विल्यम्स, टेनेसी : (२६ मार्च १९११–२५ फेब्रुवारी १९८३). विख्यात अमेरिकन नाटककार. मिसिसिपी राज्यातील कोलंबस येथे जन्मला. १९१८ साली त्याचे वडील आपल्या कुटुंबियांसह उत्तरेकडील सेंट लूइस ह्या शहरी राहावयास आले. ह्या शहरात गेलेले त्याचे बालपण ‘एकाकी आणि दुःखमय’ होते, असे त्याने म्हटले आहे. तो हळवा आणि प्रकृतीने नाजुक होता. समवयस्क मुलांबरोबर विविध प्रकारच्या मैदानी खेळांमध्ये सहभागी होणे त्याला जमत नसे. त्यामुळे त्याच्या बरोबरीची मुले आणि खुद्द त्याचे वडीलही त्याची हेटाळणी करत. दक्षिणेकडील कोलंबस ह्या छोट्याशा गावात सात वर्षे गेल्यामुळे त्याचे उच्चार दक्षिणेकडचे होते. त्या गावातून एकदम उत्तरेकडील मोठ्या शहरात येण्यातला बदलही त्याला मानवला नाही. ह्यातून त्याला फार एकाकी वाटू लागले. पुढे त्याची एकुलती एक बहीण वेडी झाली. ह्या सर्व दुःखद अनुभवांच्या प्रभावातून तो लेखनाकडे वलला. वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षापासूनच पारितोषिकांच्या व अन्य रूपाने त्याच्या लेखनाची थोडीफार दखल घेतली जात असल्याचे दिसते. १९२९ साली त्याने मिसूरी विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथेही लेखनाची पारितोषिके त्यास मिळाली. तथापि १९३२ साली त्याच्या वडिलांनी त्याचे शिक्षण थांबवून त्याला बुटांच्या एका कंपनीत नोकरी करण्यास भाग पाडले. तेथे असताना तो दिवसा कंपनीतील काम व रात्री लेखन करीत असे. दोन वर्षानी तो मानसिक दृष्ट्या इतका ढासळला, की त्याला महिनाभर रुग्णालयात राहावे लागले. त्यानंतरच्या विश्रांतीच्या काळात कैरो ! शांघाय ! बाँबे ! हे नाटक त्याने लिहिले.
त्याला आपल्या आजी-आजोबांचा विशेष आदार होता. त्याच आधारावर १९३५ साली तो सेंट लूइस येथील ‘वॉशिंग्टन विद्यापीठा’त शिकू लागला. त्याच काळात ‘ममर्स’ नावाच्या नाटकमंडळीसाठी त्याने नाट्यलेखन केले. पुढे १९३७ मध्ये तो आयोवा विद्यापीठात नाट्यलेखनाचा खास अभ्यास करण्यासाठी गेला. स्प्रिंग स्टॉर्म (१९३८) हे आपले नाटक त्याने तेथे सादर केले. त्याच वर्षी तो बी. ए. झाला.
द ग्लांस मिनॅजरी (१९४५) हे विल्यम्सचे पहिले यशस्वी नाटक. यात इतक्या आत्मचरित्रात्मक खुणा आहेत, की खुद्द लेखकानेच त्याचे एक ‘स्मृतिप्रधान नाटक’ असे वर्णन केलेले आहे. एका पांगळ्या तरुण मुलीच्या या शोकांतिकेतील नायिकेची आवडती, इवली, नाजुक काचेची खेळणी कल्पनासृष्टीत हरवून जाणाऱ्या तिच्या मानसिकतेचे हृद्य प्रतीक ठरतात. अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर (१९४७) हे विल्यम्सचे आणखी एक अतिशय गाजलेले नाटक. यात सुसंस्कृत परंतु कल्पनेच्या आभासमय दुनियेतच रमणारी व दुबळी ब्लांटश ही स्त्री रांगड्या व बलदंड अशा स्टॅन्ली या पुरुषाच्या हातून कशी उद्ध्वस्त केली जाते याचे प्रभावी चित्रण आहे. विल्यम्सची समर अँड स्मोक (१९४८) व द रोझ टॅटू (१९५१) ही नाटकेही आभासलोलुपता व वास्तववाद यांच्यातील अटळ संघर्ष, याच मुख्य