विशाखापटनम् : आंध्र प्रदेश राज्यातील त्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय, एक औद्योगिक शहर आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील एकमेव भूवेष्टित नैसर्गिक बंदर. लोकसंख्या ७,५२,००० (१९९१). कोरोमंडल या बंगालच्या उपसागर किनाऱ्यावरील मेधाद्रिगेड्डा नदीच्या मुखावर हे बंदर आहे. त्याच्या उत्तरेस व दक्षिणेस टेकड्यांच्या रांगा असून त्या रांगांमध्ये सु. ६ किमी. चे अंतर असल्यामुळे या बंदराला नैसर्गिक संरक्षण मिळाले आहे. बंदराचे १.६२ किमी. लांब व ९५ मी. रुंद असे विस्तीर्ण प्रवेशद्वार असून येथे समुद्रातील पाण्याची खोली सु. १० ते १२ मी. आहे. बंदराची विभागणी पश्चिम, वायव्य व उत्तर अशा तीन दिशांना केली आहे. बंदरात बोटी दुरुस्त करण्याची निर्जल गोदी (ड्राय डॉक) आहे. बंदरात एकूण १३ धक्के असून मोठ्या बोटींसाठी हे बंदर बारमाही खुले असते. या बंदराच्या वापरास १९३३ पासून प्रारंभ झाला आणि त्यावेळेपासून पश्चजलाचा साठा हटवून डॉल्फिन्स नोज आणि किनारा यांमधील उपसागरात बोटींसाठी नांगर टाकण्याची प्रमुख जागा (खुटवा) निश्चित करण्यात आली. बंदरात लोहधातुक भरण्यासाठी यांत्रिक सुविधा आहेत, तसेच १५० टन क्षमतेची तरती यारीही आहे. अलीकडे या बंदरात सुधारणा घडवून आणली आहे. संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘जल उषा’ या पहिल्या आगबोटीचे जलावतरण याच बंदरातून झाले(१९४८). १९४९ पासून विशाखापट्टनम् हे जहाजबांधणी उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. बंदराच्या पश्चिम विभागात हिंदुस्थान शिपयार्ड लि. हा जहाजबांधणीचा प्रसिद्ध कारखाना आहे. या भागातच तेलशुद्धीकरण कारखाना आहे. या बंदरातून मँगनीज, लोह खनिज, कच्चे लोखंड, तेलबिया, चामड्याच्या वस्तू, नारळ यांची निर्यात तर खनिज तेल, धातू, यंत्रे, कापूस, रसायने, खते, औषधे व अन्नधान्याची आयात केली जाते. हे बंदर प्रामुख्याने आंध्र प्रदेश, ओरिसा व मध्य प्रदेश या राज्यांना सोयीचे आहे. आतील बंदर व बाह्य बंदर असे बंदराचे दोन भाग आहेत. शहरात एक नाविक तळही आहे. बंदराच्या जवळच उत्तरेकडील टेकडीवर ब्रिटिशांनी गोऱ्यांसाठी वसाहत केली. तिला ‘वॉल्टेअर’ म्हणतात. हे उपनगर आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असून ब्रिटिश अंमलात तेथे प्रामुख्याने अधिकाऱ्यांचे बंगले, काही शासकीय कार्यालये, क्रीडांगणे, टेनिस कोर्ट इ. सुविधा होत्या.
