बॉल्डविन, जेम्स : (२ ऑगस्ट १९२४ – ). अमेरिकन निग्रो कादंबरीकार, नाटककार आणि निबंधकार. न्यूयॉर्क शहरात जन्म. बॉल्डविनचे वडील बॅप्टिस्ट धर्मोपदेशक होते. झोपडपट्टीत तो वाढला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या कुटुंबियांच्या निर्वाहासाठी त्याने अनेक प्रकारची कामे केली हलाखीत दिवस काढले. १९४८ मध्ये तो पॅरिसला गेला आणि तेथे तो काही वर्षे राहिला. गो टेल इट ऑन द माउंटन ही त्याची पहिली कादंबरी १९५३ मध्ये प्रसिद्ध झाली. ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीचा समावेश बॉल्डविनच्या उत्कृष्ट साहित्यकृतींत केला जातो. ‘वर्णवादाचा वास न येणारी निग्रो जीवनावरील पहिली कादंबरी’ असे तिचे स्वागत झाले. नोट्स ऑफ ए नेटिव्ह सन (१९५५-निबंधसंग्रह) आणि जोव्हान्नीज रूम (१९५६-कादंबरी) ह्या त्यानंतरच्या पुस्तकांनी प्रक्षोभक साहित्यिक म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित झाली. १९५७ मध्ये बॉल्डविन अमेरिकेत परतला आणि निग्रोंच्या समान नागरी हक्कांसाठी देशात चालू झालेल्या वादळी चळवळीत त्याने भाग घेतला. नोबडी नोज माय नेम हा त्याता दुसरा निबंधसंग्रह १९६१ मध्ये प्रसिद्ध झाला. निग्रो आणि गोरे ह्यांच्यातील परस्परसंबंधांचे संकुल स्वरूप त्यातील निबंधांतून त्याने व्यक्तविले आहे तसेच कलावंत आणि समाज ह्यांच्यातील नात्यावरही त्याने प्रकाश टाकला आहे. १९६२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या अनदर कंट्री ह्या कादंबरीत निग्रो-गोरे संबंधाबाबत एक प्रकारचा निराशावाद प्रत्यायास येतो. केवळ वंशभिन्नतेमुळे भय, द्वेष, तिरस्कार अशा भावनांनी पछाडली गेलेली माणसे ह्या कादंबरीत आपणास भेटतात. ‘टेल मी हाउ लाँग द ट्रेन’स बीन गॉन ही त्याची आणखी एक कादंबरी १९६८ मध्ये प्रसिद्ध झाली. द फायर नेक्स्ट टाइम (१९६३) हे त्याचे पुस्तक-हा एक दीर्घ लेख आहे-विशेष गाजले. अमेरिकेतील निग्रोंची खोल परिवेदना त्यातून व्यक्त झालेली आहे आणि ‘निग्रोंबरोबर जगूनच गोऱ्यांना समाधानाचे जीवन जगता येईल’ अशा आशयाचे विचार बॉल्डविनने त्यात मांडलेले आहेत. पुस्तकरूपाने प्रसिद्ध होण्यापूर्वी, १७ नोव्हेंबर १९६२ रोजी, हा दीर्घ लेख न्यूयॉर्कर ह्या मासिकात प्रकाशित झालेला होता. ब्लूज फॉर मिस्टर चार्ली (प्रयोग १९६४). आमेन कॉर्नर (प्रयोग १९६५) ही त्याची नाटके. पहिल्या नाटकात निग्रो-गोरे ह्यांच्या शत्रुत्वाचा बळी ठरलेल्या एका निग्रो गायकाचे जीवन दाखविले असून दुसऱ्यात धर्मवेड आणि जॅझ संगीतकार नवऱ्याबद्दल वाटणारे प्रेम ह्यांच्या कात्रीत सापडलेल्या एका इन्व्हँजलिस्ट स्त्रीचे चित्रण त्याने केलेले आहे. गोइंग टू मीट द मॅन ह्या नावाने त्याच्या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत (१९६५). अमेरिकन निग्रोंतील पहिल्या दर्जाचा लेखक म्हणूनच नव्हे, तर एक निग्रो पुढारी व विचारवंत म्हणूनही बॉल्डविनची ख्याती आहे.

संदर्भ : 1. Bone, Robert, The Negro Novel in America, rev. ed. N. Y., 1965. 2. Eckman, F. M. The Furious Passage of James Baldwin, N. Y., 1968.

नाईक, म. कृ.