी निगडित आहे, असे मानतात. पृथ्वीवर जवळजवळ सर्व ठिकाणी जीव आढळतात. याचा अर्थ टोकाच्या परिस्थितींशी जुळवून घेण्याच्या आणि अशा परिस्थितींत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणा पृथ्वीवरील जीवांत उत्क्रांत झाल्या आहेत. या यंत्रणांचे संशोधन करण्यात येत आहे. इतर ग्रहांवरील अशाच टोकाच्या पर्यावरणांतील संभाव्य जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी या संशोधकांची मदत होऊ शकेल. तसेच पृथ्वीवरील जीवांमध्ये परस्परक्रिया कशा होतात व हे जीव आपले पर्यावरण कसे बदलत असतात, हे समजून घेण्यासाठीही हे संशोधन उपयुक्त ठरेल.


जीवाच्या रासायनिक उत्क्रांतीच्या उपपत्तीनुसार पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी व सुरूवातीच्या काळात असलेल्या विशिष्ट रासायनिक व भौतिकीय परिस्थितीत नैसर्गिक रीत्याच जीवनिर्मितीची प्रक्रिया सुरु झाली, असे मानतात. अशा तऱ्हेची परिस्थिती विश्वात इतरत्र पुष्कळ ठिकाणी असण्याची शक्यता आहे, असा विश्वास ज्योतिर्विदांना वाटतो. अशा प्रकारे इतर अनेक ग्रहांवर जीवनिर्मिती झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या विषयाच्या अभ्यासकांच्या मते पृथ्वीवरील व पृथ्वीबाह्य जीवांमध्ये रासायनिक दृष्ट्या साम्य असेल. तथापि इतरत्र जीवांचा विकास तेथील विशिष्ट पर्यावरणीय परिस्थितीला अनुरूप ठरेल अशा रीतीने झाला असणार. यामुळे तेथील जीवांची रचना व बाह्यरूप ही पृथ्वीवरील जीवांपेक्षा मोठ्या प्रमाणात भिन्न असण्याची दाट शक्यता आहे.

पृथ्वीवर करण्यात आलेल्या प्रयोगांतून जीवनिर्मितीविषयीच्या पुढील गोष्टी सूचित झाल्या आहेत : जीवनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या रेणूंचा वातावरणात संयोग झाला आणि पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळातील महासागराच्या किनारी भागांत हे रेणू साचत गेले. यातूनच स्वतःसारख्या जीवाची निर्मिती करू शकणारा पहिला प्रजोत्पादनक्षम जीव निर्माण झाला. मात्र हे नेमके कसे घडले ते समजलेले नाही. नंतर क्रमविकासाने अधिकाधिक जटिल जीव निर्माण होत गेले. पृथ्वीवरील जीवनिर्मितीच्या या प्रक्रियेचा वापर पृथ्वीबाह्य जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी करून घेता येईल. अशी पृथ्वीबाह्य जीवसृष्टी कधी काळी आढळलीच, तर तिची पृथ्वीवरील जीवसृष्टीशी तुलना करून तिच्याबद्दल पुष्कळ माहिती करून घेता येईल.

जेथे जीवसृष्टी विकसित होऊन टिकून राहू शकेल, अशा ठिकाणांविषयी पुर्वानुमान करण्यात येत आहे. जीवपूर्व रासायनिक विक्रिया घडत असणाऱ्या पर्यावरणांचा अभ्यास करण्यात येत आहे. यामध्ये ज्योतिषशास्त्रीय वेध घेणे, अवकाशयाने वा एषणींद्वारे ग्रहांचे समन्वेषण करून माहिती मिळविणे आणि जीवसृष्टीच्या संदर्भात मूलभूत महत्वाच्या असलेल्या कार्बनी रसायनशास्त्रासारख्या विज्ञान शाखांचा उपयोग करणे, या गोष्टी येतात. याकरिता इतर ग्रहांवर भौतिकीय, रासायनिक व जैव प्रयोग करून त्यांचे निष्कर्ष पृथ्वीवर पाठविणारी उपकरणे बनविली आहेत.

पृथ्वीबाह्य जीवसृष्टी असावी या तर्कामागे असलेली काही कारणे या आधीही आली आहेत. ही कारणे पुढीलप्रमाणे आहेत : (१) सूर्याभोवती ग्रहमाला व तिच्यातील एका ग्रहावर म्हणजे पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. (२) सूर्य हा आकाशगंगेतील अब्जावधी ताऱ्यांपैकी एक सर्वसामान्य तारा आहे. (३) विश्वात अब्जावधी दीर्घिका आहेत. (४) तारा निर्माण होण्याविषयी जी माहिती आहे तिच्यावरून ताऱ्याभोवती ग्रहमाला निर्माण होणे ही अगदी सामान्य घटना आहे, असे दिसते. (५) सुमारे ६ प्रकाशवर्षे अंतरावरील ( १ प्रकाशवर्ष = ९.४६१ X १०१२ किमी.) बर्नार्ड ताऱ्याला किमान एक तरी ग्रह असल्याचा काहीसा निश्चित पुरावा उपलब्ध झाला आहे. (६) पृथ्वीवरील जीवाची उत्पत्ती व क्रमविकास यांमागील रसायनशास्त्रीय व भौतिकीय ज्ञात तत्त्वे इतरत्र लावता येतील, ती दूर सारण्याची गरज नाही. पृथ्वीवर जे काही घडले ती द्रव्याच्या गुणधर्माची अपरिहार्य परिणती ( वा निष्पत्ती) असली पाहिजे आणि विश्वातील पुष्कळ ग्रहांवर असे घडले असावे. (७) पृथ्वीवरील जीवसृष्टीची मूलभूत रासायनिक जडणघडण एकसारखी असून ती कार्बन हे मूलद्रव्य आणि पाणी हा विद्रावक (विरघळविणारा पदार्थ) यांच्यावर आधारलेली आहे. पृथ्वीबाह्य जीवसृष्टीही याच रासायनिक जडणघडणीची असावी, असे बहुतेक शास्त्रज्ञ गृहीत धरतात. तथापि काहींनी कार्बनांऐवजी सिलिकॉन (मूलद्रव्य) व पाण्याऐवजी द्रवरूप अमोनिया (विद्रावक) यांच्यावर आधारलेली जीवसृष्टी सुचविली आहे. मात्र अशा जीवसृष्टीचा मागोवा घेणे हे काम सोपे असणार नाही. कारण ती आपल्याला कशी ओळखता येईल, हा प्रश्नच आहे.

सूर्यकुलात जीवसृष्टीचा शोध : ‘स्फ्टुनिक I’ हा अवकाशात पाठविण्यात आलेला पहिला कृत्रिम उपग्रह असून रशियाने तो ४ ऑक्टोबर १९५७ रोजी सोडला होता. मग १९६०-६७ दरम्यान अवकाश प्रवास शक्य कोटीत आला व यामुळे पृथ्वीलगतच्या खस्थ पदार्थांवर जीवसृष्टीचा शोध घेण्यात सुरुवात झाली. १९६९ नंतर अपोलो अवकाश कार्यक्रमानुसार अमेरिकन अंतराळवीर चंद्रावर जाऊन परत आले. मात्र चंद्रावर जीव अथवा जीवाश्म आढळले नाहीत. वातावरण, मुक्त रूपातील पाणी, प्रारणापासून जीवाचे रक्षण करणारे पट्टे इ. गोष्टी चंद्रावर नसल्याने तेथील पर्यावरण जीवोत्पत्तीस अनुकूल नाही.

