विद्युत् विलेपन : वस्तूच्या पृष्टभागाचे गुणधर्म, तिची परिमाणे किंवा दर्शनी रूप बदलण्यासाठी तिच्यावर विद्युत् प्रवाहाच्या मदतीने धातूचा मुलामा देण्याची प्रक्रिया. पृष्ठभाग आकर्षक वा गुळगुळीत करणे, गंजणे व झीज (अपघर्षण) यांना असणारा रोध सुधारणे, इष्ठ ते विद्युतीय (उदा., उच्च विद्युत् संवाहकता) व चुंबकीय गुणधर्म प्राप्त करून देणे, झिजलेल्या व अयोग्य भागांची परिमाणे सुधारणे यांकरिता मुख्यत्वे विद्युत् विलेपन करतात. प्रकाशकीय परावर्तनक्षमता वाढविणे, विषारीपणा कमी करणे इ. हेतूंनीही विद्युत् विलेपन कमी प्रमाणावर केले जाते. गृहोपयोगी उपकरणे, सायकल, मोटारगाडी इ. वाहनांचे काही दर्शनी भाग यांवरील क्रोमियमाचे विद्युत् विलेपन त्या वस्तू आकर्षक दिसाव्यात म्हणून करतात. हे विलेपन झीजरोधक व संक्षारणालाही (गंजण्याच्या क्रियेलाही) रोधक असते. काटे-चमच्यांवरील चांदीचे व दागदागिन्यांवरील सोन्याचे पातळ विद्युत् विलेपन हे त्या वस्तू सुंदर दिसण्यासाठी असते. विशिष्ट विद्युतीय गुणधर्म आणण्यासाठी बऱ्याचदा सोन्याचे विद्युत् विलेपन करतात (उदा., स्पर्शकांच्या रूपातील विद्युतीय संपर्क स्थाने). पर्म-ॲलॉय हे लोखंड आणि निकेल यांच्या मिश्रधातूचे व्यापारी नाव असून या मिश्रधातूच्या बाबतीत चुंबकीय गुणधर्म सर्वांत महत्त्वाचे असतात. तांब्याच्या तांरावर या मिश्रधातूचे विद्युत् विलेपन करतात. आणि संगणकातील माहिती साठविण्यासाठी त्यांचा वापर करतात. बादल्या, पिंपे, डबे इत्यादींचा पत्रा, तसेच नट, बोल्ट यांच्यावरील जस्तलेपन गंजरोधक असते.
मराठी विश्वकोशात कथिलच्छदित पत्रे, गॅल्व्हानीकरण, जर व कलाबूत धातूंचे मुलामे, विद्युत् घट, विद्युत् धातूविज्ञान, विद्युत् रसायनशास्त्र, विद्युत् रासायनिक श्रेणी व विद्युत् विच्छेदन ह्या विद्युत् विलेपनाशी निगडीत असलेल्या स्वतंत्र नोंदी आहेत.
इतिहास : काही धातूंचे विलेपन प्राचीन काळापासून करण्यात येत होते. तथापि विद्युत् विलेपनाची सुरूवात १८०० साली झाली. त्या वर्षी व्होल्टा चिताचा शोध लागल्याने एकदिश (एकाच दिशेत वहनारा) विद्युत् प्रवाह पुरेसा प्रमाणात उपलब्ध झाला. त्याच वर्षी लोखंड पोलाद इत्यादींवर जस्त, तांबे व चांदी यांचे विद्युत् विलेपन करण्यात आले. याच सुमारास शिसे, तांबे इत्यादींच्या विद्युत् निक्षेपणासाठी (थर साचविण्यासाठी) विद्युत् घटमाला वापरण्यात आली.
⇨मायकेल फॅराडे यांच्या विद्युत् चुंबकीय प्रवर्तनाच्या (चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेत बदल केल्यास विद्युत् चालक प्रेरणा म्हणजे विद्युत् मंडलात प्रवाह वाहण्यास कारणीभूत होणारी प्रेरणा उत्पन्न होण्याच्या तत्त्वाच्या) शोधामुळे (१८३१) विद्युत् जनित्र (यांत्रिक ऊर्जेचे विजेत रूपांतर करणारे साधन) तयार करता आले आणि विजेचा चांगला स्त्रोत उपलब्ध झाला. १८४०-४१ च्या सुमारास विद्युत् विलेपन व्यापारी प्रमाणात वापरले जाऊ लागले. चांदी, सोने, तांबे व पितळ यांचे विद्युत् विलेपन करण्यासाठी उपयुक्त असलेल्या सायनाइड विद्रांवाचा शोध लागल्याने या उद्योगाच्या वाढीला गती मिळाली उदा., सायनाइड-कॉपर विद्रावामुळे लोखंड व पोलाद यांच्यावर सरळ तांब्याचे चांगले विद्युत् विलेपन करता येऊ लागले. हा विद्राव अजूनही वापरतात. १८३७ साली मॉरिट्झ याकोबी यांनी गॅल्व्हानो प्लॅस्टी ही प्रक्रिया शोधून काढली. हिला आता विद्युत् धातूरूपण म्हणतात व हिची अधिक माहिती पुढे दिली आहे. मात्र विद्युत् विलेपन उद्योगाचे जनक म्हणून सामान्यपणे जॉर्ज रिचर्ड्स एल्किंग्टन व हेन्री एल्किंग्टन यांचा उल्लेख करतात. कारण चांदीच्या विद्युत् विलेपणाचे ब्रिटनमधील पहिले (पेटंट) त्यांनी १८४० मध्ये मिळविले होते.
अभियांत्रिकी व सामग्री यांच्या सुविकसित स्वरूपामुळे वाढलेल्या गरजांतून हा उद्योग विकसित झाला व त्याचा व्याप वाढला. १९२५ साली क्रोमियमाच्या विद्युत् विलेपणास सुरूवात झाली व हा उद्योग मोठ्या प्रमाणात वाढला. क्रोमियमाचा मुलामा आकर्षक, चकचकीत व दीर्घकाळ टिकणारा असतो. विविध प्रकारच्या वाहनांचे भाग, घरगुती वापराची साधने इत्यादींवर क्रोमियमाचा मुलामा देण्याचे प्रमाण वाढत गेले. निकेल क्रोमियम तांबे निकेल-क्रोमियम असे मिश्र विद्युत् विलेपन करता येऊ लागले. क्रोमियमाच्या विद्युत् विलेपनातील यशस्वी वाटचालींमुळे निकेल, चांदी, तांबे व सोने या धातूंचाही अभियांत्रिकीय उपयोग वाढला.
विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत विद्युत् विलेपनासह इतर विद्युत् रासायनिक प्रक्रियासाठी विजेचा स्त्रोत म्हणून मुख्यतः चलित्र-जनित्र संच वापरीत असत या संचात विजेचे यात्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे एक चलित्र व एक वा अधिक जनित्रे यांत्रिक रितीने युग्मित केलेली (जोडलेली) असतात. त्यामुळे एका उदग्माचा विद्युत् दाब दुसऱ्या इष्ट विद्युत् दाबामध्ये बदलता येतो. नंतर या संचाऐवजी एकदिश कारक वापरण्यात येऊ लागले आता विद्युत् विलेपनासाठी लागाणारा बहुतेक सर्व विद्युत् प्रवाह उच्च विद्युत्त दाबांच्या प्रत्यावर्ती (अलटसुलट दिशांत वहनाऱ्या) विद्युत् प्रवाहाचे एकदिश कारकादिशकारमार्फत एकदिश विद्युत् प्रवाहात रूपांतर करून मिळवितात.
