सुत्तपिटक : पाली भाषेत रचलेल्या बौद्घांच्या ⇨त्रिपिटका तील अत्यंत लोकप्रिय असे पिटक. ह्या पिटकाखेरीज त्रिपिटकात ⇨विनयपिटक आणि ⇨अभिधम्मपिटक अशा दोन पिटकांचा समावेश आहे. पिटक म्हणजे पेटारा. उपर्युक्त प्रत्येक पिटकात त्याचे असे स्वतंत्र घटक ग्रंथ आहेत. दीघनिकाय, मज्झिमनिकाय, संयुत्तनिकाय, अंगुत्तरनिकाय आणि खुद्दकनिकाय अशा पाच निकायांचे वा संग्रहांचे मिळून सुत्तपिटक झालेले आहे. दीघनिकायातील सूत्रे फार मोठी (दीर्घ) आहेत. मज्झिमनिकायातील मध्यम आकाराची आहेत, तर संयुत्तनिकायात निरनिराळ्या सूत्रांचा विषयवार संग्रह केलेला आहे. अंगुत्तरनिकायातील संग्रह संख्यावार केलेला आहे. ह्यात एककनिपात, दुकनिपात, तिकनिपात, चतुक्कनिपात, पंचकनिपात, छक्कनिपात, सत्तकनिपात, अट्‌ठकनिपात, नवकनिपात, दसकनिपात आणि एकादसकनिपात असे अकरा निपात आहेत. एककनिपातात ‘ एक धर्म काय आहे ? ‘ ह्या प्रश्नाचा विचार आहे. दुकनिपातात जी टाळायला हवीत, अशी दोन प्रकारची पापे कोणती, ह्याचे विवेचन आहे. मूर्ख वा अविवेकी माणसे शरीर, वाचा आणि मन ह्या तीन माध्यमांतून पापे करीत असतात, असे तिकनिपातात म्हटले आहे. अशा प्रकारे संख्याबद्घ शैलीत अकराव्या वा एकादसकनिपातापर्यंत विषयांचे विवेचन आहे. अंगुत्तरनिकाया त अगदी १०– ५ ओळींचीही बरीच सूत्रे आहेत.संयुत्तनिकाय आणि अंगुत्तरनिकाय हे दोन संग्रह संदर्भग्रंथांसारखे मुद्दाम रचलेले दिसतात. उपर्युक्त चार निकायांची ( दीघनिकाय ते अंगुत्तरनिकाय ) मांडणी संभाषणपद्घतीने करण्यात आलेली आहे. खुद्दकनिकायात एकूण पंधरा ग्रंथांचा समावेश होतो. ते ग्रंथ असे : (१) खुद्दकपाठ, (२) ⇨धम्मपद, (३) उदान, (४)इतिवुत्तक, (५) सुत्तनिपात, (६) विमानवत्थु, (७) पेतवत्थु, (८) थेरगाथा, (९) थेरीगाथा, (१०) जातक, (११) निद्देस, (१२) पटिसम्भिदामग्ग, (१३) अपदान, (१४) बुद्घवंस, (१५) चरियापिटक तथापि इ. स. ४८९ च्या सुमारास लिहिल्या गेलेल्या विनयपिटकाच्या चिनी संस्करणात चौदाच ग्रंथांचा उल्लेख आहे. खुद्दकपाठ ह्या ग्रंथाचा त्यात निर्देश नाही. खुद्दकपाठ हा छोट्या छोट्या पाठांचा वा सूत्रांचा संग्रह बुद्घाच्या शिकवणीचा अभ्यास करणाऱ्या प्रारंभिक विद्यार्थ्यांसाठी आहे. त्याचप्रमाणे तो बौद्घ गृहस्थांच्या दैनिक पाठासाठीही आहे. धम्मपद हा जागतिक ख्यातीचा ग्रंथ आहे. ह्या लहानशा ग्रंथात बौद्घ धर्माची स्थविर संप्रदायास मान्य असलेली सर्व शिकवण अंतर्भूत झालेली आहे. उदान हाही एक छोटासा, वाचनीय ग्रंथ आहे. त्यात बुद्घाच्या तोंडून निरनिराळ्या प्रसंगी उत्स्फूर्तपणे व्यक्त झालेली वचने आहेत. इतिवुत्तक ह्या ग्रंथातही बुद्घवचने आहेत. सुत्तनिपात हा एक अत्यंत प्राचीन असा गाथासंग्रह असून बौद्घ धर्माच्या प्राथमिक अवस्थेतील भिक्षूंचे आचार व त्यांची ध्येये त्यात सांगितलेली आहेत. विमानवत्थु आणि पेतवत्थु ह्यांत अंतर्भूत असलेल्या गोष्टी कर्माचे महत्त्व लोकांवर बिंबविण्याकरता देवयोनीत किंवा प्रेतयोनीत जन्मलेल्या व्यक्तींच्या तोंडी घातल्या आहेत. थेरगाथा आणि थेरीगाथा हे दोन्ही गाथासंग्रह लोकप्रिय असून त्यांत भिक्षुभिक्षुणींनी प्रव्रज्या का घेतली, नवीन आयुष्यात त्यांना रुची कशी उत्पन्न झाली व त्यांना त्यात अर्हत्‌पदाचा साक्षात्कार कसा झाला, ह्याचे स्वानुभवपर उद्‌गार ग्रथित केलेले आहेत. जातक ह्या नावावरुन हा ग्रंथ गौतम बुद्घाच्या पूर्वजन्मासंबंधीच्या कथा किंवा ⇨जातके ही त्रिपिटकाचाच एक भाग होत असे मानले जाते तथापि जातक ह्या ग्रंथात विविध जातककथांशी संबंधित अशा मुख्य गाथाच आहेत प्रत्यक्ष जातककथा जातककथांशी संबंधित अशा मुख्य गाथाच आहेत प्रत्यक्ष जातककथा नाहीत. निद्देस हा टीकात्मक ग्रंथ आहे. विषय आणि शैली ह्या दोन्ही दृष्टींनी पटिसम्भिदामग्ग हा ग्रंथ अभिधम्मपिटकाला जवळचा आहे. अपदान ह्या ग्रंथात अनेक बौद्घ भिक्षुभिक्षुणींच्या कर्माचे फल निदर्शित करणाऱ्या त्यांच्या मागील जन्मांच्या कथा आहेत. बुद्घवंसा त गौतम बुद्घांच्या पूर्वीचे चोवीस बुद्घ व ते स्वतः ह्यांच्यासंबंधी ठरावीक साच्याचे इतिवृत्त आहे. चरियापिटक हा खुद्दकनिकायातील अखेरचा ग्रंथ. त्यात पस्तीस जातककथा थोडक्यात, पद्यात सांगितलेल्या आहेत. ह्याच्या भाषेत वैदिक अर्थ असलेले शब्द व वैदिक भाषेशी जुळणारी रुपे आढळतात.

खुद्दकनिकाय हा ग्रंथसंग्रह आरंभी खुद्दक ( क्षुद्रक ) म्हणजे कमी महत्त्वाचा समजला गेला, पण पुढे क्रमाक्रमाने अनेक ग्रंथांचा समावेश केल्यामुळे त्याला मान्यता मिळाली.

बापट, पु. वि.