मंगळ व शुक्र या ग्रहांवर जीव असावेत असा समज पूर्वी होता. जोव्हान्नी स्क्यापारेल्ली यांनी मंगळावर कालवे असल्याचे १८७७ साली म्हटले होते आणि तेव्हापासून मंगळावर जीवसृष्टी असावी, अशी शक्यता व्यक्त होऊ लागली. मात्र नंतर तेथे कालवे नसल्याचे स्पष्ट झाले. मंगळाचे वातावरण व त्याच्या ध्रृवीय प्रदेशांवरील बर्फाचे पांढरे आच्छादन (टोप्या) यांमुळे तेथे जीवसृष्टी असण्याची शक्याता वाटत होती. १९७६ साली व्हायकिंग I व I I ही अवकाशयाने मंगळावर पाठविण्यात आली. त्यांच्याबरोबर पाठविलेल्या ⇨ रोबॉटांच्या मदतीने मंगळावरील तांबड्या मातीची व तिच्यावर इतस्ततः पडलेल्या खडकांची छायाचित्रे घेण्यात आली. रोबॉटाने त्याच्या कलथ्यासारख्या हाताने १० सेंमी. खोलीपर्यंतच्या धुळीचे नमुने खणून मिळविले व तेथेच त्यांचे विश्लेषणही केले. अतिशय संवेदनशील अभिज्ञातकाला (ओळख पटविणाऱ्या साधनाला) या मातीत लेशमात्र प्रमाणातही कार्बन आढळला नाही. याचा अर्थ तेथील कार्बनी संयुगांमधील कार्बन तीव्र जंबुपार प्रारणामुळे व उघडा पडल्याने नाहीसा झाला असावा. दुसऱ्या उपकरणाने तेथील मृदेतील जैव क्रिया ओळखण्याचा प्रयत्‍न केला. मात्र तेथे अशा क्रिया आढळल्या नाहीत. तथापि असाधारण म्हणता येतील अशा काही रासायनिक विक्रिया तेथे आढळल्या. या विक्रिया काही साध्या जैव क्रियांच्या (उदा., पोषक रसायनांचे विघटन व वायुरूप पदार्थांपासून कार्बनी द्रव्याचे संश्लेषण) नकला वाटल्या. १९९७ साली ‘पाथफाइंडर’ ही बग्गीसारखी छोटी गाडी मंगळाच्या पृष्ठभागावर उतरविण्यात आली. तिने तेथील जमिनीवर फेरफटका मारून तेथील खडकांचे व मातीचे विश्लेषण केले व ही माहिती पृथ्वीवर पाठविली. अशा मर्यादित परीक्षणांच्या आधारे जीवसृष्टीविषयी काही अंतिम ठाम निष्कर्ष काढता येणे शक्य नाही. यामुळे मंगळावरील जीवसृष्टीचा प्रश्न सुटलेला नाही आणि माणूस मंगळावर जाऊन तेथील मृदेचे प्रत्यक्ष विश्लेषण करीत नाही, तोपर्यंत तरी हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे. [⟶ मंगळ ग्रह].

दाट वातावरणामुळे शुक्राचा पृष्ठभाग दिसत नाही. अमेरिकेने पायोनियर व रशियाने व्हेनेरा ही अवकाशयाने शुक्रावर पाठविली होती. त्यांनी केलेल्या निरीक्षणांवरून शुक्राच्या पृष्ठभागाचे तापमान ४६०° ते ५४०° से.,वातावरणाचा दाब पृथ्वीच्या वातावरणाच्या दाबाच्या शंभरपट, ढगांचे तापमान १५°ते ३२° से., वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइड असून थोडी वाफ व अत्यल्प ऑक्सिजन आहे इ. माहिती उपलब्ध झाली होती. शुक्राच्या पृष्ठभागावर पृथ्वीवरील जीवसृष्टीसारखी जीवसृष्टी निर्माण होण्यासारखी परिस्थिती नाही हे या मोहिमांतून उघड झाले. मात्र शुक्राभोवतींच्या ढगांत व तेथील उंच पर्वतांवर जीव निर्माण होऊ शकेल, असा काहींचा तर्क आहे. [⟶ शुक्र].

बुध सूर्याच्या अतिशय जवळ असल्याने त्याच्या सूर्याकडील बाजूचे तापमान सु. ३१५° से. असते, उलट विरूद्ध बाजूचे तापमान – १७०° से. असते. बुधाला वातावरण नाही व तेथे ऑक्सिजनही नाही. अशा प्रतिकूल पर्यावरणात जीवसृष्टी निर्माण होण्याची शक्यता नाही. तथापि थोड्या शास्त्रज्ञांच्या तर्कानुसार प्रकाश व अंधार यांच्या सीमावर्ती भागांत पृष्ठभागाखाली जीव निर्माण होण्याची अत्यल्प शक्यता आहे. [⟶ बुध].

गुरू, शनी, प्रजापती (युरेनस), वरूण (नेपच्यून) आणि कुबेर (प्‍लुटो) हे ग्रह सूर्यापासून अतिशय दूर असल्याने ते अतिशय थंड आहेत. तेथे कार्बनी रेणू बऱ्याच प्रमाणात आढळतात. हे ग्रह व त्यांचे उपग्रह येथील वातावरण हे पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळातील वातावरणासारखे वाटते. यामुळे हे ग्रहोपग्रह रासायनिक उत्क्रांतीच्या प्रयोगशाळा असू शकतील असा कयास आहे. गुरूच्या वातावरणात हायड्रोजन, हीलियम, अमोनिया, मिथेन व थोडी वाफ असून त्याचा दाब जास्त आहे. यामुळे गुरूवर जीवसृष्टी असण्याची शक्यता वाटत नाही. त्याच्या वातावरणाच्या वरच्या भागात जीवनिर्मिती होऊ शकेल असा काहींचा तर्क आहे. कारण तेथील ढगांत विजा चमकत असल्याचे व्हॉयेजर अवकाशयानांमुळे लक्षात आले आहे. अशा विजा किंवा उल्कापात यांच्यामुळे तेथे जटिल रेणू निर्माण होण्याची शक्यता आहे. ही जीवपूर्व रासायनिक विक्रियेची अथवा पृथ्वीवरील ४ अब्ज वर्षांपूर्वीच्या विक्रियांची नक्कल असू शकेल. मात्र वातावरणातील अभिसरणाने असे रेणू खालच्या तप्त भागात जाऊन नष्ट होत असावेत व त्यामुळे त्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाही, असे काहींचे मत आहे [⟶ गुरू – १ ]. शनीच्या टायटन या मोठ्या उपग्रहावरील परिस्थिती कुतूहलजनक आहे. त्याच्या वातावरणाच्या वरच्या भागात कार्बनी रेणूंची निर्मिती होते व ते साचण्यासाठी त्याला पृष्ठभागही आहे. मात्र त्याच्या पृष्ठभागाचे तापमान द्रवरूप ऑक्सिजनाएवढे थंड (-१८३° से. किंवा ९० के. ) आहे.


