विवाहसंस्था : दोन भिन्नलिंगी व्यक्तींनी संततीची प्राप्ती आणि तिचे संगोपन करण्याच्या उद्देशाने, तसेच समाजाच्या मान्यतेने स्थिर आणि सातत्यापूर्ण लैंगिक जीवन जगण्यासाठी, कायदेशीर दृष्ट्या आवश्यक व समाजमान्य विधींचे पालन करून कौटुंबिक जीवनाची केलेली सुरुवात म्हणजे विवाह होय आणि या विविध विधींचा तसेच संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक प्रथांचा समुच्च्य म्हणजे विवाहसंस्था होय. विवाहसंस्थेचे उद्दिष्ट मानवी समाजातील प्रजनन-प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे हे आहे. जीवसृष्टीतील इतर प्राण्यांच्या तुलनेने मानवी मूल हे अतिशय परावलंबी असते. ते स्वतःचे पोषण व संरक्षण अनेक वर्षे करू शकत नाही. इतर प्राण्यांचे जीवन सहजप्रेरणेने घडत असते. स्वतःचे अन्न शोधणे, संरक्षण करणे या गोष्टी प्राण्याचे लहान पिलू थोड्या दिवसांतच स्वतः करू लागते. परंतु मानवाच्या बाबतीत तशी परिस्थिती नाही. मानवास फारच थोड्या सहजप्रेरणा प्राप्त झालेल्या आहेत व एकूण मानवी वर्तनात त्यांचे स्थान दुय्यम आहे. चालणे, बोलणे, जेवणे, शरीराची काळजी घेणे इ. सर्व बाबी मानवाच्या मुलास शिकवाव्या लागतात. त्याशिवाय त्याला या क्रिया करता येणार नाहीत. मानवी सहवासापासून वंचित झालेल्या व प्राण्यांच्या सहवासात वाढलेल्या मुलांची जी थोडीफार उदाहरणे उजेडात आली, त्यांवरून मानवासारखे वर्तन करणे हे मुलास मानवाच्या संपर्काशिवाय व सहवासाशिवाय शक्य होत नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे मूल जन्माला आल्यावर त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी प्रौढ व्यक्तीने स्वीकारल्याशिवाय ते जगू शकणार नाही अथवा त्याची नीट वाढ होऊ शकणार नाही. गर्भधारणेपासून मुलाच्या जन्मापर्यंत मूल व त्याला जन्म देणारी स्त्री ही एकमेकांस जैविक बंधामुळे बांधलेली असतात. जन्मानंतर मुलाला पहिले अन्न जन्मदात्या आईकडून मिळण्याची व्यवस्था निसर्गाने केलेली आहे. त्यामुळे मुलाच्या जन्मानंतर नाळ पडल्यानंतर मूल आणि माता यांच्यामधील शारीरिक बंध जरी संपत असले. तरी निसर्गाने मुलाच्या जन्माबरोबर त्याच्या जननीस उत्पन्न करू दिलेले दूध स्वतःच्या मुलास पाजण्याच्या प्रेरणेमुळे मूल आणि माता हे बंधन पुढे काही काळ तरी चालूच राहते व त्याबरोबरच इतर भावनिक बंधनांची त्यात भर पडत गेल्यामुळे ते पुढे दीर्घकाळ चालू राहते. अशा तऱ्हेने स्त्री ही स्वतःच्या मुलाशी त्याच्या जन्मानंतर जैविक आणि मानसिक बंधनांमुळे बांधली जाते.
जन्मदात्या पुरुषाची स्थिती याहून वेगळी असते. लैंगिक समागमानंतर पुरुष स्त्रीपासून अलग होतो. त्याने जन्मास घातलेल्या मुलाशी स्त्रीप्रमाणे त्याचे शीरीरिक संबंध राहत नाहीत. त्यामुळे पुरुष पितृत्वाची जबाबदारी सहज झटकू शकतो. परंतु असे झाल्यास स्त्रीला गर्भधारणेपासून मुलाच्या जन्मापर्यंत व त्यानंतरही पुरुषाच्या मदतीने व साहचर्याची जी गरज निर्माण होते, त्याची पूर्तता झाली नसती. ही पूर्तता निसर्गाने मानवाला जी लैंगिक प्रेरणा दिली आहे, तिच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामुळे घडून येते. यातील पहिले वैशिष्ट्य म्हणजे लैंगिक प्रेरणा ही युवावस्था प्राप्त झाल्यानंतर सतत चालू राहणारी गोष्ट आहे. प्राणी जगतात मादी ही एका विशिष्ट कालखंडातच मीलनोत्सुक होते व त्याच वेळी तिचा नराशी समागम झाल्यास तिला गर्भधारणा होण्याची शक्यता असते. परंतु मानवी स्त्रीच्या बाबतीत अशी परिस्थिती नसते. ती ऋतुस्नात झाल्यानंतर तिची मासिक पाळी चालू होते व प्रत्येक पाळीच्या ठराविक कालखंडात ती गर्भवती राहण्याची शक्यता असते. लैंगिक समागम ही पुरुषाची नित्याची गरज असते. त्यामुळे रोज नित्य नव्या स्त्रीचा शोध घेण्यापेक्षा एकाच स्त्रीशी स्थिर लैंगिक संबंध ठेवणे, हे बहुतांशी पुरुषांच्या दृष्टीने अधिक सुखकारक ठरते. स्त्री आणि पुरुष यांच्या या परस्परपूरक लैंगिक गरजांतून स्त्री, पुरुष आणि त्यांचे मूल असा जनन गट असतित्वात येतो. यालाच प्रारंभिक कुटुंब (केंद्र/केंद्रस्थ/बीज-कुटुंब) असे म्हटले जाते. असा गट अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुष यांना जी बंधने पाळावी लागतात आणि जे वर्तनसंकेत व मूल्ये आचारणात आणावी लागतात, त्यांच्या एकत्रित अनुबंधातून विवाहसंस्थेची निर्मिती झाली आहे. हॅरी जॉन्सन (१९२३७७) या अमेरिकन समाजशास्त्राने म्हटल्याप्रमाणे, विवाह म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचे असे स्थिर संबंध, की ज्यामध्ये त्यांना त्यांच्या सामाजिक स्थानास कोणतीही बाधा न येता मुलांना जन्म देण्याची अनुमती समाजाने दिलेली असते.
विवाहसंस्थेचा उगम : विवाहसंस्थेच्या शास्त्रीय अध्ययनाच्या इतिहासात स्वैराचारापासून एकपत्नीकत्वाकडे होत गेलेल्या विवाहसंस्थेच्या वाटचालीचा सिद्धांत एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्लंडमध्ये व अन्य यूरोपीय देशांत लोकप्रिय झाला होता. व्हिक्टोरिया राणीच्या कालखंडातील समाज हा समाजिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील अत्युच्च बिंदू असून, या समाजात अस्तित्वात असलेली ⇨एकविवाहाची (एकपतिपत्नीकत्वाची) प्रथा ही स्त्रीपुरुषांमधील लैंगिक संबंधाची नितिमत्तेवर आधारलेली आदर्श प्रणाली आहे, असा विचार त्या काळात मान्य झाला होता. मानवी समाजाच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या आदिम अवस्थेमध्ये स्त्री-पुरुषांमध्ये स्वैराचार अस्तित्वात होता. कालांतराने सामाजिक जीवनात वैवाहिक बंधने असतित्वात येऊ लागली आणि स्वैराचाराची जागा ⇨समूहविवाह, ⇨बहुपतिकत्व, ⇨बहुपत्निकत्व आणि एकपत्नीकत्व पद्धती या क्रमशः उत्क्रांत होत गेलेल्या पद्धतींनी घेतली, अशा स्वरूपाचा हा सिद्धांत होता. हा सिद्धांत मांडणाऱ्यांमध्ये ⇨लेविस हेन्री मॉर्गन (१८१८-८१), रॉबर्ट ब्रिफॉल्ट इ. मानवशास्त्रज्ञांचा अंतर्भाव होतो. हा विवाहसंस्थेच्या उत्क्रांतीचा सिद्धांत ज्या सामाजिक प्रथांच्या आधारावर मांडला होता, त्या प्रथांच्या आधारावर मांडला होता, त्या प्रथांचा विचार करणे अगत्याचे आहे. आदिवासी समाजामध्ये उत्सवाच्या प्रसंगी स्त्री-पुरुषांमधील लैंगिक बधने शिथिल होतात. त्याचप्रमाणे पत्नीची अदलाबदल करणे, खास पाहुण्यास स्वतःची पत्नी उपभोगासाठी देणे या आदिवासी समाजात अस्तित्वात असलेल्या प्रथांचा वरील सिद्धांताच्या उल्लेख केला जातो. तसेच जैविक पितृत्वाविषयीचे अज्ञान ऑस्ट्रेलिया आणि इतरत्र राहणाऱ्या काही आदिवासी जमातींमध्ये दिसून येते. आदिवासी समाजात स्वतःच्या वडिलांच्या, आईच्या, बहिणाच्या, मुलाच्या वयोगटांतील व्यक्तींना त्या त्या नात्याच्या परिभाषेने संबोधण्याची वर्गनिष्ठ नातेपद्धती प्रचलित आहे. या सर्व प्रथांचा चिकित्सक व पूर्वग्रहविरहित मूलभूत पद्धतीने विचार न करता त्यांचा उथळ दृष्टीने विचार करून ह्या शास्त्रज्ञांनी स्वैराचाराचा सिद्धांत मांडल्याचे आता लक्षात आले आहे. आदिवासी समाजामध्ये असलेली वर्गनिष्ठ नातेव्यवस्था, ज्या ज्या संदर्भात स्वतःच्या बायकोच्या वयोगटात मोडणाऱ्या जमातीतील स्त्रियांना बायको म्हणून संबोधिले जाते, ती काही समाजिक उद्दिष्टे साधण्याची एक व्यवस्था आहे. अशा जमातींमध्ये स्वतःच्या बायकोसाठी वेगळे नातेदर्शक नाव व बायकोच्या वयाच्या इतर स्त्रियांसाठी-ज्यांच्याशी अशा अन्य पुरुषाचा विवाह होऊ शकतोवेगळे नातेदर्शक नाव वापरण्यात येते. यामुळे दोहोंमधील सामाजिक भेद स्पष्ट केला जातो. त्याचप्रमाणे जननप्रक्रियेतील पुरुषाच्या कार्याचे अज्ञान काही आदिवासी जमातींमध्ये दिसत असले, तरी अशा जमातींत जैविक पितृत्वापेक्षा सामाजिक पितृत्व हे अधिक महत्त्वाचे मानले जाते. त्याचप्रमाणे आदिवासी समाजामध्ये विवाहाच्या आधी स्वैर लैंगिक संबंध वर्ज्य नसतात परंतु विवाहानंतर असे संबंध वर्ज्य मानले जातात. या सर्व विवेचनातून एकच निषकर्ष निघतो, तो म्हणजे स्वैराचारातून एकपत्नीकत्वाकडे उत्क्रांतीची वाटचाल दर्शिविणारा जो सिद्धांत एकेकाळी ग्राह्य मानला जात होता, तो आधुनिक काळात मानवशास्त्राने उजेडात आणलेल्या साधनसामग्रीच्या संदर्भात अग्राह्य ठरला आहे. ⇨एडवर्ड अलेक्झांडर वेस्टरमार्कची (१८६२१९३९) भूमिका या संदर्भात महत्त्वाची आहे. विविध विवाहप्रकारांकडे आणि लैंगिक जीवनासंबंधीच्या इतर चालीरीतींकडे सामाजिक उत्क्रांतीच्या अवस्था म्हणून पाहणे, हे शास्त्रीय दृष्ट्या ग्राह्य ठरण्यासारखे नाही.
विवाह आणि औरसता : विवाहाचा उद्देश जे स्त्री-पुरुष संततिनिर्मितीच्या उद्देशाने परस्परांशी स्थिर लैंगिक संबंध प्रस्थापित करू इच्छितात, अशा व्यक्तींच्या संबंधांना विविध नियमांच्या आणि सामाजिक संकेतांच्या बधनाने स्थैर्य प्राप्त करून देऊन संततिसंगोपनासाठी आवश्यक अशा पती, पत्नी आणि त्यांचा मुले हे सदस्य असलेल्या प्रारंभिक कुटुंबाची निर्मिती करणे हा आहे, हे वरील विवेचनावरून स्पष्ट होते. समाजाच्या दृष्टीने स्वतःच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्याची ज्यांची तयारी आहे, अशाच स्त्री-पुरुषांच्या संबंधांना विवाहाच्या संस्काराने मान्यता देणे व या बंधना बाहेर संततिनिर्मितीच्या शक्यतेवर नियंत्रण ठेवणे, हे जबाबदार सामाजिक घटक निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक आहे. असे जर झाले नाही, तर सामाजिक जीवन अनियंत्रित होऊन मानवी जीवनाच्या अस्तित्वासच धोका निर्माण होऊ शकतो. या दृष्टीने विवाहाशी औरसतेची संकल्पना जोडलेली आहे. विवाहबंधनातून निर्माण झालेल्या संततीस औरस संततीचा दर्जा दिला जातो. विवाहबंधनाबाहेर निर्माण होणाऱ्या संततीमुळे समाजस्वास्थावर विपरित परिणाम होत असल्यामुळे अशा संततीस अनौरस संतती म्हणून संबोधले जाते व तिला औरस संततीचा सामाजिक दर्जा व अधिकार प्राप्त होत नाही. अशा तऱ्हेने औरसतेच्या संकल्पनेद्वारा समाजमान्य संततीच्या निर्मितीस प्रोत्साहन दिले जाते आणि समाजस्वास्थावर ताण निर्माण करणाऱ्या विवाहबाह्य संततीच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवले जाते.
समाजाच्या स्थैर्यास धोका उत्पन्न करणारी अनौरस संतती समाजास अमान्य असणाऱ्या विविध प्रकारच्या स्त्री-पुरुषांमधील लैंगिक संबंधांतून निर्माण होण्याची शक्यता असते. या विविध प्रकारच्या अमान्य संबंधांच्या समाजाच्या स्थैर्यावर होणाऱ्या परिणामांचे गांभीर्य एकसारखे नसते. काही लैंगिक संबंध अत्यंत घृणास्पद मानले जातात, तर काही लैंगिक संबंध अत्यंद घृणास्पद मानले जातात, तर काही संबंध कमी घृणास्पद मानले जातात व त्यांना समाजाची मान्यता जरी नसली, तरी समाज अशा संबंधांकडे कानाडोळा करतो. या दृष्टीने अनौरसतेचे त्याच्या गांभीर्यावर आधारित विविध प्रकार केले जातात. जगातील सर्व समाज वडील व मुलगी, आई आणि मुलगा, तसेच बहीण आणि भाऊ यांच्यामधील लैंगिक संबंधम्हणजेच ⇨अगम्य आप्तसंभोग-सर्वांत निषिद्ध मानतात. सर्व धर्माचा अशा संबंधांना विरोध आहे. अशा संबंधांमुळे संततिसंगोपनास अत्यावश्यक असलेल्या प्रारंभिक कुटुंबाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असते. आदिवासी समाजामध्ये विवाहपूर्व लैंगिक संबंधांना मान्यता असते. परंतु अशा संबंधांची परिमती स्त्री गर्भवती राहण्यात होत असल्यास अशा जोडप्यांचे लग्न लावण्यात येते. परंपरागत कृषिप्रधान समाजात रखेली ठेवण्याची पद्धत अस्तित्वात होती व अजूनही ही प्रथा संपूर्णपणे नाहीशी झालेली नाही. अशा संबंधातून निर्माण होणाऱ्या संततीच्या पालनपोषणाची जबाबदारी संबंधित जोडपे उचलत असल्यामुळे अशा अस्तित्वाकडे समाज कानाडोळा करतो. अशा संबंधांना गौण दर्जाची मान्यता मिळते. विवाहित स्त्रीबरोबर विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणे, हे कुमारिकेशी अनैतिक संबंध ठेवण्यापेक्षा सामान्यतः अधिक गंभीर मानले जाते. अशा प्रकारे समाजामध्ये औनरसतेचे त्याच्या कमीअधिक गांभीर्यावर आधारलेले विविध प्रकार असल्यामुळे दिसून येते. या औनरसतेच्या विविध प्रकारांकडे बघण्याच्या निरनिराळ्या प्रकाराच्या समाजांचा दृष्टिकोन निरनिराळा असू शकतो. परंतु एका संबंधाबाबत सर्व समाजांचा समान दृष्टिकोन दिसतो, तो म्हणजे अगभ्य आप्तसंभोग. सर्व समाजांमध्ये अगभ्य आप्तसंभोग-निषेध अस्तित्वात आहे.
