विद्युत् चिकित्सा :रोगांवरील उपचारांसाठी उष्णता, पाणी, माती, ध्वनी इ. भौतिकीय साधने वापरणाऱ्या भौतिकीय चिकित्सेच्या अनेक पद्धतीपैकी विद्युत् चिकित्सा ही महत्त्वाची पद्धती आहे. हिच्यात विजेच्या साहाय्याने रोग अथवा विकारांवर उपचार करतात. विद्युत् प्रवाहाचा अथवा त्यामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत् चुंबकीय उर्जेचा उपयोग मुख्यतः शरीर वा शरीराच्या भागाचे कार्य अथवा संरचना यांत बदल घडवून आणण्यासाठी केला जातो. विजेपासून निर्माण केलेल्या ध्वनी, प्रकाश, लेसर इ. ऊर्जारुपांचा विचार ‘भौतिकी चिकित्सा’ या नोंदीत केला आहे. तर ‘निसर्गोपचार’ या नोंदीतही या विविध चिकित्सांची माहिती दिलेली आहे आणि ‘ऊतकतापन चिकित्सा’ या नोंदीत विजेपासून उष्णता निर्माण करून तिचा रोगोपचारात होणारा वापर विशद केला आहे.

इतिहास :इ. स. १६०० सालानंतरच रोगोपचारासाठी विजेचा वापर होऊ लागला. १७४५ साली रोगचिकित्सेसाठी विजेचा वापर करण्याविषयीचे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. मायकेल फॅराडे यांनी विद्युत् प्रवर्तन (बदललेल्या प्रवाहाने विद्युत् चालक प्रेरणा निर्माण करणाऱ्या) वेटोळ्याच्या तत्त्वाचा शोध लावल्याने एकोणिसाव्या शतकाअखेरीपर्यंत विद्युत् शरीरक्रियाविज्ञानाचे (विशिष्ट विद्युत् प्रवाहाने स्नायू व तंत्रिका मज्जा-यांचे उद्दीपन करण्याविषयीच्या शास्त्राचे) नियम विकसित झाले. विख्यात विद्युत् चिकित्सक जी. बी. ए. द्यूशेन (१८०६-७५) यांनी १८३० एवढ्या आधी फॅराडिक विद्युत् प्रवाहाचा रोगोपचारासाठी उपयोग केला होता. झाक आर्सेअन द’ आरसांव्हाल यांनी १८९२ साली उच्च कंप्रता (दर संकेदास होणाऱ्या कंपनांची संख्या उच्च असलेल्या) प्रवाहाचा वापर सुरू केला. १९००-१० दरम्यान ऊतकतापन चिकित्सा पुढे आली ⇨रडारविषयक तंत्रामुळे सूक्ष्मतरंग ऊतकतापन चिकित्सा पुढे आली.

पद्धती :विद्युत् चिकित्सेत मुख्यतः पुढील पद्धती आहेत : (१) कमी कंप्रतेच्या प्रवाहाने तंत्रिका वा स्नायू ऊतकांत आयनी (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट निर्मितीशी निगडीत असलेले) बदल घडवून त्यांना उद्दापित करणे (उदा., पक्षाघातग्रस्त निष्क्रिय स्नायूंचा परकृत व्यायाम). (२) उच्च कंप्रतेच्या (१० किलोहर्ट्‌झपेक्षा जास्त कंप्रतेच्या, हर्ट्‌झ हे कंप्रतेचे एकक आहे) प्रवाहाने आयनी बदलाला अवसर न देता ऊतकांत उष्णता निर्माण करणे (उदा., ऊतकतापन चिकित्सा). (३) प्राकृतिक (स्वाभाविक) मर्यादेपेक्षा जास्त दाबाचे प्रवाह वापरून ऊतकनाश घडविणे (उदा., तथाकथित विद्युत् शस्त्रक्रिया). (४) विद्युत् प्रवाहाच्या मदतीने आयनी औषधिद्रव्ये त्वचेपार पाठविणे. (५) विजेचा धक्का देण्याच्या चिकित्सेत मध्यवर्ती तंत्रिका तंत्रात [⟶ तंत्रिका तंत्र] जबर उद्दीपण उत्पन्न करून उपचार करणे, उदा., मानसविकृतिविज्ञानातील विशिष्ट विकारांवर या पद्धतीने उपचार करतात.