यांशिवाय रासायनिक उत्क्रांतीचे पुरावे धूमकेतू, लघुग्रह व अशनी यांवर आढळू शकतील. कारण धूमकेतूंवर कमी रेणुभाराची कार्बनी संयुगे आढळली आहेत [⟶ धूमकेतु], तर अशनींवरही ॲमिनो अम्‍लांसारखी जीवाच्या दृष्टीने महत्त्वाची अशी कार्बनी संयुगे आढळली आहेत. मात्र अशनी अवकाशातून किंवा पृथ्वीच्या वातावरणातून जाताना अथवा पृथ्वीवरील जीवांच्या संदूषणामुळे (संपर्कात आल्याने) त्यांच्यात ही संयुगे अंतर्भूत झाली असण्याची शक्यता आहे. अशनींवर पृथ्वीबाहेरील जीवाचा निर्जीव पुरावाही मिळू शकेल. काँड्राइट अशनींत जीवाश्मरूप सूक्ष्मजीवांसारख्या रचना आढळल्या आहेत. यावरून इतरत्र जीवसृष्टी निर्माण झाल्याचा तर्क करता येतो. अशा प्रकारे आधी अवकाशात निर्माण झालेला जीव मग अशनींमार्फत वा धूमकेतूच्या धुळीबरोबर पृथ्वीवर आला असावा, ही कल्पना जुनीच आहे. मात्र १९८० साली नालान सी. विक्रमसिंघे आणि फ्रेड हॉईल यांनी यासंबंधात ‘पॅनस्पर्मिया’ ही उपपत्ती नव्याने सुचविली (सर्व प्रजोत्पादनक्षम जीव विश्वभर असून जेथे अनुकूल पर्यावरण असते तेथे ते विकसित होतात, असे या उपपत्तीत पूर्वी मानीत). अवकाशात सूक्ष्मजीव प्रचंड प्रमाणात असून फॉर्माल्डिहाइड (ग्‍लुकोज नव्हे) एककांचा (घटकांचा) बनलेला सेल्यूलोजासारखा कार्बनी बहुवारिक रेणू अवकाशात असला पाहिजे, असे या दोघांचे मत आहे. याद्वारे अवरक्त ज्योतिषशास्त्रीय निरीक्षणांतील काही खास बाबींचा खुलासा करता येतो. काहींच्या मते अशनी गुरू व मंगळ यांच्या दरम्यान असणाऱ्या लघुग्रहांच्या पट्‌ट्यांत निर्माण होत असावेत. यामुळे अशनी व लघुग्रह या दोन्हींवरील भूरासायनिक विक्रिया व त्यांचे स्वरूप एकसारखे असावे, असे अनुमान करण्यात येते. [⟶ लघुग्रह].

सूर्यकुलाबाहेर जीवसृष्टीची शक्यता : सूर्यकुलात जीवसृष्टी आढळली नसली, तरी यामुळे सूर्यकुलाबाहेर जीवसृष्टीचा शोध घेण्याचे प्रयत्‍न होत आहेत. ⇨ आंतरतारकीय द्रव्यात कार्बनी संयुगे आढळली आहेत. यावरून रासायनिक उत्क्रांती व पर्यायाने पृथ्वीवरील जीवनिर्मितीसारख्या प्रक्रिया सर्व विश्वभर आढळण्याची शक्यता सूचित होते.

आंतरतारकीय मेघांत (उदा., कृष्ण अभिक्रांत ) जीवनिर्मितीच्या दृष्टीने उपयुक्त असलेले चाळीसाहून जास्त कार्बनी व इतर रेणू आढळले आहेत. उदा., कार्बन मोनॉक्साइड (CO), ॲसिटाल्डिहाइड (C2H4O), सायनोजेन (CN), फॉर्माल्डिहाइड (HCHO), हायड्रोजन सायनाइड (HCN), पाणी (H2O), हायड्रॉक्सिल गट (OH) वगैरे. सायनोकॅटाटेट्राइन (HC2N) हा आतापर्यंत आढळलेला सर्वांत मोठा जटिल रेणू असून त्याचा रेणूभार १२३ आहे. यांवरून आंतरतारकीय अवकाशात धुळीच्या कणांवर जटिल रासायनिक विक्रिया घडत असाव्यात, असे सूचित होते. पर्यायाने तेथे जीवविकास सुरू झाल्याचे सूचित होते (सिद्ध होत नाही), असे काहींचे मत आहे. सर्वाधिक थंड ताऱ्यांच्या वातावरणातही कार्बनी रेणू आढळतात. तीव्र जंबुपार प्रारणापासून सुरक्षित असलेल्या ठिकाणी या रेणूंचे प्रमाण वाढत जाते. अशा वायूंच्या व धुळीच्या ढगांपासून तारे व ग्रहमाला निर्माण होतात. अशा ग्रहांच्या थंड झालेल्या वातावरणात अथवा पृष्ठभागात या रेणूंमुळे जीवविकास सुरू होण्याची शक्यता आहे.

अशा प्रकारे पुष्कळ ताऱ्यांभोवती जीवसृष्टी असणारे ग्रह असू शकतील, असे मानण्यात येते. मात्र ताऱ्यांमधील प्रचंड अंतरांमुळे सध्याच्या तंत्रविद्येच्या मदतीने खुद्द असे ग्रह ओळखणेही अवघड काम आहे. त्यामुळे त्यांच्यावरच्या जीवसृष्टीचा शोध घेणे हे विसाव्या शतकात तरी अशक्यप्राय वाटते आहे. अशा जीवसृष्टीशी संपर्क साधण्याआधी पुढील प्रश्न विचारात घ्यावे लागतील. पृथ्वीबाह्य प्रगत जीवसृष्टी विकसित होण्यासाठी पृथ्वीप्रमाणेच ३.५ अब्ज वर्षे लागली असतील का? या जीवसृष्टीचे सरासरी आयुर्मान किती असेल? तिला इतरांशी संपर्क साधण्याची इच्छा असेल का? वगैरे. अर्थात या प्रश्नांच्या बाबतीत मतभेद आहेत हेही लक्षात घ्यावे लागेल.

रेडिओ संदेशवहनाद्वारे जीवसृष्टीचा शोध : विश्वात इतरत्र बुद्धिमान व तंत्रविद्येत प्रगत अशी संस्कृती खरोखर असलीच,  तर तिच्याशी संपर्क साधणे ही माणसाची महत्त्वाकांक्षा आहे. अशा संदेशवहनाला CETI (कम्युनिकेशन वुइथ एक्स्ट्राटेरिस्ट्रियल इंटेलिजन्स) हे संक्षिप्त नाव आहे. १८२०-३० दरम्यान कार्ल फ्रीड्रिख गौस यांनी भल्यामोठ्या काटकोन त्रिकोणी क्षेत्रावर जंगल लावण्याची कल्पना सुचविली होती. हे क्षेत्र पाहून पृथ्वीबाहेरच्या बुद्धिमान प्राण्यांना येथे पायथॅगोरस प्रमेय जाणणारे बुद्धिमान जीव राहतात हे कळावे, हा त्यांचा यामागील उद्देश होता.

पृथ्वीबाह्य जीवांनी अथवा त्यांनी पाठविलेल्या साधनांनी म्हणजे उडत्या तबकड्यांनी (UFO अन्आयडेंटीफाइड फ्लाईंग ऑब्जेक्ट्स) पृथ्वीला भेट दिल्याचे अनेक दावे करण्यात आले आहेत. मात्र अशा दाव्यांविषयी रास्त शंका आहेत. नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आविष्कारांचे चुकीचे अर्थ लावल्यामुळे असे दावे केले जातात अथवा निराधार भ्रम, फसवणूक इ. प्रकारचे हे दावे असतात. कार्ल युंग या मानसशास्त्रज्ञांच्या मते अशा दाव्यांमागे माणसाच्या मानसिक गरजा हे कारण असते. [⟶ उडत्या तबकड्या].

पृथ्वीबाह्य जीवसृष्टीशी संपर्क साधण्यासाठी अवकाशयानाचा उपयोग होऊ शकणार नाही. कारण ताऱ्यांमध्ये प्रचंड अंतरे असून अवकाशयानाचा वेग त्यामानाने क्षुल्लक आहे. पृथ्वीला सर्वांत जवळचा प्रॉक्झिमा सेंटॉरी हा तारा ४.२५ प्रकाशवर्षे (चंद्राच्या दहा कोटीपट) अंतरावर आहे. सध्याचे अवकाशयान तेथे पोहोचायला दीर्घ कालावधी लागेल व जास्त वेगाची अवकाशयाने बनविण्याला सापेक्षता सिद्धांतामुळे मर्यादा पडतात. तसेच अवकाशयानाने समन्वेषण करूनही ठाम निष्कर्ष काढणे अवघड असल्याचे मंगळाच्या अनुभवांवरून लक्षात आले आहे. शिवाय अवकाशयान हे फारच खर्चिक साधन आहे.