विवाह आणि गृहनिवासासंबंधीचे नियम : अगम्य आप्तसंभोग-निषेधाच्या नियमाच्या सार्वत्रिक अस्तित्वामुळे विवाहच्या वेळी प्रत्येक व्यक्तीस आपला जोडीदार हा स्वतःच्या प्रारंभिक कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तींमधून निवडावा लागतो. त्यामुळे विवाहबद्ध जोडप्यामधील किमान एका व्यक्तीला स्वतः जन्म घेतलेल्या कुटुंबाचा त्याग करून स्वतःच्या जोडीदाराच्या कुटुंबामध्ये राहावयास जाणे भाग पडते. प्रत्येक समाजास लाभलेल्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीच्या संदर्भात विवाहानंतर कोणी कोणाकडे राहावयास जावे, यासंबंधीचे नियम त्या त्या समाजात अस्तित्वात असल्याचे दिसते. या संदर्भात पाच प्रकारचे नियम निरनिराळ्या समादांत अस्तित्वात असल्याचे आपणास दिसते. हे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : (१) पितृस्थानीय, (२) मातृस्थानीय, (३) मातृ-पितृस्थानीय, (४) मातुलस्थानीय आणि (५) नूतन-स्थानीय. या पाच प्रकारांचे थोडक्यात विवेचन खाली केले आहे.
पितृस्थानीय व्यवस्थेमध्ये विवाहानंतर वधू ही वराच्या पित्यातच्या कुटुंबात राहवयास जाते. ⇨जॉर्ज पीटर मर्डॉक (१८९७-१९८५) या अमेरिकन मानवशास्त्र हा नियम सर्वाधिक समाजांत म्हणजे त्याने अध्ययन केलेल्या २५० समाजांच्या नमुन्यांमधून १४६ समाजामध्ये-अस्तित्वात असल्याचे आढळले. ज्या समाजातील आर्थिक व्यवस्थेत पुरुषांना महत्त्वाची भूमिका असते, अशा समाजात हा नियम अस्तित्वात असल्याचे दिसते. पशुपालन संस्कृतीत व पुरुषप्रधान कृषिसमाजात या नियमाचे अस्तित्व दिसते. मर्डॉकच्या सोशल स्ट्रक्चर (१९४९) या ग्रंथात त्याने केलेले संशोधन व निरीक्षणे नमूद केली आहेत.
मातृस्थानीय व्यवस्थेनुसार वर हा वधूच्या पालकांच्या घरी राहावयास जातो, किंवा त्यांच्या घराला लागून स्वतंत्र घर करून राहतो. ज्या समाजामध्ये स्थिर कृषिव्यवसाय अस्तित्वात असून जमिनीची मालकी स्त्रियांकडे असते व त्या कृषिव्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावीत असतात, अशा समाजात मातृस्थानीय प्रथा आढळते. मर्डॉकने केलेल्या अध्ययनात अशा समाजांची संख्या ३८ होती.
आर्थिक दृष्ट्या अप्रगत समाजामध्ये वरास विवाहाच्या वेळी वधूच्या पित्यास वधूमूल्य देणे शक्य होत नाही, अशी वेळी तो वधूच्या घरी राहून आपल्या श्रमांद्वारा वधूमूल्याची फेड करतो. त्यानंतर त्यास आपल्या पत्नीबरोबर स्वतःच्या पित्याच्या घरी राहावयास जाण्याची मुभा असते. म्हणून या पद्धतीस मातृ- पितृस्थानीय पद्धती म्हणतात. मर्डॉकच्या अध्ययनात अशा समाजांची संख्या २२ होती.
मातुलस्थानीय व्यवस्थेमध्ये विवाहानंतर विवाहित जोडपे वराच्या मामाच्या घरी राहवयास जाते. मर्डॉकने अध्ययन केलेल्या २५० समाजांच्या नमुन्यांपैकी आठ समाजांमध्ये अशी पद्धत अस्तित्वात होती. मेलानीशियामधील डोबुवा जमातीमध्ये विवाहित जोडप्याने विवाहानंतर आळीपाळीने एकेक वर्ष वधूच्या पितृगृही आणि वराच्या मामाच्या घरी राहण्याची प्रथा आहे.
नूतन-स्थानीय व्यवस्थेमध्ये विवाहानंतर विवाहित जोडपे वधू अथवा वर यांच्या पालकांच्या घरी न राहता स्वतंत्र घर करून राहते. मर्डॉकच्या अध्ययनात हा नियम १७ आदिवासी समांजांमध्ये अस्तित्वात होता. बऱ्याचशा आधुनिक नागर समाजांत ही व्यवस्था प्रचलित आहे.
स्थानाविषयीचे नियम हे विशिष्ट समाजात अस्तित्वात असलेल्या आर्थिक व्यवस्थेच्या गरजेतून तसेच विवाहच्या प्रकारातून आकारास येतात. नूतन-स्थानीय व्यवस्था ही एकविवाह पद्धतीशी (म्हणजे एकपती व एकपत्नी या पद्धतीशी) तसेच प्रारंभिक कुटुंबव्यवस्थेचे प्राबल्य याच्याशी सुसंगत असते.
विवाहाचे प्रकार : पति-पत्नीच्या परस्परांशी असलेल्या संख्येच्या आधारावर दोन विवाहप्रकार संभवतात : एकविवाह (एकपत्नीकत्व) व बहुपतिपत्नीक्तव. एकविवाह म्हणजे एका व्यक्तीस एकावेळी फक्त एकाच जोडीदाराशी विवाहबद्ध होता येते. आधुनिक समाजाचा कल हा एकविवाह पद्धतीकडे असल्याचे दिसते. काही आदिवासी जमातींमध्येही हा विवाहप्रकार रुढ आहे. मर्डॉक याने केलेल्या अध्ययनात अशा जमातींची संख्या त्रेचाळीस असल्याचे आढळून आले.
बहुपतिपत्नीकत्व या विवाहप्रकारचे दोन उपप्रकार आहेत : यांतील एक उपप्रकार बहुपत्नीकत्व म्हणजे एकाच पुरुषाने अनेक स्त्रियांशी विवाह करणे. विवाहित स्त्रीयांचे सहअस्तित्व ह्यात गृहीत आहे. हा प्रकार अनेक समाजांमध्ये अस्तित्वात असल्याचे आढळून आले आहे. मर्डॉकने केलेल्या आदिवासी जमातींच्या अध्ययनानुसार १९३ आदिवासी समाजांत बहुपत्नीकत्वाची प्रथा होती. मात्र बहुपत्नीकत्वाची प्रथा असलेल्या समाजामध्येही प्रत्याक्षात आर्थिक परिस्थितीच्या दबावामुळे विविध वयोगटांतील बहुतांशी पुरुषांचे विवाह हे प्रत्यक्षात एकपत्नीकत्वाच्या स्वरूपाचेच असतात. मात्र अनेक स्त्रियांशी विवाह करणे हे अशा समाजात प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. व त्याला सांस्कृतिक आदर्शांचे स्थान प्राप्त होते. आदिवासी समाजाखेरीज सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत असणाऱ्या इस्लाम धर्मीय समाजामध्ये, तसेच पूर्वीच्या पारंपरिक भारतीय, चिनी, जपानी समाजांत, तद्वतच दक्षिण अमेरिकेतील देशांमध्येही बहुपत्नीकत्वाची प्रथा अस्तित्वात असल्याचे दिसून येते. अनेक धर्मांची या प्रथेस मान्यता आहे. याला अपवाद ख्रिस्ती धर्माचा आहे. ख्रिस्ती धर्माची फक्त एकपत्नीकत्वाच्या प्रथेसच मान्यता आहे.
ज्या समाजात बहुपत्नीकत्वाची प्रथा आहे, अशा समाजात या प्रथेस पोषक ठरणाऱ्या काही प्रथा अस्तित्वात असतात. बहुपत्नीक कुटुंबामध्ये पुरुषाच्या विविध पत्नींच्यामध्ये कलह होण्याची शक्यता बरीच असते. अशा समाजात निरनिराळ्या पत्नींच्या राहण्याची व्यवस्था प्रत्येक पत्नीसाठी निराळे घर बांधून केलेली असते, अथवा एकाच महालाच्या वा विस्तीर्ण घराच्या निरनिराळ्या भागांत केलेली असते. कलह कमी करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, पहिल्या पत्नीच्या संमतीने दुसऱ्या पत्नीची निवड केली जाते. त्याचप्रमाणे पहिल्या पत्नीस धाकटी बहीण असल्यास दुसऱ्या विवाहाच्या वेळी तिला प्राधान्य दिले जाते. अशा विवाहास मेहुणीविवाह म्हणून संबोधले जाते.
बहुपतिकत्व हा बहुपतिपत्नीकत्व विवाहप्रकारातील दुसरा प्रकार. हा विवाहप्रकार फार थोड्या समाजांमध्ये अस्तित्वात असल्याचे दिसते. एकाच स्त्रीने एका वेळी अनेक पती करणे व त्या पतींचे सहअस्तित्व म्हणजे बहुपतिकत्व होय. हे पती एकमेकांचे बंधू असल्यास अशा विवाहास ‘भ्रातृक बहुपतिकत्व’ म्हणतात व ते कोणत्याही नातेसंबंधाने जोडलेले नसल्यास त्यांच्या विवाहास ‘अभ्रातृक बहुपतिकत्व’ म्हणतात. भ्रातृक बहुपतिकत्वाची विवाहपद्धती दक्षिण भारतातील तोडा जमातीमध्ये, उत्तर भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी राहत असलेल्या खस जमातीमध्ये व भारताबाहेर तिबेटच्या काही भागांमध्ये आढळते. भ्रातृक विवाहानंतर आपल्या पतीच्या घरी राहावयास जाते व पतीच्या सर्व भावांच्या बरोबर लैंगिक संबंध ठेवते. अशा संबंधातून जन्मास येणाऱ्या मुलांचे जैविक पितृत्व कोणाकडे जाते हे महत्त्वाचे मानले जात नाही, तर त्यांची सामाजिक जबाबदारी कोणत्या भावाने स्वीकारावयाची-म्हणजेच त्यांचे सामाजिक पितृत्व कोणाकडे आहे-हे महत्त्वाचे मानले जाते. हे सामाजिक पितृत्व काही सामाजिक रूढींनुसार ठरविले जाते. उदा., काही समाजांमध्ये पहिल्या दोन मुलांचे पितृत्व सर्वात थोरल्या भावाकडे जाते आणि त्यानंतरच्या मुलांचे पितृत्व धाकट्या भावांच्याकडे क्रमशः सोपविले जाते. अभ्रातृक बहुपतिकत्वाची पद्धती ही फार थोड्या समाजांमध्ये अस्तित्वात असल्याचे आढळते. भारतामध्ये केरळमधील नायर जातीत ही पद्धत काही वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. भारताबाहेर पॉलिनीशियातील मार्केझान जमातीत, तसेच आफ्रिकेतील काही जमातींत ही पद्धत अस्तित्वात असल्याचे दिसून आले आहे.
बहुपतिकत्व विवाहपद्धती ही कठीण आर्थिक परिस्थितीशी निगडित असते. ही पद्धत अस्तित्वात असलेल्या जमाती अतिशय खडतर भौगोलिक परिस्थितीत राहत असतात व त्यांना तीव्र जीवनकलहाला सामोरे जावे लागते. काही कारणाने आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्यास कुटुंबातील धाकट्या भावांना दुसऱ्या स्त्रीशी विवाह करण्याची अनुमती दिली जाते व त्यांच्या पत्नींनाही सर्व भावांची पत्नी म्हणून मानण्यात येते. अशा परिस्थितीत बहुपतिकत्वाच्या जागी समूहविवाहपद्धती अस्तित्वात येते. हा विवाहप्रकार फारच दुर्मिळ आहे. ब्राझीलमधील कैगांग जमातीमध्ये, तसेच मार्केझान जमातीमध्ये या प्रकारचे काही विवाह झाल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले. एकूणच मानवी समाजजीवनात या विवाहप्रकाराचे स्थान नगण्य आहे.
जोडीदाराची निवड : विवाह ही सामाजिक महत्त्वाची बाब असल्यामुळे कोणत्या स्त्रीने कोणत्या पुरुषाशी विवाहबद्ध व्हावे, हे विविध प्रकारच्या सामाजिक नियमांनी आणि संकेतांनी निर्धारित केलेले असते. सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल, की समाजामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या समान पातळीवर असणाऱ्या स्त्री-पुरुषांचा एकमेकांशी विवाह होण्याची शक्यता अधिक असते. ही गोष्ट सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या नियमांनी साध्य केली जाते. कोणत्या सामाजिक गटातील जोडीदार निवडावा, ह्याचे सूचन सकारात्मक नियमांनी केले जाते. ह्यालाच ‘अंतर्विवाहाचे नियम’ असे म्हणतात. स्वतःच्या धार्मिक, वांशिक, सामाजिक व सांस्कृतिक गटातून जोडीदाराची निवड करावी, असे अंतर्विवाहाचे नियम सांगतात. पारंपरिक समाजात हे नियम बरेच बंधनकारक असतात आणि ते प्रकट स्वरूपात असतात. पारंपरिक भारतीय समाजात स्वतःच्या जातीतून, पोटजातीतून विवाहासाठी जोडीदार निवडण्याचे बंधन असते. हे बंधन प्रकट स्वरूपात असते व त्याचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक रोषास वा बहिष्कारास तोंड द्यावे लागते. आधुनिक यूरोपीय व अमेरिकन समाजांत हे सामाजिक नियम अप्रकट स्वरूपात असतात. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना पारंपरिक समाजातील व्यक्तींप्रमाणे समाजाचा रोष सहन करावा लागत नसला, तरी एकूण त्यांचा कल हे नियम कळत-नकळत पाळण्याकडे असतो. अशा समाजातील बहुसंख्य विवाह हे समान दर्जाच्या सामाजिक-सांस्कृतिक व आर्थिक गटात होतात.