एकोणिसाव्या शतकांच्या मध्यापासून अधातविय पुष्ट मार्गावर (उदा., लाकूड, काच, मेन, कातडी, गटापर्चा, प्लॅस्टर ऑफ पॅरीस विनझिलइची मातीची भांडी प्लॅस्टिक) धांतूचे विलेपन करण्यात येत होते. १९६३ नंतर विलेपित प्लॅस्टिकचा उपयोग मोठ्याप्रमाणात होऊ लागला. कारण त्या वर्षी एबी एस (ॲक्रिलोनायट्रॉइल-व्यूटाडाइन–स्टायरीन) प्लॅस्टिकचा शोध लागला व यावर सहजपणे विद्युत् विलेपन करता येते. प्लॅस्टिकच्या पृष्ठभागावर प्रथम योग्य त्या रासायनिक विक्रियेने (उदा.,क्रोमिक व सल्फ्यूरिक अम्लाच्या गरम मिश्रणात बूडवून) संस्करण करतात. नंतर प्रथम स्टॅनस क्लोराइडाच्या व मग पॅलेडियम क्लोराइडाच्या विद्रावात बुडवून ते सक्रियेत (मुलामा अधिक घट्ट पणे ग्रहण शकणारे) करतात. नतंर त्यावर विद्युत् हीन क्षपणकारक पद्धतीने (हिचे वर्णन पुढे आले आहे) .तांबे किंवा निकेल याचा मुलामा देतात व शेवटी आणखी विलेपन करतात. दोन धातूंमधील आसंजनापेक्षा (घट्ट चिकटले जाण्याच्या गुणधर्मापेक्षा) प्लॅस्टिकवरील धांतूचे आसंजण दुर्बल असले, तरी ते वापरण्यायोग्य असते.
प्रक्रिया: विद्युत् विलेपन प्रक्रियेत मुलामा द्यावयाच्या धातूंचे आयन (विद्युत् भारित अनु वा रेणू) असलेला धातूंचा संयुगाचा विद्राव एका टाकीत(कुडांत) असतो. ज्यावर मुलामा द्यायचा असतो. तो भाग एकदिश विद्युत् प्रवाहाच्या स्त्रोताच्या ऋण टोकाला जोडतात व दुसरा धातूचा तुकडा घणटोकाला जोडतात. नंतर हे दोन्ही भाग वरील टाकीतील विद्रावात बुडवितात ऋण टोकाला जोडलेला भाग ऋणाग्र तर धन टोकाला जोडलेला भाग धनाग्र बनतो. सामान्यपणे धनाग्र ज्याचा मुलामा द्यायचा त्या धातूचा तुकडा असतो. विद्युत् प्रवाह सुरू झाल्यावर धनाग्रापाशी धातू विरघळते. व ऋणाग्रापाशी ती निक्षेपित होऊन (साचून) विलेपन होते. अशा रीतीने केवळ धातू विरघळविणे व निक्षेपित होणे यांकरता वीज वापरली गेल्यास प्रक्रिया १०० टक्के कार्क्षम ठरते. बऱ्याचदा विद्युत् प्रवाहाचा काही भाग ऋणाग्रापाशी हायड्रोजन निर्माण होण्यासारख्या इतर विक्रियांकरिता वापरला जातो. त्यामुळे प्रक्रियेची कार्यक्षमता कमी होते आणि विद्युत् विद्रावाची अम्लता किंवा ⇨पीएच मूल्य बदलते. क्रोमियमाच्या विद्युत् विलेपणासारख्या प्रक्रियांमध्ये धनाग्र अविद्राव्य (न विरघळणारे) असते. असे अविद्राव्य धनाग्र वापरल्यास विलेपन विद्रावात अधूनमधून संयुगांच्या रूपात धातूच्या आयनांची भर घालावी लागते. [ ⟶ विद्युत् विच्छेदन].
विद्युत् प्रवाह घनता (संवाहकाच्या आडव्या छेदाच्या दर एकक क्षेत्रफळामागे असलेला विद्युत् प्रवाह उदा., दर चौ.मी, ला. असलेला अँपिअरमधील विद्युत् प्रवाह), विलेपणाचा कालावधी व ऋणाग्राची कार्यक्षमता (ऋणाग्रापाशी ठराविक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वापरल्या गेलेल्या विद्युत् प्रवाहाचे प्रमाण) या गोष्टीवर विलेपित धातूची राशी म्हणजे मुलाम्याची जाडी अवलंबून असते. विलेपन करावयाचा पृष्ठभाग अनियमित असल्यास धनाग्र आणि ऋणाग्रयांच्यातील अंतर व त्यामुळे मुलाम्याची जाडी बदलू शकते. अनियमित आकाराच्या ऋणाग्रावर एकसारख्या जाडीचा मुलामा देण्याच्या विलेपन विद्रावाच्या क्षमतेला क्षेपणक्षमता म्हणतात. उच्च प्रवाह घनतेच्या ठिकाणी विलेपणाची कार्क्षमता कमी असल्यास क्षेपणक्षमता चांगली असते. क्षारीय (अल्कधर्मी) सायनाइडासारख्या विलेपन विद्रावाची क्षेपणक्षमता चांगली असते उलट आम्ल-सल्फेट कॉपरसारख्या विद्रावाची क्षेपणक्षमता अगदीच कमी असते.
विद्युत् विलेपणाशी निकटचा संबंध असलेल्या धातूनिक्षेपणाच्या आणखी दोन पद्धती असून त्यांच्याकरिता विजेची गरज नसते. क्षपणकारक द्रव्ये [⟶ क्षपण] आसलेल्या योग्य विद्रवात धातूचे किंवा असंवाहकाचे (उदा., प्लॅस्टिक) आधारपृष्ठ बुडवून त्यावर धातूचा मुलामा निक्षेपित होऊ देण्याच्या पद्धतीला विद्युत् हिन क्षपणकारक विलेपन म्हणतात. या पद्धतीत विद्रावातील धातूच्या आयनांचे क्षपणकारकांनी क्षपण होऊन धातूचे अणू आधारपृष्ठावर निक्षेपित होतात (उदा., निकेलाच्या संयुगांच्या विलेपन विद्रावात सोडियम हायपोफॉस्फाइटासारखे क्षपणकारक घालून निकेलाचे असे विल्पन करता येते). ही प्रक्रिया सुरू झाली की, इष्ट जातीचा मलामा दिला जाईपर्यंत ती अंखड चालू ठेवता येते. म्हणजे ही प्रक्रिया स्वयंउत्तप्रेरकी विक्रिया [विक्रियेत निर्माण होणाऱ्या पदार्थांनी सुरू होणारी व स्वतःउत्प्रेरकी असलेली विक्रिया ⟶ उत्प्रेरण] आहे. ही प्रक्रिया विद्युत् विलेपणापेक्षा काहीशी महाग असली, तरी जेथे विद्युत् विलेपन सहज करता येत नाही अशा ठिकाणी (उदा., नळाचे आतले भाग) ही पद्धती उपयुक्त आहे. विस्थापन विलेपन या दुसऱ्या पद्धतीत निक्षेपित करावयाची धातू आधारपृष्ठापेक्षा अधिक अभिजात (संरक्षणाला व ⇨ऑक्सिडीभवनाला जास्त प्रमाणात विरोध करणारी) असते. सर्व आधारपृष्ठावर छिद्रहीन मुलामा आच्छादाला गेल्यावर ही विक्रिया थांबते.
पूर्वतयारी : मुलामा चांगला घट्ट बसण्यासाठी आधारपृष्ठ स्वच्छ असावे लागते. म्हणजे त्याच्यावर तेल, ग्रीझ, सल्फाईडे, ऑक्साइडे (गंज), धूळ वगैंरेंचा मुलामा संलग्न होण्याला अडसर ठरू शकणारा थर असता कामा नये. या दृष्टीने पोलादी पृष्ठभागाची पूर्वतयारी करणे सोपे असते, परंतु मॅग्नेशियम, टिटॅनियम, ॲल्युमिनियम व टँटॅलम यांच्या बाबतीत पूर्वतयारी करणे अवघड असते. या कामाकरिता मार्जन (पृष्ठभाग स्वच्छ करणारा) विद्राव असलेली एक व नंतर विसळण्याचे काम करण्यासाठी असलेल्या एक वा अनेक टाक्या असतात. स्वच्छ करावयाची वस्तू मार्जन टाकीत व नंतर पुढील टाकीत हाताने अथवा स्वयंचलित रीतीने पुढे नेली जाते.