विद्युत् प्रवाह :विद्युत् उपचारासाठी पुढील प्रवाह वापरता येतात. (१) फॅराडिक प्रवाह : मुख्य पुरवठ्याच्या प्रत्यावर्ती (५०) हर्ट्‌झ प्रवाहापासून प्रवरर्तनाने आवश्यक त्या कंप्रतेचे कमी दाबाचे खंडित एकदिश प्रवाह निर्माण करतात. मायकेल फॅराडे यांनी वापरलेल्या उच्च विद्युत् दाब देणाऱ्या प्रवर्तक वेटोळ्यावरुन अशा प्रवाहातील अल्पावधीच्या कंपनांना फॅराडिक प्रवाह म्हणतात. (२) अविरत वाहणारा गॅल्व्हानिक प्रवाह वा चल विद्युत्, (३) घर्षणजन्य स्थिर विद्युत्, (४) प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह व (५) उच्च कंप्रता विद्युत् प्रवाह. सूक्ष्म कंपनाची दोल विस्तारापर्यंत पोचण्याची गती (प्रत्यावर्ती प्रवाहाचे मूल्य सरासरीपासून ते कमाल मर्यादेपर्यंत वाढण्याचा व परत कमी होण्याचा वेग). प्रत्येक कंपनातील प्रवाहाचा एकूण अवधी, कंपनांच्या ऊर्मी (एकत्रित गट) निर्माण करणे (विद्युत् मंडलातील प्रवाहात किंवा दाबात होणारी क्षणिक मोठी वाढ म्हणजे ऊर्मी होय), अशा ऊर्मीची वारंवारकता, ऊर्मीतील दोल विस्तारांची समता अथवा विषमता इ. गुणधर्म बदलून जास्तीत जास्त परिणामकारक प्रवाह निवडता येतात. विशिष्ट विद्युत् प्रवाह मिळविण्यासाठी विशिष्ट उपकरणे वापरतात.

विद्युत् प्रवाहाचे शरीरावरील परिणाम व त्यांचे उपयोग :विद्युत् प्रवाहाचे माणसाच्या शरीरावर होणारे परिणाम भौतिक (यांत्रिक, रासायनिक, ऊष्मीय, प्रारणीय) व मानसिक असतात. निरनिराळ्या विद्युत् प्रवाहांनी ऐच्छिक व अनैच्छिक स्नायूंची जोरदार आकुंचने करता येतात. उत्तेजित करून तंत्रिकांची प्राकृतिक स्थिती सुधारता येते. वेदना व दाहयुक्त सूज कमी करता येते हृदयावर विपरित परिणाम न होता त्वचेतील रक्तवाहिन्यांचे आकुंचन व प्रसरण करता येते संवेदनाहरण व कृत्रिम श्वसन शक्य होते चयापचयात (शरीरात सतत चालणाऱ्या भौतिक रासायनिक घडामोडींमध्ये) सुधारणा करता येते.

(१) तंत्रिका तंतू (मज्जातंतू) व स्नायू यांच्या कोशिकांची पटले उद्दीपनक्षम असतात. विजेने उद्दीपित केल्यावर पटलाच्या दोन्ही पृष्ठावर असणाऱ्या आयनांच्या संहतीमध्ये (प्रमाणात) बदल घडून येतो. बाह्यपृष्ठावरील विद्युत् घनता कमी होते व ते अंतर्भागाच्या तुलनेने काही काळ ऋण भारित होते. हा बदल (विध्रुवीकरण) तरंगाप्रमाणे तंतूच्या टोकांकडे संदेशवहनाचे कार्य करतो. याचा परिणाम संवेदना स्नायूंचे आकुंचन, ग्रंथीचे स्त्रवणे इ. विशिष्ट कार्यास उद्दीपन मिळण्यास होतो. विद्युत् अग्राच्या साहाय्याने शरीराच्या पृष्ठभागावर प्रवाह सोडल्यास घडून येणारे हे परिणाम प्रवाहाची तीव्रता, कंप्रता, वसा ऊतकाचा (वसा साठवलेल्या व वसेच्या बिंदुकांनी पेशी फुगीर झालेल्या संयोजी-जोडणाऱ्या –ऊतकाचा) रोध इ. अनेक घटकांवर अवलंबून असतात.