व्यक्तीने कोणत्या गटातील व्यक्तीशी विवाह करणे निषिद्ध आहे, हे ‘बहिर्विवाहाचे नियम’ सांगतात. जगात सर्वत्र प्रारंभिक कुटुंबातील पति-पत्नी खेरीज इतर नात्याने बांधल्या गेलेल्या व्यक्तींमध्ये लैंगिक संबंध ठेवणे निषिद्ध मानले आहे. म्हणजेच रक्तसंबंधी नात्यांमध्ये लैंगिक संबंध असणे निषिद्ध मानले आहे. हा बहिर्विवाहाचा नियम सर्वत्र अस्तित्वात आहे. पारंपरिक समाजात प्रारंभिक कुटुंबाच्या जागी विस्तारित कुटुंब अस्तित्वात असते. त्यामुळे रक्तसंबंधी नातेसंबंधाची व्याप्ती ही मोठी असते. त्यामुळे एकाच वंशावळीतील नातलगांनी परस्परांशी विवाह करू नये, असा नियम पाळला जातो. भारतीय समाजात सगोत्र व सपिंड तसेच समान देवक असणाऱ्या व्यक्तींमध्ये विवाह करणे निषिद्ध मानले जाते.
वरील दोन प्रकारचे नियम प्रत्येक समाजात अस्तित्वात असले, तरी आदिवासी आणि पारंपरिक समाजांमध्ये त्यांची व्यापकता अधिक असते व त्यांचे पालन कटाक्षाने केले जाते. आधुनिक समाजाचा कल या नियमांची व्यापकता कमी करण्याकडे असून ते कमी जाचक असतात. अगम्य आप्तसंभोग-निषेधाचा नियम सोडल्यास इतर कुठलेही नियम जोडीदाराची निवड करताना व्यक्तीवर बंधनकारक असू नयेत, असा कल आधुनिक समाजात असल्याचे दिसते. या सामाजिक दृष्टिकोनातील फरकामुळे जगातील मानवी समाजात दोन प्रकारच्या विवाहव्यवस्था अस्तित्वात आहेत. त्यांचे विवेचन पुढे केले आहे.
वधूवरांची देवाणघेवाण आणि विवाहव्यवस्था : विवाहातील अगम्य आप्तसंभोग-निषेधाच्या नियमामुळे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या प्रारंभिक कुटुंबाच्या बाहेर असलेल्या व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड करावी लागते. ही निवड नातेसंबंध अस्तित्वात असलेल्या कुटुंबामधून अथवा अनेक कुटुंबांच्या बनलेल्या मर्यादित गटामधून स्त्री-पुरुषांच्या देवाणघेवाणीच्या प्रकट व्यवहारातून केली जाते, किंवा समाजातील विविध गटांतून अप्रत्यक्ष देवाणघेवाणीच्या रूपाने केली जाते. पहिल्या प्रकारात विवाहाची बंदिस्त अथवा प्रारंभिक व्यवस्था म्हटले जाते व दुसऱ्या प्रकारास विवाहाची मुक्त व्यवस्था म्हणून ओळखले जाते.
विवाहाची प्रारंभिक व्यवस्था : या प्रकारांमध्ये व्यक्तीचा वैवाहिक जोडीदार म्हणून ज्या व्यक्तीची निवड केली जाते, तिच्याशी आधीच नातेसंबंध प्रस्थापित झालेले असतात. काही जमातींमध्ये विवाहाच्या दृष्टीने जमातीची वाभागणी दोन आप्तगटांत झालेली असते. वधू ‘अ’ गटातील असेल तर वर ‘ब’ गटातील असतो व वधू ‘ब’ गटातील असेल तर वर ‘अ’ गटातील असतो. अशा तऱ्हेने दोन आप्त समूहांत वधूवरांची देवाणघेवाण होते. जगातील सर्व भागांत, विशेषत्वाचे ऑस्ट्रेलियातील आदिवासी जमातींत, अशी व्यवस्था अस्तित्वात असल्याचे दिसून येते. काही आदिवासी जमातींमध्ये दोनऐवजी चार आप्तगट अ, ब, क, ड अस्तित्वात असतात. अ गटातील पुरुष ब गटातील स्त्रीशी विवाह करतो व त्याची संतती क गटात समाविष्ट होते. त्याचप्रमाणे ब गटातील पुरुष अ गटातील स्त्रीशी विवाह करतो व त्यांची संतती ड गटात समाविष्ट होते. याचप्रमाणे क आणि ड गटात विवाहसंबंध प्रस्थापित होऊन त्यांच्या संततीला अ आणि ब गटांत स्थान मिळते.
वरील पद्धतीमध्ये दोन आप्तगटांत स्त्री-पुरुषांची देवाणघेवाण प्रत्यक्ष होताना दिसते. परंतु दुसऱ्या पद्धतीमध्ये ही देवाणघेवाण दोन अथवा त्यातून अधिक आप्तगटांत अप्रत्यक्ष पद्धतीने होते. उदा., अ, ब, क असे तीन आप्तगट अस्तित्वात असल्यास अ गटाकडून ब गट मुली स्वीकारतो पण आपल्या मुली त्या गटात देत नाही. तसेच ब गटातून क गटात मुली दिल्या जातात पण स्वीकारल्या जात नाहीत. अशा पद्धतींमध्ये विवाहाच्या रूपाने दोन अथवा त्याहून अधिक गटात स्त्री-पुरुषांची देवाणघेवाण अप्रत्यक्षपणे होत असते.
बऱ्याच समाजांमध्ये विशिष्ट प्रकारचे नातेसंबंध असलेल्या व्यक्तींच्या विवाहास प्राधान्य दिले जाते. भारतातील दक्षिण भागातील बऱ्याच जातींमध्ये मामेबहिणीशी विवाह करण्यास प्राधान्य दिले जाते. अशी प्रथा चीनमधील काही भागांत अस्तित्वात असल्याचे दिसते.
विवाहाची मुक्त व्यवस्था : या व्यवस्थेमध्ये विवाहाच्या निमित्ताने एका गटातून दुसऱ्या गटात जी स्त्री-पुरुषांची देवाणघेवाण होते, तिचे स्वरूप जटिल आणि व्यापक असते. अशा तऱ्हेची विवाहव्यवस्था अमेरिका, यूरोपचा बहुतांश प्रदेश व आफ्रिकेतील बराचसा प्रदेश या ठिकाणी अस्तित्वात आहे. या विवाहपद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे, अगम्य आप्तसंभोग-निषेधाचे प्राथमिक आणि दुय्यम नियम सोडल्यास इतर कुठलेही नियम वधूवराच्या निवडीच्या वेळी पाळावे लागत नाहीत. ‘प्राधान्य विवाह’ हे या पद्धतीत नसतात. या दृष्टीने ही व्यवस्था लवचीक असून तीत वधूवरांच्या निवडीचे स्वातंत्र्य बरेच असते. वधू-वरांच्या निवडीच्या पद्धतीवरून या व्यवस्थेचे दोन उपप्रकार पडतात : (१) भावी जोडीदारांचे आईवडील, नातेवाईक व इतर मध्यस्थ यांनी जुळविलेला विवाह, (२) स्त्री-पुरुषांनी विवाहासाठी स्वतःचा जोडीदार स्वतःच निवडण्याची पद्धत. आईवडील, नातेवाईक व इतर मध्यस्थ यांनी जुळविलेला विवाह हा भारत, चीन, जपान इ. परंपरागत समाजांमध्ये सुपरिचित आहे. परंपरागत यूरोपीय समाजांमध्येही ही पद्धत आधुनिकतेच्या आगमनापूर्वी अस्तित्वात होती व अद्यापही ती काही प्रमाणात टिकून आहे. विवाहाच्या दुसऱ्या पद्धतीत विवाहेच्छू व्यक्तीला स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य असते. एवढेच नव्हे तर तशी समाजाचीही अपेक्षा असते. ही पद्धत प्रामुख्याने आधुनिक समाजात, विशेषत्वाने यूरोपीय व अमेरिकी समाजांत जास्त प्रचलित आहे. ही निवडपद्धती मुख्यत्वे भावी जोडीदारांमधील प्रणयनिर्भर प्रेमाच्या (रोमँटिक लव्ह) उत्कट जाणिवेवर अधिष्ठित आहे. या जाणिवेची अनुभूती तरुणतरुणींना यावी, म्हणून ‘डेटिंग’ सारख्या प्रथा काही आधुनिक समाजात रूढ आहेत. डेटिंग (संकेत भेट) म्हणजे एखाद्या तरुणीने तिच्याशी ओळख करू इच्छिणाऱ्या तरुणाला भेटीगाठी घेण्यास व सहवास वाढवण्यास दिलेली अनुमती. अशा प्रत्येक भेटीचे रूपांतर संबंधित तरुणतरुणींच्या विवाहात होईलच असे नाही. परंतु अशा संकेतभेटींतून परस्परांना संभाव्य जोडीदाराची निवड करण्याची संधी लाभते. अशी संधी यवकयुवतींच्या भरवलेल्या मेळाव्यांतून, संमेलनांतून, पार्ट्यांतूनही मिळू शकते. अशा विवाहाचे जे अध्ययन झाले आहे, त्यावरून असा निष्कर्ष निघतो, की बहुतांश तरुणतरुणी अशा पद्धतीतून आपल्या जोडीदाराची निवड स्वैरपणे न करता कळत-नकळत परस्परांच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीशी सुसंगत असणारा जोडीदार निवडतात. बहुतांशी तरुणतरुणींचे आईवडील अशा निवडीवर आपल्या पसंती-नापसंतीचा प्रभाव अप्रत्यक्षपणे पाडीत असतात. मात्र तरीही असे म्हणता येईल, की तरुणतरुणींना स्वतःच्या जोडीदाराच्या निवडीचे जास्तीत जास्त स्वातंत्र्य या पद्धतीमध्ये मिळते.
विवाहसंबंधाची आर्थिक बाजू : सामान्यपणे विवाहानंतर दोहोंपैकी एका जोडीदाराला स्वतःच्या जन्मदत्त कुटुंबाचा त्याग करावा लागतो. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या समाजामध्ये एका व्यक्तीच्या विवाहोत्तर अपरिहार्य असलेल्या अशा कुटुंबत्यागाकडे केवळ भावनात्मक दृष्टिकोनातून न पाहता, आर्थिक दृष्टिकोनातूनही पाहिले जाते. पितृस्थानीय कुटुंबपद्धतीनुसार ज्यावेळी नवविवाहित स्त्री स्वतःचे जन्मदत्त कुटुंब सोडून पतीच्या घरी राहावयास जाते, त्यावेळी जन्मदत्त कुटुंबातून एका व्यक्तीचा आर्थिक भार कमी होतो व पतीच्या कुटुंबात एका व्यक्तीच्या आर्थिक भाराची भर पडते. ही व्यक्ती कमावती (नोकरी/व्यवसाय करणारी) असल्यास, जन्मदत्त कुटुंबाच्या एकूण मिळकतीत त्या प्रमाणात कमतरता येते व ती ज्या कुटुंबात जाते, त्या कुटुंबात आर्थिक दृष्ट्या भर पडते. अशा विवाहामुळे संभवणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई लग्नाच्या प्रसंगी वधूशुल्क अथवा देज देऊन केली जाते. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या जमातीमध्ये वधूशुल्काची पद्धत कार्यरत असते. अनेक वेळा हे वधूशुल्क देण्याची वरीची परिस्थिती नसते. अशा परिस्थितीत पती आपल्या पत्नीच्या घरी राहून शेतीचे अथवा अन्य काम करून वधूशुल्काची रक्कम फेडतो आणि नंतर पत्नीसह स्वतःच्या घरी राहावयास जातो. या पद्धतीस ‘सेवाविवाह’ असे म्हटले जाते.
परंपरागत कृषिप्रधान समाजामध्ये शेती करण्याची सुधारित पद्धती वापरल्यामुळे कृषि-उत्पादनात वाढ होते व त्यामुळे समाजात आर्थिक व सामाजिक असमानतेच्या तत्त्वावर आधारित विविध स्तर अस्तित्वात येतात. त्याचप्रमाणे स्त्रियांना शेतीच्या व्यवसायात अंगमेहनतीचे काम करण्याची आवश्यकता भासत नाही व त्यांची भूमिका प्रामुख्याने घरकाम करणारी गृहिणी म्हणून आर्थिक दृष्ट्या संपन्न सामाजिक वर्गात तयार होते. त्यामुळे स्त्रीचे आर्थिक व्यवहारातील महत्त्व कमी होते व त्याचा परिणाम विवाहप्रसंगी मुलीच्या पालकांना वधूशुल्क देण्याच्या पद्धतीचा लोप होऊन, त्याजागी वराला वरदक्षिणा अथवा हुंडा देण्याच्या पद्धतीचा उदय होण्यात होतो. जगातील सर्व पारंपरिक समाजात हुंड्याची पद्धत अस्तित्वात होती व अद्यापही काही प्रमाणात टिकून आहे.भारतामध्येही अद्याप काही समाजात ही प्रथा अस्तित्वात आहे. हुंडा हा पैशाच्या तसेच सोने, चांदी यांसारख्या मौल्यवान वस्तूंच्या वा गाई, बैल यांसारख्या उपयुक्त जनावरांच्या तसेच शेतजमिनीच्या रूपाने देण्याची प्रथा समाजाच्या वेगवेगळ्या वर्गांत दिसून येते. परंपरागत समाजात ज्या काळी जमिनीच्या खरेदीविक्रीचे व्यवहार होत नसत, त्यावेळी हुंडा हे जमीन प्राप्त करून घेण्याचे महत्त्वाचे साधन म्हणून मानले जात असे. परंपरागत कृषिप्रधान पितृसत्ताक समाजात वरिष्ट वर्गात हुंडा घेण्याची पद्धत अस्तित्वात असते, तर कनिष्ठ वर्गात वधूशुल्काची पद्धती प्रचारात असते. परंतु हुंडा घेणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असल्यामुळे कनिष्ठ वर्गातील लोकही हुंड्याच्या पद्धतीकडे एक आदर्श पद्धत म्हणून पहात असतात व त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली, तरी त्यांचा कल हुंडा घेण्याकडे राहतोच. हुंडा देताना मुलीला सुस्थिती प्राप्त व्हावी व आपत्काली संरक्षण मिळावे, जन्मदत्त कुटुंबातील मालमत्तेचा तिचा वाटा तिला मिळावा, अशा प्रकारचा वधूपित्याचा उद्देश असतो तर वरपित्याला मुलाच्या हुंड्यातून आपल्या मुलीच्या लग्नाचा खर्च भागविता यावा, असे वाटत असते.
ज्या समाजात जन्माधिष्ठित सामाजिक विषमता असते व सामाजिक चलनशीलतेचा अभाव असतो, अशा समाजात खालच्या स्तरातील लोकांचा कल आपल्या मुलीचा विवाह आपल्यापेक्षा वरचा सामाजिक दर्जा असलेल्या कुटुंबात करण्याकडे असतो. त्यासाठी जास्त हुंडा देण्याची त्यांची तयारी असते. पारंपरिक समाजातील अनिष्ट अशा हुंड्यासारख्या प्रथांचा अतिशय घातक परिणाम स्त्रियांच्या सामाजिक स्थानावर झालेला दिसून येतो. विधवांची दुरवस्था, मुलींच्या बालविवाहास काही ठिकाणी दिले जाणारे प्रोत्साहन, मुलींना कुटुंबात मिळणारी हीन वागणूक, क्वचित प्रसंगी अर्भकावस्थेतील मुलींची कुटुंबियांकडून होणारी हत्या, वेश्यावृत्तीस काही वेळा दिले जाणारे प्रोत्साहन, विवाहानंतर पत्नीच्या जन्मदात्या आईवडिलांची हुंड्यासाठी होणारी पिळवणूक, समाजातील स्त्रीपुरुषांचे विषम प्रमाण इ. परिणामांचा या संदर्भात उल्लेख करता येईल.