मार्जन: पृष्ठभागावरील ग्रीझ अथवा चिकटलेले घन पदार्थ काढून टाकण्याच्या तीन पद्धती आहेत: (१) विद्रावक (विरघळविणारी ) मार्जन पद्धतीत ग्रीझ वाफेच्या मदतीने काढून टाकतात. ट्राय अथवा टेट्राक्लोरोएथिलिनासारख्या विद्रवकांची (विरघळणाऱ्या पदार्थाची) बंदिस्त जागेत उकळून वाफ करतात आणि ही वाफ आधारपृष्ठावर संद्रवित (द्रवंरूपात रुपांतरित) करून पृष्ठभाग स्वच्छ केला जातो. (२) पायस मार्जन पद्धतीत कोरोसीन, सद्रवकारक (पृष्ठभाग द्रव पदार्थ लागू देण्यायोग्य करणारा) पदार्थ व क्षारीय विद्राव यांच्या कोमट मिश्रणात बुडवून पृष्ठभाग स्वच्छ करतात. (३) विद्युत् विच्छेदनीय मार्जन पद्धतीत वस्तू क्षारीय विद्रावात बुडवितात व त्यातून एकदिश प्रवाह पाठवितात. जास्त मळकट पृष्ठभाग विद्रावकांमध्ये किंवा क्षारीय फवारा यंत्रांनी स्वच्छ करतात. मार्जन विद्रावात सोडियमाचे हायड्रॉक्सइड, कार्बोनेट, फॉस्फेट किंवा मेटॅसिलिकेट, सद्रवकारक पदार्थ इ. असतात. पोलादासाठी विशेषतः अधिक तीव्र क्षारीय विद्राववापरतात. विद्युत् विच्छेदनीय पद्धती हा मार्जनातील बहुधा अखेरचा टप्पा असतो. बऱ्याचदा मार्जनानंतर पृष्ठभाग पाण्याने धुतात.
श्राव्यातील मार्जनही मोठ्या प्रमाणात वापरतात. मार्जन विद्रावात सोडलेल्या श्राव्यातीत (माणसाला ऐकू येणाऱ्या ध्वनितरंगांपेक्षा अधिक कंप्रतेच्या) तंरगांमुळे भेगा व सूक्ष्म छिद्रे यांतघट्ट चिकटून बसलेले घन कण लवकर सुटे होण्यास मदत होते. यांकरिता सामान्यपणे १८,००० ते २४,००० हर्ट्झ दरम्यानच्या कंप्रता (दर सेकंदास होणाऱ्या कंपनांच्या संख्येस कंप्रता म्हणतात) वापरतात. [⟶ श्राव्यातीत ध्वनिकी].
धातूमार्जन : यात धातूच्या पृष्ठभागावरील ऑक्साइडे (गंज) अम्लाच्या साहाय्याने काढून टाकतात. पोलादाचे असे मार्जन मोठ्या प्रमाणावर करायचे झाल्यास गरम, विरल सल्फ्युरिक अम्ल वापरतात. कारण ते स्वस्त पडते. मात्र कोठी तापमानाला यासाठी हायड्रोक्लोरिक अम्लही वापरतात. कारण त्याची क्रिया जलद होते. धातूमार्जननाच्या जोडीने बऱ्याचदा विलेपनाच्या आधी अम्ल संस्करण करतात. कारण या संस्करणामुळे पृष्ठभाग सक्रियित होतो.
धातूमार्जन होताना, तसेच विशिष्ट प्रकारच्या विलेपन क्रियांमधील पोलादात हायड्रोजनाचे विसरण होते म्हणजे तो पोलादात सावकाशपणे विखुरला जातो. पोलादाची तन्यता (किंवा चिवटपणा) कमी होते मात्र इतर यांत्रिक गुणधर्मात विशेष बदल होत नाही. काही पोलादांत अशा प्रकारे भेगा पडू शकतात.
विद्युत् झिलईकाम : पातळ व चकचकीत मुलाम्यासाठी ही क्रिया वापरतात. याकरिता धातूचा पृष्ठभाग धनाग्र करून तो योग्य विद्युत् विच्छेद्यात (विरघळविले किंवा वितळविले असता ज्यातून विद्युत् प्रवाह वाहू शकतो अशा संयुगात) बुडवितात. या क्रियेत आधारपृष्ठाच्या बाह्यारूपाची नक्कल होते. म्हणून आधारपृष्ठ गुळगुळीत असावे लागते. अशा पृष्ठभागावर या क्रियेने अतिशय सपाट, गुळगुळीत व चकचकीत विलेपन होते. ही विद्युत् विलेपणाच्या विरूद्ध अशी प्रक्रिया आहे.
विलेपणाची सामग्री : विद्युत् विलेपनाकरि पुताढील सामग्री लागते.
विद्युत् सामग्री: विलेपणाच्या बहुतेक क्रिया ३ ते १२ व्होल्ट विद्युत् दाबाच्या एकदिश प्रवाहाने करतात. सर्वसाधारण प्रत्यावर्ती वीजपुरवठा २२० व्होल्ट विद्युत् दाबाला केला जातो. यामुळे विद्युत् दाब कमी करणे व प्रत्यावर्ती प्रवाहाचे एकदिश प्रवाहात रूपांतर करणे गरजेचे असते. याकरिता रोहित्रे (विद्युत् दाबात बदल करणारे साधन), चलित्र -जनित्र संच व ⇨एकदिशकारक वापरतात. विद्रावाचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी तापन वेटोळी व विलेपन टाकीत निर्माण होणारी उष्णता काढून टाकण्यासाठी शीतनक वेटोळी असतात.
यांत्रिक साहित्य: विलेपन विद्राव ठेवण्यासाठी टाक्या वापरतात. पूर्वी या विलेपन टाक्या लाकडी असत व त्यांना अस्फास्ट, रबर किंवा शिशाच्या पत्र्याचे अस्तर लावलेले असे. आता बहुसंख्य विलेपन टाक्या प्लॅस्टिकच्या व पोलादी (कधीकधी काँक्रीटच्या) असतात. क्षारीय विद्रावाच्या बाबतीत टाकीला अस्तर लावण्याची गरज नसते. मात्र उदासीन अम्ल विद्रवाकरिता पोलादी टाकीला प्लॅस्टिकचे किंवा रबराचे अस्तर लावतात. क्रोमिक अम्लासाठी प्लॅस्टिकचे किंवा शिशाचे अस्तर वापरतात. पूर्ण स्वयंचलित पद्धतीत मार्जन, धातूमार्जन व विलेपन टाक्यांमधून विलेपन करावयाची वस्तू (ऋणाग्र) क्रमवार नेली जाते. या दोन टाक्यांच्या मध्ये गरजेनुसार वस्तू विसळली जाण्याची सोय केलेली असते. धातूच्या पट्टीचे अंखडपणे विद्युत् विलेपन करणे ही अशी एक महत्त्वाची व मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी क्रिया आहे.
नट, बोल्ट, स्क्रू यांसारख्या छोट्या वस्तू पिंपातून नेल्या जाऊन त्यांच्वर विद्युत् विलेपन केले जाते. ही पिपे बहुधा षट्कोनी आकाराची असून त्यांच्या प्लॅस्टिकच्या बाजू सच्छिद्र असतात. असे पीप आडव्या आक्षावर बसविलेले असून ते विद्युत् विलेपणाच्या टाकीतून फिरते. धनाग्र पिपात असते. आणि पीप फिरते तेव्हा त्यातील वस्तू खाली येतात आणि त्या विद्रावाच्या व ऋणाग्र स्पर्शकाच्या संपर्कांत येतात.
