विधेयप्रकार: काही विधाने अशा स्वरूपाची असतात, की त्यांच्यात आपण एका विशिष्ट वस्तूचा किंवा व्यक्तीचा उल्लेख केलेला असतो आणि तिच्याविषयी काही तरी सांगितलेले असते. उदा., ‘देवदत्त बुद्धिमान आहे’ हे अशा प्रकारचे विधान आहे. ज्या विशिष्ट वस्तूचा (व्यक्तीचा) उल्लेख केलेला असतो, तिला विधानाचे ‘उद्देश्य’ म्हणतात आणि तिच्याविषयी जे सांगितलेले असते, त्याला विधानाचे ‘विधेय’ म्हणतात. वरील विधानाचे ‘देवदत्त’ हे उद्देश्य आहे आणि ‘बुद्धिमान (असणे)’ हे विधेय आहे. एखाद्या उद्देशाला उद्देशून जर एखादे विधेय मांडण्यात आले, तर त्या उद्देश्याविषयी त्या विधेयाचे विधेयन करण्यात आले आहे, असेही म्हणतात. ‘देवदत्त बुद्धिमान आहे’ ह्या विधानात ‘देवदत्त’ ह्या उद्देश्याला उद्देशून‘बुद्धिमान’ ह्या विधेयाचे विधेयन करण्यात आले आहे.
उद्देश्यांविषयी ज्या भिन्न विधेयांचे विधेयन करण्यात येते त्यांचे काही प्रकार ⇨ॲरिस्टॉटल ह्या ग्रीक तत्त्ववेत्त्याने पाडले आहेत. विधेयांच्या ह्या प्रकारांना विधेयप्रकार (प्रेडिकेबल्स) म्हणतात. ‘विधेय’ ह्या शब्दासाठी ‘प्रेडिकेट’ हा इंग्रजी शब्द रूढ आहे. त्यापासून विधेयप्रकारासाठी ‘प्रेडिकेबल’ हा शब्द प्राप्त होतो.
ॲरिस्टॉटलची विधेयप्रकारांविषयीची उपपत्ती थोडक्यात अशी: समजा, अबक हा एक विशिष्ट त्रिकोण आहे आणि त्याविषयी आपण विधाने करीत आहोत. मग ‘अबक हा त्रिकोण’ हे ह्या विधानांचे उद्देश्य असेल. आता ‘अबक हा त्रिकोण (ही) तीन सरळ रेषांनी बंदिस्त अशी आकृती आहे’ हे विधान घ्या. ह्या विधानाचे ‘तीन सरळ रेषांनी बंदिस्त अशी आकृती’ हे विधेय आहे. हे विधेय उद्देश्याविषयी काय सांगते? आपल्याला हे माहीत आहे, की त्रिकोण असणे म्हणजेच तीन सरळ रेषांनी बंदिस्त अशी आकृती असणे. ज्या कशाच्या अंगी तीन सरळ रेषांनी बंदिस्त अशी आकृती असण्याचा धर्म असतो, ती वस्तू त्रिकोण असते आणि जर एखादी वस्तू त्रिकोण असली, तर तिच्या अंगी हा विशिष्ट धर्म असतो. आता जो धर्म एखाद्या वस्तूच्या अंगी असला, तर आणि तरच ती वस्तू विशिष्ट प्रकारची वस्तू बनते-उदा., त्रिकोण ह्या प्रकारची वस्तू बनते-त्या धर्माला त्या वस्तुप्रकाराचे सार (एसन्स) म्हणतात. तेव्हा तीन सरळ रेषांनी बंदिस्त अशी आकृती (असणे) हा धर्म त्रिकोण ह्या वस्तुप्रकाराचे सार आहे. तेव्हा-
‘अबक हा त्रिकोण तीन सरळ रेषांनी बंदिस्त अशी आकृती आहे’ हे विधान आपण घेतले, तर त्याचे विधेय हे त्याच्या उद्देश्यपदाचे सार काय आहे हे सांगणारे विधेय आहे हे विधेय सार ह्या विधेय प्रकारात मोडते. जेव्हा एखादे पद एखाद्या वस्तुप्रकाराचे सार काय आहे हे सांगते, तेव्हा ते पद त्या वस्तुप्रकारची व्याख्या करते असे म्हणतात. ‘तीन सरळ रेषांनी बंदिस्त अशी आकृती’हे पद त्रिकोण ह्या वस्तुप्रकाराची व्याख्या करते. तेव्हा विधेयाचा एक प्रकार म्हणजे सार किंवा व्याख्या असलेली विधेये. आता ‘अबक हा त्रिकोण ही आकृती आहे’ हे विधान घ्या.ह्यातील ‘आकृती’ हे विधेय म्हणजे ‘तीन सरळ रेषांनी बंदिस्त आकृती’ ह्या सार असलेल्या विधेयाचा भाग आहे. ‘आकृती’ हे विधेय सर्व त्रिकोणांना लागते. पण त्याबरोबरच चौकोन, वर्तुळ इ. दुसऱ्या प्रकारच्या गोष्टींनाही लावता येते. अशा विधेयाला, म्हणजे जे विधेय साराचा भाग असते आणि उद्देश्याहून भिन्न असलेल्या वस्तुप्रकारांनाही लावता येते, अशा विधेयाला ‘जाती’ असे म्हणतात ते जाती ह्या विधेयप्रकारात मोडते. तेव्हा-
अबक हा त्रिकेण (ही एक) आकृती आहे.