विवाहाचे वय : वैवाहिक जीवनास सुरुवात करण्याच्या वेळी स्त्री-पुरुषांचे वय काय असावे, या प्रश्नाला जशी जीवशास्त्रीय बाजू आहे, तशीच सामाजिक सांस्कृतिक बाजूही आहे. शारीरिक दृष्ट्या मुलगी ऋतुस्नात झाल्याशिवाय-म्हणजे तेरा-चौदा वर्षांची झाल्याशिवाय ती गर्भधारणेस योग्य होत नाही. पूर्ण शारीरिक वाढ होण्यासाठी मुलगी सोळा वर्षांची होणे आवश्यक असते. मुलाच्या बाबतीत त्याने पौगंडावस्थेत प्रवेश केल्याशिवाय-म्हणजेच तो किमान सोळा वर्षांचा झाल्याशिवाय-विवाहास म्हणजे प्रजननास योग्य होत नाही. बहुतेक सर्व समाजांमध्ये विवाहाच्या वेळी वधू ही वरापेक्षा ३-४ वर्षांनी लहान असावी, असे मानण्यात येते आणि यासाठी स्त्री आणि पुरुष यांच्या शारीरिक विकासांत तीन ते चार वर्षांचे अंतर पडते, असे सांगण्यात येते. परंतु शास्त्रीय वस्तुस्थितीच्या निकषावर ही कल्पना टिकू शकत नाही. विवाहित स्त्रीची कौटुंबिक भूमिका काय असावी, याबद्दलच्या सांस्कृतिक आदर्शांचा प्रभावही वधू आणि वर यांचे विवाहसमयी वय काय असावे या बाबीवर पडल्याचे दिसते. पत्नी ही नाजूक असावी, ती स्वसंरक्षणाच्या बाबतीत आपल्या पतीवर अवलंबून असावी, अशा सांस्कृतिक संकेतांमुळे पत्नी म्हणून वयाने लहान असणाऱ्या मुलीची निवड पती करताना दिसतो.
आदिवासी जमातींत स्त्री-पुरुषांच्या सामाजिक दर्जामध्ये बरीच समानता आढळते. तसेच बऱ्याच आदिवासी जमातींमध्ये प्रौढविवाह प्रचलित आहेत. कौमार्याच्या वा योनिशुचितेच्या संकल्पनेला आदिवासी जीवनात फारसे स्थान नाही. त्यामुळे तरुणतरुणींमधील विवाहपूर्व लैंगिक संबंध क्षम्य असतात. परंतु पारंपरिक कृषिप्रधान, पितृसत्ताक समाजामध्ये स्त्री-पुरुषांच्या सामाजिक दर्जामध्ये असमानता आढळते. असा समाज निरनिराळ्या वांशिक गटांचा मिळून बनला असेल व त्यांचा सामाजिक दर्जा असमान असेल, तर वंशशुद्धी महत्त्वाची मानली जाते. अशा परिस्थितीत विवाहाच्या वेळी मुलीच्या कौमार्याला महत्व दिले जाते व तारुण्यागम-पूर्व (प्रीप्यूबर्टी) विवाहास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे लहान वयातच मुलीचे लग्न तिच्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या असणाऱ्या पुरुषाशी लावले जाते. मुलीचे लग्न लहान वयातच करण्याच्या सामाजिक दडपणामुळे कित्येकदा मूल गर्भावस्थेत असतानाच सोयरीक जमविली जाते. अशी पद्धत राजस्थानमध्ये अस्तित्वात होती. पारंपरिक भारतीय समाजात वरिष्ट जातींत मुलींची लग्ने तारुण्यावस्था प्राप्त होण्यापूर्वीच लावण्याचा दंडक पूर्वी होता. परंतु अशा बालवधूचा पती किती वयाचा असावा, याविषयी कोणतेही बंधन नसे. त्यामुळे बालिका वधू व प्रौढ जरठ असे विवाह प्रचलित व समाजमान्य होते. परिणामी अशा वरिष्ठ जातींत ⇨विधवांचे व त्यातही बालविधवांचे प्रमाण मोठे असे. [⟶ बालविवाह].
विवाहबंधनाची स्थिरता : विवाहबंधनाच्या स्थिरतेकडे पहाण्याच्या सामाजिक दृष्टिकोनामध्ये स्थूल मानाने दोन प्रकार दिसतात. काही समाजात विवाहबंधन हे अतूट मानले जाते तर काही समाजांत ते काही परिस्थितीत तोडले जाऊ शकते, काही अपवाद वगळल्यास सर्वसाधारण असे म्हणता येईल, की आदिवासी समाजामध्ये विवाहविच्छेद विनासायास होऊ शकतो. आफ्रिकेतील मातृसत्ताक झूनी जमातीमध्ये एखाद्या विवाहित स्त्रीला आपल्या पतीबरोबर राहणे पसंत नसेल, तर ती त्याचे कपडलत्ते आणून घराच्या दरवाज्याजवळ ठेवते. हे ज्या वेळेला पती म्हणून असलेले नाते संपलेले आहे हे समजतो व आपले सामान घेऊन स्वतःच्या जन्मगृही जातो. बहुतेक आदिवासी जमातींमध्ये वैवाहिर बंधन हे चिरस्वरुपाचे मानले जात नाही. विवाहित स्त्री-पुरुषांना एकमेकांपासून ⇨घटस्फोट घेण्याची तरतूद असते व त्यासाठी परस्परांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करण्याची आवश्यकता नसते. घटस्फोटित स्त्री-पुरुषाला पुनर्विवाह करता येतो, त्याचप्रमाणे विधवेलाही पुनर्विवाह करण्याचा अधिकार असतो. शिकारीवर निर्भर असणाऱ्या काही थोड्या आदिवासी जमातींमध्ये विवाहबंधन हे अतूट मानण्यात येते. याचे उदाहरण श्रीलंकेतील ⇨वेद्दा ही आदिवासी जमात होय.
परंपरागत कृषिप्रधान समाजामध्ये विवाहसंबंधांना स्थैर्य प्राप्त करून देण्याकडे समाजाचा कल असतो. यास अशा समाजातील धार्मिक श्रद्धा मोठ्या प्रमाणावर सहाय्यभूत होतात. हिंदू धर्मात त्याचप्रमाणे ख्रिस्ती धर्मातील रोमन कॅथलिक पंथात विवाह हे पतिपत्नीमधील अतूट नाते म्हणून मानले आहे. विवाहबंधन हे स्वर्गात ठरविले जाते व ज्यांना देवाने एकत्र जोडले आहे त्यांना कोणीही विभक्त करू शकत नाही, अशी श्रद्धा आहे. जोडप्यातील एकाच्या मृत्यूनेच हे नाते समाप्त होऊ शकते. घटस्फोटाची कल्पना रोमन कॅथलिकांना मान्य नाही. परंतु विधवाविवाह धर्मसंमत आहे. हिंदू धर्मात वैवाहिक बंधन हे केवळ या जन्मापुरते अतूट मानले आहे असे नसून ते जन्मजन्मांतरीचे बंधन म्हणून मानण्यात येते. वैदिक संस्कारांना ज्या उच्चवर्णीय जातींचे विवाह होतात अशा जाती वैवाहिक बंधन अतूट मानतात व त्यात विधवाविवाह आणि घटस्फोट यांना मान्यता नसते. कनिष्ठ जातींत लग्ने वैदिक संस्काराने लावली जात नाहीत, तसेच जातीच्या प्रथेनुसार पतिपत्नीस घटस्फोट दिला जातो आणि विधवाविवाहासही मान्यता असते. परंतु पुरुषाचा कुमारिकेशी झालेला पहिला विवाह हा धार्मिक दृष्ट्या उच्च प्रतीचा मानला जातो. इस्लाम धर्मात विवाह हा करार मानला जातो. घटस्फोटाचा अधिकार स्त्री व पुरुष दोघांनाही असला, तरी प्रत्यक्षात मात्र या अधिकाराचा वापर बव्हंशी पुरुषच करताना दिसतो. घटस्फोटाच्या वेळी विवाहकरारात नमूद केलेली मेहेरची रक्कम पुरुषाला आपल्या पत्नीस द्यावी लागते. स्त्री व पुरुष या दोघांनाही जरी धर्माने वा रूढीने घटस्फोटाबाबत समान अधिकार दिले असले, तरी पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने पुरुषच या अधिकाराचा वापर करताना दिसतात.
विवाहाचे सामाजिक आणि धार्मिक स्वरूप : समाजधारणेच्या दृष्टीने एक सामाजिक संस्था म्हणून, स्त्री-पुरुषांच्या व्यक्तिगत जीवनातील विवाहास सामाजिक महत्व प्राप्त होत असल्यामुळे सर्व समाजांमध्ये विवाह ही एक सामाजिक घटना मानली जाते व विवाहाची ही सामाजिक बाजू विवाहप्रसंगी धार्मिक विधी व सामाजिक समारंभ साजरे करून समाजात व्यक्त केली जाते. आदिवासी आणि पारंपरिक समाजांमध्ये या विधीचा प्रारंभ स्त्रीच्या बाबतीत तारुण्यागमाच्या विधीने होतो. समाजात रूढ असणारे विवाहविषयक विधिनियम पाळले गेले आहेत किंवा नाही ह्यांस महत्त्व येते, तसेच विवाहानंतर स्त्री आणि पुरुष यांच्या सामाजिक जबाबदारीत होणारे बदल, विवाहानंतर प्राप्त होणारे नव्या आप्तसमूहाचे सदस्यत्व, वधूवरांच्या आप्तांची त्यांच्या संबंधातील तसेच वधूवरांची आप्तांच्या संबंधातील जबाबदारी, वधू आणि वर यांची परस्परांविषयीची जबाबदारी इ. बाबी सामाजिक व धार्मिक विधींच्या द्वारा सर्व संबंधितांच्या मनावर बिंबविल्या जातात. या सर्व सामाजिक घटनांभोवती गुंफलेल्या क्रियांना धार्मिक विधीचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे त्यांची दखल समाजात अधिक गांभीर्याने घेतली जाते.
विवाहाच्या घटनेची सामाजिक दखल आदिवासी आणि पारंपरिक कृषिप्रधान समाजांत जास्त प्रमाणात घेतली जाते. अशा समाजांतील संबंधित जनता या विधींच्या पालनाबद्दल जास्त जागरूक असते. काही विधींचे रीतसर पालन न झाल्यास संबंधितांना दंड केला जातो. आधुनिक समाजात व्यक्तीवरील अत्यावश्यक बंधने सोडल्यास तिला पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते. परिणामस्वरूप अशा समाजात विविध धार्मिक व सामाजिक विधींचे पालन कमी प्रमाणात होताना दिसते. दोन व्यक्ती विवाहबद्ध झाल्याची नोंद समाजातर्फे शासकीय यंत्रणा घेते. त्याचप्रमाणे विविहविच्छेदाची नोंदही शासकीय यंत्रणा घेते.
आदिवासी जमातींमध्ये तसेच पारंपरिक कृषिप्रधान समाजामध्ये विवाहाच्या वेळी बहिर्विवाह, अंतर्विवाह इ. नियमांना धार्मिक स्वरूप प्राप्त होते. अशा नियमांचे पालन न झाल्यास धर्माचे उल्लंघन झाल्याचे मानण्यात येते व धर्मसंस्थेतर्फे अशा व्यक्तीस योग्य ती शिक्षा होते. उदा., हिंदू समाजात सपिंड व्यक्तीशी काही अपवाद वगळता विवाह होत नाही. अशा तऱ्हेचा विवाह झाल्यास त्यास समाजविरोधी व धर्मविरोधी वर्तन मानण्यात येते. परंतु औद्योगिक समाजव्यवस्थेमध्ये परिस्थिती वेगळी असते. अशा समाजात अनेक धर्मांचे लोक राहत असतात व त्यांच्या सामाजिक चालीरीतींमध्येही भिन्नता असते. निरनिराळ्या धर्मांचे लोक विवाहाच्या आणि कौटुंबिक व्यवहाराच्या संदर्भात भिन्नभिन्न चालीरीतींचे आचरण करतात. त्यामुळे सामाजिक ऐक्यास तडे जाण्याची शक्यता असते. हे संकट टाळण्यासाठी विविध धर्मांतील लोकांसाठी किमान सामाजिक आचारसंहिता असणे जरूरीचे भासते. अशा आचारसंहितेस धर्माचा आधार प्राप्त होण्याची शक्यता नसल्यामुळे तिला कायद्याच्या रूपाने शासनाचा आधार द्यावा लागतो. विवाहाच्या संदर्भात विवाहसमयीचे वधूवरांचे वय, घटस्फोट, ⇨पोटगी, वारसाहक्क इ. बाबींविषयी कायदे करून भिन्नभिन्न धर्मीयांना नागरिक या नात्याने समान हक्क मिळण्याची व्यवस्था शासन करते.
भारतीय विवाहसंस्था : विवाहसंस्थेतील व्यक्तिस्वातंत्र्याचे स्थान आणि वैवाहिक संबंधांचे स्वरूप या दोन निकषांवर जगातील वैवाहिक संस्थांचे वर्गीकरण करावयाचे झाल्यास, एका टोकाला व्यक्तिस्वातंत्र्याचा संपूर्ण अभाव आणि वैवाहिक संबंधांचे अतूट स्वरुप या निकषांवर आधारलेली परंपरागत हिंदू विवाहसंस्था तर दुसऱ्या टोकाला संपूर्ण व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी आणि वैवाहिक संबंधांचे स्वरूप पूर्ण ऐच्छिक असावे असा आग्रह धरणारी पाश्चात्य समाजात सध्या रूढ असलेली आधुनिक विवाहसंस्था, असा फरक करावा लागेल. या दोन टोकांच्या विवाहसंस्थांच्या दरम्यान जगातील अन्य समाजांतील विवाहसंस्थांचे स्थान निर्धारित करता येऊ शकेल. विवाहसंस्थेचे सम्यक आकलन होण्याच्या दृष्टीने या दोन प्रमुख विवाहसंस्थांच्या स्वरूपाचे विवेचन करणे आवश्यक आहे. प्रथम परंपरागत हिंदू विवाहसंस्थेचे व त्यानंतर आधुनिक विवाहसंस्थेचे विवेचन केले आहे.
हिंदू विवाहसंस्थेची उत्क्रांती प्राचीन वैदिक काळापासून झाली. या उत्क्रांतीची विभागणी स्थूल मानाने प्राचीन वैदिक, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तीन कालखंडांत करता येते. हिंदू विवाहसंस्थेची जडणघडण वैदिक काळापासून सुरू झाली. मध्ययुगीन काळात तिला तिचे पूर्ण स्वरूप प्राप्त झाले व ते अठराव्या शतकापर्यंत-म्हणजे ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीपर्यंत-टिकून राहीले आणि ब्रिटिश राजवटीत आधुनिक पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे तिच्या मूळ स्वरूपाशी विसंगत असलेले काही बदल तिच्यात घडून आले.