विलेपन विद्राव: हे विद्राव कार्बनी विद्रावाकांतील (उदा., सायुज्यित तेलातील) किंवा वितळलेल्या लवणांच्या रूपातील असतात. विद्युत् संवाहकता वाढविणे अम्ल-क्षार संतुलन टिकविणे, मुलाम्याचे भौतिक स्वरूप सुधारले, धनाग्र विरघळविण्याची गती वाढविणे धातूच्या आयनांबरोबर जटिल संयुगे बनविणे, मुलाम्याची जाडी एकसारखी राखणे व तो चकचकीत करणे किंवा त्यामधील धातूच्या स्फटिकांचे वा कणांचे आकारमान कमी ठेवणे अथवा त्यांची दिशेनुसार होणारी मांडणी बदलणे वगैंरेंसाठी विलेपन विद्रावांत अल्कोहॉलासारखी काही कार्बनी द्रव्ये अल्प प्रमाणात घालतात. त्यांना समावेशक द्रव्ये म्हणतात. विलेपन विद्रावांत सायनाइड संयुगे, तसेच क्रोमियम, निकेल, जस्त इ. विषारी घटक असतात. त्यांच्यामुळे विलेपणातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट लावताना प्रदूषणविषयक प्रश्र निर्माण होतात.
विलेपन विद्रावाचे तापमानही महत्त्वाचे असते. विद्रावाची विद्युत् संवाहकता, कार्यक्षमता, मुलाम्याचे स्वरूप इ. गोष्टी विद्रावाच्या तापमानावर अवलंबून असतात. उत्तम मुलामा तयार होण्यासाठी प्रत्येक विद्रावाचा एक विशिष्ट तापमान-पल्ला असतो.
विशिष्ट धातूंचे विलेपन : क्रोमियम, तांबे, चांदी, निकेल. सोने, कथिल, जस्त, कॅडमियम या धातूंचे, तसेच पितळ, कासे, डाखकामाची धातू इ. मिश्रधातूंचे विलेपन जास्त प्रमाणात केले जाते. यांशिवाय कधीकधी लोखंड, टेल्युरियम कोबाल्ट, पॅलॅडियम, रूथेनि यम, ऱ्होडियम, इरिडियम, ॲल्युमिनियम, मॉलिब्डेनम, टंगस्टन, टँटॅलम, निओबियम, इंडियम, टिटॅनियम, प्लॅटिनम इ. धातूंचेही विद्युत् विलेपन केले जाते.
क्रोमियम : गृहोपयोगी उपकरणे, वाहनांचे दर्शनी भाग इ. अनेक वस्तूंवरील मुलाम्यामुळे क्रोमियमाचा मुलामा परिचित आहे. पोलाद व लोखंड यांवरील छिद्रहीन क्रोमियम मुलामा हा आदर्श गंजरोधक मुलामा आहे. निकेलाच्या बऱ्याच जाड विलेपनावर सुशोभनासाठी अशा प्रकारचा क्रोमियमाचा पातळ मुलामा विद्युत् विलेपणात देण्यात येतो. क्रोमियमाचा मुलामा संक्षारण रोधी व झीजरोधकही असतो आणि त्याचा चकचकीतपणा दीर्घकाळ टिकतो. झीजरोध हा मुख्य हेतू असल्यास क्रोमियमाचे जाड (कठीण) विलेपन करतात. याच्या विलेपन विद्रावात क्रोमिक अम्ल, सल्फ्यूरिक अम्ल व पाणी याची क्षेपणक्षमता व प्रवाह कार्यक्षमता कमी असते. फर्निचर, मापके, हत्यारे, डीझेल एंजिनांचे सिलिंडर इ. वस्तूंवरही क्रोमियमाचे विद्युत् विलेपन करतात. [⟶ क्रोमियम].
तांबे:पुष्कळ शोभिवंत निकेल-क्रोमियम विलेपित मुलाम्याच्या खालील आधारपृष्ट तांब्याच्या विद्युत् विलेपणाचा उपयोग होतो. विद्युत् व इलेक्ट्रॉनीय उद्योगांतही तांब्याचे विद्युत् विलेपन मोठ्या प्रमाणात वापरतात. तांब्याचे मंद अथवा चकचकीत विलेपन करता येते.
विद्युत् निरोधक आधारपृष्ठावर ⇨मुद्रित मंडले तयार करण्यासाठी तांब्याचे विलेपन करण्याच्या अनेक पद्धती वापरतात. याद्वारे पूर्ण मुद्रितमंडल तयार करता येते. याकरिता असे पृष्ठ प्रथम स्टॅनस व पॅलॅडियम क्लोराइडांच्या विद्रावांनी सक्रियित करतात व मग त्यावर विद्युत् हीन क्षपणकारक पद्धतीने तांब्याचे विलेपन करतात. असे काहीसे पातळ मुलामे अधिक जाड विद्युत् विलेपणासाठी आधारपृष्ठ म्हणूनही वापरता येतात. प्लॅस्टिकशी पटलित केलेल्या तांब्याचा असा पातळ पत्रा मोठ्या प्रमाणात वापरतात. विचवेक (निवड पद्धतीने केलेल्या) अम्लकोरणाने किंवा विविचक विलेपनाने प्रत्येक मुद्रित मंडल तयार करतात. मुद्रित मंडलातील तांब्याच्या भागांवर शिसे-कथिल मिश्रधातूचे विद्युत् विलेपन करतात. यामुळे नंतर डाखकाम करणे सोयीस्कर होते. याकरिता सोन्याचेही विद्युत् विलेपन करतात. मात्र सोन्याचे विलेपन खास कामांसाठीच करतात. याचे एक कारण सोने महाग आहे, हे होय [⟶ मुद्रित मंडले].
तांब्याच्या विलेपणासाठी अम्ल, सल्फेट व क्षारिय सायनाइडविद्रावा मोठ्या प्रमाणात वापरतात. कधीकधी यासाठी फ्ल्युओबोरेटे, पायरोफॉस्फेट व सल्फामेट विद्रावही वापरतात. अम्ल सल्फेट विद्राव वापरायला सोपा असूनत्याची कार्क्षमता चांगली आहे. मात्र त्याची क्षेपणक्षमता कमी असून पोलादावर थेट तांब्याच्या मुलामा देण्यासाठी तो वापरता येत नाही. कारण याने होणारे विस्थापन विलेपन पोलादाला घट्ट चिकटून राहत नाही. विद्रावाची क्षेपणक्षमता चांगली असून याद्वारे पोलादावर थेट मुलामा देता येतो. तथापि हा विद्राव प्रदूषणकारी आहे.
तांब्याच्या विद्युत् हीन क्षपणकारी विलपणासाठी सर्वाधिक प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या विद्रावात फॉर्माल्डिहाइड हे क्षपणकारक असते. मुलाम्यातील हायड्रोजनाच्या बुडबुड्यांमुळे पुष्कळच कमी होते. असे बुडबुडे कमी प्रमाणात समाविष्ट व्हावेत म्हणून विद्रावात काही संयुगे घालतात. मुद्रणाचे ठसे, दीपगृहातील आरसे इत्यादी मध्येही तांब्याच्या विद्युत् विलेपणाचा उपयोग होतो. [⟶ तांबे].
सोने: दागदागिने, विद्युतीय स्पर्शक, सूक्ष्ममंडलांतील जोडण्या, माहिती साठविण्याच्या विशिष्ट इलेक्ट्रॉनीय प्रयुक्त्या, घन अवस्था घटक, अवकाशयानांतील उपकरणे वगैंरेमध्ये सोन्याचे विलेपन उपयुक्त असते.
सर्वसाधारणपणे पोटॅशियम गोल्ड सायनाइड, सायट्रिक किंवा असिटिक अम्ल हे अम्ल सुवर्णविलेपन विद्रावाचे घटक असतात. यात बहुधा अविद्रव्य धनाग्रे वापरतात. त्यामुळे विद्रावात अधूनमधून संयुगाच्या रूपाने धातूंचे आयन समाविष्ट करावे लागतात. क्षारीय सायनाइड विद्राव मर्यादित प्रमाणात वापरतात तर सल्फाइड अटिलांवर आधारित विद्राव व अदिक प्रमाणात वापरले जाऊ लागले आहेत. विविध रंगछटांचे विद्युत् करण्यासाठी सोन्याबरोबर निकेल, चांदी, तांबे कोबाल्ट व इंडियम या धातूंचे सहनिक्षेपण करतात. या पद्धतीने पिवळसर, तांबडी, गुलाबी, सोनेरी, हिरवट सोनेरी अथवा चंदेरी सोनेरी छटा मिळू शकतात. एक विद्युत् हीन क्षपणकारक सुवर्णविलेपन विद्रावही वापरात आहे. [⟶ सोने].