स्नायू व तंत्रिका यांच्या शारीरीय अभ्यासावरून निश्चित केलेल्या विशिष्ट बिंदूंवर विद्युत् अग्रे ठेवून इच्छित ऊतकांना उद्दीपण करता येते. दीर्घकाळ उपयोगात नसलेल्या स्नायूचे पुनर्शिक्षण, कंडरा [अस्थींना किंवा उपस्थींना (सांध्यातील हाडांच्या पृष्ठभागावर असणाऱ्या लवचिक पेशीसमूहांना) स्नायू घटट बांधणाऱ्या तंतुसमुहाच्या दोरीसारख्या चकमकीत पांढऱ्या गठ्ठ्यांचे ⟶ कंडरा] प्रतिरोपण (एका स्थानापासून काढून दुसऱ्या स्थानात व दुसऱ्या शरीरात बनविण्याच्या) किंवा अन्य पुनर्घटन (शरीरभाग वा अवयवाची दुरूस्ती करण्याच्या) शस्त्रक्रियेनंतर स्नायूंना नवीन क्रियेचे शिक्षण. स्नायूमध्ये तंतुमय ऊतकांचे बंध निर्माण होऊन त्यांच्या हालचालीस देणारा अडथळा टाळणे, हालचालीचे रक्त व लसीका द्रवाचा [⟶ लसीका तंत्र] निचरा करून सूज न येऊ देणे असे विविध परिणाम विद्युत् चिकित्सेने साधता येतात.

(२) संवेदी तंत्रिकांच्या उद्दीपणाने झिणझिण्या आल्याचे जाणवते. त्याच वेळी मेरुरज्जू (मेंदूच्या मागील भागापासून निघालेला व मणक्यांच्या आतील पोकळीतून जाणारा मज्जातंतूंचा दोरीसारखा जुडगा) आणि मध्यमस्तिष्क अशा दोन पातळ्यांवर कार्य करणारी ‘वेदना द्वार’ ही यंत्रणा क्रियाशील होते. परिणामी आधी जाणवत असलेल्या वेदनेची पातळी कमी होते. वेदना संस्करणाची ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पारत्वचीय तंत्रिका उद्दीपन करतात [⟶ तंत्रिका तंत्र मेंदू], यासाठी विद्युत् अग्रे जास्तीत जास्त वेदनेची स्थाने, योग्य त्या तंत्रिका, त्वक्खंड (जिच्यापासून त्वचेला संवेदनशील आतला वाहक मध्यस्तरीय थर बनतो ती कायखंडाची पार्श्वभत्ती) किंवा ⇨ सूचिचिकित्सेचे बिंदू यांवर ठेवतात.

(३) उच्च कंप्रता विद्युत्, लघुतरंग व सूक्ष्मतरंग हे शरीरात जास्त खोलवर पोचून उष्णता निर्माण करतात. ऊतकतापनाच्या या विक्रिमुळे रोहिणिका व केशिका यांचे विस्फारण होते (रुंद होतात). त्या क्षेत्रातील रक्ताचा पुरवठा वाढून पोषकांचा व ऑक्सिजनाचा स्थानिक पुरवठा सुधारतो आणि शोथग्रस्त (दाहयुक्त सुजेने ग्रस्त) इंद्रियांच्या प्रतिष्ठापनास मदत होते. [⟶ ऊतकतापन चिकित्सा].