हिंदू विवाहसंस्थेचे पारंपरिक स्वरूप व विवाहप्रकार : हिंदू विवाहसंस्था ही प्राचीन इहवादी व पारलौकिक दृष्टिकोणांच्या समन्वयातून साकारलेल्या जीवनविषयक मूल्यांच्या तात्विक बैठकीवर आधारलेली आहे. त्यात ⇨पुरुषार्थ, आश्रम, ⇨ऋणत्रय या मूल्यांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही मानवी जीवनाची मूलभूत उद्दिष्टे म्हणजे चार पुरुषार्थ होत. जीवनाचे अंतिम उद्दिष्ट हे जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती म्हणजे मोक्ष मिळविणे हे जरी असले, तरी हे उद्दिष्ट भौतिक सुखाकडे पाठ फिरवून मिळवावयाचे नसून धर्माच्या आधाराने या भौतिक सुखाचा उपभोग घेऊन व आपल्या सर्व जबाबदाऱ्या योग्य तऱ्हेने पार पाडून मिळवावयाचे आहे. पारंपरिक हिंदू समाजातील ⇨आश्रमव्यवस्थेनुसार संपूर्ण मानवी जीवनाचा कालावधी हा ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास अशा चार आश्रमांत विभागलेला आहे. विवाहसंस्कारानंतरच व्यक्तीस गृहस्थाश्रमात प्रवेश मिळतो. या आश्रमस्थितीत चार पुरुषार्थांपैकी अर्थ व काम या पुरुषार्थांचे धर्मानुसार पालन करावयाचे असते. अर्थ म्हणजे भौतिक संपत्ती व काम म्हणजे लैंगिक तसेच अन्य वासनांची पूर्ती ह्या मानवी जीवनातील महत्त्वाच्या दोन उद्दिष्टांची पूर्ती विवाहसंस्काराने व गृहस्थधर्माच्या पालनाने होते. गृहस्थाश्रमात व्यक्तीस मातापित्याची सेवा करावयाची व पितरांचे श्राद्ध करावयाचे असते. मुलास जन्म दिल्याने पितृऋण फेडले जाते व मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो. इतर तीनही आश्रमस्थितीतील लोक अन्न, वस्त्र या दैनंदिन गरजांच्या पूर्तीसाठी गृहस्थाश्रमावर अवलंबून असतात. या दृष्टीने गृहस्थाश्रम हा सर्व समाजाचा मुख्य आधारस्तंभ होय. गृहस्थाश्रमातील सर्व कर्तव्ये पती व पत्नी या दोघांनी मिळून पाळावयाची असतात. स्त्रीच्या दृष्टीनेही विवाह हा महत्त्वाचा संस्कार मानला आहे. विवाहप्रसंगी धर्म, अर्थ व काम यांच्या बाबतींत पत्नीचे अतिक्रमण करणार नाही, अशी वराने प्रतिज्ञा घ्यावयाची असते यावरून स्त्रियांचा पुरुषार्थप्राप्तीचा हक्क स्पष्ट होते. विवाह हा दोघांच्याही पुरुषार्थप्राप्तीसाठी असतो. पतीच्या धर्मकार्यात पत्नीचा सहभाग आवश्यक असतो. विवाहसंस्कार होण्यापूर्वी स्त्रीचा वा पुरुषाचा मृत्यू झाल्यास अशा व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्यापूर्वी अपूर्ण राहिलेल्या विवाहसंस्कारांची पूर्तता काही धार्मिक विधी पार पाडून करण्यात येते. या सर्व विवेचनावरून हिंदू समाजातील विवाहविधीची अनिवार्यता स्पष्ट होते.
पारंपरिक भारतीय समाजव्यवस्थेत एकविवाह (एकपत्नीकत्व) पद्धतीस वैदिक काळापासूनच एक आदर्श विवाहप्रकार म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. ऋग्वेदकाली पतीपत्नीचे नाते ज्या प्रकारचे होते आणि कुटुंबसंस्थेतील आपसांतील संबंध ज्या प्रकारचे मानत असत, त्याचप्रकारचे पतीपत्नीचे नाते व कौटुंबिक संबंध वर्तमान काळापर्यंत भारतीय समाजात आदर्श मानले आहेत. ऋग्वेदात विवाहबंधन पवित्र मानले असून, पतिपत्नींमधील परस्परांची वैवाहिक निष्ठा महत्त्वाची मानली आहे. रामायणातील राम-सीतेचे पतिपत्नीचे नाते नैतिकतेचा आदर्श मानले आहे. ऋग्वेदकालात एकपत्नीत्वाचा चाल प्रशस्त मानीत असत. ‘गृह्यसूत्रा’तील सप्तपदीच्या मंत्रात पत्नी सखी होते, असे म्हटले आहे. यावरून वैदिक लोकांचा वैवाहिक आदर्श म्हणजे पतिपत्नीचे मित्रत्वाचे समानपणाचे नाते होते, असे म्हणता येते. विवाहित स्त्रीवर पतीचे एक प्रकारचे स्वामीत्व असले तरी ती घराची स्वामिनी आहे, ही कल्पना वैदिक काळापासून आजपर्यंत मान्य आहे. पत्नी हेच गृह होय, अशी भावना ऋग्वेद संहितेत व्यक्त केली आहे. ऋग्वेदकालीन गृहसंस्थेत सर्व स्त्रीपुरुषांमध्ये वरिष्ठ स्थान स्त्रीला प्राप्त होऊ शकत असे. विवाह झाल्यावर ती घरात आली असता तिच्या नेत्रक्षेपाने घराला ऊर्जितावस्था येऊ शकते, अशी समजूत त्या काळी होती. यज्ञामध्ये पतीच्या बरोबरीने तिचे महत्व असे. पती व पत्नी हे समानपणे धनाचे स्वामी आहेत, असे आपस्तंभ धर्मसूत्रात म्हटले आहे. ऋग्वेदकालीन कुटुंबसंस्था पितृप्रधान असली, तरी पिता व माता यांना कुटुंबसंस्थेत सारखीच प्रतिष्ठा होती. ‘सूर्यासूक्त’ हे आर्यांच्या विवाहसंस्कारात पठन करावयाचे असते. सूर्या व चंद्रमा यांचा विवाह ‘सूर्यासूक्ता’त वर्णिला आहे. पुत्र नसेल तर मुलीचा अधिकार पुत्रवत मानला जात होता. पत्नी या दृष्टीने स्त्रीची प्रतिष्ठा गृहसंस्थेत मुख्य मानत असत.
ऋग्वेदकालीन एकविवाह आदर्श मानला असला, तरी बहुपत्नीकत्वाची चाल समाजात मान्य होती. परंतु अशा प्रकारचा प्रघात राजघराण्यांतील व्यक्ती, श्रीमंत लोक व कारागीर जमाती यांच्यातच विशेषत्वाने असावा. हिंदू धर्माने पुरुषास पुत्रप्राप्तीसाठी दुसरा विवाह करण्यास मान्यता दिली होती. पहिल्या पत्नीस पुत्र न झाल्यास आठ वर्षे वाट पाहून त्यानंतर पुरुषाने दुसरा विवाह करावा, असे मनूने व कौटिल्यानेही सांगितले आहे. तसेच पहिली पत्नी दीर्घकाळ आजारी असेल परंतु तिचे पतीशी वर्तन चांगले असेल तर तिच्या संमतीने पतीने दुसरा विवाह करावा, असे मनूने सांगितले आहे. अनेकभार्यत्व ऋग्वेदकालापासून ते अर्वाचीन काळापर्यंत भारतीय समाजात रूढ असल्याचे दिसते. स्त्रीपुरुषांचे विवाह सामान्यतः वयात आल्यानंतर होत व कन्यादानापेक्षा उभयपक्षी स्वयंवराची पद्धत ऋग्वेदकाली अधिक रूढ असावी. ज्येष्ठताक्रमानुसार कन्येचे व पुत्राचे विवाह होत असत. वरपक्षाकडून वा वधूपक्षाकडून परिस्थिती असेल, त्याप्रमाणे हुंडा घेण्याची चाल त्या काळी होती.
पति-पत्नीचे वैयक्तिक नाते ज्यावेळी निर्माण झाले नव्हते, त्यावेळची स्थिती ‘गोधर्म’ म्हणून महाभारतात वर्णिली आहे. यास ‘यूथविवाह’ असे म्हणता येईल. जनावरांच्या कळपात जसे स्त्रीपुरुष भेदाशिवाय इतर नाते लैंगिक संबंधाच्या बाबत नसते, त्या प्रकारची मानवाची विवाहसंस्था उत्तरकुरू देशात असल्याचा उल्लेख आढळतो. शिवाय ‘अरणिधर्म’(पतीच्या संमतीने पत्नीने परपुरुषाकडे त्यास संतती होईपर्यंत राहणे व संतती झाल्यावर पतिगृही परतणे, ही चाल) प्रचलित होता. ही चाल श्वेतकेतूने बेद पाडली, असे महाभारतात म्हटले आहे. द्रौपदीने पाच पती करणे, हे बहुपतिकत्वाचे उदाहरणही महाभारतात आढळते. अगम्य आप्तसंबंधी विवाहाची उदाहरणेही प्राचीन काळात आढळतात. रूद्राने आपल्या भगिनीशी आणि प्रजापतीने वा मनूने आपल्या मुलीशी लग्न केल्याची कथा वेदात सापडते. पुराणांमध्ये अशा सपिंडसंबंधाच्या दर्शक काही कथा आहेत. मात्र ऋग्वेदात सहोदरांच्या विवाहसंबंधाचा निषेध यम-यमी संवादातून सूचित केला आहे. ऋग्वेदकाली सपिंडविवाहाला मर्यादा घालण्यात आली. साधारणपणे तिसऱ्या पिढीला कुटुंबे विभक्त होतात म्हणून पहिल्या दोन पिढ्या म्हणजे सख्खी, सावत्र व चुलत नाती वगळून मुलामुलींची लग्ने त्यावेळी मान्य होऊ लागली. चुलत नात्यातील केवळ सख्ख्या भावाची संतती विवाहास निषिद्ध धरत. आतेबहिण व मामेबहिण अथवा आतेभाऊ व मामेभाऊ यांची आपसांत लग्ने ऋग्वेदकाली मान्य होती. ऋग्वेदी-देशस्थ, कऱ्हाडे आणि दक्षिण भारतातील कर्नाटक इ. प्रांतांतील ब्राह्मण ह्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या जवळच्या नात्यात लग्न करण्याची प्रथा अजून विद्यमान आहे. आते-मामे भावंडांच्या विवाहांमुळे आप्तसंबंधाचे नातेवाईक जास्त जवळ येतात व त्यांचे परस्परसंबंध टिकून राहतात, अशा विवाहांमुळे सामाजिक ऐक्यभाव वाढीस लागतो व आप्तसंबंधांतील लोकांच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन होते, असे निष्कर्ष व मते फ्रेंच मानवशास्त्रज्ञ ⇨क्लोद लेव्ही-स्त्राऊस (१९०८ – ) याने व्यक्त केली आहेत. आते-मामे भावंडांमधील विवाह तसेच मामा-भाची विवाह हे सपिंड बहिर्विवाहाच्या नियमास अपवाद आहेत परंतु ते रूढीमान्य असल्यामुळे वैध ठरले आहेत. डॉ. के. ल. दप्तरी यांनी असे अनुमान काढले आहे, की प्रथम सपिंड शब्दाचा अर्थ एका स्वयंपाकावर जेवणारे असा असावा. पिंड म्हणजे अन्नाचा गोळा. जोपर्यंत कुटुंबे विभक्त होत नाहीत तोपर्यंत सर्वांचा स्वयंपाक एकत्र होत असतो. साधारणपणे सख्खे वा सावत्र बंधू एकत्र राहतात. चुलतबंधू वयात आल्यावर कुटुंबात वाटणी होते. एका घरात राहणाऱ्यांचा कोवळ्या वयात लैंगिक संबंध होऊ नये, म्हणून प्रथम सपिंड विवाहाचा निषेध झाला असावा. दुसरे कारण असे दिसते, की लैंगिक संबंधाच्या मर्यादा जेव्हा नव्हता, तेव्हा म्हातारी माणसे तरुण कोवळ्या पोरीवरचा आपला संभोगाचा अधिकार सोडत नसावी, त्यामुळे वयात आलेल्या तरुणांमध्ये आणि वयस्क मंडळीत आपसांत वैर उद्भवत असेल, ते टाळण्याकरिता अशा संबंधांवर मर्यादा घालण्यात आली. या सापिंड्याचा अर्थ सूत्रकालात व स्मृतिकालात पारिभाषिक बनला. पित्याकडून सात पिढ्या व मातेकडून पाच पिढ्या असा सपिंडतेचा अर्थ गौतमादी सूत्रकारांनी व स्मृतिकारांनी केला आहे. पिंड म्हणजे शरीर, असा अर्थ स्मृतिकार करतात. सपिंड म्हणजे एकाच रक्तामांसाची म्हणजे रक्तसंबंधी व्यक्ती. मातापित्याच्या अवयवांची वा धातूंची अनुवृत्ती दहा पिढ्यांपर्यंत राहते, असे सपिंड विवाहाच्या निषेधाचे कारण स्मृतिकार सांगतात. सपिंड या शब्दाचा आणखी एक रूढ अर्थ म्हणजे श्राद्धाच्या प्रसंगी पूर्वजांना पिंडदान करण्याचा अधिकार ज्याला आहे अशी व्यक्ती. व्यक्तीचे इतरांशी असलेले रक्तसंबंध अत्यंत घनिष्ठ, थोडे दूरचे वा खूप दूरस्थ असू शकतात. तात्विक दृष्ट्या खूप दूरच्या व्यक्तींच्या मधे नातेसंबंध दाखवणे शक्य असले, तरी प्रत्यक्षात ते क्रियाशील नसतात. या दृष्टीने सपिंड कोणाला म्हणावयाचे, ह्याची मर्यादा स्मृतिकारांनी लोकव्यवहाराच्या आधारे घालून दिली आहे. वैवाहिक संबंध जोडायला वधूवरांचा वर्ण एक पण गोत्र व प्रवर भिन्न असले पाहिजेत, असे मन्वादि स्मृतिकार व सूत्रकार यांनी सांगितले आहे. ‘गोत्र’ म्हणजे पारंपरिक अर्थाने प्राचीन ऋषिकुल आणि ‘प्रवर’ म्हणजे गोत्रातील प्राचीन विशिष्ट ऋषीचे नाव होय. ‘गोत्र’ ह्याचा अर्थ छांदोग्योपनिषदात कुटुंब असा सांगितला आहे. एका गोत्रातील स्त्रीपुरुषांचे बंधुभगिनीचे नाते प्रस्थापित होत असल्यामुळे परगोत्रातील वधूशी विवाह करण्याचा प्राचीन परिपाठ आहे. सूत्रकाळात (इ. स. पू. ६ वे – ५वे शतक) ही रूढी असल्याचे स्पष्टच दिसते. याच्याही पूर्वी ऋग्वेदकाली ही प्रथा असावी. विवाहप्रसंगी वधूवरांच्या गोत्रांबरोबर प्रवरांचाही उच्चार करण्याची प्रथा आहे. गोत्र आणि प्रवर समान असलेल्या कुळांत विवाह होत नाही, असे ‘बौधायन प्रवराध्याया’त म्हटले आहे. काळाच्या ओघात गोत्रसंस्था शुद्ध राहिली नाही. गोत्र म्हणजे वंश ही मूळची वस्तुस्थिती आता उरलेली नसल्यामुळे, हिंदू कायद्यात सगोत्र विवाह वैध मानला आहे. [⟶ गोत्र-प्रवर].