निकेल: वाहनांचे दर्शनी भाग, नळकामातील भाग, ग्रामोफोनमधील काही भाग, खेळणी, विद्युतीय जोडण्या इत्यादींवर निकेलचे विलेपन मोठ्या प्रमाणात केले जाते. पोलाद, पितळ इत्यादींवर निकेलाचे सापेक्षतः जाड विद्युत् विलेपन करून मग त्याच्यावर क्रोमियमाचा पातळमुलामा देतात. सुशोभन व संक्षारणरोध या हेतूंनी मुख्यत्वे असे विद्युत् विलेपन करतात. यासाठी वॉट विलेपन विद्राव सर्वाधिक वापरला जातो. या विद्रावात निकेलाचे सल्पेट व क्लोराइड आणि बोरिक अम्ल असते. चमकदार मुलाम्याकरिता विद्रावात बेंझिन अथवा नॅप्थॅलीन डाय सल्फॉनिक अम्ले व ब्युटाइन डायॉल यांसारखी कार्बनी संयुगे घालतात. संक्षारणरोध सुधारण्यासाठी बऱ्याचदा निकेलाचे दुहेरी विलेपन करून त्यावर क्रोमियमाचा पातळ मुलामा देतात.
अधातवीय पृष्ठभागावर सुशोभनासाठी विद्युत् हीन क्षपणकारक निकेल विलेपन करतात. अशा आधारपृष्ठावर प्रथम विवेचक अम्लकोरणकरतात. यांमुळे पडलेल्या भेगांत निकेल घुसून ते आधारपृष्ठाला घट्ट चिकटते. अशा विलेपन विद्रावांत हायपोफॉस्फाइटे किंवा बोरोहायड्राइडे हे क्षपणकारक असतात. विद्युत् हीन क्षपणकारक पद्धतीने अनियमित धातवीय आधारपृष्ठावर एकसारख्या जाडीचा निकेलाचा मुलामा देता येतो. [⟶निकेल].
चांदी : काटे, चमचे, किटल्या यांसारख्या घरगुती वापराच्या वस्तू, दागिने यांवर मुख्यतः चांदीचे विद्युत् विलेपन करतात. अशा वस्तू तांबे, पितळ, निकेल इत्यादींच्या असतात. आकर्षक रूप व संक्षारणरोध या हेंतूंनी असे विलेपन करतात. मात्र गंधकयुक्त खाद्यपदार्थासाठी अशी भांडी वापरता येत नाहीत. धारवे, विद्युत् मंडले, ⇨तरंग मार्गदर्शक, तप्त वायूंसाठीची झीरपबंदी यांमध्येही चांदीच्या विद्युत् विलेपनाचा उपयोग होतो. चांदीच्या विलेपनाचे विद्राव सामान्यपणे सायनाइड प्रकारचे असून त्यांमध्ये मुलाम्याला तेजस्वीपणा आणणारी द्रव्ये टाकलेली असतात. [⟶ चांदी].
कथिल : पोलादी पत्र्यावर कथिलाचे विलेपन करून कथिलाच्छादित पत्रे तयार करतात. खाद्यपदार्थासाठीचे हवाबंद डबे, प्रशीतकांची वेटोळी, धारव्यांचे पृष्ठभाग, डाखकाम करावयाचे पृष्ठभाग, दुकानावरील पाट्या वगैंरेंसाठी हे पत्रे वापरतात. पोलादावरील कथिलाचा पातळ मुलामा वितळून परत वाहू दिल्यास छिद्रहिन, चकचकीत मुलामा तयार होऊ शकतो . अम्ल कथिल विलेपन विद्रावांत स्टॅनस क्लोराइड व सल्फेड, तर क्षारिय विद्रावात सोडियम किंवा पोटॅशियम स्टॅनेट हे मुख्य घटक असतात. हे दोन्ही प्रकारचे विद्राव विद्युत् विच्छेदनीय कथिलाच्छादित पत्रे तयार करण्यासाठी वापरतात. [⟶ कथिल कथिलाच्छादित पत्रे].
जस्त : पोलाद गंजू नये म्हणून मुख्यत्वे त्याच्यावर जस्ताचे विलेपन करतात. जस्ताच्या तप्त रसात पत्रा बुडवून दिलेल्या मुलाम्यापेक्षा विद्युत् निक्षेपणाने दिलेला जस्ताचा मुलामा पातळ व शुद्ध स्वरूपाचा असू शकतो. सायनाइड जस्त विलेपन विद्राव सर्वांत जास्त प्रमाणात वापरला जातो. कारण त्याची क्षेपणक्षमता चांगली जास्त प्रमाणात जातो. कारण त्याची क्षेपणक्षमता चांगली आहे., तो वापरयला सोयीस्कर आहे व त्यात घालावयाची ते जस्वीपणा आणणारी द्रव्ये उपलब्ध आहेत. विशेषतः तारेच्या अथवा पट्टीच्या अखंड विलेपणासाठी अम्लीय विद्राव वापरतात. [⟶ जस्त गॅल्व्हानीकरण].
कॅडमियम: पोलादावर उत्कृष्ट गंजरोधक म्हणून कॅडमियमाचे विद्युत् विलेपन करतात. विशेषतः सागरी वतावरण गंजरोधक म्हणून याचा खास उपयोग होतो. धुलाई यंत्रे, बाष्पित्रे इ. घरगुती वापराच्या साधनांतही या विलेपनाचा उपयोग होतो. कॅडमियम विद्युत् विलेपनासाठी वापरण्यात येणाऱ्या सायनाइड विद्रावात कॅडमियम सायनाइड, सोडियम सायनाइड, सोडियम हायड्रॉक्साइड किंवा कॅडीमियम ऑक्साइड व सोडियम सायनाइड हे घटक असतात. लोखंडावर याचे सरळ विलेपन करता येते. विलेपित वस्तू ऑक्सिडीकारक विद्रावांत २ ते ३० सेंकद बुडवितात. त्यामुळे पृष्ठभाग चकचकीत होतो. [⟶ कॅडमियम].
शिसे : लोखंड वपोलाद यांच्यावर संरक्षणासाठी शिशाचे विद्युत् विलेपन करतात. फ्ल्युओसिलिकेट, फ्ल्युओबोरेट व परक्लोरेट असलेल्या विलेपन विद्रावाने जाड मुलामा देता येतो. [⟶ शिसे].
लोखंड : यंत्रातील झिजलेल्या भांगावर विद्युत् निक्षेपणाने लोखंडाचे विलेपन करून त्या भागांचे आकारमान इष्ट तेवढे करून घेतात. छपाईच्या शाईच्या संक्षारक क्रियेपासून तांब्याच्या मुद्रणफलकांचे संरक्षण करणयासाठी त्याच्यावर लोखंडाचे विलेपन करतात. (उदा., चलनी नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे मुद्रणफलक). [⟶ लोखंड].
मिश्रधातू: धातूपेक्षा मिश्रधांतूचे विद्युत् विलेपन कमी प्रमाणात केले जाते. पितळ, कासे, डाखकामाची धातू, स्पेक्युलम (मुख्यत्वे तांबे व कथिल यांची पांढरी, कठिण मिश्रधातू) व तांबे कथिल जस्त मिश्रधातू यांचे विलेपन अधिक प्रमाणात केले जाते. रबर चिकटण्यासाठी व सुभोनासाठी पोलादावर पितळेचे विलेपन करतात. स्पेक्युलम धातू कठिण, झीजरोधक, गंजरोधी व दिसायला आकर्षक असल्याने तिचे विद्युत् विलेपन करतात. तांबे कथिल जस्त मिश्रधातू गंजरोधक व निकेलपेक्षा अधिक झीजरोधक आहे, तसेच ती अचुंबकीय व डाखकामाला सोयीची आहे. दागिने, काटे, चमचे, भांडी, धातूचे फर्निचर, प्रशीतक इ. वस्तूवंरील विद्युत् विलेपनासाठीही मिश्रधातू वापरतात. कधीकधी शिसे-कथिल -तांबे, निकेल कोबाल्ट व कथिल -जस्त या मिश्रधातूंचे विद्युत् विलेपन करतात. [⟶ मिश्रधातू].