(४) विद्युत् शस्त्रक्रिया पद्धतीत लहान क्रियाशील विद्युत् अग्र व मोठे अक्रिय विद्युत् अग्र यांतून विद्युत् प्रवाह वाहतो. लहान विद्युत् अग्राखालील उच्च घनता प्रवाहाने एकाच ठिकाणी तीव्र उष्णता निर्माण होऊन ऊतक नष्ट होते. यामुळे नियंत्रित क्षेत्रात निरनिरळ्या प्रमाणात ऊतकनाशक करणे शक्य असून योग्य आकाराच्या विद्युत् अग्राने ऊतकात छेद घेणेही शक्य असते. लहान रक्तवाहिन्यांतून रक्तस्राव कमी प्रमाणात होणे नाजूक व अतिशय वाहिनीवंत ऊतके झटपट व हळूवारपणे हाताळणे, सुलभ होणे आणि शस्त्रक्रियेनंतरचा अवसाद व वेदना कमी प्रमाणात होणे हे विद्युत् शस्त्रक्रियेचे फायदे आहेत. चेहऱ्यावरील नको असलेले केस कायमचे काढून टाकण्यासाठी केसांच्या मुळांमध्ये सूक्ष्म अग्रांच्या साहाय्याने प्रवाह सोडून ते नष्ट करता येतात. यासाठी ऊतकतापन चिकित्सा किंवा गॅल्व्हानिक प्रवाहांचा वापर केला जातो. गॅल्व्हानिक प्रवाहाचा विशिष्ट ऊतकाशी (उदा, चामखीळ) प्रत्यक्ष संपर्क आणून ऊतकदहन किंवा ऊतकनाश करता येतो. गुदाशयाचा कर्करोग व गर्भाशय ग्रीवेवरील (मानेसारख्या भागावरील) व्रण यांवर ऊतकदहनाचे उपचार उपयुक्त ठरले आहेत.

(५) त्वचेवर विद्रावाच्या स्वरूपात लावलेले आयनी पदार्थ गॅल्व्हानिक प्रवाहाच्या साहाय्याने त्वचेपार ढकलता येतात. धन विद्युत् अग्राचे धन आयन ऊतकात प्रविष्ट करता येतात. उदा., विशिष्ट त्वचारोग, डोळ्यांचे विकार इत्यादींत तांबे, मेथॅकोलीन वा झिंक क्लोराइड अशा प्रकारे देतात. ऋण विद्युत् अग्राने ऋण आयन त्वचापार पाठविता येतात. उदा., त्वचावरणाच्या उपचारात कधीकधी आयोडाइड वा क्लोराइडासारखे आयन या रीतीने देतात. ऋण विद्युत् भार असलेले पदार्थ ऋण विद्युत् प्रस्थाखाली आणि धनभारित द्रव्य धन विद्युत् प्रस्थाखाली भिजविलेल्या कापडी घड्यांच्या रूपात ठेवून प्रवाह सुरू केला जातो. अशाच प्रकारे परंतु प्रवाहाची दिशा बदलून त्वचेवर साठलेली त्वक स्नेह (त्वचेच्या त्वक्‌-स्नेह ग्रंथींमधून स्त्रवलेले वसायुक्त वंगण द्रव्य), तेलकट पदार्थ, प्रदुषक द्रव्ये इत्यादींची कठीण पुटे काढून त्वचा मऊ केली जाते. यासाठी सरकते विद्युत् अग्र वापरतात.