अशा रीतीने दोन ताऱ्यांमधील प्रचंड अंतराचा विचार करता असा संपर्क साधण्याचे रेडिओ तरंग हे सर्वांत कार्यक्षम व सोयीस्कर साधन आहे. कारण या तरंगांची गती सेकंदाला सु. ३ लाख किमी. असून आकाशगंगेतून जाताना या तरंगांचे (व सूक्ष्मतरंगांचे) फारसे शोषण होत नाही. वैश्विक रेडिओ तरंग १९३८ साली आढळले असले, तरी बुद्धिमान जीवसृष्टीच्या शोधासाठी रेडिओ तरंग ⇨ रेडिओ ज्योतिषशास्त्राच्या उदयानंतर आणि ⇨ रेडिओ दूरदर्शकाच्या शोधानंतरच वापरण्यात येऊ लागले.

रेडिओ तरंगांच्या बाबतीत असंख्य पर्यायांमधून योग्य कंप्रता ( दर सेकंदास होणाऱ्या कंपनांच्या संख्येला कंप्रता म्हणतात व ती हर्ट्‌झ या एककात मोजतात) निवडणे, हा या रेडिओ शोधमोहिमेतील सर्वांत मूलभूत प्रश्न आहे. १९५९ साली जी. कोकोनी व पी. मॉरिसन यांनी वर्णपटातील हायड्रोजन अणूची २१ सेंमी. रेडिओ रेषा ही वैश्विक कंप्रता म्हणून वापरण्याची सूचना केली. पृथ्वीबाह्य संस्कृती पृथ्वीशी रेडिओ संपर्क साधू इच्छित असतील, तर रेडिओ ज्योतिषशास्त्र वापरणाऱ्या सर्व प्रगत संस्कृतींना माहीत असलेली वैश्विक कंप्रता निवडल्यास असा संपर्क जास्तीत जास्त सुकर होईल, असा त्यांचा ही कंप्रता निवडण्यामागील युक्तिवाद होता. यामुळे या व या मूल्याच्या जवळच्या तरंगलांबीवर लक्ष सीमित करण्यात आले.

अशा प्रकारे पृथ्वीबाह्य जीवसृष्टीचे अस्तित्व ओळखण्यासाठी आणि आपले अस्तित्व त्यांना जाणवून देण्यासाठी रेडिओ तरंगांचा वापर होऊ लागला. अवकाशाच्या प्रचंड पसाऱ्यातून आपल्याशी संपर्क साधू शकणारे प्रगत तंत्रविद्या जाणणारे जीव विश्वात इतरत्र असले आणि त्यांनी आपल्याशी रेडिओ संदेशवहन करण्याचा प्रयत्‍न केलाच, तर त्यांचे अस्तित्व आपल्याला कळू शकेल म्हणून त्यांच्याकडून येणारे संभाव्य रेडिओ संकेत किंवा संदेश ग्रहण करण्यासाठी (पकडण्यासाठी) रेडिओ दूरदर्शकांचा वापर करण्यात येत आहे.

पृथ्वीबाह्य बुद्धिमान जीवसृष्टीशी संपर्क साधण्याचे प्रयत्‍न आपल्या बाजूने होत आहेत. पायोनियर I व II या  अवकाशयानांतून आकृती, चित्रे, माहिती इ. असलेली कोरीव पट्टिका (१९७२-७३) आणि व्हॉयेजर I व II यांच्यामधून दृक्-श्राव्य (व्हिडिओ) तबकडी (१९७७) अवकाशात पाठविली आहे. पृथ्वीवासीयांचे अस्तित्व इतरांना जाणवून देण्याचे हे प्रयत्‍न आहेत. सूर्यकुलाबाहेर गेल्यावर ही याने आकाशगंगेत भटकतील व ती जेथे पोहोचतील तेथे बुद्धिमान जीवसृष्टी असल्यास तिला पृथ्वीविषयी आणि सूर्यकुलाची माहिती मिळेल. उदा., पृथ्वीचे सूर्यकुलातील स्थान व सूर्यापासूनचे अंतर, तिला स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्यास लागणारा काल, मानवजात, विविध भाषांतील शुभेच्छा, संगीताचे नमुने, माणसाचा आणि पशुपक्ष्यांचे आवाज वगैरे. सूर्यकुलापासून ४० प्रकाशवर्षे अंतरामधील प्रगत संस्कृतींना ही माहिती मिळू शकेल.

आपले अस्तित्व इतरांना समजावे म्हणून रेडिओ संकेताचे प्रेषणही करण्यात येत आहे. १९७४ साली आरेसीबो (प्वेर्त रीको) आकाशकामार्फत (अँटेनामार्फत) मेसियर-१३ या गोलाकार तारकागुच्छाकडे रेडिओ संदेश पाठविला असून त्यात माणसाची जीवरासायनिक माहिती, स्वभाव, लोकसंख्या, तंत्रविद्येत गाठलेली गुणवत्ता इ. माहिती पाठविण्यात आली आहे. उलट पृथ्वीबाह्य प्रगत जीवसृष्टी आपल्याशी अशाच तऱ्हेचा संपर्क साधेल, अशी अपेक्षा आहे. असे त्यांनी मुद्दाम पाठविलेले रेडिओ संदेश हे पृथ्वीबाह्य जीवसृष्टीचे निदर्शक ठरतील. यामुळे विविध ताऱ्यांकडून येणारे संभाव्य, अनैसर्गिक, अस्पष्ट रेडिओ संकेत रेडिओ दूरदर्शकांमार्फत ग्रहण करण्याचे प्रयत्‍न होत आहेत. याकरिता अतिशय प्रगत रेडिओ ग्राही वापरण्यात येत आहेत.

पृथ्वीबाह्य बुद्धिमान जीवसृष्टी रेडिओ संदेशवहनाद्वारे शोधण्याच्या ‘ओझ्मा’ प्रकल्पात अवकाशातील अपेक्षित अनैसर्गिक रेडिओ संकेत ग्रहण करण्यासाठी नॅशनल रेडिओ ॲस्ट्रॉनॉमिकल लॅबोरेटरीचा ग्रीन बँक (प. व्हर्जिनिया) रेडिओ दूरदर्शक वापरण्यात आला. यात सु. ११ प्रकाशवर्षे अंतरावरील एप्सायलॉन एरिडानी आणि टाऊ सेटी या ताऱ्यांचे हायड्रोजन अणूची २१ सेंमी. कंप्रता वापरून निरीक्षण करण्यात आले परंतु त्यांच्याकडून तसे काही संकेत आल्याचे आढळले नाही. मात्र या प्रकल्पामुळे अशा अनेक SETI (सर्च फॉर द एक्स्ट्राटेरिस्ट्रियल इंटेलिजन्स) प्रकल्पांना प्रेरणा मिळाली आणि संदेशाच्या संकेतनाला (संकेतबद्ध करण्याला) चालना मिळाली.


बर्नार्ड ऑलिव्हर व जॉन बिलिंगहॅम यांनी १९७१ साली ‘सायक्लॉप’हा असा प्रकल्प सुचविला होता. मात्र निधी अभावी तो प्रत्यक्षात सुरू झाला नाही. यात फिरविता येणारे १०० मी. व्यासांचे १,००० तबकडी आकाशक (डिश अँटेना) उभारण्याची योजना होती. यांद्वारे आकाशगंगेतील सर्व प्रगत संस्कृतींशी संपर्क साधणे शक्य झाले असते.

