विभेद मानसशास्त्र : (डिफरेन्शल सायकॉलॉजी). व्यक्ती किंवा त्यांचे विविध गट ह्यांच्या वर्तनात दिसून येणारे विभेद वा फरक हा ‘विभेद मानसशास्त्र’ ह्या अभ्यासक्षेत्राचा विषय होय. हा अभ्यास केवळ मानवांपुरता मर्यादित नसून त्यात सर्व सजीवांचा समावेश केला जातो. जीवशास्त्रीय परिस्थिती आणि आसमंत ह्यांच्यातील परिवर्तनांमुळे सजीवांच्या वर्तनावर जे परिणाम होतात, त्यांच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे सजीवांच्या वर्तनाचे आकलन करून घेण्याचा विभेद मानसशास्त्राचा प्रयत्न असतो.

विभेद मानसशास्त्राची मूळ कल्पना एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ⇨फ्रान्सिस गॉल्टन (१८२२-१९११) ह्यांच्या अभ्यासात आढळते. त्यांनी वातावरणातील भिन्नभिन्न प्रक्रियांनुसार आढळणाऱ्या विशिष्ट संस्कृती, राहणीमान, विचारप्रणाली ह्यांची माहिती गोळा करून आकडेवारीनुसार तिचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे, तर लोकोत्तर व्यक्तींच्या वंशावळींचे व त्यानुसार प्रकट होणाऱ्या गुणावगुणांचे विश्लेषण करण्यासही आरंभ केला होता.

व्यक्तिव्यक्तींमध्ये असणारा फरक हा एक सार्वत्रिक अनुभव आहे. कोणत्याही दोन वा अधिक व्यक्तींमध्ये काही साम्य असू शकते परंतु त्या सर्व दृष्टींनी, अगदी एकसारख्या अशा कधीच नसतात. शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, अभियोग्यता (ॲटिपटयूड), स्वभाव, भावनाशीलता, भावनिकता, कार्यक्षमता अशा निरनिराळ्या बाबतींत या वेगळ्या असतात आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या परीने अनन्यसाधारण असते. आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या व्यक्तींशी आपल्याला जुळवून घ्यावे लागते. जीवशास्त्रीय, सामाजिक-सांस्कृतिक, राष्ट्रीय अशा काही निकषांवर-उदा., वंश, लिंग, वय सामाजिक-सांस्कृतिक स्तर वा वर्ग राष्ट्रीयत्व-माणसांचे काही गट केले जातात. एक विशिष्ट क्षमता, वृत्ती, स्वभाव ह्या गोष्टी गटांशी निगडित केल्या जातात. उदा., अमुक एका वंशाचे लोक इतरापेक्षा श्रेष्ठ असतात स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक भावनाप्रधान असतात इत्यादी. असे निष्कर्ष बरोबर आहेत वा असतात असे मानले, तरी अशा गटांतील व्यक्तीही ‘व्यक्ती’ म्हणून एकसारख्या नसतात.

व्यक्तिव्यक्तींमधील फरकांचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीची आनुवंशिकता आणि तिला प्राप्त झालेला आसमंत हे होय त्यामुळे आनुवंशिकता आणि आसमंत हा विभेद मानसशास्त्राच्या अभ्यासक्षेत्रात अंतर्भूत असलेला एक महत्त्वाचा विषय होय. व्यक्तीची आनुवंशिकता ही केवळ तिच्या आईवडिलांपुरतीच मर्यादित नसते, तर तिच्या आईवडिलांच्या आधीच्या पिढयांतील पूर्वजांचाही तिच्या आनुवंशिककतेत समावेश होतो. ‘आसमंत’ म्हणजे ही व्यक्ती राहत असते तेवढा भौगोलिक परिसर नव्हे. ज्यातून व्यक्ती निर्माण होते, ते गर्भबीज गर्भाशयाची वाटचाल करू लागल्यापासूनच एक विशिष्ट आसमंत त्या गर्भबीजाला प्राप्त होत असतो. गर्भबीजातील कोशिकाद्रव हा त्या गर्भबीजाचा अंतःकोशिकी आसमंत म्हणता येईल. ह्या कोशिकाद्रवाचा जनुकांवर, म्हणजे आनुवंशिक गुणधर्माच्या वाहकांवर प्रभाव पडत असतो. जनुकांच्या संभाव्य संयोगांतील (काँबिनेशन्स) विविधता जवळपास ‘अमर्याद’ म्हणता येईल, अशी असल्यामुळे सजीवांमध्ये-विशेषतः बरीच गुंतागुंतीची शरीररचना असलेल्या मनुष्यप्राण्यामध्ये-व्यक्तिव्यक्तींनुसार अनेक प्रकारचे विभेद निर्माण होतात.