(६) विद्युत् झटक्याच्या (धक्क्याच्या) पद्धतीत डोक्यावर योग्य जागी टेकवलेल्या विद्युत् अग्रांमधून मोठ्या प्रमाणात प्रवाह (सु. ७० व्होल्ट दाबाचा ६० हर्ट्‌झ प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह सु. ०.१ सेकंद) सोडल्यास मेंदूच्या विस्तृत क्षेत्राचे जोरदार उद्दीपन होऊन संपूर्ण शरीरभर आकडी आल्याप्रमाणे झटके बसू लागतात. प्रवाहाच्या कंप्रतेनुसार ते अवमोहनी ( विरुद्ध कार्य करणाऱ्या स्नायूंचे आलटून पालटून आकुंचन व शिथिलन होणारे) अथवा तानयुक्त (सर्वच स्नायूंचे एका वेळी संकोचन झाल्याने शरीर ताठ करणारे) असतात. आकडीनंतर अल्पकाळ बेशुध्दावस्ता आणि नंतर घटनांचा पूर्वस्मृतिलोप निर्माण होतो. यामुळे नंतरचे उपचार अधिक सुलभ होतात. या मूळ तंत्राचे सुधारित व वेगवेगळे प्रकार आहेत यातून गंभीर धोके व गुंतागुंत निर्माण होऊ शकतात. याकरिता योग्य रीतीने रोगी निवडतात, ही पद्धती अतिशय कौशल्याने वापरतात आणि उपचार करणाऱ्याची निर्णयशक्ती उत्तम असावी लागते. इ. स. १९३८ मध्ये या पद्धतीचा उपयोग मनोविकारांच्या उपचारासाठी एम्. सेरलेट्टी व एल्. बिनी यांनी प्रथम केला. त्यापूर्वी मेट्राझॉलासारखी उत्तेजक औषधे देऊन हा परिणाम साधला जाई. अजूनही विद्युत् झटका देण्याची ही पध्दत काही प्रमाणात वापरली जात असली, तर विविध मानस औषधशास्त्रीय द्रव्यांच्या शोधामुळे ती मागे पडत आहे.

विद्युत् चिकित्सेचे तंत्र: विद्युत् प्रवाह निर्मितीसाठी सध्या वापरण्यात येणारी उद्दीपन उपकरणे इलेक्ट्रॉनीय पद्धतीवर आधारलेली असतात. शरीरामध्ये इष्ट जागी प्रवाह सोडण्यासाठी त्वचेचा तेवढाच भाग ओला करून किंवा लवण द्रावात भिजवलेली कापडाची पातळ घडी तेथे ठेवून त्यावर योग्य आकाराचे विद्युत् अग्र स्थिर ठेवतात. व्रण वा जखम असलेल्या भागातून प्रवाह जाऊ नये म्हणून त्यावर व्हॅसलीनचा संरक्षक थर देतात. धातूच्या पट्टीका अग्राऐवजी लावण्यास सोप्या, दिर्घकाळ टिकणाऱ्या आणि निर्जंतूक करण्यास सुलभ अशा ग्रॅफाइटमिश्रित रबर किंवा तत्सम अर्धसंवाहक (ज्यांची विद्युत् संवाहकता संवाहक व निरोधक द्रव्यांच्या दरम्यानची असते अशा) द्रव्यांची अग्रे वापरली, तर सोयीस्कर असते. ऊतकतापन चिकित्सा किंवा सूक्ष्मतरंगासाठी विशिष्ट रचनेची अग्रे वापरावी लागतात. दीर्घकाळ प्रवाह चालू ठेवल्याने त्वचा पोळण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे प्रवाहाच्या मार्गात किंवा त्यापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या क्षेत्रात धातूच्या वस्तू, दागिने, श्रवणयंत्रे इतर विद्युत् उपकरणे येणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी लागते. वापरात असलेली काही उपचार तंत्रे पुढीलप्रमाणे आहेत :

फॅराडिक प्रवाहाने स्नायूंना व्यायाम: विद्युत् अग्राच्या एक वा जास्त जोड्यांनी प्रवाहाच्या प्रतिमिनिट ५०-६० ऊर्मी व वृध्दामंध्ये ३०-४० ऊर्मी, तर इजा झालेल्या स्नायूंना २० पेक्षा कमी ऊर्मी देतात. दृश्यमान आकुंचने सुरू होईपर्यंत प्रवाहात हळूहळू वाढ करतात. कंप्रता ५० ते १०० हर्ट्‌झ असून स्पंदकाल ०.०१ ते १० मिलिसेकंद असतो. एका वेळी ५ ते २५ मिनिटे उपचार करतात.

खंडित (रूपांतरित) एकदिश प्रवाह :हे तंत्र वरीलप्रमाणेच आहे, परंतु तंत्रिका छेदित (मज्जातंतूचा भाग शस्त्रक्रियेने कापलेल्या) स्नायूंसाठी जास्त दीर्घ स्पंदकालाचा (१० ते ३०० मिलिसेकंद) प्रवाह प्रतिमिनिट २० ते ६० ऊर्मी या वेगाने उपयुक्त ठरतो.