विवाहाचे आठ प्रकार मनु इ. स्मृतींमध्ये वर्णिले आहेत. ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, आसुर, गाधर्व, राक्षस व पैशाच असे आठ प्रकार मनूने सांगितले आहेत. ही प्रकारांची संख्या व नावे यांबाबत सर्व स्मृतिकारांमध्ये एकवाक्यता नाही. हे आठही प्रकार वैदिक किंवा वेदपूर्वकाळापासून भारतीय समाजातील भिन्न भिन्न गटांत रूढ असावेत.विवाहसंस्थेच्या इतिहासाच्या दृष्टीने विवाहाचे आठ प्रकार महत्त्वाचे आहेत. प्राजापत्यात धर्म, अर्थ व काम या बाबतींत पतिपत्नीच्या समान हक्काची कल्पना आहे. निष्ठा न सोडता एकमेकांस समान अधिकाराने धर्माचरण करण्याचा करार प्राजापत्य विवाहात सांगितला आहे. एकपत्नीकत्वाची कल्पना प्राजापत्य विवाहातून विकसित झाली असण्याचा संभव आहे. कन्यादान हे ब्राह्म विवाहाचे विशेष सवरूप होय. गांधर्व विवाह म्हणजेच प्रेमविवाह. आर्ष विवाह हा कन्याविक्रयाचा प्रकार असल्याने महाभारतात त्याचा निषेध केला आहे. आसुर विवाहही कन्याविक्रयरूपच आहे. दैव विवाह म्हणजे यज्ञात ऋत्विजाला दक्षिणा म्हणून कन्येचे दान. आर्ष म्हणजे वरापासून गोमिथून (गायबैलाची जोडी) घेऊन कन्यादान. आसुर विवाहात वराकडून कन्येची ज्ञाती द्रव्य घेते. हा विवाह म्हणजे कन्याविक्रयच होय. राक्षस विवाहात कन्या तिच्या जन्मदात्या कुळातून जबरदस्तीने हरण करून न्यावयाची असते. पैशाच विवाहात झोपलेल्या, दारू प्यालेल्या किंवा बेभान असलेल्या मुलीशी जबरदस्तीने गुप्त संभोग हे निमित्त लागते. प्राजापत्य व गांधर्व हे दोन प्रकार वगळता, बाकीचे सर्व प्रकार पितृप्रधान समाजसंस्थेचे द्योतक आहेत. मनूने आठ विवाहप्रकारांपैकी पहिले सहा (शेवटचे दोन वगळून) ब्राम्हणांकरिता सांगितले आहेत. शेवटचे चार प्रकार क्षत्रियांकरिता व राक्षस वगळून शेवटचे तीन प्रकार वैश्य-शूद्रांकरिता सांगितले आहेत. पण मनूने सांगितलेला हा वर्णविभागानुसारी तारतम्यविचार सर्व स्मृतींस मान्य नाही. त्याबाबत मतभेद आहेत. प्राजापत्य, ब्राह्म व गांधर्व हे तीन प्रकार विद्यमान हिंदू समाजात साधारणपणे प्रशस्त समजले जातात.
उत्तर वैदिक काळात ⇨वर्णव्यवस्था जसजशी बंदिस्त होऊ लागली, तसतशी आंतरवर्णीय विवाहावर बंधने घातली जाऊ लागली. परंतु ती पूर्णपणे अंमलात यावयास काही कालावधी जावा लागला. या मधल्या कालावधीत समाजातील उच्च वर्णातील पुरुषाने आपल्यापेक्षा कनिष्ठ वर्णातील स्त्रीशी विवाह करण्याची प्रथा होती, त्यास ‘अनुलोम विवाह’ असे म्हणतात. स्मृतींमध्ये अशा विवाहास संमती दिली आहे. मात्र असे विवाह गौण समजले जात. या काळात स्वतःच्या वर्णातच विवाह करावा, अशी विचारसरणी समाजात प्रभावी होऊ लागली होती. परंतु अनुलोम पद्धतीचे आंतरवर्णीय विवाह करणे पूर्णतया थांबले नव्हते. ब्राह्मण पुरुष क्षत्रिय वा वैश्य स्त्रीशी विवाह करू शकत असे, तसेच क्षत्रिय पुरुष वैश्य स्त्रीशी विवाह करू शकत असे. तथापि पहिल्या तीन वर्णातील पुरुषांनी शूद्र स्त्रीशी विवाह करणे हे त्याज्य मानले होते. अनुलोम विवाहपद्धतीतून या काळात बहुपत्नीकत्वाची प्रथाही वाढीस लागली.
उच्च वर्णाच्या स्त्रीने हीन वर्णाच्या पुरुषाशी विवाह केल्यास त्यास ‘प्रतिलोम विवाह’ असे म्हणतात. मात्र अशा विवाहास समाजाची मान्यता नव्हती. उलट त्यास प्रतिबंध असून त्याकरिता दंडही ठेवला होता. प्रतिलोम विवाहाचे एक उदाहरण ऋग्वेदात आढळते. स्वनय भावयव्य या क्षत्रियाने आंगिरसी नामक ब्राह्मण कन्यशी विवाह केला होता. तसेच देवयानी या ब्राह्मण कन्येचा ययाती ह्या क्षत्रीय राजाशी झालेला विवाह हे प्रतिलोम विवाहाचे आणखी एक उदाहरण होय.
मध्ययुगीन कालखंडात बहुपत्नीविवाह हा प्रामुख्याने राजघराण्यातील व्यक्ती तसेच सरदार, जमीनदार इ. सधन वर्ग यांच्यात होत असे. समाजातील अन्य स्तरांमध्ये एकविवाह हा सर्रास प्रचलित असला, तरी बहुपत्नीविवाहास निर्बंध नव्हता. बहुपत्नीकत्वास बंदी स्वातंत्र्योत्तर काळातच द्विभार्याप्रतिबंधक कायदा करून घालण्यात आली. मध्ययुगीन कालखंडात वर्णावर आधारलेली अनुलोम विवाहपद्धती जरी संपुष्टात आली होती, तरी स्वतःच्या जातीतील असमान दर्जा असलेल्या पोटजातीत अनुलोम पद्धतीचा विवाह रूढ होता.
एका स्त्रीने एकाच वेळी अनेक पुरुषांशी विवाह करणे-म्हणजेच बहुपतिकत्व पद्धती-प्राचीन भारतीयांना माहीत होती. परंतु एकपत्नीकत्व व बहुपत्नीकत्व यांच्या तुलनेत ही पद्धत अस्वाभाविक मानण्यात येत असे. बहुपतिकत्व पद्धतीचे सुपरिचित उदाहरण म्हणजे द्रौपदीचा पाच पांडवांशी झालेला विवाह होय. त्या आधी जटिलेचा विवाह सात ऋषींशी आणि वार्क्षीचा विवाह प्रचेतस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दहा भावांशी झाल्याची उदाहरणे युधिष्ठिराने पांडवांच्या द्रौपदीशी झालेल्या विवाहाच्या समर्थनार्थ दिल्याचा उल्लेख महाभारतात आढळतो. पांडव ज्या जमातीतून आले, त्या जमातीत बहुपतिकत्वाची प्रथा असल्याचा उल्लेखही महाभारतात आहे. ही अपवादात्मक उदाहरणे सोडल्यास धर्मशास्त्रकारांचा कल या विवाहपद्धतीस मान्यता न देण्याकडेच होता.
बहुपतिकत्वाच्या प्रथेशी निगडित असलेल्या दीर-भावजय विवाहपद्धतीचे निर्देश ऋग्वेद, रामायण, महाभारत इ. ग्रंथात आढळतात. रामायणात वालीच्या मृत्यूनंतर त्याची विधवा पत्नी तारा हिच्याशी वालीचा भाऊ सुग्रीव याने विवाह केल्याचे उदारहण आहे. पुढे दीर-भावजय विवाहाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन जसजसा असहिष्णू होत गेला, तसतसे दीर-भावजयीत काही विशिष्ट परिस्थितीतीच लैंगिक संबंध असावेत, असे सामाजिक बंधन निर्माण झाले. ही परिस्थिती म्हणजे पुत्रप्राप्तीशिवाय पतीचा मृत्यू होणे ही होय. अशा विधवेला वा पती जिवंत असताही तो असाध्य रोग, क्लीबत्व, निर्बीजत्व इ. कारणांमुळे असमर्थ असल्यास त्याच्या निपुत्रिक पत्नीला केवळ पुत्रोत्पत्तीसाठी वडीलधाऱ्यांच्या अनुमतीने आपल्याला संतती प्राप्त होईपर्यंतच दिराशी अथवा अन्य योग्य परपुरुषाशी लैंगिक संबंध ठेवण्याची मुभा प्राचीन धर्मशास्त्रात होती. ही प्रथा ⇨नियोग या नावाने ओळखली जाते. महाभारतात अंबिका आणि अंबालिका यांना नियोगातून अनुक्रमे धृतराष्ट्र आणि पंडू हे पुत्र झाल्याचा उल्लेख आहे.
मध्ययुगीन कालखंडात जातिसंस्थेचा उदय झाल्यानंतर काही आदिवासी जमाती व केरळमधील नायर ही जात सोडल्यास बहुपतिकत्वाची प्रथा भारतीय समाजात फारशी आढळत नाही. भारतात आधुनिक कालखंडाची सुरुवात होईपर्यंत नायर जातीत अशा पद्धतीचे-म्हणजे अभ्रातृक बहुपतिकत्व पद्धतीचे-विवाह होत असत. नायर जातीत मातृसत्ताक पद्धती व बहुपतिकत्व रूढ असल्याने पुरुषाचे स्थान स्त्रीपेक्षा दुय्यम असे. या जमातीतील स्त्रीला ऋतुप्राप्ती होण्यापूर्वीच जमातीतील एखाद्या सदस्याच्या कडून तिच्या गळ्यात ताळी (वा ताईत) बांधण्याचा विधी ‘ताळी- केडू-कल्याणम्’ केला जात असे. स्त्रीला ताळी बांधणारा तिचा पती मानला जात असला, तरी हा वैवाहिक संबंध तीन दिवसांपेक्षा जास्त टिकत नसे. पुढे ती स्त्री ‘संबंधम्’ हा वस्त्रदानाचा विधी करून स्वतःच्या जातीतींल पुरुषाशी अथवा क्षत्रियाशी वा नंपुतिरी(नंबुद्री) ब्राह्मणाशी पतीसारखे लैंगिक संबंध ठेवत असे. उत्तर प्रदेशातील ⇨खस या आदिवासी जमातीतही बहुपतिकत्वाची प्रथा रूढ असल्याचे उल्लेख आढळतात. दक्षिण भारतातील इरवा, कोडगू, ⇨तोडा, तसेच कोटा [⟶ कोटा-१] या आदिवासी जमातींतही बहुपतिकत्व रूढ होते.
हिंदू विवाहपद्धतीमध्ये जोडीदाराच्या निवडीसंबंधी अनेक प्रकारचे नियम व निर्बंध रूढ आहेत. यांत प्रामुख्याने अंतर्विवाह व बहिर्विवाह यांसंबंधीच्या निर्बंधांचा समावेश होतो. हिंदू समाजात जातिव्यवस्था रुजल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने केवळ आपल्या जातीतच विवाह करावा, असे बंधन निर्माण झाले. आंतरजातीय विवाहास हिंदू धर्माची मान्यता नाही. एवढेच नव्हे तर, ज्या जातीत पोटजाती आहेत, त्यातील व्यक्तींनी आपापल्या पोटजातीतच विवाह करण्याचे बंधन पाळणे आवश्यक मानले आहे.
व्यक्तीने कोणत्या सामाजिक गटातून आपला जोडीदार निवडावा हे जसे महत्त्वाचे मानले आहे, तसेच या अंतर्विवाही गटात अंतर्भूत असलेल्या कोणत्या रक्तसंबंधी गटातील व्यक्तींशी वैवाहिक संबंध जोडू नयेत, याचेही निर्बंध पाळणे बंधनकारक आहे. यासंबंधीच्या वर्जनाच्या नियमांना ‘बहिर्विवाहाचे नियम’ असे संबोधतात. अगम्य आप्तसंभोग-निषेधाच्या वैश्विक नियमाखेरीज सपिंड आणि सगोत्र म्हणून गणल्या गेलेल्या व्यक्तींबरोबर विवाहसंबंध वर्ज्य मानले आहेत. बहिर्विवाहाच्या गोत्र आणि प्रवर नियमाप्रमाणे एकाच गोत्रातील तसेच समान प्रवर असणाऱ्या व्यक्तींमध्ये विवाह होऊ शकत नाही. गोत्र–प्रवर हे ब्राह्मणांमध्येच असतात. क्षत्रिय आणि वैश्य यांच्यामध्ये कुलोपाध्यायाचे गोत्र घेण्याची प्रथा आहे.
शूद्रांमध्ये गोत्रांऐवजी देवक असते व देवकाची पूजा केली जाते. काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पती, प्राणी यांना देवक मानण्यात येते. एकच देवक असणाऱ्या कुटुंबामध्ये विवाह होत नाहीत. मुळात विस्तृत कुटुंब असा अर्थ असणाऱ्या गोत्र या संज्ञेचा विस्तार इतका वाढला, की केवळ आपले गोत्र-ऋषी एक आहेत असे मानणारे सर्वजण आपण एकाच पितृवंशातील आहोत, असे मानू लागले व आपापसांत विवाह करणे धर्मबाह्य मानू लागले. त्यामुळे कौटुंबिक भावनेतून निर्माण झालेल्या गोत्र-बहिर्विवाहाच्या नियमाला विकृत स्वरूप प्राप्त झाले. आधुनिक काळात ही विकृती १९५५ च्या हिंदू विवाहाच्या कायद्याने नष्ट झाली आहे.
परंपरागत हिंदू विवाहपद्धतीमध्ये व्यक्तिस्वातंत्र्याला फारसे स्थान नाही. विवाह करण्याचा उद्देश व्यक्तीवर असलेल्या देवांच्या, पितरांच्या, ऋषींच्या अथवा समाजाच्या ऋणाची फेड करणे हा मानला आहे. व्यक्तिगत सुख मिळविणे हा नाही. विवाह करण्याच्या परंपरागत उद्दिष्टांमध्ये प्राधान्याने धर्माला प्रथम स्थान आहे प्रजा हे दुसरे उद्दिष्ट मानले आहे तर तिसरे आणि सर्वांत गौण मानलेले उद्दिष्ट म्हणजे रती होय.