हे प्रयत्‍न पुढे चालू ठेवण्यासाठी वैज्ञानिकांनी एकत्र येऊन १९७६ साली एक SETI प्रकल्प हाती घेतला आणि यासंबंधीच्या महत्वाच्या वैज्ञानिक गरजा निश्चित करण्यासाठी SETI सायन्स वर्किंग ग्रुप तयार केला. सूर्यकुलाबाहेर बुद्धिमान जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी तेथून येणाऱ्या संभाव्य विद्युत् चुंबकीय तरंगांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच तिची ओळख पटविण्यासाठी व तिच्याशी संपर्क साधण्यासाठी सूक्ष्मतरंग (०.३ ते ३० सेंमी.) दरम्यानच्या तरंगलांबी असणारे तरंग) सोयीस्कर असल्याचे कळून आले. १९८१ साली तालीन (रशिया) येथे SETI परिषद झाल्याने या कार्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप आले. १९८२ साली इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने अशा सर्व प्रयत्‍नांमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘कमिशन ५२-SETI’ हा आयोग स्थापन केला. अशा प्रकारे ज्योतिषशास्त्र आणि खगोल भौतिकी या क्षेत्रांमध्ये १९८०-९० या दशकात SETI कार्यक्रमांना विशेष प्राधान्य देण्यात आले होते. यातूनच जीवखगोलशास्त्रज्ञ ही ज्योतिषशास्त्राची शाखा पुढे आली.

सुमारे दहा वर्षे पूर्वतयारी व परीक्षणे (चाचण्या) पूर्ण केल्यावर अमेरिकेच्या ‘नासा’ (नॅशनल एरॉनॉटिक्स अँड स्पेस ॲड्‌मिनिस्ट्रेशन NASA) या संघटनेने ११ ऑक्टोबर १९९२ रोजी अशा प्रकारचा आतापर्यंतचा सर्वांत व्यापक असा रेडिओ शोध कार्यक्रम सुरू केला होता. याचे अधिकृत संक्षिप्त नाव HRMS(हाय-रिझोल्यूशन मायक्रोवेव्ह सर्व्हे) असून याचे लक्ष्यवेधी शोध (टारगेटेड सर्च) आणि खगोल (आकाश) सर्वेक्षण (स्काय सर्व्हे) असे दोन भाग होते. हा कार्यक्रम बंद करण्यात आला आहे.

या कामाला पूरक असे काम करणाऱ्या काही SETI प्रणालीही आहेत. उदा., प्लॅनेटरी सोसायटीचा हाव्‍ईर्ड येथील META (मेगॅचॅनल एक्स्ट्राटेरिस्ट्रियल ॲसे) आणि बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचा आरेसीबो येथे चालणारा द अर्जेंटाइन इन्स्टिट्यूट ऑफ रेडिओॲस्ट्रॉनॉमी आणि SERENDIPITI ( द सर्च फॉर एक्स्ट्राटेरिस्ट्रियल रेडिओ एमिशन फ्रॉम निअरबाय डेव्हलप्ड इंटेलिजंट पॉप्युलेशन) हे प्रकल्प.

अशा रीतीने पृथ्वीबाह्य जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी १९६० नंतर अमेरिका, रशियासह अनेक देशांनी ६० हून जास्त प्रकल्प हाती घेतले. यात १९९३ पर्यंत १ लाख २० हजार तासांपेक्षा जास्त काळ वेध घेण्यात आले होते. तीन रेडिओ ज्योतिषशास्त्रीय वेधशाळा वैश्विक रडिओ संकेत शोधण्याचे काम अखंडपणे करीत आहेत. याकरिता मुख्यतः हायड्रोजनाची २१ सेंमी. रेषा वापरण्यात आली आणि काहींनी इतर वैशिष्ट्यपूर्ण कंप्रताही वापरल्या. अधिकाधिक सुविकसित पद्धती, तंत्रे, उपकरणे, प्रयुक्ती वापरण्याचे प्रयत्‍न होत असले, तरी या सर्व प्रयत्‍नांना अजून यश लाभलेले नाही. मात्र अधिक मोठे आकाशक उभारून यात यश मिळू शकेल, असा आशावाद काही ज्योतिर्विद व्यक्त करतात.

रेडिओ संदेशवहनात अनेक अडचणी आहेत. ताऱ्यांमधील प्रचंड अंतरांमुळे लागणारा दीर्घकालावधी ही एक अडचण आहे. उदा., पृथ्वीच्या सर्वांत जवळचा तारा ४.२५ प्रकाशवर्षे अंतरावर आहे म्हणजे याच्याबरोबर होणाऱ्या एका प्रश्नोत्तरासाठी किमान ८.५ वर्षे लागतील. तर अब्जावधी प्रकाशवर्षे अंतरावरील संस्कृती लुप्त झाल्या असण्याची शक्यता विचारात घ्यावी लागेल.

रेडिओ संदेशवहनात योग्य कंप्रता, पट्टविस्तार, लक्ष्य इत्यादींची निवड करणे हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे, कारण परिस्थितींनुसार बदलणाऱ्या या राशींचे पल्ले मोठे आहेत. शिवाय यांपैकी थोड्याच भागांत समन्वेषण झाले आहे. यामुळे गवताच्या गंजीतून सूई निवडण्याप्रमाणे असंख्य वैश्विक पर्यायांमधून इष्ट कंप्रता निवडावी लागते.

रेडिओ संदेशवहनातील नैसर्गिक व मानवनिर्मित व्यत्ययांचा (गोंगाटाचा किंवा अनिष्ट संकेतांचा) उपद्रव हीही मोठी अडचण आहे. विश्व हे रेडिओ व्यत्यय किंवा ⇨विद्युत्‌ गोंगाट असलेले ठिकाण आहे. म्हणजे अवकाशातून पृथ्वीवर येणारे भेदक ⇨ विश्वकिरण,क्वासार,पल्सार, वायुमेघ इत्यादींकडून रेडिओ तरंग उत्सर्जित होत असतात. रेडिओ ज्योतिषशास्त्रात यांचा अभ्यास केला जातो. पृथ्वीबाह्य बुद्धीमान जीवसृष्टी सर्वसाधारणपणे या नैसर्गिक संकेतांहून पुष्कळच अरूंद संकेत प्रेषित करतील, असे SETIप्रकल्पात गृहीत धरले आहे. यामुळे असे कृत्रिम संकेत स्पष्टपणे वेगळे ओळखता येतील. याकरिता या प्रकल्पांत गाळण्यांप्रमाणे कार्य करणारे छानक [⟶ छानक, विद्युत्‌], तसेच नियामक वापरण्यात येतात. नैसर्गिक गोगाट व वैश्विक कृत्रिम संकेत यांतील फरक जाणणे हे अवघड काम असले, तरी बहुपरिवाही विश्लेषक (मल्टिचॅनल ॲनालायझर) वापरून एकाच वेळी लाखो कंप्रतांवर संकेतांची दखल घेता येते. या नैसर्गिक गोंगाटाव्यतिरिक्त मानवनिर्मित विद्युत्‌ गोंगाटही असतो. उदा., सूक्ष्मतरंग भट्टी, कृत्रिम उपग्रह, विमान वा अवकाशयाने यांच्याकडून यांच्यावर येणारे रेडिओ संकेत, मोटारगाडीतील दूरध्वनी, सैनिकी संदेशवहने इत्यादींमुळे मानवनिर्मित विद्युत्‌ गोंगाट उत्पन्न होत असतो. जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीने (अमेरिका) नैसर्गिक व मानवनिर्मित या दोन्ही प्रकारच्या गोंगाटांचे विस्तृत अध्ययन केले आहे. त्यामुळे हे संकेत दूर सारणारे संगणकाचे कार्यक्रम तयार करता आले. या सर्व खबरदारीमुळे खराखुरा वैश्विक संकेत ओळखू येईल, अशी अपेक्षा आहे. अर्थात असा संकेत चकवणारा नाही, याची खात्री करून घेतानाच त्याची दुसऱ्या वेधशाळेमार्फतही खातरजमा करून घ्यावा लागेल.


