विद्रधि: शरीराच्या एखाद्या भागात ऊतकनाशानंतर (समान रचना व कार्य असणाऱ्या : कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांच्या नाशानंतर) पू तयार होऊन तो सीमाबद्ध पोकळीत साठून राहिला, तर विद्रधि (किंवा गळू) निर्माण झाला आहे, असे म्हणतात [फोड, पुरळ व विद्रधि यांच्यात सकृतदर्शनी साम्य वाटले, तरी हे तिन्ही शब्द निरनिराळ्या अर्थांनी वापरले जातात ⟶ पुरळ फोड]. पुंजगोलाणू (स्टॅफिलोकॉकस) किंवा मालागोलाणू (स्ट्रेप्टोकॉकस) या सूक्ष्मजंतूचे संक्रामण बहुतेक वेळा त्वचेखालील विद्रधींना कारणीभूत असते. हे पूयजनक (पू निर्माण करणारे) सूक्ष्मजंतू जेव्हा एखाद्या भागावर आक्रमण करतात, तेव्हा त्यांच्या बाह्यविषामुळे ऊतकातील कोशिकांचा नाश होऊ लागतो. या नाशामुळे बाहेर पडणारी द्रव्ये आणि संलयपिंड नावाच्या पिशवीसारख्या कोशिकांगातील विविध एंझाइमसारख्य (उत्तेजक स्त्रावांच्या) क्रियेमुळे निर्माण होणारी रसायने यांच्यामुळे रसायनानुचलन (रासायनिक कारकाच्या संदर्भात होणारी कोशिकांची हालचाल) सुरू होते. रासायनिक आकर्षणामुळे रक्तातील श्वेत कोशिका आणि ऊतकद्रव यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होऊन तीव्र शोथाची (दाहयुक्त सुजेची) प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर घडणाऱ्या संरक्षक प्रतिक्रियेमध्ये अनेक सूक्ष्मजंतू, श्वेत कोशिका आणि स्थानिक ऊतककोशिकांचा नाश होऊ लागतो. या सर्व मृत कोशिका वा त्यांचे विघटित भाग आणि ऊतकद्रव यांच्या मिश्रणाने पिवळसर पांढरा पू तयार होतो. भक्षिकोशिकांच्या (परकी द्रव्य वेढून त्याचे व विघटित पदार्थांचे भक्षक करणाऱ्या. कोशिकांच्या) मदतीने रक्तातून किंवा लसीकाद्रवातून [⟶लसीका तंत्र] हे सर्व विघटित पदार्थ दूर वाहून नेण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पूनिर्मिती होत राहिल्यामुळे एकाच ठिकाणी स्थानीकृत असे पूयीभवनाचे (पूनिर्मितीते) केंद्र तयार होऊ लागते.

एंझाइमांच्या क्रियेमुळे पूयीभवनाच्या केंद्रात मध्यभागी मृत कोशिकाजन्य पदार्थांच्या रूपांतर हळूहळू द्रवात होते. परिघीय (सीमावर्ती) भागात याच वेळी प्रतिष्ठापन (एकाच्या जागी दुसरा पदार्थ येण्याची क्रिया) किंवा दुरुस्तीचा प्रयत्न होत राहतो. त्यासाठी एक पटल निर्माण होऊन ते पूयजनक पटल हळूहळू पूयनिर्मितीची क्रिया सीमाबद्ध करू लागते. या पटलाच्या आतल्या भागावर जखमेवर तळाशी असते तसेच कणोतक (जखमेतील नष्ट झालेल्या ऊतकाची जागा तात्पुरत्या काळासाठी घेणारे ऊतक) आढळते आणि बाहेरच्या पृष्ठावर कोलॅजेन निर्माण होत असते. पटलाने बंदिस्त असा विद्रधि ऊतकद्रव जसजसावाढत जातो, तसतसा आतील दाब वाढून ठणका लागल्याप्रमाणे वेदना होऊ लागतात. ऊतकद्रवाच्या निर्मितीचा वेगही कमी होऊन संरक्षक प्रक्रियेची क्षमता कमी होते. मुखावटे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने दिलेली जंतुनाशक औषधे किंवा प्रतिजैव (ॲटिबायॉटिक) पदार्थ निःस्त्रावणाच्या (पाझरण्याच्या) अक्षमतेमुळे पुरेशा प्रमाणात पूयजनक जंतूंपर्यत पोहोचत नाहीत व वेदनाजनक विद्रधीने रूग्ण अस्वस्थ होतो. त्वचेची लाली, सूज, किंचित ताप, नजीकच्या लसीका ग्रंथींची वेदनापूर्ण वाढ ही लक्षणे निर्माण होतात.