ह्या विधानाचे विधेय उद्देश्याची जाती आहे.
आता आकृती हा वस्तुप्रकार घेतला, तर त्यात सर्व त्रिकोण तर मोडतात पण सर्व चौकोन, सर्व वर्तुळे इ. आकृतीही मोडतात. आकृती ही जाती आहे आणि त्रिकोण, चौकोन, वर्तुळे इ. ह्या त्याच्या उपजाती आहेत [⟶विभाजन, तार्किक]. आता आकृती ह्या जातीची त्रिकोण ही जी उपजाती आहे ती वर्तुळ इ. तिच्या इतर उपजातींहून कशामुळे, कशाच्या आधारावर भिन्न ठरते? तर तीन सरळ रेषांनी ती बंदिस्त असतेह्या तिच्या अंगी असलेल्या धर्मामुळे त्रिकोण ह्या उपजातीची आकृती चौकोन इ. उपजातींच्या आकृतींहून वेगळी पडते.कोणत्याहीजातीच्या एका उपजातीला तिच्या इतर उपजातींहून वेगळ्या करणाऱ्या धर्माला प्रभेदकधर्म (डिफरेन्शिअम) म्हणतात. तेव्हा-
अबक हा त्रिकोण तीन रेषांनी बंदिस्त आहे.
ह्या विधानातील ‘तीन रेषांनी बंदिस्त (असणे)’ हे विधेय प्रभेदकधर्म ह्या विधेयप्रकारात मोडते. जाती आणि प्रभेदकधर्म ह्यांचे मिळून सार बनलेले असते हे स्पष्ट आहे.
आता एखादी आकृती जर तीन सरळ रेषांनी बंदिस्त असली, तर तिच्या ह्या धर्मापासून तिच्या तीन कोनांची बेरीज दोन काटकोनांएवढी असते असे सिद्ध करता येते. म्हणजे तीन सरळ रेषांनी बंदिस्त असलेली आकृती असण्याच्या धर्मापासून-त्रिकोणाच्या सारापासून-तिच्या सर्व कोनांची बेरीज दोन काटकोनांएवढी असण्याचा धर्म अनिवार्यपणे निष्पन्न होतो. अशा धर्माला, म्हणजे उद्देश्यपदाच्या सारात जो अंतर्भूत नसतो, पण ह्या सरापासून अनिवार्यपणे निष्पन्न होतो, अशा धर्माला अनुगुण (प्रॉपर्टी) म्हणतात. पण उद्देश्याच्या ठिकाणी असलेले काही धर्म असे असतात, की जे त्याच्या सारातही अंतर्भूत नसतात किंवा ह्या सारापासून अनिवार्यपणे निष्पन्नही होत नसतात. अशा धर्मांना उपाधी (ॲक्सिडेंट) म्हणतात. उदा., समजा, आपला अबक हा त्रिकोण समभुज आहे. आता समभुज असण्याचा धर्म त्रिकोणाच्या सारात अंतर्भूत नाही किंवा त्याच्यासारापासून अनिवार्यपणे निष्पन्न होत नाही. त्रिकोण समभुज असेल किंवा नसेल. तेव्हा ‘समभुज (असणे)’ हे विधेय म्हणजे अबक ह्या त्रिकोणाची उपाधी आहे.