ड्रेक समीकरण : एखाद्या ग्रहमालेतील एखाद्या ग्रहावर जीवोत्पत्ती होऊन जीवाचा क्रमविकास होण्यासाठी एका मध्यवर्ती ताऱ्याची गरज असते. हा तारा खूप लहान अथवा खूप मोठा असून चालत नाही. कारण लहान ताऱ्याचे तापमान फारच कमी असते आणि खूप मोठ्या ताऱ्याचे आयुर्मान फारच कमी असते. सूर्यासारख्या मध्यम आकारमानाच्या ताऱ्याच्या एका ग्रहावर असा जैव क्रमविकास होण्यासाठी तेथे विस्तृत वातावरण व मोठ्या व्यापाचे समुद्र असावे लागतील. असे वातावरण व समुद्र असणे याचा अर्थ तो ग्रह त्याच्या ताऱ्यापासून फार दूर अथवा फार जवळ नसून वाजवी अंतरावर आहे, असा होतो. अशा प्रकारे जैव क्रमविकासाला अनुकूल परिस्थिती असणाऱ्या ग्रहांची (व पर्यायाने ताऱ्यांची) संख्या मर्यादित असेल.

तंत्रविद्येत प्रगत असलेल्या व तिचा वापर करीत असलेल्या आकाशगंगेतील संस्कृतींची संख्या (N) काढण्यासाठी फ्रँक ड्रेक यांनी १९६०-६३ च्या सुमारास पुढील समीकरण सुचविले होते. N = R X P X L या समीकरणात R म्हणजे आकाशगंगेत दरवर्षी निर्माण होणाऱ्या नवीन ताऱ्यांची संख्या आहे P म्हणजे जीवाची उत्पत्ती व त्यांचा सावकाशपणे क्रमविकास होत जाऊन तंत्रविद्येत प्रगत असलेली संस्कृती निर्माण होण्यासाठी आवश्यक असलेली तेजस्विता, योग्य अंतरावरील ग्रह वगैरे परिस्थिती असणाऱ्या ताऱ्यांची संभाव्य संख्या आहे L म्हणजे अशा प्रगत संस्कृतीचे आयुर्मान होय. समीकरणातील सर्वगुणक पुरेशा अचूकतेने माहीत नसल्याने हे समीकरण सुटले आहे, असे म्हणता येत नाही. या समीकरणाच्या बाबतीत ज्योतिषशास्त्रज्ञ हे जीववैज्ञानिकांपेक्षा अधिक आशावादी आहेत. कार्बनी रेणूंपासून जीवनिर्मिती कशी झाली, हे नेमके समजलेले नाही. जीववैज्ञानिकांच्या मते पृथ्वीवरील जीवाची उत्पत्ती व क्रमविकास ही एक अद्‌भूत व अगदी कमी संभाव्य अशी घटना आहे. यामुळे या घटनेची इतरत्र पुनरावृत्ती झाली असण्याची शक्यता त्यांना वाटत नाही. असे असले, तरी या समीकरणाने पुढील प्रश्नांची संभाव्य उत्तरे समजण्यास मदत होईल. सूर्याप्रमाणे तेजस्विता, आकारमान व द्रव्यमान असणाऱ्या ताऱ्यांचे आकाशगंगेतील प्रमाण काय आहे? यांपैकी किती ताऱ्यांना ग्रहमाला आहेत? यापैंकी किती ग्रह आपल्या ताऱ्यापासून वाजवी अंतरावर आहेत? म्हणजे ताऱ्याची ऊर्जा योग्य प्रमाणात मिळून किती ग्रहांवर जैव विकास होऊ शकेल? पैकी किती ग्रहांवर जीवांना पोषक रसायने आहेत व किती ठिकाणी जीवनिर्मिती होऊ शकेल? त्यांचा विकास होण्याची शक्यता किती आहे? माहितीची देवाणघेवाण करण्याची क्षमता ते गाठू शकतील का? अशी प्रगत जीवसृष्टी किती काळ टिकू शकेल? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे ड्रेक समीकरणातून मिळू शकतील. मात्र त्यातील गुणकांच्या गृहीत धरलेल्या मूल्यांवर ती अवलंबून असतील.

ड्रेक समीकरणाच्या काही पुरस्कर्त्यांनी या गुणकांची मूल्ये पुढीलप्रमाणे सुचविली आहेत. R = २० म्हणजे वर्षभरात आकाशगंगेत नवीन २० तारे निर्माण होत असतात. P = सु. १ टक्का. याचा अर्थ एकूण ताऱ्यांपैकी १ टक्का ताऱ्यांवर जीवाची निर्मिती व क्रमविकास यांना अनुकूल परिस्थिती असू शकेल आणि L = सु. १०. ही मूल्ये घालून समीकरण सोडविल्यास आकाशगंगेतील प्रगत संस्कृतींची संख्या २ लाख येते. याचा अर्थ दर १० ताऱ्यांमागे एक प्रगत संस्कृती येते. सांख्यिकीय (संख्याशास्त्रीय) हिशोबानुसार अशी आपल्याला सर्वात जवळची संस्कृती ३०० प्रकाशवर्षे अंतरावर असेल. अशा रीतीने एका संस्कृतीचा मागोवा घेण्यासाठी १० ताऱ्यांचा शोध घेणे गरजेचे आहे आणि या समीकरणाच्या पुरस्कर्त्यांच्या मते या शोधात यश न मिळण्याचे हे एक कारण आहे. या मूल्यांच्या ड्रेक समीकरणाच्या आधारे करण्यात येणाऱ्या भाकितानुसार आकाशगंगेच्या १०१० वर्षे एवढ्या आयुष्यात १० प्रगत संस्कृती निर्माण होतील आणि या प्रत्येक संस्कृतीचे सरासरी आयुर्मान १० वर्षे असेल, असा तर्क आहे. अर्थात P आणि L याच्या मूल्यांत फार अनिश्चितता आहे. यामुळे N च्या मूल्यातही फार तफावत आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते N चे मूल्य एक आहे. याचा अर्थ आकाशगंगेत फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे. उलट कार्ल सेगन यांनी आकाशगंगेतील प्रगत जीवसृष्टींची संख्या सु. १० लाख असावी. असा अंदाज केला होता.

जीवसृष्टीला योग्य अशा ग्रहाची वैशिष्ट्ये स्टिफन जे. डोल यांनी पुढील प्रमाणे दिली आहेत. हा ग्रह खडकाळ, पृथ्वीच्या द्रव्यमानाच्या ०·४ ते २·४ पट द्रव्यमानाचा, पृथ्वीच्या त्रिज्येच्या ०·८ ते १·३ पट त्रिज्येचा असावा आणि त्याचा एकच व F2 ते K वर्णपटीय प्रकारचा [⟶ तारा] असावा. त्यांच्या मते आकाशगंगेत असे १० ते १० ग्रह असावेत आणि यांपैकी ५० ग्रह सूर्यापासून १०० प्रकाशवर्षे अंतराच्या आत असावेत. तसेच आकाशगंगेत सध्या ६०० हून जास्त बुद्धिमान जीवसृष्टी असाव्यात.

