विनयपिटक : त्रिपिटकातील एक पिटक. ह्या पिटकात ⇨पातिमोख्याचा अंतर्भाव असलेले सुत्तविभंग, त्याचप्रमाणे खंधक आणि परिवार ह्या मुख्य ग्रंथांचा समावेश आहे. सुत्तविभंगाचे ‘पराजिक’ व ‘पाचित्तिय’ असे दोन पोटविभाग आहेत. खंधकाचेही दोन पोटविभाग असून त्यांची नावे ‘महावग्ग’ आणि ‘चुल्लवग्ग’ अशी आहेत. संपूर्ण विनयपिटक म्हणजे बौद्ध संघाचे संविधानच होय. बौद्ध संघाची व्यवस्था, भिक्षु-भिक्षुणींची नित्य-नैमित्तिक कृत्ये इत्यादींसंबंधीचे नियम एकत्रिच स्वरूपात आणुन शिस्तीबाबत मार्गदर्शन करणे, हा विनयपिटकातचा हेतु. त्या द्दष्टीने बौद्व भिक्षु-भिक्षुणींकडून घडू नयेत, अशा विविध अपराधांचा विचार ह्या पिटकात केलेला आहे. हे सर्व अपराध पातिमोक्खात नमुद केलेले असून अपराध करणाऱ्या. व्यक्तीस कोणते शासन करावे, हेही त्यात सांगितले आहे. संपूर्ण विनयपिटक हे पातिमोक्खाचाच विस्तार मानता येईल. सुत्तविभंगाच्या ‘पाराजिक’ आणि ‘पाचित्तिय’ ह्या दोन पोटविभागांत पातिमोक्खातील भिक्षु-भिक्षुणींकरिता घालून दिलेले नियम का व कसे अस्तित्त्वात आले, यासंबंधीच्या कथा (त्यांत काही नियम कल्पित कथांचाही अंतर्भाव आहे) सांगून त्या नियमांवर स्पष्टीकरणार्थ टीकाही दिल्या आहेत. एखादे कृत्य कोणत्या परिस्थीतीत गुन्हा ठरते व कोणत्या परिस्थितीत ते गुन्हा न ठरता, ज्याच्या हातून प्रमाद घडला असेल, तो दोषमुक्त होतो, हेही सविस्तर सांगितले आहे.

खंधकाच्या पोटविभागांपैकी ‘महावग्गा’ मध्ये बोधिवृक्षाखाली ⇨बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यापासूनची आणि ⇨सारिपुत व ⇨मोग्गल्लान त्याला येऊन मिळाल्यापर्यंतची जीवनकथा सांगितली आहे. त्याचप्रमाणे बौद्ध संघात प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेला दीक्षाविधी, संघातील ‘उपवसथ’ आणि ‘प्रवारणा’ ह्यांसारखे काही धार्मिक विधी, सांघिक जीवनात घडून येणारे प्रमाद आणि त्यांवरीलउपायह्यांची माहिती दिलेली आहे. ह्यासंबंधाने अनेक कथाही प्रसंगोपात्त आल्या असून त्यांमध्ये जीवक कोमारभच्च (कुमार-भृत्य) ह्या राजवैद्यासंबंधीच्या मनोरंजक कथांचाही समावेश आहे. शेवटी बौद्ध संघात फूट कशी पडली यासंबंधीची माहिती दिलेली आहे. ‘चुल्लवग्ग’ ह्या दुसऱ्यात पोटविभागामध्ये भिक्षूंचे सांघिक जीवन, त्यांच्याकडून घडणारे प्रमाद आणि त्या संदर्भातील उपाय, दंडयोजना, प्रायश्चित्ते वगैरे सविस्तरपणे सांगितली आहेत. तसेच विहाराची देखभाल, विहारातील सामानाची काळजीपूर्वक जपणूक, विहारातील लोकांनी एकमेकांच्या संदर्भात पाळावयाचे आचारधर्म व कर्तव्ये, भिक्षुणींच्या बाबतीत पाळावयाचा आचारधर्म इत्यादींबाबत सांगितले आहे. संघभेददर्शक कथाही आहेत. शेवटी राजगृह व वैशाली येथे भरलेल्या दोन बौद्ध संगीत्यांची सविस्तर माहिती दिली आहे.

परिवार (परिवार-पाठ ह्या नावानेही प्रसिद्ध) हा ग्रंथ दीप नावाच्या बौद्ध विद्वानाने सिंहलद्वीपात लिहिला, असे दिसते. सारांशात्मक सूचिवजा अशा स्वरूपाचा हा ग्रंथ असून त्यात सिंहलद्वीपातील विनयाचार्यांची यादी आली आहे. 

बापट, पु. वि.