विल्सन, एडमंड बीचर : (१९ ऑक्टोबर १८५६–३ मार्च १९३९). अमेरिकन जीववैज्ञानिक. भ्रूणविज्ञान व कोशिकाविज्ञान यांमधील संशोधनाबद्दल प्रसिद्ध. कोशिकांची रचना व त्यांचे क्रियाविज्ञान तसेच प्राण्यांतील प्रारंभीच्या अवस्थांच्या विकासाचे संशोधक म्हणून ते ओळखले जात. जिनीव्हा (इलिनॉय राज्य) येथे त्यांचा जन्म झाला. येल विद्यापीठाच्या शेफील्ड सायंटिफिक स्कूल मधून त्यांनी पीएच्. बी. पदवी मिळविली (१८७८). जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून त्यांनी पीएच्. डी. पदवी संपादन केली (१८८१). विल्यम्स कॉलेज (विल्यम्स टाउन), मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ब्रॅनम्वॉर कॉलेज येथे विविध पदांवर त्यांनी काम केले. १८९१ साली ते कोलंबिया विद्यापीठाच्या प्राणिविज्ञान विभागात रुजू झाले. विभाग प्रमुख म्हणून ते तेथून सेवानिवृत्त झाले. डा कोस्टा येथे असताना त्यांना संशोधनाबद्दल आंतरराष्ट्रीय कीर्ती आणि अनेक मानसन्मान मिळाले.
गुणसूत्राच्या अभ्यासाकडे ते १९०५ साली वळले. अर्धसूत्री विभाजनाचाही त्यांनी अभ्यास केला. डे विनीवॉटर यांचे समीपस्थितीवरील भाष्य खरे आहे असे त्यांनी दाखविले. अंड्याच्या पहिल्या विदलनाच्या वेळी तयार झालेल्या कोशिका (पेशी) अलग होण्याच्या वेळी पूर्ण डिंभामध्ये किंवा अंशतः त्यांच्या भागात विकसित होत असाव्यात असे रॉक्स व ड्रिसेच यांनी प्रयोगांद्वारे मांडले होते. विल्सन यांनी या प्रयोगावर अधिक अभ्यास करून पुराव्यानिशी दोन व्यवच्छेदक प्रकारची अंडी नसावीत असे मत मांडले. निश्चितीकरण व विदलन यांमधील वेळेच्या संबंधावर ते घडत असावे असे मत व्यक्त केले. अवर्णी तर्कू व तारा यांच्या आधारे प्रयोग करून त्यांचा कोशिका विभाजन व सूत्री विभाजन यांच्याशी असलेला संबंध विशद केला.
भ्रूणविज्ञानातील त्यांच्या सुरुवातीच्या प्रायोगिक अध्ययनामुळे त्यांचे अनुसंधान कोशिकीय स्तरावर गेले. कोशिका वंशावळीवरील कार्यामुळे ते त्याचे प्रख्यात जनक म्हणून प्रसिद्धी पावले. कोशिका वंशावळ म्हणजे व्यक्तिगत पूर्वगामी कोशिकांपासून विभिन्न प्रकारचे ऊतक (समान रचना व कार्य असलेले पेशीसमूह) कसे निर्माण होतात याचा मागोवा घेणे होय. त्यानंतर त्यांनी आपले लक्ष आंतरिक कोशिकीय संघटनाकडे वळविले. १८९६ मध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेल्या दि सेल इन डेव्हलपमेंट अँड इनहेरिटन्स या ग्रंथामुळे जीववैज्ञानिक विचारसरणीवर खूप खोलवर, दूरगामी परिणाम झाला. याच ग्रंथाचे १९२५ साली दि सेल इन डेव्हलपमेंट अँड हिरिडिटी या शीर्षकाने पुनर्मुद्रण करण्यात आले.
लिंग निश्चितीच्या समस्या हा त्यांच्यापुढील आवडीचा विषय होता. लिंग निश्चितीमध्ये गुणसूत्रांचा संबंध यावर शोधनिबंधांचे मालिका लेखन हा त्यांच्या कोशिकावैज्ञानिक अध्ययनाचा कळस होय. ⇨ग्रेगोर मेंडेल यांच्या आनुवंशिकीवरील सुरुवातीच्या महत्त्वाच्या कार्याची पुनर्मांडणी झाल्यावर, ते कार्य १९०० मध्ये पुनःसंशोधित झाल्यावर विल्सन यांच्या हे लक्षात आले की, गुणसूत्रांचे कार्य फक्त लिंग निश्चितीशीच निगडित नसून एकूणच आनुवंशिकीमध्ये त्यांचे कार्य महत्त्वाच्या घटकाचे आहे. त्यांच्या कल्पनांचा आनुवंशिकीतील भविष्य काळातील संशोधनावर जबरदस्त प्रभाव पडला.
अत्यंत बुद्धिमान शिक्षक व तळमळीचा संशोधक कार्यकर्ता म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आपल्या प्रयोगशाळेकडे आकर्षित केले.
अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसचे अधिछात्र, नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे अध्यक्ष व अमेरिकन ॲसोसिएशन फॉर दि ॲडव्हान्समेंट ऑफ आर्ट्स सायन्सचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मोलाचे कार्य केले. अनेक परदेशी शास्त्रीय संस्थांचे ते सदस्य होते.
न्यूयॉर्क येथे ते निधन पावले.
जमदाडे, ज. वि.
“