एका अंदाजानुसार आकाशगंगेत ४०० अब्ज तारे असावेत. यांपैकी दर दहा ताऱ्यांपैकी एकाला ग्रह असावेत असा माफक अंदाज केल्यास ग्रह असणारे ४० अब्ज तारे येतात. दर ताऱ्याला दहा ग्रह असल्यास ग्रहांची एकूण संख्या ४०० अब्ज येते. अशा एका ग्रहमालेत एका ग्रहावर जीवसृष्टीला अनुकूल परिस्थिती असेल असे गृहीत धरल्यास अशा ग्रहांची संख्या ४० अब्ज येईल. यांपैकी किती ठिकाणी प्रत्यक्ष जीव अवतरू शकेल? हा अंदाज करणे अवघड असले तरी दहांपैकी एका ग्रहावर जीव अवतरेल असे गृहीत धरल्यास ४ अब्ज ग्रहांवर जीवसृष्टी असेल. यांपैकी किती ठिकाणी बुद्धिमान जीवसृष्टी  विकसित होऊ शकेल? हा खरा महत्त्वाचा प्रश्न असून त्यासाठी कोणतीच वैज्ञानिक मोजपट्टी नाही. १०० पैकी एकावर असे घडू शकेल असे मानल्यास ४ कोटी संस्कृती येतील. यांपैकी किती ठिकाणी आपल्याशी रेडिओ संदेशवहन करू शकणाऱ्या प्रगत संस्कृती असू शकतील? दहांपैकी एका ठिकाणी असे घडेल असे गृहीत धरल्यास तंत्रविद्येत प्रगत संस्कृतींची संख्या ४० लाख येईल. अशा संस्कृती किती काळ टिकू शकतील? या संस्कृतींचे आयुर्मान १ कोटी वर्षे गृहीत धरले, तर सध्या ४,००० प्रगत संस्कृती आकाशगंगेत असू शकतील, अशा प्रकारे ड्रेक समीकरण सोडविणे हे फारच गुंतागुंतीचे काम आहे, हे लक्षात येईल.

आकाशगंगेतील वसाहतीकरणाचा प्रश्न : बुद्धिमान जीव आंतरतारकीय प्रवास करतात आणि इतरत्र जाऊन वसाहत करतात, ही शक्यता विचारात घेतल्यास, पृथ्वीबाह्य जीवसृष्टीचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा होतो. या नवीन गुंतागुंतीच्या घटकांमुळे ड्रेक समीकरण निरुपयोगी ठरते. कारण सर्व पृथ्वीबाह्य संस्कृती आहेत तेथेच म्हणजे स्थानिक क्रमविकासातून विकसित झाल्या आहेत आणि त्यांनी आंतरतारकीय स्थलांतर केलेले नाही, असे ड्रेक समीकरणात गृहीत धरलेले आहे. तथापि आकाशगंगेतील वसाहतीकरणाची शक्यता १९७५ च्या सुमारास खूपच गंभीरपणे विचारात घेण्यात येऊ लागली. शिवाय अशा आत्मनिर्भर वसाहतींचे दुसऱ्या ताऱ्यापर्यंत स्थलांतर होऊ शकेल, ही कल्पना मान्य होऊ लागली. अशा प्रवासाला शेकडो वर्षे लागतील आणि त्यात अनेक पिढ्या निर्माण होतील, हे येथे लक्षात घेतले आहे. अणुकेंद्रीय संघटन (संयोग) हे इंधन प्रचालनासाठी वापरून प्रकाशवेगाच्या काही टक्के एवढ्या गतीने असा आंतरतारकीय प्रवास करणे शक्य आहे. आधीच स्थिरस्थावर झालेल्या खगोलीय संस्कृतींनी आपल्या लगतच्या ताऱ्यांच्या ग्रहांवर वसाहती करीत पुढे जात रहायचे ठरविल्यास १० पेक्षा कमी वर्षात संपूर्ण आकाशगंगाभर वसाहतीकरणाचा फैलाव होऊ शकेल (आकाशगंगेचे वय १०१० वर्षे असून त्याच्या तुलनेत १० वर्षे हा कालावधी पुष्कळच छोटा आहे). यामुळे आकाशगंगेतील सुयोग्य गती व परिस्थिती असलेल्या प्रत्येक ताऱ्याभोवती (म्हणजे त्याच्या ग्रहावर) एक आवकाशगामी संस्कृती प्रस्थापित होऊ शकते. यात सूर्यकुलाचाही अंतर्भाव आहे. या घटनेमुळे वैश्विक कालाच्या संदर्भात (भाषेत) क्षणभरात ड्रेक समीकरणात अंदाजलेले N चे मूल्य (पृथ्वीबाह्य बुद्धिमान प्रगत संस्कृतींची संख्या) १० पटींनी वाढेल.

पुष्कळ शास्त्रज्ञांच्या मते आकाशगंगेतील वसाहतीकरण हे केवळ शक्य कोटीतीलच आहे, असे नव्हे, तर बुद्धिमान जीवसृष्टीचा क्रमविकास व तंत्रविद्येची उत्क्रांती यांचा हा बहुधा अपरिहार्य असा परिणामही आहे. तथापि या संकल्पनेमधून पुढील दोन टोकांचे पर्याय पुढे येतात : (१) आकाशगंगेत आधीच वसाहतीकरण झालेले असेल. या बाबतीत N चे मूल्य खूप जास्त असले पाहिजे. (२) आकाशगंगेत वसाहतीकरण झालेले नाही. कारण ते करणारेच कोणी अस्तित्वात नव्हते. या बाबतीत N चे मूल्य फारच अल्प असले पाहिजे. हे दोन्ही पर्याय ड्रेक समीकरणाच्या निष्कर्षाशी न जुळणारे आहेत. ड्रेक समीकरणात वसाहतीकरण गृहीत धरलेलेच नाही आणि त्याद्वारे येणारे N चे मूल्य वरील दोन मूल्यांदरम्यानचे येते.

तथापि या तिन्ही पर्यायांमध्ये गंभीर स्वरूपाच्या पुढील विसंगती असून त्यांचे निराकरण करणे हे सोपे काम नाही.

आकाशगंगेत आधीच वसाहतीकरण होऊन गेलेले असल्यास प्रगत संस्कृतींनी सूर्यकुलातही वसाहती केलेल्या असणार, परंतु मग त्या संस्कृती कोठे आहेत? त्यांच्या या प्रत्यक्ष अभावाला (नसण्याला) ‘फेर्मी विरोधाभास’ म्हणतात ( हा प्रश्न सर्वात प्रथम एन्‍रिको फेर्मी यांनी उपस्थित केला होता, असे मानतात आणि म्हणून त्यांच्या नावे ही संज्ञा आली आहे). यावरून आकाशगंगेत केवळ पृथ्वीवरच मानवी वस्ती (प्रगत संस्कृती) असली पाहिजे, असे ठामपणे सूचित होते, असा याचा अर्थ काही शास्त्रज्ञ लावतात.

सूर्यकुलात वसाहतीकरण झालेले नसल्यास संपूर्ण आकाशगंगेत ते झालेले नसणार. म्हणजे वसाहतीकरण सुरू करणाऱ्या प्रगत संस्कृती नव्हत्या, असा याचा अर्थ होतो. म्हणून मानववंश ही आकाशगंगेतील एकमात्र संस्कृती नसली, तरी ती अगदी थोड्याच संस्कृतींपैकी एक असली पाहिजे परंतु मग मानववंश व पृथ्वी यांचे अत्यंत आगळेवेगळे असे वैशिष्ट्य कोणते? (खास वेगळेपण कोणते?).

प्रगत संस्कृती आंतरतारकीय प्रवास व वसाहतीकरण करीत नसल्यास त्यामागे आर्थिक, सामाजिक, नैतिक इ. स्वरूपाचे कारण असले पाहिजे. तथापि आकाशगंगेच्या अब्जावधी वर्षाच्या इतिहासात लक्षावधी प्रगत संस्कृती यांपैकी एखाद्या कारणाने वसाहती करीत नाहीत, हे समजून घेणे अवघड आहे. या सर्वामध्ये वसाहतीकरणास प्रारंभ करणारा एखादा तरी अपवाद का असू नये, हे काही लक्षात येत नाही.