विशाखापटनम् चा प्राचीन इतिहास ज्ञात नाही, तथापि मध्ययुगात यावर काकतीय घराणे (११५०-१३२६) व त्यानंतर विजयानगरचे राजे यांचे वर्चस्व होते. तालिकोट येथील विजयानगरच्या पराभवानंतर (१५६५) हा प्रदेश गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीच्या अंमलाखाली गेला. औरंगजेबाने कुत्बशाही बरखास्त केल्यानंतर (१६८७) हा सर्व प्रदेश मोगलांच्या दक्षिणेकडील सुभ्यात अंतर्भूत झाला. तत्पूर्वीच १६८३ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने विशाखापटनम् येथे व्यापारानिमित्त वखार स्थापन केली होती. औरंगजेबाच्या सैन्याने ती १६८९ मध्ये घेतली, पम इंग्रजांना पुन्हा व्यापारास परवानगी दिली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा भाग हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत आला(१७०८). इंग्रज-फ्रेंच यांच्या आपसातील संघर्षात फ्रेंच सेनापती बुसी याने येथील वखारीवर हल्ला केला. तेव्हा इंग्रज फ्रेंचांना शरण आले (२५ जून १७५७), पण कर्नल फोर्ड याने फ्रेंचांना पुढील वर्षीच हाकलून लावले (१७५८). त्यानंतर निजामुल्मुल्क याने हैदर-टिपू विरुद्ध इंग्रजांनी केलेल्या मदतीबद्दल हे बंदर १७९५ मध्ये इंग्रजांना बक्षीस दिले. स्वातंत्र्यापर्यंत ते ब्रिटिशांच्या ताब्यात होते. ब्रिटिशांनी बंदराच्या सुविधांत सुधारणा करून वॉल्टेअर या उपनगराची वाढ केली. विशाखापटनम् हा भाग श्रीकाकुलम् या जिल्ह्यातून बाहेर काढून त्याचा स्वतंत्र जिल्हा केला. स्वातंत्र्योत्तर काळात राज्यपुनर्रचनेनंतर तो मद्रास राज्यातून आंध्र प्रदेश राज्यात समाविष्ट करण्यात आला (१९५६).
इ. स. १८६६ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. शहरात जिल्ह्याची सर्व शासकीय कार्यालये असून औद्योगिक वसाहत आहे. तेथील स्वतंत्र महामंडळे काही कारखाने चालवितात. वॉल्टेअर हे उपनगर अव्वल इंग्रजी अमदानीत ‘इंडियन ब्रिटन’ या नावाने पाश्चात्यांत प्रसिद्ध होते. या ठिकाणी दक्षिण, पूर्व व दक्षिण-मध्य रेल्वे यांचे फाटे एकत्र येत असल्यामुळे व्यापारी दृष्ट्या त्यास महत्व प्राप्त झाले आहे. वॉल्टेअर येथे आंध्र विद्यापीठ (स्थापना १९२६) हे जुने विद्यापीठ आहे. १९४२ मध्ये जपानने विशाखापटनम् वर बाँबहल्ला केला तेव्हा हे विद्यापीठ गुंतूरला हलविण्यात आले. १९४६ मध्ये ते पुन्हा वॉल्टेअरला आणण्यात आले. शहरात एक वैद्यक महाविद्यालय आणि वैद्यकविषयक वस्तूसंग्रहालय आहे. वॉल्टेअरच्या पूर्वेस सु. १६ किमी. वरील टेकडीवर सिंहाचलम् येथे गंग राजांनी बांधलेले बाराव्या शतकातील एक प्राचीन मंदिर आहे. त्यातील काही स्तंभांवर कोरीव लेख असून गंग शैलीतील मूर्तिकाम आढळते. विजयानगरचा राजा कृष्णदेवराय (कार. १५०९-२९) याने हा प्रदेश जिंकल्यानंतर तेथे एक विजयस्तंभ उभारला होता, पण त्याचे अवशेष मिळत नाहीत. वॉल्टेअर मध्ययुगापासून पंजाम कापड आणि हस्तिदंती कलासुसरयुक्त वस्तू व रुपेरी कलाबुतीचे काम यांसाठी प्रसिद्ध आहे. शहरात काथ्याकाम, दारू गाळणे हे उद्योगही चालतात. येथे लोह-पोलाद कारखाना असून त्याची पोलाद उत्पादनक्षमता ३० लक्ष टन इतकी आहे. येथील समुद्रात मासेमारी चालत असून तेथे शीतगृहाची सोयही आहे. शहरात विविध उंची हॉटेले, उद्याने, मनोरुग्णालय, आरोग्यधाम आणि क्षयरोग्यांसाठी एक भव्य रुग्णालय हे. विशाखापटनम् च्या वायव्येस आठ किमी. वरील सिंहाचलम् या धार्मिक स्थळी असलेल्या विष्णु-मंदिरावर बाराव्या शतकातील कोरीव लेख आढळतात.
देशपांडे, सु. र.
“