या अवस्थेत असतानाच जर पुरेसा मोठा छेद घेऊन आतील पू बाहेर पडण्यास वाट करून दिली, तर वेदना कमी होते. आतील दाब कमी झाल्याने निःस्त्रावण पुन्हा पूर्ववत सुरू होते व जखम बरी होऊ लागते. असा छेद न घेतल्यास विद्रधीमधील द्रव पदार्थ कमीत कमी प्रतिरोधाच्या दिशेने म्हणजेच पृष्ठभागाकडे पसरण्याचा प्रयत्न करतो आणि तेथे विद्रधीला तोंड फुटते. त्वचेवरील गळवे बाहेरच्या दिशेने फुटतात परंतु खोलवर निर्माण झालेले विद्रधी मात्र जवळपासच्या एखाद्या नैसर्गिक पोकळीत (उदा., आतडे, उदरपोकळी, श्वसनमार्ग) फुटण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी तीव्र शोथनिर्मिती होऊन इतर लक्षणे दिसू लागतात. कधीकधी विद्रधीमधील ऊतकप्रतिष्ठापनाची क्रिया आपोआप वेग घेते आणि पुवाचे हळूहळू शोषण होऊन विद्रधी आपोआप बरा होतो. तेथे तंतुमय ऊतकाची निर्मिती होऊन कठीण वण तयार होतो. या ऊतकात कॅल्शियमाचे निक्षेपण होऊन (साचून) कठीण गाठही होण्याची शक्यता असते.

क्षयरोगाच्या जंतूंमुळे निर्माण होणाऱ्या विकृतिस्थळाचे रूपांतर कधीकधी बहुरूपकेंद्रकी (अनेक खंडांचे जटिल केंद्रक असलेल्या) श्वेतकोशिकांच्या आक्रमणामुळे विद्रधीत होते. हा विद्रशी तीव्र शोथ निर्माण न करता शांतपणे शरीराच्या खोल भागातील ऊतकांच्यामधून पसरत जातो. याची बाह्य लक्षणेही जाणवत नाहीत. म्हणून याला शीत विद्रशी असे नाव आहे. असा विद्रशी हाडात किंवा लसीका ग्रंथीत निर्माण होऊन पसरत जातो. तो एखाद्या इंद्रियावर, तंत्रिका तंतूंवर (मज्जातंतूंवर) किंवा ⇨मेरूरज्जूवर दाब देऊ लागतो तेव्हा लक्षणांची निर्मिती होते.

सूक्ष्मजंतूंच्या अनुपरिस्थीतीत, केवळ रासायनिक परिणामाने शोथ निर्माण होऊन किंवा ⇨ऊतकमृत्यू होऊन तेथे श्वेत कोशिकांची संख्या वाढून विद्रधी निर्माण होणेही शक्य असते. उदा., क्विनिनाच्या इंजेक्शनामुळे किंवा इतर काही इंजेक्शने पुरेशा प्रमाणात विरल विद्राव न करता दिल्याने विद्रधी होतात. अशा विद्रधींना निर्जंतुक विद्रधी म्हणतात. अमीबाजन्य विकारात कधीकधी यकृतात विद्रधी होऊ शकतो. त्यातील अमीबायुक्त पूयद्रव जाड सुईच्या मदतीने शोषून बाहेर काढणे आवश्यक ठरते.

वरचेवर विद्रधी होत असतील किंवा एखादा विद्रधी छेद घेऊनही बरा होत नसेल व त्यांचे रूपांतर दीर्घकालिक कोटरात (पोकळीत) होत असेल, तर कुपोषण, मधुमेह, आतमध्ये एखादा प्रतिक्रियाजनक पदार्थ (उदा., टाका, काचेचा तुकडा, हत्याराचा तुकडा) राहण्याची शक्यता, त्याचप्रमाणे क्षयरोग किंवा कर्करोग यांच्यासारख्या शक्यता विचारात घ्याव्या लागतात.

पहा:अभीवाजन्य विकार अस्थिमज्जाशोथ गळसुटे पूयरक्तता.

संदर्भ:1. Browser, N. L. An Introduction to the Symptoms and Signs of Surgical Disease,  Sevenoaks, 1991.

         2. MacSween, R. N. M. Whaley, K., Eds., Muir’s Textbook of Pathology, Sevenoaks, 1992.

श्रोत्री, दि. शं.