वरील विसंगतींची अनेक स्पष्टीकरणे सुचविण्यात आली असून त्यांपैकी काही पुढे दिली आहेत.

ड्रेक समीकरणाने अंदाजलेली आकाशगंगेतील प्रगत संस्कृतींची संख्या फारच जादा असू शकेल. उदा., आकाशगंगेत प्रगत संस्कृती वरचेवर अवतरत असण्याची शक्यता असली, तरी ह्या अगदी अल्पकाल टिकत असतील (याचा अर्थ ड्रेक समीकरणातील ‘L’ चे वरील मूल्य स्थूलपणे जादा घेतलेले दिसते). यामुळे आंतरतारकीय प्रवासाला प्रारंभ करण्याची संधी मिळण्याच्या आधीच तंत्रविद्येतील अनेक समस्यांमुळे हा प्रयत्‍न सोडून देणे भाग पडत असण्याची शक्यता आहे. म्हणजे एकतर जादा लोकसंख्या, प्रदूषण, साधनसंपत्ती संपुष्टात येणे यांसारख्या प्रश्नांवर तंत्रविद्येद्वारे मात करता येऊ शकेल हा विचार त्यांनी केला असावा अथवा या प्रयत्‍नातून आत्मनाश तर ओढवणार नाही ना अशी शंका त्यांना भेडसावत असावी.

पुष्कळ ग्रहांवर काहीशा सहजपणे जीवोत्पत्ती होत असण्याची शक्यता आहे. मात्र असे असले, तरी यांपैकी फारच थोड्या ग्रहांवर पाणी द्रवरूपात अब्जावधी वर्षे टिकून राहत असावे. साधा जीव ते प्रगत तंत्रविद्या जाणणारा जीव हा क्रमविकास अत्यंत सावकाश होतो व याकरिता अब्जावधी वर्षे लागतात. इतका काळ ग्रहावर पाणी द्रवरूपात टिकून राहिले नाही, तर असा क्रमविकास होणार नाही. याचा अर्थ ड्रेक समीकरणात अंदाजलेले P चे मूल्यही फारच जादा आहे.

कदाचित आंतरतारकीय प्रवासात एखादा ‘वैश्विक अडसर’ असू शकेल. मात्र तो अजून तरी आढळला नाही अथवा पृथ्वीवरच्या उगवत्या संस्कृतींसारख्या संस्कृतींशी संपर्क साधू नये असा निर्णय काही कारणांमुळे प्रगत संस्कृती घेत असण्याची शक्यता आहे.

पृथ्वीबाह्य जीवसृष्टीच्या शोधमोहिमेची पूर्वतयारी : पृथ्वीबाहेरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी व कोणती तंत्रे वापरावीत यांविषयी अतिशय तीव्र मतभेद आहेत. कारण ज्यांच्याबद्दल अगदीच थोडी माहिती आहे अशा पृथ्वीबाहेरील संस्कृतीचे वर्तन एका ठराविक प्रकारचे असेल, असे प्रत्येक योजनेत गृहीत धरलेले असते. म्हणून या शोधाच्या परंपरागत प्रयत्‍नांना प्राप्त झालेली गती टिकवून ठेवायचीच, शिवाय त्याचबरोबर भिन्न तरंगलांबी वापरून वेध घेणे सूर्कुलांतर्गत शोध घेणे यांसारख्या पर्यायी नवीन उपायांना प्रोत्साहन देणे हा सर्वात श्रेयस्कर मार्ग आहे.

इतर प्रगत खगोलीय संस्कृतींनी ऑक्सिजनयुक्त वातावरण असलेला सूर्यकुलातील ग्रह (म्हणजे पृथ्वी) ओळखला असण्याची शक्यता आहे, तसेच त्यांनी सूर्यकुलाच्या अध्ययनासाठी एक वा अनेक अवकाशयाने अथवा एवढ्या पाठविल्या असण्याचीही शक्यता आहे. या अवकाशयानांत अणुसंघटनावर चालणारी एंजिने असतील आणि त्या एंजिनांमधून ट्रिटियम (म्हणजे हायड्रोजनाचा जड प्रकार) बाहेर पडत असण्याची शक्यता आहे. यामुळे सूर्यकुलातील ट्रिटियमाच्या अशा स्त्रोताचा रेडिओ दूरदर्शकाने शोध घेणे हितकारक ठरू शकेल.

असे प्रयत्‍न मोठ्या प्रमाणावर करूनही माणसाला पृथ्वीबाह्य जीवसृष्टी शोधण्यात अपयश येण्याची शक्यता आहे. असे घडल्यास मानवी संस्कृती ही तंत्रविद्येत प्रगत असलेल्या अगदी थोड्याच संस्कृतींपैकी एक आहे आणि कदाचित आकाशगंगेतील ही अशी एकमेव संस्कृती आहे, असे निष्पन्न होईल. यालाही अपयश म्हणता येणार नाही. कारण विश्वातील आपले (एकमेवाद्वितीय) स्थान लक्षात येणे हीही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आपण असे एकटे असलो, तर जीवसृष्टी हा अशक्यप्राय स्वरूपाचा अपघात असू शकेल का? उलट पृथ्वीबाह्य प्रगत जीवसृष्टीचा शोध हाही मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वाची व खळबळजनक घटना ठरेल. तसे झाल्यास जीवाविषयीचा आपला दृष्टीकोन व्यापक होईल, व्यक्तिगत श्रद्धा, समजुती यांना धक्का बसून त्यातून मानसिक संघर्ष सुरू होईल. आपण स्वतः आपली संस्कृती व पृथ्वी यांवीषयीची आपली दृष्टी पूर्णपणे पालटू शकेल. म्हणजे कोपर्निकस यांच्या संशोधनामुळे जशी वैचारिक क्रांती घडून आली तिच्यापेक्षा ही क्रांती अधिक प्रभावी असेल. अशी पृथ्वीबाह्य संस्कृती आढळल्यास मानवी संस्कृती तिच्या तुलनेत ‘आदिम’ ठरू शकेल कारण विश्वाच्या आयुष्याशी तुलना करता प्रगत मानवी संस्कृतीचे सु. ३०० वर्षांचे अस्तित्व हे क्षणभराचेच आहे. थोडक्यात, आपल्या हाकेला तिच्या तऱ्हेने ‘ओ’ देईल अशी जीवसृष्टी विश्वात आहे का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

पहा : आकाशगंगा ग्रह जीव जीवविज्ञान जीवोत्पत्ती विश्वोत्पत्तिशास्त्र सूर्यकुल.

संदर्भ : 1. Baugher. J. F. On Civilized Stars, Englewood Cliff, N. J. 1985.

            2. Clarke, Aurther C. Voices from the Sky, New York, 1980.

            3. Drake, F. Sobel, D. Anyone out There?, New York, 1993.

            4. Hartman, H., Ed., Search for the Universal Ancestors, 1985.

          5. Heidmann, J. Klein, M. S., Eds., Bioastronomy: The Search for the Extraterrestrial Life, New York, 1990.

            6. McDonough, T. R. The Search for Extraterrestrial Intelligence, New York, 1987.

            7. Marx, G. Bioastronomy : The Next Steps, New York, 1988.

            8. Papagiannis, M. D., Ed., The Search for Extraterrestrial Life, IAV Symp. 112, 1985.

          9. Papagiannis, M. D., Ed., Strategies for the Search for Life in the Universe, 1980.

           10. Regis, E. Ed., Extraterrestrials, Cambridge, 1987.

ठाकूर, अ. ना.