सारांश, ॲरिस्टॉटच्या उपपत्तीप्रमाणे पाच विधेयप्रकार आहेत : सार, जाती, प्रभेदकधर्म, अनुगुण आणि उपाधी. कोणतेही विधेय यांतील कोणत्या तरी एका प्रकारात मोडते. वैज्ञानिक ज्ञानाविषयीची ॲरिस्टॉटलची जी उपपत्ती आहे तिच्याशी ही विधेयप्रकारांची उपपत्ती जोडलेली आहे. ॲरिस्टॉटलच्यामताप्रमाणेविज्ञानहे वस्तुप्रकारांविषयी असते, विशिष्टवस्तुविषयी नसते. उदा., वनस्पतिशास्त्र हे वनस्पतिप्रकारांविषयी असते, ह्या किंवा त्या विशिष्ट झाडाविषयी नसते. पण अर्थात वनस्पतिशास्त्रात लागलेले शोध विशिष्ट झांडांना उद्देशून लावता येतात. आता कोणताही वस्तुप्रकार घेतला, तर त्याच्याविषयीच्या विज्ञानाचे स्वरूप असे असते: प्रथम आपण त्या वस्तुप्रकाराचे सार किंवा व्याख्या मुक्रर करतो, म्हणजे कोणते गुणधर्म अंगी असले तर आणि तरच एखादी वस्तू त्या प्रकारची वस्तू ठरते हे निश्चित करतो. पण ह्या सारापासून जे इतर गुणधर्म अनिवार्यतेने निष्पन्न होतात ते निगमनाने शोधून काढतो. एखाद्या वस्तुप्रकाराच्या विज्ञानात त्या वस्तुप्रकाराची व्याख्या आणि ह्या व्याख्येपासून अनिवार्यतेने निष्पन्न होणारे अनुगुण ह्यांचा समावेश होतो. ह्याशिवाय जे इतर गुण त्या प्रकारच्या वस्तुंच्या अंगी कधी असतात, कधी नसतात, ज्यांना आपण उपाधी म्हणतो ते गुण विज्ञानाच्या कक्षेत येत नाहीत. ॲरिस्टॉटलची विज्ञानाविषयीची संकल्पना अशी निगामी आहे.
पॉर्फिरी (दुसरे शतक) ह्या तत्त्ववेत्याने ॲरिस्टॉटलच्या विधेयप्रकारांविषयीच्या उपपत्तीमध्ये काही बदल करून एक काहीशी वेगळी उपपत्ती मांडली. ह्या दोन उपपत्तींधील मुख्य फरक असा, की ॲरिस्टॉटच्या उपपत्तीप्रमाणे विधानाचे उद्देश्य, म्हणजे नेहमी कोणत्या तरी एका प्रकारची व्यक्ती असते-उदा., ‘अबक हा त्रिकोण’, ‘देवदत्त हा सेनापती’ इत्यादी-तर, पॉर्फिरीच्या उपपत्तीप्रमाणे उद्देश्यही केवळ व्यक्ती असते- उदा., ‘अबक’, ‘देवदत्त’ इत्यादी. आता अशी केवळ घेतली, तर तिचे सार असे काही असत नाही.म्हणजे ज्याप्रमाणे अमुक धर्म अंगी असल्यामुळे एखादी वस्तू त्रिकोण ह्या प्रकारची (किंवा मनुष्य ह्या प्रकारची) वस्तू ठरते व त्यामुळे हे धर्म म्हणजे त्रिकोण ह्या वस्तुप्रकाराचे (किंवा मनुष्य ह्या वस्तुप्रकाराचे) सार आहे असे ज्याप्रमाणे म्हणता येते, त्याप्रमाणे अमुक अमुक गुण अंगी असल्यामुळे देवदत्त ही व्यक्ती देवदत्त ठरते ह्यांतील एखादा गुण देवदत्ताच्या अंगी नसता, तर तो देवदत्त ठरला नसता असे म्हणता येत नाही. त्यामुळे व्यक्तीच्या ठिकाणी सार असे काही नसते. दुसऱ्या शब्दांत व्यक्तीची व्याख्या असत नाही. तेव्हा ॲरिस्टॉटच्या ‘सार’ (व्याख्या) ह्या विधेयप्रकाराच्या ऐवजी पॉर्फिरी ‘उपजाती’ (स्पीशीज) ह्या विधेयप्रकाराची योजना करतो. पण एखादी निवळ व्यक्ती घेतली, तर तिची उपजाती नेमकी कोणती हे सांगता येत नाही. उदा., गांधीजी मनुष्य होते, भारतीय होते, गुजराती-भाषिक होते. त्यांची उपजाती मनुष्य की भारतीय की गुजराती-भाषिक हे कसे ठरविणार? ते स्वच्छंदीपणे, स्वेच्छेनेच (आर्बिट्ररीली) ठरविता येईल. समजा, आपण देवदत्त ही व्यक्ती उद्देश्य म्हणून घेतली. आता देवदत्त मनुष्य आहे. तेव्हा मनुष्य ही देवदत्ताची उपजाती म्हणून स्वेच्छेने मानता येईल.