पारंपरिक भारतीय विवाहसंस्थेत वैदिक संस्कारांनी साजरा झालेला विवाह हा अतूट बंधनकारक मानला आहे. या विवाहपद्धतीत घटस्फोटाला मान्यता नव्हती. पतीशी कोठल्याही परिस्थितीत एकनिष्ठ राहिलेल्या सीता, सावित्री, तारा, मंदोदरी अशा पौराणिक स्त्रियांचा पतिव्रता म्हणून समाजापुढे आदर्श ठेवला गेला. या आत्यंतिक पतिनिष्ठेची परिसीमा मध्ययुगीन कालखंडात ⇨सतीची प्रथा निर्माण होण्यात झाली. स्त्री ही या जगात स्वतःकरिता अस्तित्वात नाही, ती पुरुषाकरिता अस्तित्वात आहे, तिचे व्यक्तित्व पुरुषात समर्पित आहे, या तत्त्वाचा विकृत अतिरेक म्हणजे सतीची चाल होय. या चालीचे सर्वात प्राचीन उदाहरण इ. स. पू. सु. ३१६ मधील असून, ते डिओडोरस सिक्युलस या ग्रीक इतिहासकाराच्या ग्रंथातील आहे. ग्रीकांविरुद्ध लढताना एक हिंदू सेनापती रणांगणावर मरण पावला. त्याचा पत्नी सती गेल्याचा त्यात उल्लेख आहे. महाभारतातील पंडुपत्नी माद्री सती गेल्याचा उल्लेख या चालीचे प्राचीनत्व दर्शवितो. विष्णुधर्मसूत्रात या प्रथेचा वैकल्पिक म्हणून निर्देंश आहे. ही प्रथा प्रामुख्याने राजस्थान येथे राजपूतांमध्ये, तसेच बंगाल, पंजाब येथे जास्त प्रमाणात रूढ होती. १८२९ साली कायद्याने सतीची चाल बंद झाली. मात्र त्यानंतरही सती जाण्याचे तुरळक प्रकार या प्रदेशांत घडल्याचे आढळून येतात.
मनू, याज्ञवल्क्य प्रभ्रृतींनी सतीप्रथेची दखलही घेतलेली नाही. याउलट विधवेने पतिनिधनानंतर आपले पावित्र्य टिकवून जीवन जगावे, असा आदेश दिला आहे. उच्चवर्णियांमधील विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता. ज्या कनिष्ठ जातींना वैदिक संस्कारांनी विवाह करण्याची मुभा नव्हती, अशा जातींत परंपरेने घटस्फोट घेण्याला, तसेच स्त्रीच्या पुनर्विवाहालाही मान्यता होती.
वेदकाळाच्या प्रारंभी स्त्रीला वेदाध्ययनाचा अधिकार होता व त्यासाठी तिला गुरूकुलातही प्रवेश होता. यावरून स्त्रीच्या विवाहसमयीच्या वयाबाबत समाजाचा दृष्टिकोन उदार होता, असे दिसते. स्त्रीने तरूण वा प्रौढ वयात विवाह करणे समाजमान्य होते. स्त्रीपुरुषांचे विवाह वयात आल्यानंतर होण्याची प्रथा रूढ असावी, असे सूचित करणारे विवाहसूक्त ऋग्वेदात आहे. वेदांमध्ये बालविवाहाचा उल्लेख आढळत नाही. तथापि धर्मसूत्रांच्या कालखंडामध्ये ही परिस्थिती बदलली आणि स्त्रीचा विवाह ती ऋतुस्नात होण्यापूर्वी व्हावयास पाहिजे, असा दंडक समाजात निर्माण झाला. पराशराने वयाच्या आधारावर मुलींचे वर्गीकरण केले. त्यानुसार आठ वर्षाच्या मुलीला ‘गौरी’, नऊ वर्षांच्या मुलीला ‘रोहिणी’, दहा वर्षाच्या मुलीला ‘कन्या’ व दहाच्या पुढील वयाच्या मुलीला ‘रजस्वला’ या नावांनी ओळखण्यात येऊ लागले. आठवे वर्ष हे मुलीचे वय विवाहास उत्तम मानण्यात आले. आपली मुलगी रजस्वला होण्याच्या आत तिच्या वडिलांनी व वडीलभावाने तिचा विवाह ठरवावा अन्यथा त्यांना नरक प्राप्त होईल, असे पराशराने म्हटले आहे. स्त्री ही स्वातंत्र्य उपभोगण्यास पात्र नाही, असे मनुवचन आहे. तीस वर्षांच्या पुरुषाने बारा वर्षाच्या मुलीशी विवाह करावा व चोवीस वर्षाच्या पुरुषाने आठ वर्षाच्या मुलीशी विवाह करावा, असे मनुसंहितेमध्ये लिहिले आहे. ऋतुस्नात होण्यापूर्वी मुलीचा विवाह झाला पाहिजे, असा दंडक मध्ययुगीन काळात रूढ झाला व तो विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या एकदोन दशकापर्यंत अस्तित्वात होता. ब्रिटिश अमदानीमध्ये या परिस्थितीत बदल घडून येण्यास सुरुवात झाली.
भारतीय विवाहसंस्थेतील आधुनिक परिवर्तने : ब्रिटिश राजवटीच्या आगमनाबरोबर भारतीय समाजात आधुनिक युगाचा प्रारंभ झाला आणि त्याच्या प्रभावामुळे पारंपरिक भारतीय विवाहसंस्थेत मूलभूत बदल घडून येण्यास सुरुवात झाली. हे आधुनिकीकरण घडवून आणण्यात औद्योगिकीकरण तसेच दळणवळणाच्या साधनांत झालेला क्रांतिकारक बदल, सामाजिक समतेच्या तत्त्वावर आधारलेल्या उदारमतवादी, पुरोगामी विचारांचा आणि आधुनिक शिक्षणाचा प्रसार व पारंपरिक समाजव्यवस्थेत निर्माण झालेल्या विकृती दूर करण्याच्या कामी शासनाने कायदे करून घेतलेली ठाम भूमिका यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. विवाहसंस्थेला आधुनिक वळण देण्यात भारतातील सुधारकांनी सुरू केलेल्या समाजसुधारणा चळवळींचा आणि सुधारकांच्या आग्रही भूमिकेमुळे व त्यांच्या साहाय्याने ब्रिटिश शासनाने केलेल्या प्रगतिशील कायद्यांचा वाटा मोठा आहे.
भारतात समाजसुधारणा-आंदोलनांची सुरुवात राजा राममोहन रॉय यांच्या ⇨ब्राह्मो समाजाच्या स्थापनेपासून (१८२८) झाली. व्यक्तिस्वातंत्र्याचे तत्त्व ब्राह्मो समाजाने पुरस्कारल्याने, त्याचा एक भाग म्हणून, गृहसंस्थेतील जिचे व्यक्तित्व जुन्या धर्माने नष्ट झाले होते त्या स्त्री जातीच्या उद्धाराचा मुद्दा ब्राह्मो समाजाच्या चळवळीने हाती घेतला. राजा राममोहन रॉय व त्यांचे ब्राह्मो समाजातील सहकारी यांच्या चळवळीचा परिणाम म्हणून १८२९ साली सतीची चाल ब्रिटिश शासनाने कायद्याने बंद केली. तद्वतच बालविवाहस बंदी, विधवांच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन, स्त्रीशिक्षणाच्य चळवळी अशा समाजसुधारणांच्या आंदोलनांतून स्त्रीच्या स्वतंत्र अस्मितेला जाग येऊ लागली. ब्राह्मो समाजाच्या चळवळीचे एक प्रमुख नेते ⇨ईश्वरचंद्र विदायासागर यांनी हिंदू समाजातील बालविवाहाच्या प्रथेविरुद्ध जन-आंदोलन सूरू केले व विधवाविवाहाचा पुरस्कार केला. महाराष्ट्रात ⇨धोंडो केशव कर्वे, बंगालमध्ये शशिपाद बॅनर्जी, गुजरातमध्ये माधवदास करसनदास या समाजसुधारकांनी स्वतः विधवाविवाह करून समाजास सुधारणेचा मार्ग दाखविला. स्त्रियांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने ⇨महात्मा जोतीराव फुले, धोंडो केशव कर्वे, बंगालमध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर प्रभृतींनी स्त्रीशिक्षणाच्या चळवळी उभारल्या. स्त्रीशिक्षणाची चळवळ म्हणजे पर्यायाने स्त्रीस्वातंत्र्याची चळवळ होय. स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास, पुरुषाच्या बरोबरीने समान हक्काची जाणीव, विवाहात जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य या गोष्टी स्त्रीला शिक्षणामुळेच साध्य झाल्या. आधुनिक विवाहसंस्थेतील पतिपत्नीच्या समान नात्याचा पाया स्त्रीशिक्षणाने घातला [⟶ स्त्रीशिक्षण]. पंडिता रमाबाई, महादेव गोविंद रानडे, तसेच अन्य समाजसुधारकांच्या भरीव योगदानामुळे पारंपरिक हिंदू विवाहसंस्थेमध्ये विधायक बदल घडून आले, तद्वतच त्यासाठी आवश्यक असलेल्या कायद्यांच्या दृष्टीने अनुकूल वातावरण तयार झाले.
ब्रिटिश शासनाने भारतातील समाजसुधारकांच्या मदतीने परंपरागत हिंदू विवाहसंस्थेत स्त्रियांवर जो अन्याय होत होता तो दूर करण्याच्या उद्देशाने जे कायदे केले, त्यांत सतीबंदीच्या कायद्याप्रमाणेच हिंदू विधवा पुनर्विवाहाच्या कायद्याचा (१८५६) उल्लेख करावा लागेल. बालविवाहाची प्रथा नष्ट करण्याच्या हेतूने म्हैसूर संस्थानामध्ये नऊ वर्षांच्या आतील मुलीच्या विवाहावर बंदी आणणारा कायदा १८९४ साली करून पहिले पाऊल उचलले. त्यापाठोपाठ बडोदे संस्थानात लग्नाच्या वेळी मुलगी बारा वर्षांहून लहान असता कामा नये, या आशयाचा कायदा १९०४ साली झाला. नंतर ब्रिटिश शासनाने अठरा वर्षांखालील मुलाच्या आणि चौदा वर्षांखालील मुलीच्या विवाहावर बंदी घालणारा कायदा १९२९ साली केला. हिंदू विवाह अधिनियमानुसार (१९५५) वराचे वय पूर्ण २१ वर्षे आणि वधूचे वय पूर्ण १८ वर्षे असले पाहिजे, अशी अट घालण्यात आली. त्याचप्रमाणे या कायद्याने द्विभार्या पद्धत बंद झाली, तसेच घटस्फोट मिळण्याचीही तरतूद करण्यात आली. १९५६ च्या हिंदू वारसा कायद्याने स्त्रियांना आणि विधवांना कुटुंबाच्या मालमत्तेत समान हक्क प्राप्त झाला. थोडक्यात, हिंदूंच्या पारंपरिक विवाहसंस्थेला आधुनिक वळण देण्यात समाजसुधारकांच्या प्रयत्नांबरोबरच हे कायदेही पूरक ठरले.
आधुनिक समाजातील विवाहसंस्था : दुसऱ्या महायुद्धानंतर आधुनिक यूरोपीय व अमेरिकन समाजातील विवाहसंस्थेमध्ये क्रांतिकारी बदल घडून येऊ लागले. जगभराच्या पारंपरिक समाजांतील विवाहसंस्था आधुनिकतेच्या दबावामुळे कोणत्या दिशेने जाण्याची शक्यता आहे, याचे आकलन होण्याच्या दृष्टीने आधुनिक समाजातील विवाहसंस्थेचे आजचे स्वरूप समजावून घेणे अगत्याचे आहे.
एकोणीसाव्या शतकात औद्योगिक क्रांतीच्या परिणामी झपाट्याने घडून आलेले औद्योगिकीकरण उदारमतवादी, व्यक्तिनिष्ठ व समतावादी सामाजिक विचारसरणी तसेच लोकशाहीवादी राजकीय विचारप्रणाली यांच्या प्रभावामुळे यूरोपीय समाजव्यवस्थेला आधुनिक स्वरूप प्राप्त झाले. कारखानापद्धतीची उत्पादनव्यवस्था, नागरीकरण, वाढती भौगोलिक आणि सामाजिक चलनशीलता या सामाजिक पर्यावरणात सरंजामशाही व्यवस्थेतील प्रस्थापित विस्तारित कुटुंबास तडे जाऊन त्या जागी पती, पत्नी आणि फक्त अविवाहित मुले असा मर्यादित आकार असलेली प्रारंभिक वा केंद्रस्थ कुटुंबव्यवस्था अस्तित्वात आली व त्यास अनुकूल अशी विवाहसंस्था आकारास आली.
कारखानापद्धतीच्या उत्पादनव्यवस्थेमुळे कुटुंबास उत्पादनव्यवस्थेत स्थान उरले नाही, परिणामी कुटुंबातील मिळवत्या व्यक्तींना अर्थार्जनासाठी कुटुंबाबाहेर पडावे लागले. स्त्रीपुरुष समानतेच्या विचारसरणीमुळे स्त्रिया घराचा उंबरठा ओलांडून कुटुंबाबाहेरील जगात स्वतंत्रपणे अर्थार्जन करू लागल्या. त्यामुळे त्या आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर घराबाहेर पडून नोकरी अथवा अन्य व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. आधुनिक काळात व्यवसायाची सर्व क्षेत्रे स्त्रियांना उपलब्ध झाली आहेत व व्यावसायिक जगात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करण्याची स्वाभाविक व रास्त अपेक्षा स्त्रियांच्या ठायी निर्माण झाली आहे. परंपरेने त्यांच्याकडे चालत आलेली कुटुंबातील गृहिणीची भूमिका त्या तुलनेत आता दुय्यम व कमी महत्त्वाची ठरते आहे. घरकामात साहाय्यभूत होणारी अनेक यंत्रोपकरणे आता गृहिणीला सहज उपलब्ध झाली आहेत, तसेच डबाबंद व तयार अन्नपदार्थांच्या उपलब्धतेमुळे घरकामाचा ताण खूपच कमी झाला आहे. पतीच्या बरोबरीने आपणही नोकरी अथवा विविध व्यवसाय करून अर्थार्जन करतो, तेव्हा पतीने आपल्या बरोबरीने घरकामाची व बालसंगोपनाची जबाबदारी उचलावी, अशी रास्त अपेक्षा आधुनिक समाजातील स्त्री करू लागली आहे. त्यामुळे आधुनिक समाजातील कुटुंब हे पितृसत्ताक राहिले नसून समसत्ताक झाले आहे. मूल केव्हा व्हावे व किती मुले व्हावीत, याविषयीचे निर्णय घेण्याची क्षमता व स्वातंत्र्य आधुनिक समाजातील स्त्रीला प्राप्त झाले आहे. कुटुंबनियोजनाच्या प्रभावी साधनांच्या उपलब्धतेमुळे मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे तिला शक्य झाले आहे. लैंगिक सुख आणि मातृत्व यांची निसर्गाने जी सांगड घातली होती, ती आता प्रजननाच्या शास्त्रीय ज्ञानाने व संततिनियमनाच्या साधनांच्या क्रांतीमुळे तुटली आहे. मूल न होऊ देता लैंगिक सुखाचा उपभोग घेणे आधुनिक समाजातील स्त्री-पुरुषांना आता शक्य झाले आहे. त्यामुळे लैंगिक सुखासाठी विवाहाची आवश्यकता राहिली नाही. व्यक्तिनिष्ठ समाजरचनेमुळे सामाजिक नियंत्रणाची भीतीही आता उरली नाही. या सर्व घडामोडींचा भलाबुरा प्रभाव आधुनिक समाजातील विवाहसंस्थेवर पडणे अटळ व स्वाभाविकच आहे.