विषयावर आदारित आहेत. एका दक्षिण देशीय कुटुंबात जमीनजुमल्यासाठी चाललेल्या भांडणांतून मानवी स्वभावाच्या अनेक नमुन्यांचे दर्शन कॅट ऑन अ हॉट टिन रूफ (१९५५) मध्ये दिसते. संवेदनशील, अगतिक स्त्रियांची एकलेपणाच्या आगीतून निसटण्याची केविलवाणी धडपड हा ऑर्फिअस डिसेंडिंग (१९५८), गार्डन डिस्ट्रिक्ट [समथिंग अन्स्पोकन आणि सड्नली लास्ट समर (दोन्ही १९५८) ह्या दोन नाटकांना मिळून दिलेले हे नाव आहे.] आणि स्वीट बर्ड ऑफ यूथ (१९५९) या नाटकांचा स्थायी भाव आहे. पीरिअड ऑफ ॲड्जस्टमेंट (१९६०) ही कौटुंबिक सुखांतिका आपल्या वेगळेपणामुळे विल्यम्सच्या नाट्यसंसारात उठून दिसते. त्यानंतरच्या द नाइट ऑफ द इग्वाना (१९६१) व द मिल्क ट्रेन डझन्ट स्टॉप हिअर एनी मोअर (१९७६) यांत विल्यम्सची गाडी पुन्हा पूर्वपदावर आल्याची साक्ष पटते. किंग्डम ऑफ अर्थ (१९६८) व इन द बार ऑफ अ टोकिओ हॉटेल (१९७०) मध्ये मात्र विल्यम्सला आता फारसे काही नवीन सांगण्यासारखे राहिलेले नाही याची जाणीव होते. अर्थात त्यानंतरही त्याने काही नाट्यलेखन केले आहे. उदा., ए परफेक्ट अनॅलिसिस गिव्हन बाय ए पॅरट (१९७०), स्मॉल क्राफ्ट वॉर्निंग्ज (१९७२) इत्यादी.
नाटकांखेरीज द रोमन स्प्रिंग ऑफ मिसेस स्टोन (१९५०) ही कादंबरी व इन द विटर ऑफ सिटीज (१९५६) हा काव्यसंग्रहही विल्यम्सच्या नावावर जमा आहे. त्याने काही कथालेशनही केले आहे.
लैंगिक व मानसिक विकृती, मनोगंड व आंतरिक द्वंद्वे यांचे चित्रण करताना विल्यम्स अनेक वेळा सवंग भडकपणाचा आश्रय घेतो, अशी त्याच्यावर टीका केली आहे. परंतु या चित्रणात त्याने केलेला प्रतीकांचा प्रत्यकारी उपयोग या आरोपापासून त्याचा बचाव करण्यास समर्थ ठरतो. ही प्रतीके उपयोजिताना त्याची शैलीही भावपूर्ण बनून जाते. यंत्रयुगात संवेदनक्षम जीवांची होणारी होरपळ प्रभावीपणे दाखविणारी विल्यम्सची नाटके आधुनिक मनाला जवळची वाटतात. विल्यम्सचे नाट्यतंत्रही प्रयोगशील आहे. प्रेक्षकांशी हितगूज करणारा निवेदक, तऱ्हेकऱ्हेची सूचक प्रतीके, सुयोग्य संगीत व प्रकाशयोजना तसेच प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोरच विशिष्ट पोशाख केलेल्या पात्रांकडून नेपथ्यरचना बदलून घेणे इ. अनेक यशस्वी तंत्रविषयक प्रयोग विल्यम्सने केलेले आहेत. न्यूयॉर्क शहरी त्याचे निधन झाले.
संदर्भ : 1. Donahue, F. The Dramatic World of Temessee Willams, New York 1964.
2. Jackson, E. M. The Broken World of Tennessee Williams, Madison, 1966.
3. Leavitt. R. The World of Tennessee Williams, New York, 1978.
4. Nelson, B. Tennessee Williams, New York, 1961.
5. Obolensky, I. Tennessee Williams: The Man and His Work, New York, 1961.
6. Stanton, S. S. Ed. Tennessee Williams, Englewood Cliffs (N. J.), 1977.
7. Tischler, N. Tennessee Williams, Rebellious puritan, New York, 1965.
8. Weales, G.Tennessee Williams, Minneapolis, 1965.
नाईक, म. कृ.
“