व्यक्तीला काही गोष्टी तिच्या विशिष्ट आनुवंशिकतेमुळे मिळत असतात, तर काही तिच्या आसमंतामुळे प्राप्त होत असतात. आनुवंशिकता आणि आसमंत ह्यांची सतत अन्योन्यक्रिया चालू असल्यामुळे ‘माणसाच्या जीवनात अन्न अधिक महत्त्वाचे की पाणी?’ असा प्रश्न उपस्थित करणे जसे अप्रस्तुत ठरेल त्याचप्रमाणे ‘व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण असे व्यक्तिमत्त्व आकारास येते, ते तिच्या आनुवंशिकतेमुळे की तिला लाभलेल्या आसमंतामुळे?’ असा प्रश्नही उपस्थित करता येत नाही. व्यक्तिमत्वविकास हा आनुवंशिकता आणि आसमंत ह्या दोघांचा परिपाक आहे, असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल.

आनुवंशिकता आणि आसमंत ह्यांचा व्यक्तीच्या जडणघडणीवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी ह्या दोन घटकांतील एक स्थिर आणि दुसरा चल ठेवून निरीक्षणे केली जातात. समान आनुवंशिकता असलेल्या एकांडज जुळ्यांचा (आयडेंटिकल टिवन्स) त्यासाठी उपयोग करून घेतला जातो. अशी भावंडे वेगवेगळ्या आसमंतांत वाढविली गेल्यास त्यांच्या बुद्धिगुणांकांत, स्वभावात काय फरक पडतो द्विअंडज जुळ्या (फ्रॅटर्नल टिवन्स) भावंडांमधील आनुवंशिक तफावत किती असते, त्यांच्या बुद्धिगुणांकांत समान वा वेगवेगळ्या आसमंतांत किती फरक पडतो?बुद्धिमत्तेखेरीज अन्य मानसिक गुणांवर आसमंताचा किती प्रभाव पडतो? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मानसशास्त्रज्ञांनी प्रयत्न केलेला आहे. व्यक्ती जेथे वाढतात, तो आसमंत समान असल्यास केवळ भिन्न आनुवंशिकतेमुळे त्यांची व्यक्तिमत्त्वे कशी वेगळी होतात? मातापिता आणि त्यांची अपत्ये ह्यांच्यातील बौद्धिक सहसंबंध सरासरीने किती असतो? अतिशय बुद्धिमान व्यक्तींची मुले बुद्धिमत्तेत आपल्या आईवडिलांसारखीच असतात काय? देहामनाने विकृत असलेल्या व्यक्तींच्या विकृती आनुवंशिक किती आणि आसमंतीय कारणांनी निर्माण झालेल्या किती? अशा प्रश्नांचा अभ्यासही विभेद मानसशास्त्र करते तथापि अमुक एक गुण वा अवगुण निव्वळ आनुवंशिकतेमुळे वा निव्वळ आसमंताच्या प्रभावामुळे निर्माण होतो, असे गणिती काटेकोरपणाने सांगता येत नाही.

ऑस्ट्रियन जीववैज्ञानिक ⇨ग्रेगोर मेंडेल (१८२२-१८८४) ह्यांचा जनुकविषयक सिद्धांत प्रकाशात आल्यानंतर आनुवंशिकतेच्या संदर्भात वेचक प्रजननाचे (सिलेक्टिव्ह ब्रीडिंग) प्रयोग करण्यात आले. त्यांच्या निष्कर्षांनाही विभेद मानसशास्त्राच्या अभ्यासक्षेत्राला महत्त्वाचे योगदान लाभले. ‘कर्तृत्ववान, बुद्धिमंत आईवडिलांची मुले त्यांच्यासारखीय होतात आणि त्यामुळे काही ठरावीक घराण्यांमध्ये कर्तृत्व आणि बुद्धिमत्ता नांदताना दिसते’ अशा आशयाचा सिद्धांत मांडून सर फ्रान्सिस गॉल्टन ह्यांनी सुप्रजाजननशास्त्राची वाट दाखविली. उत्तम शारीरिक-मानसिक गुणलक्षणे असलेल्या स्त्री-पुरुषांना एकत्र आणून निकोप, कर्तृत्वसंपन्न्, बुद्धिसंपन्न संतती निर्माण करता येईल आणि रोगट, कर्तृत्वहीन, बुद्धिहीन संतती आटोक्यात ठेवता येईल किंवा थांबवताही येईल, असा विचार मांडला जाऊ लागला.