वेदनाहरणासाठी पारत्वचीय तंत्रिका उद्दीपन :उच्च उद्दीपनाने (१५० हर्ट्‌झ, १०० ते ५०० मायक्रोसेकंद स्पंदकालाचे तरंग) झिणझिण्या येतात, तर निम्न पारत्वचीय तंत्रिका उद्दीपनाने (१ ते ५ हर्ट्‌झ, १०० ते १५० मायक्रोसेकंद, ३० मिलिअँपिअरपेक्षा जास्त शक्ती) तीव्र उद्दीपण धक्का मिळतो. सुचि-चिकित्सेप्रमाणेच हा परिणाम घडून येतो. उपचार ३० ते ४० मिनिटांसाठी किंवा रुग्णामे बरोबर बाळगायच्या छोटया उपकरणाच्या साहाय्याने हवा तेव्हा घेता येतो.

मध्यम कंप्रता व्यतिकरण पद्धती :संवेदक अथवा प्रेरक तंत्रिकांच्या उद्दीपनासाठी कमी कंप्रतेचे प्रवाह वापरताना त्याला त्वचेत बराच रोध होतो. तो टाळण्यासाठी मध्यम कंप्रतेचे दोन प्रवाह एकमेकांस काटकोन करून सोडले जातात. कंप्रतेचे थोडासा फरक असलेले हे प्रवाह छेदनबिंदूच्या क्षेत्रात निम्न कंप्रतेचा परिणाम घडवतात. उदा., एक प्रवाह ४,००० व दुसरा प्रवाह ३,९०० हर्ट्‌झ असेल, तर निष्पन्न किंवा विस्पंद कंप्रता (दोन संकेत एका अरैखिक मंडलात एकत्र केले असता त्यांतून निर्माण होणारी वा दोन संकेतांच्या कंप्रतांमधील फरकाएवढी असलेली कंप्रता) शंभर हर्ट्‌झ मिळते. एक प्रवाह स्थिर ठेवून दुसऱ्याची कंप्रता बदलती ठेवल्यास विस्पंद कंप्रतेत ० ते १०० असा लयबद्ध घडवून जास्त परिणामकारक उद्दीपण मिळू शकते. त्वचेने अस्वस्थ करणारे उद्दीपन व्यतिकरणाने [एकाच प्रकारचे दोन तरंगसमुह एकत्र आले असता होणाऱ्या परस्पर परिणामाने ⟶ व्यतिकरणमापन] टाळता येते.


गॅल्व्हानिक प्रवाहाने आयन प्रवेशन व पुटनिरास :अविरत वाहणारा २ ते ३ मिलिअँपिअर एकदिश प्रवाह १० ते १५ मिनिटे चालू ठेवतात. कार्बनी लवणे, विशिष्ट अमोनियम संयुगे, एंझाइमे इ. पदार्थांची आयन प्रवेशनाने (प्रवेश करून) स्थानीय संहती निर्माण करून वेदनाहरण, स्वेदनियंत्रण, ऊतक-विघटन यांसारखे परिणाम मर्यादित क्षेत्रात घडवून आणता येतात.

उच्च कंप्रता प्रवाह : वैद्यकशास्त्रातील हे १०० किलोहर्ट्‌झपेक्षा जास्त कंप्रतेचे प्रवाह खरे म्हणजे मध्यम कंप्रतेचेच म्हणता येतील. नीकोला टेस्ला वलय या उपकरणाच्या साहाय्याने हा प्रवाह प्रवर्तित केला जात असे. त्याचा उष्णताजनक परिणाम त्वचेपुताच मर्यादित असल्याने सध्या ही पद्धत फारशी वापरात नाही. काचेच्या विद्युत् अग्रांमधून निळसर जांभळा प्रकाश बाहेर पडत असल्याने या पद्धतीस चुकीने ‘जुंबुकिरण’ असे नाव पडले होते.