विद्युत् विलेपित मुलाम्यांचे गुणधर्म : उपयोगांनुसार मुलाम्याच्या विशिष्ट गुणधर्मांचे नियमन करतात व त्याकरिता त्यांचे मापन करावे लागते. याकरिता काही संस्था व शासन यांच्यामार्फत विनिर्देश (मूलभूत गरजांनुसार प्रमाण म्हणून निर्देशित केलेली गुणवैशिष्ट्ये) ठरविलेले असतात. या विनिर्देशांनुसार विविध गुणधर्म व ते निश्चित करण्याच्या मापन पद्धती तयार केल्या आहेत. मुलाम्याची जाडी, त्याची आधारपृष्ठाशी असलेली संलग्नता, तेज्वीपणा, संक्षारणरोध, झीजरोध, तसेच शरणबल, तन्यता, कठिनता, अंतर्गत प्रतिबल इ. यांत्रिक गुणधर्म डाखकामक्षमता, घनता, विद्युत् संवाहकता व चुंबकीय गुणधर्म यांचा उपयोगांनुसार विचार करावा लागतो.
जाडी : मुलाम्याची जाडी व आधारपृष्ठावर ती कशी बदलते आहे. यांवर मुलाम्याचे बरेच गुणधर्म अवलंबून असतात. ही जाडी मोजण्यासाठी अनेक प्रकारची मापके, तसेच सूक्ष्मदर्शकीय, भारात्मक (वजनी) किंवा रासायनिक पद्धती वापरतात.
विविध प्रकारच्या काही मुलाम्यांची सर्वसाधारण वापरातील जाडी अशी असते: सोन्याचा मुलामा ०·५ मायक्रॉन (१ मायक्रॉन म्हणजे मीटरचा दशलक्षांश भाग), क्रोमियम ०·२५ मायक्रॉन, अभियांत्रिकीय उपयोगाचे जाड क्रोमियम १०० ते ३०० मायक्रॉन, निकेल २० ते २५ मायक्रॉन, जस्त व कॅडमियम २·५ ते १५ मायक्रॉन, डब्यांच्या कथिलाच्छादित पत्र्यातील कथिल ०·४ मायक्रॉन तर डाखकामाचे कथिल मायक्रॉन आणि धातूपणातील मुलामा ०·५ सेंमी.
आधारपृष्ठ किंवा मुलामा चुंबकीय असल्यास चुंबकीय मापकांनी जाडी मोजतात. याकरिता मुलामा दिलेला नमुना व एक चुंबक यांच्यातील आकर्षण प्रेरणा मोजतात. आधारपृष्ठ चुंबकीय असल्यास ही आकर्षण प्रेरणा मुलाम्याच्या वाढत्या जाडीनुसार कमी होते. उलट मुलामा चुंबकीय असल्यास त्याच्या वाढत्या जाडीनसार ही प्रेरणा वाढते. विशिष्ट प्रकारे मुलाम्याचा आडवा छेद तयार करून त्याची जाडी सूक्षमदर्शकाने किवा क्रमवीक्षक ⇨इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने मोजतात.
मुलामा विरघळण्यासाठी लागणारा वेळ मोजून रासायनिक पद्धतीने मुलाम्याची जाडी मोजतात. भारात्मक पद्धतीत आधारपृष्ठापासून मुलामा अलग करून त्याचे वजन करतात अथवा आधारपृष्ठाचे विलेपनापूर्वी व नंतर वजन करतात. या दोन्ही पद्धतीत मुलाम्याची घनता व क्षेत्रफळ अचूकपणे माहीत असावे लागते.
आसंजन : बहुतेक उपयोगाकरिता मुलामा व आधारपृष्ठ यांच्यातील आसंजन किंवा संलग्नता (घट्ट चिकटण्याचा गुणधर्म) चांगली आसावी लागते. आसंजन चांगले नसल्यास मुलामा फळावरील सालीप्रमाणे सोलवटून निघून जातो किंवा त्यांचे फुगवटे निर्माण होतात. दोन धातूंमधील आसंजन सर्वसाधारणपणे घट्ट अथवा बळकट असते.विलेपनापूर्वी आधारपुष्ठ स्वच्छ नसले किंवा ते सर्वत्र एकसारखे कठीण नसले, तर आंसजन चांगले होत नाही. अधातवीय आधारपृष्ठ व विद्युत् हीन क्षपणकारक मुलामा यांच्यातील बंधन मुख्यत्वे यांत्रिक स्वरूपाचे असते. त्यामुळे त्यात एकसारखेपणा नसतो.
आसंजनाचे मापन करणाऱ्या परीक्षांचे चांगले मानकीकरण झालेले नाही. सोलवटण्याच्या परिक्षेत मुलाम्याचा काही भाग आधारपृष्ठापासून सालीप्रमाणे सोलून अलग करतात व उरलेला मुलामा खेचून काढण्यासाठी लागणारी प्रेरणा मोजतात. तीवरून आसंजनाचे मापन करतात. खरडण्याची परीक्षा तसेच आधारपृष्ठ व मुलामा यांच्यामध्ये धारदार सुरी घुसवण्याची परीक्षा ह्या आसंजनमापनाच्या गुणात्मक परीक्षा आहेत.
तेजस्वीपणा: पृष्ठभागावरील खाचखळग्यांची खोली प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा जास्त नसल्यास मुलाम्याचा तेजस्वीपणा चांगला असतो. मुलाम्यातील स्फटिकांचे आकारमान अतिसूक्ष्म असले म्हणजे असे घडते. विलेपन विद्रावातील समावेशक संयुगे जलद शोषली जाऊनही खळगे भरले जातात व पृष्ठ गुळगुळीत होते. तेजस्वीपणाचे गुणात्मक मापन क्वचित करतात. डोळ्यांनी तुलना करूनच सामान्यपणे तेजस्वीपणा निश्चित करतात.
संक्षारण : पुरेसा मुलामा असेपर्यत क्षयक्षम मुलाम्याने आधारपृष्ठाचे संक्षारणापासून रक्षण होते. येथे संक्षारणाने मुलाम्याचा क्षय होतो व ह्याद्वारे आधारपृष्ठाचे संरक्षण होते. (उदा., जस्तलेपित पोलादी पत्रा). अशा तऱ्हेने हे संरक्षण मुलाम्याच्या जाडीवर अवलंबून असते. आधारपृष्ठापेक्षा अधिक अभिजात मुलामा सलग, अखंड असला, तर आधारपृष्ठाचे संक्षारणापासून रक्षणहोते. मुलाम्यात भेगा, छिद्रे वा खंड असल्यास तेथे आधारपृष्ठ संक्षारक माध्यमाला उघडे पडते, प्रत्यक्ष, सद्दशीकरण केलेल्या [⟶ सद्दशीकरण]वा अनावृत (उघड्या) स्थितीत संक्षारणाची परीक्षा करतात. [⟶ गंजणे].
झीजरोध: अधिक कठीण मुलामा अधिक झीजरोधक असतो. मात्र झीजरोधाशी संबंधित असलेल्या काही गोष्टी नीट समजलेल्या नाहीत. झीज अनेक प्रकारची असून आसंजक व अपघर्षक झीज हे सर्वाधिक सामान्य प्रकार आहेत. संक्षारण व वंगणक्रिया यांचा झिजेवर मोठा परिणाम होऊ शकतो. संपर्कात असलेले दोन पृष्ठभाग एकमेकांच्या संदर्भात काही काळ हलवून व नंतर त्यांच्या वजनात झालेली घट मोजून त्यांचा झीजरोध ठरवितात.
