विरंजक चूर्ण : (ब्लीं चिंग पावडर क्लोरिनेटेड लाइम क्लोराइड ऑफ लाइम). क्लोरिनापेक्षा किंचित निराळा उग्र वास असलेले हे मंद पांढरे चूर्ण असून ते विरंजक (रंग घालविणारे द्रव्य) म्हणून वापरतात. क्ष-किरण विश्लेषणाच्या निष्कर्षावरून विरंजक चूर्ण हे कॅल्शियम हायपोक्लोराइड [Ca ( OCI )2], कॅल्शियम क्लोराइड (Ca Cl2) आणि कॅल्शियम हायड्रॉक्साइड [Ca ( OH ) 2] यांचे मिश्रण असल्याचे दिसून आले. सजलीकृत जुन्याचे ( हायड्रेटेड लाइम ) क्लोरिनीकरण करून हे चूर्ण बनवितात परंतु पुढे दिलेली ही विक्रिया कधीही पूर्ण होत नसते.

3 Ca (OH)2 + 2 Cl2 ⟶ Ca (OCl)2. CaCl2. Ca (OH)2. 2 H2 O

अतिरिक्त सौम्य अम्ला ची विरंजक चूर्णाबरोबर विक्रिया झाल्यास क्लोरीन वायू मुक्त होतो. या क्लोरिनाला प्राघ्य (मिळण्याजोगा) क्लोरीन असे म्हणतात. 

Ca (OCl)2 + H2 SO4 ⟶ CaSO4 + Cl2 + H2O

व्यापारी विरंजक चूर्णामध्ये ३५-३७ टक्के प्राप्य क्लोरीन असतो. ⇨क्लोरीन मुख्यतः विरंजनासाठी (रंग घालविण्याच्या क्रियेसाठी) वापरतात. त्याची वाहतूक करणे अवघड जात असल्याने १७९९ मध्ये चार्ल्स टेनंट यांनी जास्तीत जास्त क्लोरिनाची वाहतूक करता यावी म्हणून विरंजक चूर्णाचा प्रथम वापर केला.

विरंजक चूर्णाचे उत्पादन करण्यासाठी उच्च दर्जाचा नमुना व क्लोरीन हा मुख्य कच्चा माल लागतो. दाहक (कॉस्टिक) सोड्याच्या निर्मितीकरिता खाऱ्या पाण्याचे विद्युत्‌ विच्छेदन करताना उप-उत्पादन म्हणून मिळणारा क्लोरीन मुख्यतः यासाठी वापरतात. यासाठी वापरण्यात येणाऱ्या सजलीकृत चुन्यात शुद्ध चुना ९५% व पाणी ४% असते. विक्रिया-कोठीमध्ये स्फोट घडू नये म्हणून क्लोरीन हायड्रोजनविरहित असावा लागतो. विरंजक चूर्ण ओतीव लोखंडाच्या किंवा लाकडी पिंपात साठवितात.

विरंजक चूर्ण ४०° से. तापमानाला ठेवल्यास जलशोषक नसते. उत्पादनाच्या वेळी किंवा साठविताना त्याचे तापमान ४०° से. पेक्षा अधिक झाल्यास त्यामध्ये बदल होतो आणि ते चांगले जलशोषक बनते. हे चूर्ण तापमानाला अशा प्रकारे संवेदनशील असल्यामुळे त्याच्या वापरावर मर्यादा पडतात. विरंजक चूर्ण कितीही चांगल्या प्रकारे साठवून ठेवले, तरी त्यातील सर्व क्लोरीन एका वर्षात नाहीसा होतो.

विरंजक चूर्ण उष्ण हवामानात लवकर खराब होते. त्यामधील क्लोरिनाचे प्रमाण स्थिर ठेवण्यासाठी काही वेळा त्यात चुन्याची निवळी मिसळतात. यालाच ‘ट्रॉपिकल ब्लिथच’ असे म्हणतात. चुन्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे पाण्याबरोबर त्याची विक्रिया झाल्यानंतर उरलेल्या साख्यामध्ये अनिष्ट घटक असतात. त्या घटकांमुळे कापडाच्या रंजनक्रियेत दोष निर्माण होतात.

विरंजक चूर्णाच्या अस्थिरपणामुळे त्याची जागा नवीन विरंजकांनी घेतली आहे. उदा., क्लोरीन आणि सोडियम हायपोक्लोराइट यांचा कापडाच्या विरंजनासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. या विरंजकांमुळे रंजनक्रियेत दोष निर्माण करणारी अनिष्ट कॅल्शियम लवणे अत्यल्प प्रमाणात मागे राहतात.

विरंजक चूर्णामुळे होणारे विरंजन हा ऑक्सिडीकरणाचा [⟶ ऑक्सिडीभवन] प्रकार आहे. क्लोरीन पाण्यात विरघळून क्रियाशील ऑक्सिजन मुक्त होतो व तो कार्बनी रंगाचे ऑक्सिडीकरण करून रंग घालवितो.

विरंजक चूर्णाचा वापर मुख्यतः सुती धागे व कापड, कागदाचा लगदा, लाकडाचा भुसा व ताग यांचे विरंजन करण्यासाठी होतो. ह्याचा उपयोग जंतुनाशक म्हणून (विशेषतः जखमा, शस्त्रक्रिया यांसाठी वापरण्यात येणाऱ्या मलमपट्‌ट्या इत्यादींच्या निर्जंतुकीकरणासाठी), पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी, क्लोरोफॉर्मच्या उत्पादनासाठी लागणारा क्लोरीन मिळविण्यासाठी आणि लोकरीचे आकुंचन टाळण्यासाठी होतो. काही देशांत हे मुख्यतः सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता यांकरिता वापरले जाते.

पहा : विरंजन. 

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Part I, Delhi, 1948.

बागडे, शं. ना.