‘देवदत्त मनुष्य आहे’ ह्या विधानात ‘मनुष्य’हे विधेय उपजाती ह्या विधेयप्रकाराचे आहे असे मानल्यानंतर पुढचा मार्ग सोपा आहे. कारण मनुष्य ही उपजाती म्हणजे प्राणी ह्या जातीची उपजाती आहे हे उघड आहे आणि प्राणी ह्या जातीतील इतर उपजातींपासून (उदा., माकड, हत्ती इ.) मनुष्य ही उपजाती भिन्न आहे कारण तिच्या अंगी विवेकशीलता (रीझन) हा गुण आहे, तेव्हा ‘देवदत्त प्राणी आहे’ ह्या विधानात ‘प्राणी’ हे विधेय म्हणजे जाती आहे आणि ‘देवदत्त विवेकशील आहे’ ह्या विधानात ‘विवेकशील’ हे विधेय म्हणजे प्रभेदकधर्म आहे. उपजातीपासून जे गुण अनिवार्यतेने निष्पन्न होतात त्यांना पॉर्फिरी ॲरिस्टॉटलप्रमाणे अनुगुण म्हणतो. उदा., माणूस विवेकशील प्राणी असल्यामुळे तो भाषा बोलू शकतो. तेव्हा ‘देवदत्त भाषा बोलू शकतो’ ह्या विधानातील विधेय देवदत्ताचा अनुगुण आहे. जे गुण देवदत्ताच्या अंगी आहेत, पण त्याच्या उपजातीपासून निष्पन्न होत नाहीत त्यांना पॉर्फिरी, ॲरिस्टॉटलला अनुसरून, उपाधी म्हणतो. पण उपाधींच्या बाबतीत तो एक भेद करतो. समजा, देवदत्त सेनापती आहे. आता मनुष्य सेनापती असेल किंवा नसेल. तेव्हा ‘देवदत्त सेनापती आहे’ ह्या विधानात ‘सेनापती’ हे विधेय म्हणजे उपाधी आहे. पण देवदत्त आज जरी सेनापती असला तरी उद्या राजाने त्याला काढून टाकले तर तो सेनापती राहणार नाही. तेव्हा सेनापती (असणे) ही देवदत्ताची उपाधी विभाज्य (सेपरेबल) आहे. ‘देवदत्त सहा फुट उंच आहे’ ह्या विधानातील ‘सहा फुट उंच (असणे)’ हे विधेयही उपाधी आहे, कारण मनुष्य सहा फुट उंच असेल किंवा नसेल. पण ही देवदत्तची अविभाज्य उपाधी आहे, कारण प्रौढ वयाच्या देवदत्ताची उंची कमी-जास्त होणार नाही.
सारांश, ॲरिस्टॉटलप्रमाणे जे विधेयप्रकार आहेत ते असे : सार (व्याख्या), जाती, प्रभेदकधर्म, अनुगुण आणि उपाधी. .पॉर्फिरीप्रमाणे उपजाती, जाती, प्रमेदकधर्म, अनुगुण आणि विभाज्य व अविभाज्य उपाधी असे विधेयप्रकार आहेत.
संदर्भ: y3wuoeph, H. W. B. An Introduction to Logic, Oxford, 1961.
रेगे, मे. पुं.
“