यांत्रिक गुणधर्म: ओतीव व तापानुशीतित (प्रथम उष्णता संस्करण करून मग थंड केलेल्या) धातूंपेक्षा मुलाम्यांची कठिनता व बल जास्त तर तन्यताकमी असते. मुलाम्यांतील धातूंचे अनेक स्फटिकदोष धातूंतील दोषासारखेच असतात. विद्युत् निक्षेपित धातू तापविल्यावर पुनर्स्फटिकीभवन होताना पुष्कळदा त्यांच्यात लहान स्फटिक तयार होतात. त्यांच्या स्फटिक जालकांतील परक्या द्रव्यांमुळे मुलाम्याचे बल वाढते. मुलाम्यात पुष्कळ जुळे स्फटिक असल्यासही त्याचे बल वाढू शकते. सर्वसाधारणपणे घटकांमुळे तन्यता कमी होते. मुलाम्यात समाविष्ट झालेल्या वायूंमुळे छिद्रे निर्माण होऊन बल व तन्यता दोन्ही कमी होतात. [⟶ धातूंचे यांत्रिक गुणधर्म].
मुलाम्याचे यांत्रिक गुणधर्म निश्चित करण्यासाठी तन्यता परीक्षा वापरतात. मात्र पुष्कळदा फुगवटा परीक्षा वापरतात. कारण प्रमाण तन्यता परीक्षेपेक्षाफुगवटा सच्छिद्रतेचा परिणाम कमी होतो. मुलाम्याची कठिनता मोजण्यासाठी खूप परीक्षेसारख्या पद्धती वापरतात. [⟶कठिनता].
अंतर्गत प्रतिबल : (घनपदार्थातील विलगीकरण, सरकक्रिया किंवा घनीकरण यांना विरोध करणारी दर एकक क्षेत्रफळामागील प्रेरणा म्हणणे प्रतिबल होय आणि बाह्य प्रेरणांवर अवलंबून नसणाऱ्या घन पदार्थातील प्रतिबल प्रणालीलां अंतर्गत प्रतिबल म्हणतात). विद्युत् विलेपित बहुतेक मुलामे अंतर्गत तन्यता प्रतिबलाच्या स्थितीत असतात. विलेपन विद्रावात विशिष्ट द्रव्ये घालून (उदा., निकेलाच्या विलेपन विद्रावात सॅकॅरीन टाकून) हे प्रतिबल कमी करता येते. मात्र या प्रतिबलामागील कारण अजून नीट समजलेले नाही मुलामा दिलेली पट्टी वाकवून अथवा सर्पिलाकार गुंडाळून हे प्रतिबल मोजण्याच्या पद्धती वापरात आहेत.
डाखकामक्षमता: मुद्रित मंडलांच्या विद्युत् विलेपित भागांच्या दृष्टीने हा गुणधर्म विशेष महत्त्वाचा असतो. हा गुणधर्म पृष्ठभागाच्या स्वच्छपणावर (उदा., दीर्घकाळ साठविल्यानंतर किती प्रमाणात ऑक्सिडीभवन होतेयावर) अवलबूंन असतो. तांब्याच्या मुलाम्यावर डाखकामाची धातू, कथिल किंवा सोने यांचे विद्युत् विलेपन करून त्याचे आच्छादन निर्माण केले जाते. यामुळे ऑक्सिडीभवनास प्रतिबंध होतो. व डाखकामक्षमता सुधारते. वितळलेल्या स्वरूपातील डाखकाम धातू किती चांगली पसरते त्यावरून हा गुणधर्म निश्चित करतात. या पसरण्यावर तापमानाचा परिणाम होतो. मुद्रित मंडलाचे द्रव्य व मुलाम्यावरील तांबे यांचे ऊष्मीय प्रसरण गुणांक भिन्न असतात. त्यामुळे डाखकामासाठी तापविल्यावर त्यांच्यात उच्च अंतर्गत प्रतिबले निर्माण होऊ शकतात. विशेषतः आरपार छिद्रांजवळील विलेपित भागाच्या पातळ व ठिसूळ भागांत या प्रतिबलामुंळे भंग निर्माण होऊ शकतात[⟶धातूंचे यांत्रिक गुणधर्म].
उपयोग: विद्युत् विलेपणाचे काही महत्त्वाचे उपयोग याआधी आलेले असून ‘कथिलाच्छादित पत्रे’ व ‘गॅल्व्हानीकरण’ या नोंदीमध्येही काही उपयोग दिलेले आहेत. पुढे काही अन्य उपयोग दिले आहेत. काही संस्करणांमध्ये पोलादाच्या पृष्ठभागालगतचा थर कठिण होतो.असे पृष्ठकठिनीकरण रोखण्यासाठी पोलादावर तांब्याचे विद्युत् विलेपन करतात. पत्रा, तार, पट्टी या रूपांत वापरण्यास येणाऱ्या घरगुती वापराच्या पोलादी वस्तूंवर जस्तलेपन करतात. कारण जस्त स्वस्त असते. गृहोपयोगी वस्तू, रुग्णालयातील साधने व हत्यारे इत्यांदींवर निकेल व क्रोमियम यांचे विद्युत् विलेपन करतात. बऱ्याचदा पोलादावर निकेल व क्रोमयम यांच्या आधी तांब्याचे विद्युत् विलेपन करतात. कारण तांब्याचे विलेपन सहज करता येते. त्यामुळे पोलादी आधारपृष्ठावरील दोष झाकले जाऊन ते गुळगुळीत होते आणि जेव्हा अंतिम संस्कारणासाठी यांत्रिक क्रिया करण्याची आवश्यकता असते, तेव्हा पोलादापेक्षा तांब्यावर उजळण क्रिया करणे सोपे असते. सागरी वातावरणात वापरावयाच्या पोलादी वस्तूंवर कॅडमियमाचे विलेपन करतात. विषारी नसल्याने नित्योपयोगी भांडी व इतर वस्तू यांवर चांदीचे विद्युत् विलेपन करतात. तसेच विद्युतीय स्पर्शक, धारवे इत्यांदीवर चांदिचा मुलामा देतात. दागदागिने, घड्याळाच्या डब्या वगैंरे वस्तूंवर सोन्याचा आकर्षक व न गंजणारा मुलामा देतात. इलेक्ट्रॉनीय उद्योगात डाखकामधातूच्या विद्युत् विलेपणाचा उपयोग होतो. कर्तन हत्यारे,मुद्रा, लाटमाचे रूळ इ. वस्तूंचे भौतिकीय व यांत्रिक गुणधर्म सुधारण्यासाठी त्यांच्यावर क्रोमियमाचे जाड विलेपन करतात. यंत्रण क्रिया नीट न झालेले अथवा झिजलेले यंत्रभाग योग्य आकारमानात आणण्यासाठी त्यांच्यावर क्रोमियम, निकेल किंवा लोंखड यांचे विद्युत् विलेपन करतात. धारव्यांवर क्रोमियमाचे सच्छिद्र विद्युत् विलेपन करतात. यामुळे निर्माण होणाऱ्या खाचखळग्यांत वंगण तेल साचून राहते व धार्याचे काम चांगले होते. दट्ट्यांच्या कडांवर कथिलाचे विद्युत् विलेपन करतात. त्यामुळे ज्या सिलिंडरात दट्ट्या हलतो त्या सिलिंडराच्या भित्ती खराब होत नाहीत. चांगले प्रकाश परावर्तक व विद्युत् स्पर्शक यांवर ऱ्होडियमाचे विद्युत् विलेपन करतात. लोंखड-कोबाल्ट-निकेल या मिश्रधातूचे विद्युत् विलेपन केलेल्या पट्ट्या संगणकातील स्मृतिघटकांसाठी वापरतात. यांशिवाय विशिष्ठ उपयोगांसाठी विद्युत् रूपण व ॲनोडायझिंग या प्रक्रिया कराव्या लागतात. त्यांची माहिती थोडक्यात पुढे दिली आहे.