व्यक्तिगत विभेद वा फरक हे दोन प्रकारचे असतात: अंतर्व्यक्तिक विभेद (इंट्रा –इंडिव्हिज्युअल डिफरन्सिस) आणि आंतरव्यक्तिक विभेद (इंटर-इंडिव्हिज्युअल डिफरन्सिस). अंतर्व्यक्तिक विभेद म्हणजे एकाच व्यक्तीत विविध गुणांच्या संदर्भात आढळून येणारे फरक होत. उदा., एखादा विद्यार्थी विविध विषयांमधील त्याच्या व्यक्तिगत प्रगतीमध्ये कमीअधिक प्रमाण दाखवू शकतो. व्यक्तिव्यक्तींमध्ये काही विशिष्ट योग्यता आणि व्यक्तित्व-गुण यांच्या – उदा., बुद्धिमत्ता, बहिर्मुखता इ. -संदर्भात असलेल्या फरकांना आंतरव्यक्तिक विभेद म्हणतात.

विविध व्यक्तींची अभियोग्यता, कार्यक्षमता ह्यांत फरक आढळून येतो. एखाद्या विद्यार्थ्याची अभियोग्यता भाषाज्ञानाच्या वा गणिताच्या बाबतीत दिसून येते असे म्हटले जाते, तेव्हा ह्या विषयांतील नैपुण्य त्याने दाखवून दिलेले असते, असा याचा अर्थ होतो. अभियोग्यता ही व्यक्तीच्या कर्तृत्वातून सिद्ध होणारी तिची अंतःशक्ती होय. भविष्यकाळात अमुक एका व्यक्तीला योग्य संधी व प्रशिक्षण मिळाल्यास ही अंतःशक्ती काय करू शकेल, ह्याचा काही निर्वाळाही त्या व्यक्तीच्या कर्तृत्वातून मिळू शकतो. अनेकदा व्यक्तीच्या अभियोग्यतेचा वा अंतःशक्तीचा योग्य, परिपूर्ण असा आविष्कार होत नाही. एखाद्या मुलाच्या बुद्धिमापन कसोटीतून वा त्याच्यासंबंधीच्या अन्य प्रत्ययांवरून तो मुलगा बुद्धिमान आहे असे लक्षात आले, तरी प्रत्यक्ष परीक्षेत त्याला कमी गुण मिळू शकतात ह्याउलट मंदबुद्धीचा मुलगा वर्गात वयाने इतरांपेक्षा मोठा असल्यामुळे, किंवा त्याने शिक्षकांची मर्जी राखल्यामुळे त्याला अधिक गुण मिळणे शक्य आहे पण म्हणून तो कमी गुण मिळवणाऱ्या मुलापेक्षा अधिक बुद्धिमान ठरत नाही.

प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या परीने अनन्यसारधारण असते हे जरी खरे असले, तरी व्यक्तिव्यक्तींमधील बरेचसे फरक हे गुणात्मक असण्यापेक्षा संख्यात्मक वा परिमाणात्मक असतात. म्हणजेच सामान्यतः माणसामाणसांमधले फरक अगदी पराकोटीचे नसतात. उदा., अत्यंत बुद्धिमान आणि अत्यंत मठ्ठ अशा टोकाच्या विरोधी प्रकारातल्या जोड्या कमी असतात. बहुतेक माणसे अशा टोकाच्या जोडयांच्या दरम्यान असतात, असे आढळून येते. हे सांख्यिकीच्या द्वारे सर्वसाधारण संभाव्यता वक्राद्वारे दाखविता येते. हा वक्र घंटेच्या आकाराचा असतो. ह्या वक्राच्या मध्यभागी ६८ टक्के व्यक्ती आढळतात व अगदी थोड्या व्यक्ती दोन टोकांना आढळतात.