आधुनिक समाजात एकपतिपत्नीकत्व पद्धती आता रूढ झाली आहे. यूरोप-अमेरिकेतील आधुनिक समाज ख्रिस्ती धर्मीय असल्यामुळे एकपतिपत्नीकत्वाची ही एकमेव धर्मसंमत पद्धती या समाजात अस्तित्वात आहे. व्यक्तिवादी विचारसरणी आणि स्त्री-पुरुष समानता या मूल्यांच्या निकषावर हीच पद्धत टिकू शकते. आधुनिक विवाहसंस्थेत जोडीदाराच्या निवडीचे स्वातंत्र्य वयात आलेल्या मुलामुलींना दिले जाते. आईवडिलांनी व ज्येष्ठ आप्तेष्टांनी मुलामुलींचा विवाह जमविण्याची पद्धती आता आधुनिक समाजातून जवळजवळ नामशेष होत चालली आहे. ह्याचे महत्त्वाचे कारण नागरी समाजातील प्रचंड गतिमान अशा भौगोलिक व सामाजिक चलनशीलतेत आढळून येते. त्यामुळे नागरी समाजात शेजार असा उरला नाही. आधुनिक कुटुंबात पती, पत्नी आणि स्वतःची अविवाहित मुले यांखेरीज अन्य नातेवाईकांना स्थान नाही. या सर्वांचा परिणाम मुलामुलींचे विवाह त्यांच्या आईवडिलांनी व आप्तेष्टांनी जुळविण्याची पद्धत जवळजवळ कालबाह्य होण्यात झाला आहे व त्या जागी प्रणयनिर्भर प्रेमभावनेच्या निकषावर युवकयुवतींनी आपापले विवाह जमविण्याची पद्धत अस्तित्वात आली आहे. ही पद्धत साधारणपणे सर्वच आधुनिक समाजांत रूढ असली, तरी विशेषत्वाने अमेरिकन समाजात प्रणयनिर्भर प्रेमाच्या अधिष्ठानावर विवाह जुळवण्याला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाल्याचे आढळून येते. प्रणयभावनेच्या एकमेव निकषावर आधारलेले विवाह हे अस्थिर असण्याची व त्याची परिणती शेवटी घटस्फोटात होण्याची शक्यता जास्त असते. या विवाहपद्धतीच्या टीकाकारांच्या मते, वैवाहिक जीवनास स्थैर्य प्राप्त करून देणाऱ्या पतिपत्नीच्या समान आवडीनिवडी, समान सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी या व्यावहारिक बाजू लक्षात न घेता केवळ प्रेमभावनेच्या एकमेव आधारावर विवाह जमविणे हे अवास्तव आहे. अमेरिकन संस्कृतीत प्रकटपणे प्रेमभावनेखेरीज अन्य व्यावहारिक महत्त्वाच्या बाबींना विवाह जमविण्याच्या वेळी नगण्य स्थान देण्यात येत असले, तरी अप्रत्यक्षपणे बहुतेक तरुणतरुणींचे विवाह समान वंश, तसेच समान आर्थिक व सामाजिक दर्जा यांच्या पार्श्वभूमीवर होताना दिसतात. ह्याचाच अर्थ, प्रणयनिर्भर प्रेमभावना ही अगदीच स्वच्छंदपणे अस्तित्वात येत नसून, सामान्यतः सामाजिक संरचनेच्या चौकटीतच तिचा मार्ग आखला जातो.
विवाह जुळविण्यात आईवडील व आप्तेष्ट यांना उघड स्थान नसल्यामुळे युवक-युवतींच्या संकेतभेटीची (डेटिंग) नवी प्रथा आधुनिक समाजात रूढ झाली आहे. या प्रथेमुळे युवक-युवतींना एकत्र येण्याची संधी लाभते व त्यातून परस्परांना अनुरूप वाटणाऱ्या तरुणतरुणींचे विवाह ठरण्याची शक्यता अधिक असते. अशा भेटींमुळे तरुणतरुणींना एकमेकांची ओळख करून घेण्याची, तसेच आवडीनिवडी जाणण्याची संधी प्राप्त होते व त्यातून त्यांचे विवाह जुळतात. ह्या प्रकारात तरुणतरुणींच्या आईवडिलांना प्रकटपणे काही स्थान नसले, तरी अप्रत्यक्षपणे आपली पसंती-नापसंती ते आपल्या मुलामुलींच्या लक्षात आणून देऊन आपल्या पाल्याच्या वैवाहिक जोडीदाराच्या निवडीवर प्रभाव पाडू शकतात. तथापि या विवाहपद्धतीत संभाव्य असलेल्या अस्थेर्यावर आईवडिलांच्या अप्रत्यक्ष प्रभावाचा फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही.
आधुनिक समाजात वैवाहिक जोडीदाराच्या निवडीचे जास्तीत जास्त स्वातंत्र्य युवक-युवतींना दिले जाते. अगम्य आप्तसंबंध-निषेधाचा एकमेव नियम सोडल्यास, बाकी कोणताही नियम पाळणे आधुनिक समाजात बंधनकारक नाही. व्यावसायिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने सहभागी होण्याची संधी स्त्रियांना प्राप्त झाल्यामुळे विवाहसमयीच्या वयात वाढ झाली आहे. आधुनिक समाजात विवाहपूर्व लैंगिक संबंध हे फारसे निषिद्ध मानले जात नसल्यामुळे लैंगिक सुख मिळविण्यासाठी विवाहाचे बंधन स्वीकारण्याची आवश्यकता युवा पिढीला जाणवत नाही. विवाह न करता तरुणतरुणींनी एकत्र राहण्याची पद्धत आधुनिक समाजात रूढ झाली आहे व अशा एकत्र राहणाऱ्या तरुणतरुणींना समाजाचा रोष सहसा पतकरावा लागत नाही. संततिनियमनाच्या साधनांच्या उपलब्धतेमुळे कुमारी माता बनण्याची पाळी युवतीवर सहसा येत नाही व तशी वेळ आल्यास अशा मुलांच्या संगोपनाचे कार्य करणाऱ्या अनेक संस्था उपलब्ध असल्यामुळे, तिची संगोपनाची तयारी नसल्यास ती आपल्या मुलाला अशा संस्थेच्या हवाली करू शकते. परंपरागत समाजामध्ये अनौरस संततीकडे तुच्छतेच्या नजरेने पहाण्यात येते परंतु आधुनिक समाजात सामाजिक नियंत्रण प्रभावी नसल्यामुळे व परंपरागत नीतिमत्तेच्या कल्पनांचा जनमानसावरील प्रभाव क्षीण झाल्यामुळे अशा अनौरस संततीला समाजाच्या रोषास तोंड द्यावे लागत नाही. त्याचप्रमाणे स्त्रीपुरुष समानतेच्या कल्पनेमुळे स्त्री कायमचे वैवाहिक बंधन न स्वीकारता मुलास जन्म देऊ शकते व त्याचे संगोपनही आधुनिक समाजात स्वतःच्या सामाजिक स्थानास धक्का लागू न देता करू शकते. या सर्व सामाजिक बदलांमुळे आधुनिक समाजातील विवाहसंस्था दुर्बल झाली आहे. व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना पराकोटीला पोहोचल्यामुळे घराचे घरपण नाहीसे झाले आहे. घर हे कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन परस्परांशी सहकार्य करून भौतिक व भावनिक समाधान मिळविण्याचे ठिकाण, असे घराचे स्वरूप न राहता ती एक भावनाशून्य वास्तू झाली आहे. या सर्वांचा परिणाम विवाहसंस्थेशी निगडित असलेल्या तीन प्रमुख समस्यांच्या निर्मितीत झाल्याचे दिसते. ह्या समस्या म्हणजे घटस्फोट, जननदराचे घटते प्रमाण आणि पालक-युवक संघर्ष या होत.
घटस्फोट : घटस्फोटाची समस्या अनेक समाजात अस्तित्वात असली, तरी आधुनिक पाश्चात्य समाजांत दुसऱ्या महायुद्धानंतर घटस्फोटाच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. अमेरिकन समाजामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वसाधारणपणे तीन विवाहांपैकी दोन विवाहांची परिणती घटस्फोटात होऊ लागली. वाढते औद्योगिकीकरण व नागरीकरण, भौगोलिक आणि सामाजिक चलनशीलतेचा प्रचंड वेग, धर्माचा समाजमानसावरील घटता प्रभाव व घटस्फोटाकडे पाहण्याचा न्यायसंस्थेचा उदार दृष्टिकोन या कारणांनी घटस्फोटांच्या संख्येत बेसुमार वाढ झाली. औद्योगिकीकरणाच्या वाढत्या वेगामुळे आर्थिक उत्पादनाचे एक केंद्र या नात्याने कुटुंबाचे असलेले महत्त्व झपाट्याने नाहीसे होत चालले आहे. परिणामस्वरूप कुटुंबातील गृहिणी मोठ्या संख्येने नोकरी अथवा व्यवसाय करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत व त्यांचे पतीवरील आर्थिक अवलंबित्व कमी झाले असून, त्या आता आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाल्या आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे समाजाचे एकजिनसी स्वरूप बदलून ते बहुजिनसी होते. सामाजिक संबंध औपचारिक व दुय्यम स्वरूपाचे होतात. त्यामुळे सामाजिक नियंत्रणाचा दबाव कमी झाल्याने, घटस्फोटितांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अधिक सौम्य व उदार बनतो. तसेच विवाहबंधनाकडे धार्मिक भावनेतून पाहिले न जाता केवळ एक सामाजिक करार म्हणून पाहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने घटस्फोटावर धर्माचे नियंत्रण उरलेले नाही. तद्वतच न्यायसंस्थेच्या घटस्फोटाबाबतच्या उदार दृष्टिकोणामुळे घटस्फोट घेणे ही बाब आता अधिक सुलभ झाली आहे. परस्परसंमतीने घटस्फोट घेणाऱ्यांची संख्याही खूप वाढली आहे. पूर्वी घटस्फोट घेणारांना जसे सामाजिक टीकेस तोंड द्यावे लागत होते, तशी परिस्थिती आता आधुनिक समाजात राहिलेली नाही. त्यामुळे जगभरच्या सर्वच आधुनिक समाजांत घटस्फोटाचे प्रमाण खूपच वाढले आहे.
जननदराचे घटते प्रमाण : विवाहसंस्थेत होत असलेल्या परिवर्तनांमुळे आधुनिक समाजातील जननदराचे प्रमाण घटत चालले आहे. प्रजननाच्या शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार, संततिनियमनाच्या परिणामकारक साधनांची सहज उपलब्धता आणि स्त्रियांमध्ये व्यावसायिक क्षेत्रात आपणही आपले स्वतंत्र स्थान निर्माण करावे अशी वाढत चाललेली आकांक्षा यांमुळे आधुनिक समाजातील स्त्री स्वतःला एक किंवा दोन पेक्षा जास्त मुले होणार नाहीत, ह्याची खबरदारी घेत असते. निपुत्रिक विवाहित जोडप्यांना घटस्फोट घेण्यात फारशा अडचणी येत नसल्यामुळे, विवाहानंतर आपले पटत नाही किंवा आपली जोडीदाराची निवड चुकली असे लक्षात आल्यास आपणास मूल न होऊ देण्याची खबरदारी स्त्री घेऊ लागली आहे. या सर्व कारणांमुळे आधुनिक समाजातील जननदरात घट होऊ लागली आहे. संततिनियमनाचा अवलंब गरीब जनतेपेक्षा मध्यमवर्गीय व जास्त सधन वर्गात अधिक प्रमाणात होत असल्याने या वर्गाच्या आकारात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या मुलांचे पालनपोषण चांगल्या तऱ्हेने करण्याची क्षमता ज्या सामाजिक वर्गात आहे, त्यातील लोकांचाच कल स्वतःस कमीत कमी मुले होऊ देण्याकडे आहे. ह्याचा घातक परिणाम समाजातील भावी पिढीच्या पालनपोषणावर व गुणवत्तेवर होऊ शकतो.
पालक आणि युवापिढीतील संघर्ष : पारंपरिक कुटुंबप्रमुखाच्या तुलनेत आधुनिक कुटुंबातील प्रमुख हा आपले परंपरागत अधिकार गमावून बसला आहे. औद्योगिक क्रांतीच्या परिणामी आधुनिक कुटुंबातील सदस्य अर्थार्जन करण्यासाठी स्वतंत्र झाले असल्याने त्यांचे कुटुंबप्रमुखावरील अवलंबित्व कमी झाले आहे. तसेच व्यावसायिक ज्ञान मिळविण्यासाठी मुले कुटुंबप्रमुखावर आता फारशी अवलंबून नसतात. युवापिढीला व्यावसायिक ज्ञान शाळा, महाविद्यालये, तांत्रिक शिक्षणसंस्था यांतून मिळू शकते. ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रातील प्रचंड प्रगतीमुळे वडिलांच्या या क्षेत्रातील अधिकाराला पूर्वीच्या तुलनेत खूपच मर्यादा पडल्या आहेत. या सर्व परिवर्तनांचा परिणाम म्हणजे कुटुंबातील वडिलांच्या मुलावरील अधिकाराला तरुण पिढीकडून होत असलेला विरोध होय. आधुनिक कुटुंबात पालक आणि त्यांच्या तरुण मुलांमधील संघर्ष ही आता नित्याची बाब झाली आहे. अशा परिस्थितीत कुटुंब हे परस्परांच्या सहकार्याचे व भावनात्मक सहजीवनाचे केंद्र न राहता, ते संघर्षाचे व भावनाशून्य सहवासाचे केंद्र बनण्याचा धोका निर्माण झाला आहे. विवाह न करता व कौटुंबिक जीवनाची जबाबदारी न उचलता तरुणतरुणींनी एकत्र राहण्याचा पाश्चात्य समाजातील वाढता प्रघात, हे त्याचे प्रत्यंतर आहे.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे परीक्षा-नलिकेद्वारा संततिप्राप्तीची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जन्मदाता पिता वेगळा व पालनपोषण करणारा सामाजिक पिता वेगळा अशी परिस्थिती समाजात निर्माण होऊ लागली आहे. आधुनिक पाश्चात्य समाजात समलिंगी विवाहालाही मान्यता मिळते आहे. या सर्व घटनांमुळे परंपरागत विवाहसंस्थेच्या मुळावरच आघात होऊ लागले आहेत. त्यामुळे विवाह करून आपले कुटुंब स्थापन करणे व कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलांचे पालनपोषण करणे, ही मानवी जीवनातील अनिवार्य बाब न रहाता एक ऐच्छिक बाब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पहा : कुटुंबसंस्था मिश्रविवाह विवाहविधी विवाहविषयक कायदे.
संदर्भ : 1. Askham, Janet, Identity and Stability in Marriage, Cambridge, 1984.
2. Bernard, Jessie, The Future of Marriage, London, 1982.
3. Blood Robert O. Marriage, New York, 1962.
4. Bowman, Henry A. Marriage for Moderns, New York, 1965.
5. Cherlin, Andrew J. Marriage, Divorce, Remarriage, Cambridge,1981.
6. Clark, D. Marriage,Domestic Life and Social Change, London, 1991.
7. Fortes, M. Ed., Marriage in Tribal Societies, Cambridge, 1962.
8. Goode, W. J. The Family, New Delhi, 1965.
9. Harlan, Lindsey Courtright, Paul B. Ed., From the Margins of Hindu Marriage, London,1995.
10. kapadia, K. M. Marriage and Family in India, London, 1959.
11. Mace, D. R. Mace, Vera, Marriage: East and West, London 1960.
12. Murdock, G. P. Social Structure, New York, 1949.
13. Stopes, Marie, Married Love, Calcutta, 1966.
14. Westermark, E. A. The History of Human Marriage, 3Vols., (5th Ed.), 1971.
15. Williamson, Robert C. Marriage and Family Relations, New York, 1965.
१६. जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास (आवृ. तिसरी), वाई, १९९६.
१७.राजवाडे,वि. का. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, पुणे १९७६.
वाळुंजकर, त्रि. ना.
“