विद्युत् रूग्ण: विद्युत् विलेपणाचा हा कास प्रकारचा उपयोग आहे. इष्ट त्या आधारपृष्ठावर(किंवा आधारदंडावर) विद्युत् विलेपनाने जाड मुलामा देतात. मग तो जाड मुलामा आधारपृष्ठावरून काढून घेतात. ओतिवासारखा हा जाड थर साचा म्हणून वापरतात. ज्या भागांच्या आतल्या पृष्ठभागांवर गुंतागुंतीची रचना (नक्षी) करण्याची गरज असते, असे पृष्ठभाग तयार करण्यासाठी ही पद्धती विशेष सोयीचे आहे. आतल्या पृष्ठभागापेक्षा बाह्या पृष्ठभागावर गुंतागुंतीच्या यंत्रणक्रिया अधिक सहजपणे करता येतात. आधारपृष्ठाच्या बाह्या पृष्ठभागावर इष्ट ती यंत्रणक्रिया करतात. त्यावर विद्युत् विलेपनाने जाड थर दिला म्हणजे या बाह्या पृष्ठभागाची रूपरेखा या थराच्या आतल्या पृष्ठभागावर स्थानांतरित होते. असा अलग केलेला थर मग साचा म्हणून वापरतात. हा साचा धातवीय किंवा अधातवीयही असू शकतो. अधातवीय पृष्ठभाग ग्रॅफाइटासारखे चूर्ण लावून, विद्युत् संवाहक लॅकरचा लेप देऊन, रासायनिक क्षपण करून, विद्युत् हीन क्षपणकारक विलेपणाने अथवा बाष्पनिक्षेपणाद्वारे विद्युत् संवाहक करतात. घट्ट न चिकटणारा मुलामा आधारपृष्ठापासून अलग करणे सोपे असते. अन्यथा आधारपृष्ठ विरघळून वितळवून काढावे लागते. या तंत्राने गुंतागुंतीच्या आकाराची तंतोतंत नक्कल करता येते. आणि हे साध्य करताना कराव्या लागणाऱ्या यंत्रणक्रियेत थोडेच भंगार निर्माण होते अथवा निर्माण होत नाही. या पद्धतीत धातूला उष्णता द्यावी लागत नाही आणि प्रमाण वस्तूच्या पृष्ठभागाची रूपरेषा अगदी सूक्ष्म तपशिलानिशी हुबेहुब तयार करता येते. यामुळे ध्वनीमुद्रिकांच्या मूळ (प्रमाण) प्रती बनविणे व त्यांवरून त्यांच्या अनेक प्रती तयार करणे, मुद्रणफलक किंवा मुद्रणजाळी तयार करणे, पदके व त्यांच्यासारख्या वस्तूंचे पुनरूत्पादन करणे, तसेच रडार तरंग मार्गदर्शक [⟶ तरंग मार्गदर्शक], काही वाद्ये, फाउंटन पेनांची टोपणे इत्यादींच्या निर्मितीत हे तंत्र वापरतात. विद्युत् टंकनिर्मिती हा याच तंत्राचा एक प्रकार आहे. व्यवसायातील टंकांची रूपे व कोरीव काम यांचे पुनरूत्पादन करण्यासाठी विद्युत् टंकनिर्मितीचा उपयोग होतो.
ॲनोडायझिंग: ही विद्युत् विलेपनाशी निगडीत असलेली प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत एका योग्य विद्रावामध्ये धनाग्र म्हणून असलेल्या धातूवर ऑक्साइड निक्षेपित करतात. मुख्यतः ही प्रक्रीया ॲल्युमिनीयमासाठी वापरली जात असली, तरी बेरिलियम, मॅग्नेशियम, टँटॅलम, टिटॅनियम इ. धातूंसाठीही ती वापरता येते. ऑक्साइडे विद्युत् निरोधक असली तरी त्यांचे सापेक्षतः जाड निक्षेप (थर) निर्माण करता येतात. बारीक छिद्रांवाटे विद्राव धातूच्या पृष्ठापर्यंत पोहोचू शकत असल्याने निक्षेपणाची क्रिया अखंडपणे चालू राहते. कारण या छद्रातील विद्युत् विच्छेद्यांमार्फत विद्युत् प्रवाह वाहून नेला कारण या छिद्रातील विद्युत् विच्छेद्यांमार्फत विद्युत् प्रवाह वाहून नेला जातो. ॲनोडायझिंग नंतर ही छिद्रे सीलबंद करतात. यामुळे आधारपृष्ठाचे अधिक चांगले संरक्षण होते. यासाठी गरम पाणी किंवा पाण्याची वाफ यांनी संस्करण करतात. यामुळे जलसंयोग झाल्याने ऑक्साइडांचे घनफळ वाढते व छिद्रे बंद होतात. ॲल्युमिनियमाच्या ॲनोडायझिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या विद्रांवामध्ये सामान्यपणे क्रोमिक अम्ल किंवा सल्फ्युरिक अम्ल असते. विद्रावात रंजकांचा अंतर्भाव करून रंगीत छटा निर्माण करता येतात.
भारत: भारतात विद्युत् विलेपनाचा व्यवसाय मुख्यत्वे मुंबई, कलकत्ता, एर्नाकुलम् अलाहाबाद, दिल्ली, बंगलोर इ. शहरांतून मोठ्या प्रमाणावर चालतो. तसेच इतर बहुतेक मोठ्या शहरांतही छोट्या प्रमाणावर चालतो. तसेच इतर बहुतेक मोठ्या शहरांतही छोट्या प्रमाणावर विद्युत् विलेपणाचे काम केले जाते. तांबे, क्रोमियम, निकेल, जस्त, कॅडमियम, काही मिश्रधातू यांचे विद्युत् विलेपन अधिक प्रमाणात केले जाते. शस्त्रक्रियेची हत्यारे, दूरध्वनी संच, गृहोपयोगी व विद्युतीय उपकरणे, रेडिओ ग्राही व दूरचित्रवाणी संच सायकली, मोटारगाड्या, विमाने इ. वाहने यांच्या भागांच्या विद्युत् विलेपणामुळे हा उद्योग वाढला आहे. झिजलेल्या यंत्रभागांना योग्य ते आकारमान देण्यासाठीही विद्युत् विलेपन वापरले जाते. भारतातॲल्युमिनियम मिश्रधातूंचे ॲनोडायझिंगही केले जाते. काही विलेपन रसायने व धातू यांचीही निर्मिती भारतात होते.
अलीगढ, मुरादाबाद, मिर्झापूर, बनारस, सुरत, दिल्ली, येथे परंपरागत रीतीने शोभिवंत वस्तू व दागदागिने यांवर विद्युत् विलेपन केले जाते. भोजनाच्या टेबलावरील भांडी व वस्तू, चहाची भांडी, फुलदाणी, अत्तरदाणी, काटे, चमचे, गलाबदाणी, सुशोभनाच्या वस्तू इ. शोभिवंत वस्तू, तसेच जर कलाबूत यांवरील विद्युत् विलेपन अधिक प्रमाणात केले जाते. मुरादाबादचा निकेल व चांदीचा एकत्रित मुलामा वैशिष्ट्यपूर्ण आहे.
पहा: धातूंचे मुलामे विद्युत् धातूविज्ञान विद्युत् रसायनशास्त्र.
संदर्भ: 1. Blum, W. Hongaboom, G.B. Principles of Electroplating and Electroforming, New York, 1949.
2. Duffy, J. I., Ed., Electrodepostion Processes, Equipment and Compositions, 1982.
3. Foulke. D. F. Crane, F. D., Eds., Electroplaters, Process Control Handbook, New York, 1975.
4. Graham, A.K., Ed., Electrrroplating Engineering Handbook, New York,1971.
5. Lowenheim, F. A., Ed., Modern Electroplatimg, New York, 1974.
6. Pathasaeathy, N. V. Practical Electroplating Handbook, Princeton 1988.
7. Sard, R. and others, Eds., Properties of Electrodeposits Their Measurement and Significance, New York, 1975.
बालावलकर, प्र. ग. ठाकूर, अ. ना.
“