कच्चायन : पाली भाषेचा हा आद्य व्याकरणकार होय, अशी समजूत आहे. ग्रंथांना किंवा ग्रंथकारांना प्राचीनत्व चिकटविण्याच्या प्रवृत्तीमुळे हा व्याकरणकार म्हणजे गौतम बुध्दाच्या प्रमुख ८० शिष्यांपैकी महाकच्चायन हा विद्वान होय, अशी परंपरागत समजूत असली, तरी एकाच नावाच्या अनेक व्यक्तींमुळे होणारा घोटाळा ह्याही बाबतीत झालेला दिसतो. पाचव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेलेल्या ⇨ बुद्धघोषाने योजिलेल्या व्यकरणाविषयक परिभाषेहून कच्चायनाची परिभाषा भिन्न असल्यामुळे कच्चाचन बुध्दघोषानंतर होऊन गेला असावा. तो बुध्दघोषाच्या पूर्वी होऊन गेला असता, तर बुध्दघोषाने कच्चायनाच्या परिभाषेचा अंगीकार केला असता. ओटो फ्रांके आणि गायगर ह्या यूरोपीय पंडितांच्या मते कच्चायनाने पाणिनी, कातन्त्र व्याकर आणि काशिकावृत्ती  ह्यांचा उपयोग करून घेतलेला असल्यामुळे त्याची आरंभीची कालमर्यादा सातव्या शतकातील काशिकावृत्तीच्या पलीकडे जाऊ शकत नाही. कच्चायनाच्या व्याकरणावरी न्यास  ह्या विमलबुध्दिकृत टीकाग्रंथावर छप्पद ह्या ब्रह्मी भिक्षूने लिहिलेली न्यासप्रदीप  ही व्याख्या बाराव्या शतकातील आहे. यावरून कच्चायन हा पाचव्या शतकाचा पूर्वार्ध व बारावे शतक ह्या कालमर्यादेत केव्हातरी होऊन गेला असावा, असा सर्वसाधारण निष्कर्ष काढता येईल.

सन्धिकप्प, नामकप्प, आख्यातकप्प व किब्बिधानकप्प ही कच्चायनाच्या व्याकरणाची चार मुख्य प्रकरणे असून त्यांतील सूत्रे विविध संस्करणांनुसार ६७२ ते ६७५ च्या आसपास आहेत. ह्या व्याकरणावर पाणिनीपेक्षा कातन्त्राचा प्रभाव जास्त दिसतो. वैदिक संस्कृतशी असलेल्या पालीभाषेच्या संबंधांची कच्चायनाने दखल घेतलेली नाही, असे गायगरने दाखवून दिले आहे. अलीकडेच लक्ष्मीनारायण तिवारी व बिरबल शर्मा या दोन विद्वानांनी संपादिलेला कच्चायन व्याकरण हा ग्रंथ प्रसिध्द झाला आहे. (१९६२).

न्यास, छप्पदकृत सुत्तनिद्देस आणि महाविजितावीकृत कच्चायन वण्णना  हे ह्या व्याकरणावरील महत्त्वाचे टीकाग्रंथ होत.

बापट, पु. वि.