लघुतंरग ऊतकमापन :सुमारे २७ मेगॅहर्ट्‌झ इतक्या उच्च कंप्रेतचा प्रवाह वापरून खोलवर शेक दिला जातो. या पध्दतीत ११ मी. तंरगलांबीचे रेडिओ तंरग निर्माण होत असतात. स्नायू, सांधे इ. त्वचेपासून खोल असलेल्या भागांत निर्माण होणाऱ्या उष्णेतेबरोबरच ८ ते १० पट अधिक उष्णता त्वचेखालीही निर्माण होऊ शकते. अंगलटीला अनुरुप असे लवचिक विद्युत् अग्र किंवा जास्त दृढ असे हवा कोटर (उष्मीय निरोधनासाठी असलेली हवायुक्त बंदिस्त जागा) विद्युत् अग्र इष्ट जागी पट्‌ट्याने घट्ट बसवून १५ मिनिटे शेक दिला जातो. हातापायाभोवती गुंडाळण्यासारखे केबल विद्युत् अग्रदेखील वापरता येतात.

सूक्ष्मतरंग :ऊतकतापन चिकित्सेत त्वचेखाली होणारी उष्णतानिर्मिती कमी करण्यासाठी ही पद्धत जास्त चांगली असते. मॅग्नेट्रॉन उपकरणाने सुमारे २,४५० मेगॅहर्ट्‌झ कंप्रतेचा प्रवाह निर्माण करून तो समाक्ष केबलमधून अग्रापर्यंत नेला जातो. तेथे १२ सेंमी. तंरगलांबीच्या डेसिमीटर तरंगांचे विकिरण (पसरण्याची क्रिया) सुरू होते. हे तरंग शरीरपृष्ठापासून सु. तीन सेंमी. खोल जाऊन तेथे उष्णतानिर्मिती करतात. पाण्यात हे तंरग चांगले शोषले जातात. त्यामुळे वसा ऊतकापेक्षा रक्त व पाणी जास्त असलेल्या भागात, तसेच ओले कपडे, घाम आलेली त्वचा यांमध्ये तापमान जास्त वाढते. एका वेळी उपचार १० ते ३० मिनिटे करतात.

स्पंदित विद्युत् चुंबकीय ऊर्जा :या पद्धतीत उष्णता निर्माण न होईल इतक्या सौम्य तंरगांनी ऊतकपरिसरात फक्त विद्युत् चुंबकीय क्षेत्र निर्मिले जाते. इजा झालेल्या कोशिकापटलाच्या आतील भागावर बाह्यपृष्ठाच्या तुलनेने ४० मिलिव्होल्टइतके ऋण विद्युत् वर्चस् असते. नेहमी ते−६० ते−९० मिलिव्होल्टइतके असावयास पाहिजे. ऋण विद्युत् वर्चस कमी झाल्यामुळे आयनांच्या प्राकृतिक पारगमनावर मिळून प्रतिष्ठापनास (भरून येण्यास) आवश्यक अशी द्रव्ये कोशिकेत प्रविष्ट होत असावीत. २५ ते ६०० हर्ट्‌झ कंप्रतेचा प्रवाह सु. ६५ मायक्रोसेकंद अवधीच्या तरंगांच्या रूपात या पद्धतीत वापरला जातो. ऊर्जानिर्मितीस लागणारी शक्ती ३०० ते १,००० वॉट इतक्या मर्यादेत कमी जास्त करून क्षेत्राची पारगम्यता २ ते १५ सेंमी. इतकी साधता येते. 

पहा : ऊतकमापन चिकित्सा निसर्गोपचार भौतिकी चिकित्सा.

संदर्भ :1. Arnould Taylor, W. E. The Principles and Practice of Physical Therapy, Cheltenham, 1984.

          2. Forster, A. Palastanga, N. Ed., Claytons Electrotherapy-Theory and Practice, London, 1985.

         3. Shriver, W. J. Manual of Electrotherapy, New York, 1975.

         4. Watkins. A. L. Manual of Electrotherapy, New York, 1975.

श्रोत्री, दि. शं.