व्यक्तिव्यक्तींमध्ये जे फरक होतात, त्यांतील काही लैंगिक भेदांमुळे वा अन्य प्रकारच्या भेदांमुळे व्यक्तींचे जे गट तयार होतात त्यांच्याशी निगडित असतात. लैंगिक भेदांमुळे स्त्री-पुरुषांमध्ये शारीरिक आणि मानसिक पातळ्यांवर जे फरक होतात, त्यांचा अभ्यास करण्यात येणारी एक महत्त्वाची अडचण म्हणजे स्त्रियांची वाढ आणि परिपक्वन पुरुषांच्या तुलनेत आधिक वेगाने होते असते, हे होय. वयाच्या विसाव्या आणि पंचविसाव्या वर्षांच्या दरम्यान तरुण मुले ही त्या वयाच्या मुलींच्या तुलनेत अधिक उंच, अधिक वजनाची आणि अधिक ताकदवान होतात. तथापि वयाच्या सहाव्या ते बाराव्या वर्षांच्या दरम्यान अनेक मुली त्याच वयाच्या मुलांपेक्षा अधिक मोठ्या आणि सशक्त झालेल्या असतात.

लैंगिक भेदांमुळे निर्माण होणाऱ्या फरकांच्या संदर्भात विसाव्या शतकाच्या आरंभापासून बरेच संशोधन झाले आहे, त्यांतून आलेले काही निष्कर्ष असे: स्त्री-पुरुषांत लिंगभेदामुळे होणारे फरक फार मोठे नसतात. बुद्धिमत्तेच्या बाबतींत स्त्रिया पुरुषांच्याच तोडीच्या असतात. शालेय जीवनात मुली ह्या मुलांपेक्षा अधिक वरचढ ठरतात. शालेय वयात मुलांची वाढ मुलींच्या वाढीच्या तुलनेत मंद गतीने होत असल्यामुळे हा फरक होऊ शकतो. मुली मुलांपेक्षा अधिक नेटक्या, आज्ञाधारक आणि व्यवस्थित वर्तन करणाऱ्या असतात. मुलींची शब्दसंपदा अधिक असते. मुले यांत्रिक खेळणी, अवघड गणिते सोडविणे, विखुरलेल्या वस्तूंच्या परस्परांशी असलेल्या संबंधाचा विचार करून ते हाताळणे ह्यांत विशेष रस घेतात, शक्तीची आणि मेहनतीची कामे करतात, स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक जगतात, असे निरीक्षण आहे.

सामाजिक आणि आर्थिक निकषांवर माणसांचे काही समूह वा वर्ग तयार झालेले दिसतात. शिक्षण, व्यवसाय आणि आर्थिक स्थिती ह्यांवर कोण कोणत्या वर्गात असतो, हे ठरते. प्रत्येक वर्गातल्या त्या माणसांची काही विशिष्ट जीवनशैली असते. त्या-त्या वर्गातली माणसे शक्यतो आपल्याच वर्गातील व्यक्तींशी विवाह करतात. सामाजिक वर्ग आणि सर्वसामान्य बुद्धिमत्ता ह्यांचा काही सहसंबंध असतो, असेही अनेक अभ्यासकांना संशोधनांती आढळून आले आहे.

वर्णाच्या निकषांवर करण्यात येणाऱ्या ‘श्वेतवर्णीय’ आणि ‘कृष्णवर्णीय’ ह्या वर्गांपैकी श्वेतवर्णीय हे श्रेष्ठ होत, अशी धारणा निर्माण केली गेली. तथापि बुद्धिमत्तेमध्ये कृष्णवर्णीय श्वेतवर्णीयांच्या तुलनेत फारसे कमी पडत नाहीत. थोडेसे कमी पडले, तर त्याचे कारण त्यांना श्वेतवर्णीयांइतक्या संधी मिळत नाहीत, हे असू शकते. 

एखाद्या राष्ट्रातील व्यक्तींच्या स्वभावांविषयी केली जाणारी सर्वसामान्य विधानेही स्थूल मानानेच केलेली असतात. ही स्वभाववैशिष्टये आसमंतीय कारणांमुळे निर्माण झालेली असतात आणि त्यांना अनेक अपवादही असतात. 

पहा : आनुवंशिकता व आसमंत सुप्रजाजननशास्त्र. 

संदर्भ : 1.Anastasi, A. Foley, J. P. Differential Psychology, New York,1958.

            2. Galton, Francis, Hereditary Genius, London, 1986.

            3. Garn, S.M. Human Races, 1935.

           4. Guilford, J.P. Ed., Fields of Psychology, London, 1950.

           5. Jung, Carl Trans. Baynes, H. G. Psychological Types, New York, 1924.

           6. Klineberg, O. Race Differences, New York, 1935.

           7. Tyler, L. E. The Psychology of Human Differences, New York,1956. 

कुलकर्णी, अ. र.